ऑक्टोबरचा शेवट जवळ येतोय. रखडलेला पाऊस संपून उन्हाचा प्रताप जाणवायला लागलाय. त्यातच अचानक गारठा वाढल्याची जाणीव झाली. काल झोपताना घसा खव-खवल्या सारखं वाटलं. लगेच मनाचा 'कारणे शोधा' खेळ सुरु झाला. "रात्री जेवताना दही खायला नको होतं असं वाटून गेलं. आयुर्वेद-वाले ओरडतात त्यांची चेष्टा केल्याचं पाप भोवलं बहुतेक." पासून ते, "घरी येऊन गेलेलं कोण कोण खोकत, सुरसुरत होतं ते आठवून पाहणं" आणि सरते शेवटी, "या गोष्टी या सिझन मध्ये व्हायच्याच, आपलाच resistance कमी पडला" हा समजूतदार निष्कर्ष काढला, साहजिकच आहे. दोन दिवसापासून रात्री बारा एक पर्यंत आलटून पालटून Laptop आणि सदा'शिव' फोन (टच-स्क्रीन) वर हात आणि बोटे चालवून झोपेचं आणि दुसऱ्या दिवशीच्या (आठवड्यातून एकदाच घडणाऱ्या) मॉर्निंग-वॉक चं स्वतःहून खोबरं केलं, हेच नडलं असं स्वतःला स्पष्टपणे सांगितलं.
सर्दीला परिचित मंडळी फारशा गंभीरतेने घेत नाहीत, विशेषतः दुसऱ्याला झालेल्या. ऑफिसवाल्यांचा, त्यात काय रजा काढायची, साधी सर्दी तर आहे, असा अविर्भाव असतो. त्यात घरी अस्पृश्यांसारखी वागणूक. म्हणजे जेवताना “पोळीच्या डब्यात हात घालू नको, काय हवंय ते मागून घे”, झोपताना “पंखा बंद होणार नाही, तू बाहेरच्या खोलीत झोप हवं तर”, टीव्ही पाहताना “ई.. हा इथे पडलेला रुमाल ‘त्याचा’ आहे का? तो उचल जरा”, पोरांना “ए, त्याच्या जवळ-जवळ करू नका रे, कितीदा सांगायचं (+धपाटा फ्री)” वगैरे.
नाक चोंदणे, गळणे, लाल होते, अंगदुखी याचबरोबर सर्दीतला मुख्य फटाका म्हणजे शिंका. त्या कधी चालू होतील आणि किती फैरी झाडल्या जातील याचा काही अंदाज नसतो. आपण सगळं ‘कोरडं’ करून आवरून थोडा वेळ टीव्ही पाहावा म्हणून कॉटवरून उतरून बाहेरच्या खोलीत निघण्याचाच अवकाश की खिंडीत गाठलंच म्हणून समजा. आधी नाकपुडीच्या वरच्या भागात होणारी हलकी, खट्याळ हुलकावणी युक्त हुळ-हुळ. आपण मनोनिग्रहाने ती परतवायचा आटोकाट प्रयत्न करत अर्धवट ओठ विलग, नाक हवेत अर्धवट बॉनेट उघडल्यासारखे आणि डोळे अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्धाप्रमाणे अर्धोन्मीलित करून दोन पावले टाकतो तोच ती “मी आ....ले, निघा...ले” असा संदेश देत स्फोट घडवून आणतेच. कधी कधी तर तिचा जोर इतका असतो की मला घटना घडून जाऊन डोळे उघडल्यावर मला माझी दिशा आणि अक्षांश, रेखांश पूर्णपणे बदललेले जाणवतात. ह्यावेळी रुमाल बरोबर असेल (नसतोच) तर ठीक, नाहीतर काही खरं नाही. ही सलामी ऐकल्या-ऐकल्या आजू-बाजूची मंडळी कोरसात धृपद म्हणावं तसं, “पायात घाल, अंगात घाल, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको” असं आवर्जून आवाज चढवून घोकत असतात. आता तुम्ही जर मोक्याच्या क्षणी बेसिन अडवून मजा पाहत उभं राहाल तर घेतला ‘वसा’ मी टाकणार कसा त्यात हेच मला कळत नाही.
तर मंडळी, अशी ही वर्षातून २-३ दा छळणारी सर्दी आताही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे हे मी ओळखलंय. फार स्वतःला दोष देण्यात अर्थ नाही. सर्दी, खोकला आणि फार तर चवीपुरता ताप याचा योग बहुतेक माझ्या यंदाच्या राशीभविष्यात लिहिलेलाच आहे. यंदा जमेल तितकी ती एन्जॉय करता येईल का ते पहायचं आहे. आता पुढचं प्लानिंग. ओढवू शकणाऱ्या परिस्थितीची बायकोला कोपऱ्यात बोलावून शांत-पणे कल्पना दिली. "तरी मी म्हणत होते" स्तोत्रा पासून 'घालीन लाटणे, ओढीन चरण' पर्यंत तीन वेळा ऐकून झाल्यावर आवश्यक काळजी आणि लागणारी सेवा आणि शुश्रुषा या महत्वाच्या मुद्द्याकडे तिचं लक्ष वेधलं. खोलीतला मोक्याचा, पंख्याचा वारा लागणार नाही, हाताशी Laptop, मोबाईल, टेबल-दिवा वगैरे लगेच हाताशी येतील तरीही बैठकीतला TV बरोब्बर दिसेल असा कोपरा हेरून ठेवला. पायमोजे, विक्स, कानटोपी, ३ मऊ रुमाल, वाचायला उत्तम पुस्तके असे जंगम सामान तसेच अलोपाथिक (क्रोसिन, septran वगैरे डॉक्टर ने शिव्या घालण्यापूर्वी स्वतःची बुद्धी चालवून घ्यायची) औषधे, गवती-चहा, आले-सुंठ, दालचिनी यांचा stock तपासून घेतला आहे. ऑफिस मध्ये अशावेळी नेमके टाळता न येणारे काम निघते, त्यांना पाठवायचा कारुण्यपूर्ण, खेद-दर्शक SMS सगळी प्रतिभा पणाला लावून रचून ठेवला आहे. फक्त सकाळी उठून 'सेन्डा'यचा बाकी ठेवला आहे. आता शोले मध्ये विरू आणि जय शेवटी पिस्तुले भरून पुलाच्या एका बाजूला दबा धरून बसतात तसा मी ready आहे, त्या पहिल्या दणदणीत मुहूर्ताच्या शिंके-ची वाट पाहत. एकदा शिक्का-मोर्तब झाले कि पुढील शिंकाच्या रणधुमाळीमध्ये "मी और मेरी सर्दी, अक्सर एक दुसरेसे बाते करते है" म्हणत उरलेला सोहळा पार पाडण्याचे ठरवले आहेच. आपणही रजा शिल्लक असेल तर नुसत्या या पोस्ट वर 'कॉमेंट' मारण्या व्यतिरिक्त मला अवश्य भेटायला येण्याचे करावे. चार शिळोप्याच्या गप्पाही होतील आणि न-जाणो, हा अनमोल ठेवाही तुम्हाला देता येईल. एक मिनिट....ऑक..छी!!!
वाचेंएगे वाचेंगे..आप लिखते
वाचेंएगे वाचेंगे..आप लिखते रहो..
धमाल लिहता..मझा आ गया
हे ही भारी जमलय! सदाशिव !
हे ही भारी जमलय!
सदाशिव !
मस्त मजा आली
मस्त मजा आली
लय भारी रे.....
लय भारी रे.....
व्वा मस्त .. तुमची लेखनशैली
व्वा मस्त ..
तुमची लेखनशैली छान आहे .. लिहित रहा
खुप छान लिहलंय ..... आवडेश
खुप छान लिहलंय ..... आवडेश
जबरा आहे
जबरा आहे
ज ब री
ज ब री
भन्नाट !!! पुलेशु
भन्नाट !!!
पुलेशु
सदाशिव>> आणि शिंकेचे इतके
सदाशिव>>
आणि शिंकेचे इतके महान वर्णन कद्द्द्धी म्हणून वाचले नव्हते.... प्रत्येक ओळीने मजा आणली.... लिहीते रहा
सदाशिव फोन >>
सदाशिव फोन >>
फारच मस्त ! सर्दी एक उच्छाद
फारच मस्त !
सर्दी एक उच्छाद असते हे खरे आहे. पण आपण घरी झोपून सर्दी 'उपभोगू' शकतो हे पण खरे आहे.
(No subject)
मस्त..आवडलं..
मस्त..आवडलं..:)
सहीच !
सहीच !
सदा'शिव' फोन (+धपाटा फ्री)”
सदा'शिव' फोन
(+धपाटा फ्री)” वगैरे.
अर्धवट ओठ विलग, नाक हवेत अर्धवट बॉनेट उघडल्यासारखे आणि डोळे अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्धाप्रमाणे अर्धोन्मीलित करून दोन पावले टाकतो तोच ती “मी आ....ले, निघा...ले” असा संदेश देत
भन्नाट! अफाट!
भन्नाट! अफाट!
कसल लिहील आहेस लगेच मनाचा
कसल लिहील आहेस
लगेच मनाचा 'कारणे शोधा' >>
सर्दीला परिचित मंडळी फारशा गंभीरतेने घेत नाहीत>>
त्यात घरी अस्पृश्यांसारखी वागणूक. म्हणजे जेवताना “पोळीच्या डब्यात हात घालू नको, काय हवंय ते मागून घे”, झोपताना “पंखा बंद होणार नाही, तू बाहेरच्या खोलीत झोप हवं तर”, टीव्ही पाहताना “ई.. हा इथे पडलेला रुमाल ‘त्याचा’ आहे का? तो उचल जरा”, पोरांना “ए, त्याच्या जवळ-जवळ करू नका रे, कितीदा सांगायचं (+धपाटा फ्री)” वगैरे.>>
अगदी अगदी .. !
सदा'शिव' फोन
अर्धवट ओठ विलग, नाक हवेत अर्धवट बॉनेट उघडल्यासारखे आणि डोळे अजिंठ्याची अप्सरा अथवा गौतम बुद्धाप्रमाणे अर्धोन्मीलित करून दोन पावले टाकतो तोच ती “मी आ....ले, निघा...ले” असा संदेश देत >> कस काय सुचत ?.. खुप छान लेखनशैली ! सगळा लेखच मस्त
सगळंच नेहमीच छान
सगळंच नेहमीच छान लिहिता.चांगलं विनोदी लिहिण्यासारखं माणुसकीचं काम नाही. हा विनोद नाही :)) शुभेच्छा.
सदाशिव फोन --------- भन्नाटच
सदाशिव फोन --------- भन्नाटच ! सर्दीवर शिंकामोर्तब झालं.
झक्कास, जमलाय लेख्. तो "वसा",
झक्कास, जमलाय लेख्. तो "वसा", ते "वसा" घेणं आणि टाकणं... शिंक येण्याची प्रक्रिया... मै और मेरी सर्दी, घालीन लाटणं, ओढीन चरण (मला एकदा स्वतःशी म्हणून मूळ शब्दं आठवावे लागले)... सगळच प्रचंड खास... मुंगेरीलालछाप.
निखळ विनोद! सुर्रेख.
कधी कधी तर तिचा जोर इतका असतो
कधी कधी तर तिचा जोर इतका असतो की मला घटना घडून जाऊन डोळे उघडल्यावर मला माझी दिशा आणि अक्षांश, रेखांश पूर्णपणे बदललेले जाणवतात >>>>>>>>>
मुंगेरीलाल गायब झालेत का
मुंगेरीलाल गायब झालेत का ?????????????
मस्तं लिहिलंय..
मस्तं लिहिलंय..
जबरदस्त
जबरदस्त
मस्तं लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
@ मुंगेरीलाल,
@ मुंगेरीलाल,
झकास लिवलयं ! शिंकेच्या प्रसूतीकळा तंतोतंत
@ Diggi12
तुमच्या जुने (दुसऱ्यांचे) धागे वर काढण्याच्या नादामुळे हा खुसखुशीत लेख वाचायला मिळाला, आभार !
जबरदस्त लिहीलंय. अत्ता मला
मुंगेरीलाल, जबरदस्त लिहीलंय. अत्ता मला सर्दी होऊन गेल्यामुळे अगदी अगदी झालं. एक नंबर आहे लेख, शिर्षकापासून शेवटपर्यंत.
>>>मुंगेरीलाल,
झकास लिवलयं ! शिंकेच्या प्रसूतीकळा तंतोतंत Lol
@ Diggi12
तुमच्या जुने (दुसऱ्यांचे) धागे वर काढण्याच्या नादामुळे हा खुसखुशीत लेख वाचायला मिळाला, आभार !>>>++१११११ अनिंद्य तुम्हाला ही धन्यवाद.
धन्यवाद परंतु खरे श्रेय
धन्यवाद परंतु खरे श्रेय धागाकर्त्यांचेच
Pages