तथाकथित पुढार्‍यांची पोस्टर्स - निमित्त गणेशोत्सवाचे

Submitted by मानुषी on 2 October, 2008 - 03:12

यंदा गणेशोत्सवात पावसाने रोज हजेरी लावली. त्यामुळे बाहेर पडणंच झालं नाही. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा जरा बाजार पेठेत एक चक्कर मारू म्हणून निघाले. एकतर पावसाने रस्त्यांची दैना झालेली. आमच्या गावाला पावसाची अजिबात सवय नाही. त्यातच मंडळांच्या मांडवांसाठी वाट्टेल तिथे वाट्टेल तसं खणून ठेवलेलं. मांडवांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अगदीच निमुळते झालेले! अगदी आपली छोटुकली स्कूटी सुद्धा कशी चालवावी हा प्रश्नच होता. सगळीकडे वाहनांची भयंकर कोंडी झालेली.त्यातच कर्ण कर्कश्य ध्वनी़क्षेपकांमुळे कान किटलेले. आणि गाणी तरी कोणती? कोंबडी पळाली, नवीन पोपट, बीडी जलायले वगैरे गाणी. ......बाप्पांच्या करमणुकीसाठी!

सगळ्यात गंमत म्हणजे आमच्या मागच्या गल्लीत एका तथाकथित पुढार्‍याने मंडळांसाठी उभारलेल्या मांडवांच्या प्रत्येक खांबावर स्वता:चे फ़ोटो लावून "श्री. अमके तमके सर्व गणेश भक्तांचे स्वागत करीत आहेत." अशी पुस्ती जोडली होती. किमान पाच एकशे तरी फ़ोटो त्याने लावले होते. त्या भागातला अगदी एकही खांब त्याने सोडला नव्हता. आणि जर समजा नुसतं श्री. अमके तमके म्हणून जर.. हे कोण... असा प्रश्न कुणाला पडला, तर उगीच घोटाळा नको म्हणून स्वता:च्या नावापुढे कंसात टोपण नाव सुद्धा टाकलं होतं. म्हणजे काही उदाहरणे पहा --
श्री. पोपटराव गोजमगुंडे(तात्या), श्री. छबूराव येडगावकर(पप्पू), जालींदर मानकापे(भैय्यू) किंवा कौतुकराव लांडगे(रानबोके) वगैरे!
मनात आलं केवढी तयारी करावी लागत असेल यांना गणपती उत्सव आला की आधी स्वता:चे शे पाचशे फ़ोटो छापा...बॅनर तयार करा. पूर्ण गावभर स्वता:चे असे फ़ोटो लावायला मनाची केवढी तयारी पाहिजे......नाही का?

यातले बरेचसे फ़ोटो समोरून काढलेले........लाजर दॅन लाइफ़साईज! अगदी डोक्यावरच्या केसाच्या टोकापासून ते पायातल्या चपलेच्या टाचेपर्यंत सगळं अगदी नीट दिसलं पाहिजे.........आणि हो हातातला मोबाइल सुद्धा!
हे आता आमच्या मागच्या गल्लीतलं नुसतं उदाहरण आहे. तुम्हालाही माहिती आहेच पुढार्‍यांच्या प्रचंड पोस्टर्स मुळे सगळ्याच गावांची शोभा बिघडवली आहे. आणि असं काय कर्तृत्व आहे यांचं........?

आमच्या गावाला वेस आहे. म्हणजे एक सुंदर मोठ्ठी दगडी उंच कमान आहे. पूर्वीचं वैभव दाखवणारी.......पण आता याच वेशीवर मोठमोठी होर्डिंग्स् लावून गावातल्या पुढार्‍यांचे वाढदिवस साजरे होतात.
एक मोठा फ़ोटो पुढार्‍याचा आणि खाली त्याला शुभेच्छा देणायांचे असंख्य छोटे छोटे फ़ोटो. आणि सर्वांची नावे! (हो हो टोपणनावासकट)...... कधी युवा नेते.......कधी जाणता राजा........स्वता:ला काय वाट्टेल ते म्हणवून घेतात हे पुढारी.
अशाच एका पुढार्‍याचे नाव राजू/राजा/राजेश/राजेंद्र/राजकुमार ........किंवा याच मालिकेतलं काही तरी.........! तर त्याच्या वाढदिवसाला त्याच्या पोस्टरवरच्या पुढील ओळी वाचून चांगलीच करमणूक झाली. "मनासारखा राजा आणि राजासारख मन....."(?) पुढे अर्थातच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आता या गणेशोत्सवात एक छोटसं पोस्टर लोकमान्य टिळकांचं आणि शेजारीच त्याच्या चौपट मोठं पोस्टर पुढार्‍याचं. बरं ......फ़ोटो काढताना काहे तरी डेसेन्सी तरी बाळगावी? फ़ोटोत केस आणि डार्क काळा गॉगल यांनीच अर्धा चेहेरा व्यापलेला...कपाळावर भला मोठा शेंदराचा टिळा....! यापेक्षा तडीपार गुंडांचे फ़ोटो तरी बरे असतील.
माझ्या मुलाला हा फ़ोटोतला पुढारी भेटला(मागच्याच गल्लीत रहातो ना..). मुलाने त्याची जरा खेचली, तो पुढार्‍याला म्हणाला, " काय राव .....कस्सला भारी फ़ोटो लावलायस रे वेशीवर!"
त्यावर पुढारी म्हणाला ....एकदम बेफ़िकिरीने ...., "छ्या.... आपण नाही लावत भो......पोरं लावतात." हा किसा सांगताना माझ्या मुलाला हसू आवरत नव्हतं.
असो......चालायचंच .......काळाचा महिमा!
कालाय तस्मै नमा:!

गुलमोहर: 

मस्त एकदम.
काय भन्नाट पोस्टर्स लावतात हे पुढारी.
पुण्यात एका ठिकाणी कुत्र्याचे मोठे पोस्टर लावले होते, वाढदिवसाचे.
तोंडात हाडूक, डोळ्याला गॉगल वगैरे.

>> आणि हो हातातला मोबाइल सुद्धा!
Rofl

>>आणि हो हातातला मोबाइल सुद्धा>>
आणि झालच तर गळ्यातली जाड चकाकती चेन आणि मनगटावरच वळं Happy

यापेक्षा तडीपार गुंडांचे फ़ोटो तरी बरे असतील>>>>>>>
अगदि अगदि...... Happy
हा प्रकार आता सगळीकडेच दिसतोय.

कपाळावर भला मोठा शेंदराचा टिळा....! यापेक्षा तडीपार गुंडांचे फ़ोटो तरी बरे असतील.
---- बर्‍याच नेत्यांची (फुढार्‍यांची) काळी-कीर्द ची सुरवात तडिपारीतूनच झालेली असते.

माझ्या गावाच्या भेटीत मला "*** नगरीचे शिल्पकार *** साहेब यांना ३४ व्या वाढदिवसा निमीत्त हार्दिक शुभेच्छा" या भल्यामोठ्या होर्डिंगचे दर्शन रोज व्हायचे. फक्त ३४ वर्षात कसे काय एका नगरीचे शिल्पकार ठरवले जातात ? (हेच महाषय पाच वर्षे आधी गुंडगिरी करायचे). पायाजवळ ४-६ जणांचे लहान लहान बैठे फोटो (ह्यांनी नेत्यावरच्या प्रेमाखातर, गावातील लोकांच्या सोयी साठी हे होर्डिंग अगदी मोक्याच्या जागी लावले असते, जेणेकरुन सर्व लोकांना रोज विनासायास दर्शन घडावे). मग हा पुर्णाकृती फोटो संपुर्ण वर्षभर बघावाच लागतो (म्हणजे ३५ वा वाढ-दिवस येतो, नवीन वर्ष - नवे होर्डिंग).

जनतेला दर्शन देण्याच्या प्रबळ इच्छाशक्ती मधून मग निमीत्त निघते गणेशोत्सवाचे.

अचुक एकदम. इथे फॉर्टला एक कमान होती. त्यातली हात जोडणारी असामी कॅमेर्‍याकडे पहात होती. असा अपादमस्तक फोटो. विनोदी प्रकार सारा.

आणि ते टोपणनाव कंसात लिहीणे हा प्रकार तर जाम बोकाळला आहे. बसमधून येताना रोज नवनविन पोस्टर्स लागलेली दिसतात. पौडरोडवर परवा एक पोस्टर पाहीले, त्यात तो २०/२२ वर्षाचा मुलगा आणि त्याच्या नावापुढे कंसात (उद्योगपती) असे लिहीले होते. उद्योगपती असे टोपणनाव असू शकते का? Uhoh
शिवाय आजकाल तर श्रद्धांजली वाहक पोस्टर लावायचे ही फॅड आले आहे. आणि वरकडी म्हणजे त्यात पोस्टर करणार्‍याने जर का ४ ओळींची पेरणी केली असेल तर त्याची शोभा काय वाढली असेल याचा विचार करा.. आमच्या इथला एक मुलगा आकस्मात वारला, त्याच्या पोस्टरवर अशाच चार ओळी पाडल्या होत्या, त्यातली "जावोनी बैसला, दैवलोकी निवांत" ही ओळ माझ्या विशेष ध्यानात राहीली होती. Proud

खरंय.. सध्या काहीच्या काही प्रकार चालू आहेत..दहीहंडीच्या वेळेस लावलेल्या होर्डींग्ज मधे तर म्हणे पोलिसांना संशयित आरोपींचे फोटो दिसले!! Proud
दक्षिणे, "जावोनी बैसला, दैवलोकी निवांत">> Lol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy

मीना , कुत्र्याचे पोस्टर भन्नाट आयडिया. आणि वर तोंडात हाडुक ?......
उदय ...एक पोस्टर... (जाणता राजा - वर उल्लेखलेला-....)हा खरच गल्लीतला शेंबडा पोरगा होता. शिक्षण,कर्तबगारी सगळ्याच्या नावाने बोंब...आता फक्त वय वाढून तो कोणत्यातरी राजकीय पक्षात गेलेला.
कौतुक...........हा खरच विनोदी प्रकार आहे.
दक्षिणा.........जावोनी बैसला आणि उद्योगपती............अशक्य कोटीतला विनोद आहे!!!!!!!!!
आणि आशू .............स्वरूप , झकासराव सर्वांना धन्यवाद.........प्रतिसादाबद्दल!

कालच देवीच्या तोरणाची मिरवणूक चालली होती..त्यात देवीच्या मागच्या बाजूला पाठमोरे होर्डींग होते..एका तरुण मुलाला दिलेल्या श्रद्धांजलीचे. त्यावर लिहीले होते
"जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला".. यमक जुळवण्याची गोची झाली म्हणून जो च्या जागी जोची??? हा शब्द तरी ऐकलाय का कुणी ? Proud

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy

जावोनी बैसला.... महान आहे. हहपुवा Happy

विषय निघाला म्हणून--
"कार्यकर्ते, समर्थक, भक्त, अनुयायी इ." मधील एक उतारा..

भोळा रे भोळा! अरे आपले भावी नेते, आमदार, खासदार त्यातूनच तयार होत असतात. गल्लोगल्ली जागा मिळेल तिथे लहान-मोठी-भव्य-अतिभव्य पोस्टरं बघतोस का? समर्थक लोक स्वतःच खर्च करून नेत्यांच्या अभिनंदनासाठी ती लावतात. त्यात स्वत:चीही नावं अन फोटो टाकतात. जितकं मोठं पोस्टर, तितका मोठा फोटो, अन तितकी जास्त दहशत- म्हणजे लोकप्रियता! ही पोस्टर संस्कृती फक्त अध्यक्ष, मंत्री, आमदार, खासदार यांच्यापुरती मर्यादित न राहता गल्लीबोळातील 'उगवते तारे', 'भाग्यविधाते', 'युवा नेतृत्व' यांच्यापर्यंत पोचली आहे. गंमत म्हणजे अशी पोस्टरं लावण्यासाठी कोणतीही जागा तर चालतेच, पण निवड होण्यापासून बाप होण्यापर्यंत अन वाढदिवसापासून डास चावण्यापर्यंत कोणतेही कारण चालते. आता या पोस्टरांवर अतिक्रमणापासून ते शहर विद्रूप करण्यापर्यंत अनेक आरोप काही सामान्य अन मुर्ख लोक करतात. पण खरं तर ही पोस्टरं लोककल्याणासाठीच असतात. कोण कोणाचे समर्थक आहेत, कोण पॉवरफूल आहेत, कोणाची 'हवा' आहे- अशी अमुल्य माहिती जनतेला त्यातून मिळत असते. विशेषतः 'युवा' अन 'उगवत्या' नेतृत्वांना या पोस्टरांची महती जरा जास्तच कळलेली असते. त्यामुळे मिसरूडही न फुटलेले, स्वतःचं नावही नीट न लिहू शकणारे अनेक सुघड-अवघड, तरूण-तडफदार, अनेकरंगी-बहूढंगी, कळकट-तलवारकट, हिरोस्टाईल-सडकछाप चेहरे चोकाचोकांतून या पोस्टरांतून जनतेला अव्याहत दर्शन देत असतात. हेच समर्थक आपल्यासारख्या सामान्यांचे भावी नेते. कळलं?
...
वेळ असल्यास पुर्ण वाचा.. Happy
http://www.maayboli.com/node/2121

--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!

साजिरा पूर्ण वाचलं. सुंदर लिहिलय!
आशू जोची तोची यमक महान आहे.
सर्वांना धन्यवाद................प्रतिसादाबद्दल.

माधुरी ,
ईद निमित्त आमच्या जवळच्या चौकात पोस्टर्सची इतकी दाटी झाली आहे की फोटो काढून इथे द्यायला पाहिजे. आज बघते जमत का ते.

हो मीना तू ईदच्या पोस्टर्सचा फोटो देच! आम्हालाही पाहू देत.