तुझी सुगंधी झुळूक जेव्हा हळूच या काळजात आली....

Submitted by सतीश देवपूरकर on 12 October, 2012 - 05:42

गझल
तुझी सुगंधी झुळूक जेव्हा हळूच या काळजात आली....
स्वप्नांमधली फूलपाखरे डोळ्यांच्या उपवनात आली!

रुणझुणली झुंबरे मनाची, किणकिणले अंतरात काही;
तार तार छेडीत तनूची, याद तुझी गात गात आली!

कितीक दिवसांनी उर्मीची एक लहर दिसली उठलेली!
चोरपावलांनी आकांक्षा अलगद माझ्या मनात आली!!

वळून मी पाहतो आजवर केलेली वाटचाल तेव्हा......
कळे न केव्हा ताकद माझ्या अपंग या पावलात आली!

लळा लागला वनास माझा, जडली माझ्यावरती प्रीती!
तरू बहरले वनामधे अन् रानफुले अंगणात आली!!

दया, अहिंसा, आस्था, निष्ठा दिसू लागली थोडी थोडी!
प्राणी सुद्धा म्हणू लागले.....माणुसकी माणसात आली!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे शेर आवडले
हळूवारपणे उतरलेत अगदी .
छान ..........आपल्या खास शैलीचा टचही छान लाभलाय या गझलेला तो जास्तच शोभून दिसतोय

धन्यवाद

धन्यवाद वैभवा!
तू मला प्रतिसादाबद्दल ज्या गोष्टी सुचवल्यात, त्या आचरणात आणण्याचा कटाक्षाने प्रयत्न आजपासून सुरू केला आहे. धन्यवाद! आताच रणजीताच्या गझलेवर आटोपशीर व विनापर्यायी असा प्रतिसाद दिला आहे बघ. कसा वाटतो तो. खूप मुरड घालायला लागली, पण तू म्हणतोस तसे हळूहळू आम्हास सवय होईल बहुधा! पण, वैभवा आईशपथ सांगतो, खूप त्रास झाला रे! आमच्यातला शिक्षक खूपच हिरमुसला रे! पण आम्ही एक ठरविले आहे, की तुझ्यासारख्या हितचिंतक गझलकाराचे ऐकायचे आता!
बघू ऐकून वा-याचे, बघू या काय होते ते!
धरू या बोट रस्त्याचे बघू या काय होते ते!

..........प्रा.सतीश देवपूरकर

जरा असे वाचून पाहा

तुझी सुगंधी झुळूक जेव्हा हळूच या काळजात आली.... तेव्हा...स्वप्नांमधली फूलपाखरे डोळ्यांच्या उपवनात आली!

...ह्या गझलेतले सगळेच शेर असे वाचता येतात....
दोन वाक्यांनी शेर बनतो का? बनवता येतो का आणि तसा बनवल्यास तो गझलेच्या व्याख्येत बसतो का असा एक बाळबोध प्रश्न पडलाय मला.

प्रमोदजी!
कुठलाच प्रश्न बाळबोध नसतो. पण, विचारलेत ते बरे केलेत! डोळसपणे जेव्हा आपण एखदी गोष्ट शिकतो, तेव्हा ती निश्चितच आपणास एक ना एक दिवस वश होते! निर्भीड होवून प्रश्न विचारायलाच हवा! असो.

आपण मतल्यातल्या दोन ओळीत तेव्हा शब्द घालावा का असे विचारलेत.

आपण जर मतल्यातली पहिली ओळ वाचलीत तर तिच्यात जेव्हा असे लिहिले आहे. पहिली ओळ ही शेराची प्रस्तावना वा पूर्वार्ध असते. तिच्यात जेव्हा आल्यानंतर, दुस-या ओळीत तेव्हा काय? असाच प्रश्न उपस्थित होतो. त्याचेच उत्तर दुस-या ओळीत यायला हवे. इथे दुस-या ओळीतील ‘तेव्हा’ शब्द अव्यक्त आहे. का? कारण जेव्हा असे झाले, तेव्हा अमुक अमुक झाले असेच विधान शेरात व्यक्त होणार असते. त्यामुळे तेव्हा शब्द दुस-या ओळीत नाही लिहिला तरी चालते, तो खूपच अपेक्षित असाच आहे इथे.

गझलेतील शेरात असे कोणते शब्द अव्यक्त ठेवतात/ठेवता येतात, व तसे ते का अव्यक्त ठेवायचे?<<<<<<<<

प्रमोदजी! गझलेतील प्रत्येक शेर म्हणजेच द्विपदी म्हणजे तिच्या जागी एक स्वयंपूर्ण, सर्वांगसुंदर अशी दर्जेदार कविताच असते, जिला वरील वा खालील कोणत्याही द्विपदीचा संदर्भ लागत नाही. नुसती तीच द्विपदी जरी वाचली तरी वाचकाला एक संपूर्ण कविता वाचल्याचा व अनुभवल्याचा आनंद मिळतो.

आता दोन ओळीत जेव्हा एखदा खयाल प्रभावीपणे मांडायचा असतो, तेव्हा हाताशी असलेली जागा फारच कमी असते. त्यामुळे शेर लिहायला अभिव्यक्ती ही अत्यंत प्रभावी असावी लागते. एकाही अनावश्यक शब्दाला त्यामुळेच शायर शेरात स्थान देऊ शकत नाही. म्हणून जे शब्द खूपच अपेक्षित व सहज असतात, ते कवी अव्यक्त ठेवू शकतो, म्हणजे दुस-या पात्र शब्दांस शेरात वाव मिळू शकतो.

उदाहरणार्थ...........
जेव्हा......तेव्हा...........यातील एक अव्यक्त राहू शकतो.
जो..........तो.
ज्याने......त्याने
असे झाले...........म्हणून......
तसे आहे.............म्हणून
इत्यादी. अशा अव्यक्त शब्दांनी आशयाच्या अभिव्यक्तीत काहीच बाधा येत नाही/येवू नये.

आम्हास वाटते आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाले असेल! थांबतो!
.............प्रा.सतीश देवपूरकर

सर,आपलं विवेचन कळलं मला आणि पटलंही....पण राग नसावा....आपल्या गझलेतल्या बर्‍याचश्या द्विपदी ह्या गद्यात खपून जाणार्‍या आहेत असं माझं प्रांजळ मत आहे...त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की दोन गद्य ओळी(आधी प्रश्न आणि मग त्याचे उत्तर किंवा परस्परपूरक किंवा वर्णनात्मक) कवितेच्या धाटणीने मांडल्या तर तो शेर होऊ शकतो का?
जर होऊ शकत असेल तर मग गद्यात आणि पद्यात फरक असा कुठे राहिला?
गद्यात जे दहा ओळीत सांगावं लागतं तेच कवितेत दोन ओळीत सांगता आलं पाहिजे...तर ते पद्य समजलं जावं असं माझं बाळबोध मत आहे

प्रमोद काका तुम्ही आम्हासर्वापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात (कदाचित सरान्पेक्षाही) हे बहुधा देवसराना माहीत नाही

मघापासून आमची गम्मत म्हणून बाळबोध बाळबोध म्हणताहात म्हणून सहजच मधे बोललो
असो
चालुद्या आपले सम्भाषण .!:)

वैभवा,वयाने ज्येष्ठ असलो तरी साहित्याच्या प्रांगणात..त्यातूनही काव्य म्हणजे गझलेसारख्या विषयात मी अगदीच कच्चा लिंबू(आयडी नव्हे) आहे...त्यामुळे माझे प्रश्नही तसेच बाळबोध(सरळ भाषेत बावळट) असतात.
सरांचं सगळं आयुष्य गझल लेखनात गेलंय त्यामुळे त्यांच्यासमोर मी ह्या विषयात विद्यार्थीच आहे....अर्थात नुसत्या शंका विचारणारा...माझ्या हातून गझल वगैरे काही लिहीली जाणार नाही हे निश्चित!
वर्गात एखादा वाया गेलेला,व्रात्त्य मुलगा असतो ना..तसा समज ! Happy

प्रमोदजी! धन्यवाद प्रतिप्रतिसादाबद्दल!
आम्हास काशालाबुवा राग यावा! उलट आनंद झाला की, चला काहीजण तरी कवीपेक्षा कवितेचा/पद्याचा तर्कशुद्ध विचार करत आहेत.
इथे मूळ प्रश्न गद्य व पद्य यातील फरकाचा आहे.
पद्य जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्यात काव्य/कविता/शायरी/शेर/सुभाषित इत्यादी सर्व आले.
पद्य कोणत्याही form मधे लिहिता येते, जसे, मुक्तछंद/वृत्तबद्ध कविता/गीत/गझल/लावणी/शायरी/अभंग/ ओवी/विराणी/गवळण वगैरे.
पण मुळात काव्य/कविता/किंवा पद्य कशाला म्हणायचे...........हे इथे विस्ताराने सांगणे अशक्य आहे. तू फोन कर वा समक्ष आमची गाठ घे, म्हणजे सविस्तर बोलता येईल. तरीही, कोणत्याही कवितेच्या सौंदर्यशास्त्राच्या पुस्तकात डोकावलेस तर तुला काव्य कशाला म्हणायचे, सुंदर/अलौकिक काव्य म्हणजे काय, कवितेच्या असंख्य व्याख्या, कवितेचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण कसे करतात वगैरे माहिती मिळेल.

थोडक्यात जमेल तसे सांगण्याचा प्रयत्न करतो..............
ते आम्ही खालील मुद्यात मांडू इच्छितो.............
१)कविता ही एक वक्रोक्ती असते
२)काव्य म्हणायला आशयाचे/विचारांचे सौंदर्य अपेक्षित असते.
३)म्हणजेच मुळात आपणास जे मांडायचे आहे त्यात एक सौंदर्य पाहिजे, आशयघनता असायला हवी!
४)कमीतकमी शब्द, नेमके आशयघन शब्द, व थेट काळजास चटका लावणरी अभिव्यक्ती, यामुळे काव्याची निर्मिती होते.
५)कामयाब कवितेला अर्थांचे अनेक पदर असतात.
६)कवितेतून कवी बाजूस व्हायला हवा, व कविता universal व्हायला हवी!
७)वैयक्तिक सुखदु:खांचे उदात्तीकरण करण्याने काव्य होत नसते!
८)गद्य देखिल पद्यमय/पद्यात्मक असू शकते...........उदाहरणार्थ प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे कोणतेही भाषण हे पद्यात्मक गद्यच गणले जाते!

इतरही अनेक मुद्दे आहेत पण, ते प्रत्यक्ष भेटीतच बोलू!

आमच्या या गझलेतील कोणताही शेर काव्याच्या कसोटीवर उतरत आहे का, हे आपणच पहावे. त्यांचे शाब्दीक, लाक्षणिक व ध्वन्यार्थ लक्षात घ्यावे! सौंदर्य व उत्तरे आपल्या लक्षात येतील!
पद्याचा भास होण्यासाठी, शब्दांची ओढाताण होणे/करणे, शब्दबंबाळपणाकरणे
वगैरे अनावश्यक असते. उलट कामयाब शेर/कविता ही अगदी प्रासादिक, सोपी, थेट, प्रांजळ व बोली असली पाहिजे! अशा पद्याला गद्यात समावेश कसे कोण करेल?
.....................प्रा.सतीश देवपूरकर
टीप: प्रत्येक शेर घेवून त्यातील निखळ काव्य/काव्यसौंदर्य उलगडू शकतो, पण इथे ब-याचजणांना ते सोसणार नाही, म्हणून बाकीचे प्रत्यक्ष भेटीतच बोलू!
.............प्रा.सतीश देवपूरकर

प्रमोदजी!
आम्हास आपले वय/अधिकार/कारकीर्द/कामगिरी वगैरे काही माहीत नव्हती. वैभवाच्या प्रतिसादावरून समजले. आपणास अरे तुरे केल्याबद्दल क्षमस्व!
आहो! कुणी किती वर्षे लिखाण करतो यापेक्षा काय लिखाण करतो हे महत्वाचे!
आम्ही जरी पेशाने भूशास्त्राचे प्राध्यापक असलो, तरी आजन्म विद्यार्थीच आहोत भूशास्त्रातही व गझलक्षेत्रातही!
भेटू या कधी तरी!
...........प्रा.सतीश देवपूरकर

मजा आली वाचून हा धागा
मला ही गझल स्क्रीन वर साईडला हे पण पहा ह्या विभागात दिसली मस्त सोय उपलब्ध करून दिली आहे मायबोलीने त्याबद्दल धन्यवाद संयोजकांचे
मजा आली

शब्दकळा अत्यंत आवडली... गझलेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष असतात.. मी हिला गझल सदृष म्हणेण अर्थात माझ्यापुरते.