विचारू चला !

Submitted by रसप on 12 October, 2012 - 00:02

घराची दिशा चालणारी कुठे वाट आहे जगाला विचारू चला
'मला ठाव नाही' म्हणाले कुणी तर 'विचारू कुणाला?' विचारू चला !

सुगंधी हवा वाहते, पैंजणांचा घुमे नाद वाऱ्यासवे मुग्धसा
'तुझा गंध चोरून गेली कुठे ती?' जुई-मोगऱ्याला विचारू चला

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला !

इथे रोजच्या दगदगीतून जगणे स्वत:च्या मनासारखे विसरलो
हसावे कसे अन रडावे कसे गोजिऱ्या बालकाला विचारू चला

कुठे देश आहे असा की जिथे कायदाही नसे, नांदते शांतता
'कुणी आखल्या सांग सीमा इथे?', माजल्या मानवाला विचारू चला !

'जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला !

....रसप....
११ ऑक्टोबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post_12.html

============================

टीप:-
समांतर/ पर्यायी एखाद-दुसरा शेर चालेल. अख्खी गझल देण्याचा आगाउपणा कृपा करून करू नये. हे आधीच सांगतो आहे कारण नंतर कंटाळवाण्या चर्चांची गु-हाळं सुरू होतात, जी मला माझ्या गझलेवर नको आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घराची दिशा चालणारी कुठे वाट आहे जगाला विचारू चला
'मला ठाव नाही' म्हणाले कुणी तर 'विचारू कुणाला?' विचारू चला ! >>> वाह वाह!!

सुगंधी हवा वाहते, पैंजणांचा घुमे नाद वाऱ्यासवे मुग्धसा
'तुझा गंध चोरून गेली कुठे ती?' जुई-मोगऱ्याला विचारू चला >> प्रेडि़क्टेबल!

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला ! >>> सुपर्ब!

इथे रोजच्या दगदगीतून जगणे स्वत:च्या मनासारखे विसरलो
हसावे कसे अन रडावे कसे गोजिऱ्या बालकाला विचारू चला >> किंचीत लय अडकतेय.

कुठे देश आहे असा की जिथे कायदाही नसे, नांदते शांतता
'कुणी आखल्या सांग सीमा इथे?', माजल्या मानवाला विचारू चला ! >> खणखणीत

'जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला ! हम्म.. आवडला शेर.

एकूणच गझल खूप आवडली. वृत्त अतिशय लाडके असल्याने पुन्हा पुन्हा वाचली.

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला ! >>> क्या बात !!

काही सुटे मिसरे आवडले ........

जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला ! >>>>दोन स्वतन्त्र ओळी खूप सुन्दर !

......पण एकसन्ध शेर पाहताना मला नीटसे कनेक्षन लागले नाही .क्षमस्व !!
पण हा शेर मला खूप आवडला .थोड्याफार बदलानन्तर हा शेर मला माझ्या विठ्ठलासाठी म्हणता येइल असे वाटले !!

जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या शायरीचा मळा
'तुझे पीक येते कधी अन कसे रे? चला....विठ्ठलाला विचारू चला !

धन्स !!

_______________________

अवान्तरः आज तूही माझ्यासारखाच टीप देऊन 'पर्यायी'पासून वाचलास नक्की !(तिकडे प्राजूनेसुद्धा तुझी हीच टीप कॉपी-पेस्ट केलीय बघ आज !)
....आता हळूहळू हा पायण्डाच पडणार बहुधा मायबोलीवर !!:)

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला ! >>> सुरेख..

रणजीता!
हा माझा तुझ्या गझलेवरील गद्य प्रतिसाद!...........

१)शेर नंबर १........ठाव नाही....खटकले. ठाऊक नाही अशा अर्थी काही तरी हवे होते बहुधा! ठाव शब्दाला वेगळा अर्थ आहे, पण प्रतिसादाची लांबी खुपायला नको म्हणून लिहिणे टाळत आहे! आशयाच्या मानाने वृत्तलांबी पायघोळ वाटली..........वै.म.

२)शेर नंबर २........‘मुग्धसा’ शब्दाचा अर्थ अस्पष्टसा असा मी घेतला........बरोबर आहे का? कुठे ती गेली म्हणजे ती सुगंधी हवा कुठे गेली असेच ना? प्रेयसीवर जर हा शेर असेल तर सुगंध/तुझा गंध, वा-यासवे घुमणारा पैंजणाचा मुग्ध नाद व तिचा(प्रेयसीचा/सुगंधी हवेचा) पत्ता जुईमोग-याला विचारू या, हे आशयाचे तुकडे/प्रतिमांची गुंफण मला तरी जोडताना अडचण वाटली! या प्रतिमासृष्टीत सुगंध व नाद या दोन भिन्न प्रकारच्या संवेदना आलेल्या आहेत, ज्या एकजीव व्हायला हव्यात. अशी शब्दयोजना हवी! तुझी टीप आड येते रे, म्हणून जास्त लिहिणे/पर्यायी देणे टाळत आहे. काठाकाठावरून प्रतिसाद दिल्यासारखे वाटत आहे. पण मुरड घालायला शिकतो आहे!

३)शेर नंबर ३......... दुसरी ओळ सुंदर! ‘दु:खात बिलोरी झालेले शब्द’ या शब्दसमूहाला पहिली ओळ न्याय देते का, असे वाटून गेले. बिलोरी म्हणजे crystalline/glassy, स्फटिकासमान.

४)शेर नंबर ४
......गोजिरे बालक म्हणजे देखणे/सुंदर/छान बालक. इथे समग्र शेरात गोजिरे विशेषण खटकले. इथे निरागस/निष्पाप सारखे काही तरी हवे होते असे वाटले.........पर्यायी टाळतो आहे!


५)शेर नंबर ५
.........ठीकठाक!

६)शेर नंबर ६......छान! पहिली ओळ फारच सुंदर व अलौकिक! त्याकरता तुझे अभिनंदन रणजीता! रंगल्या पत्थराला म्हणजे देवाच्या/शेंदूर फासलेल्या मूर्तीच्या दगडाला असे आहे का? की, अन्य काही अर्थ तुझ्या मनात आहे, रणजीता?......जिज्ञासा म्हणून केवळ विचारले!

रणजीता, माझा एक मतला व एक शेर आठवले, म्हणून देत आहे! देऊ ना? जाऊ दे, देतोच कसा!..............................

सुने सर्व रस्ते! पुकारू कुणाला?
तुझा थांगपत्ता विचारू कुणाला?

तुझ्यासारखी झाक नाही कुणाची;
तुझ्या कुंचल्याने चितारू कुणाला?

...........प्रा.सतीश देवपूरकर

टीप: रणजीता तू लिहिलेल्या टीपेमुळे आमच्या लेखणीस बेड्या पडल्यासारखे वाटले!
उसळत्या खयालांना कसाबसा बांध घालून वरील गद्य (पर्यायीविना) प्रतिसाद दिला.
लब्बाड कुठला!
एकही पर्यायी शेर दिला नाही, कारण एक शेर द्यायला जायचो आणि अख्खी समांतर गझल बाहेर पडायची!
कारण, आम्हाला बाटलीचे बूच/झाकण काढता येते पण, लावता येत नाही, म्हणून स्वत:स आवर घातला बरे!
तुझ्या या सुंदर गझलेबद्दल तुझे अभिनंदन!

वैभवासाठी..............
वैभवा! तू म्हटल्याप्रमाणे कटाक्षाने मुरड घालून प्रतिसाद दिला बघ! बरोबर आहे ना रे बाबा?
...................प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

एरवी खोल तत्वगर्भ रचनेत एखाद्या झुळुक्रीसारखीच ही प्रणयरम्य द्विपदी-
सुगंधी हवा वाहते, पैंजणांचा घुमे नाद वाऱ्यासवे मुग्धसा
'तुझा गंध चोरून गेली कुठे ती?' जुई-मोगऱ्याला विचारू चला

अन आर्त शेवट-
'जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला

आवडली गझल.

'सुमंदारमाला' भरीचे शब्द न येता सांभाळणे ही कौतुकाची गोष्ट आहे..त्याबद्दल प्रथम तुझे अभिनंदन...

मतला खूप सुंदर आहे...

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला
हा एक जबरदस्त शेर...

एकूण गझल मस्त झाली आहे...
शुभेच्छा...

ठाव नाही = ठाऊक नाही (माझ्या मते.)

मुग्धसा = मुग्ध असा = धुंद, गुंग, हरवलेला ई. असा अर्थ अपेक्षित. अस्पष्ट खचितच नाही.

‘दु:खात बिलोरी झालेले शब्द’ या शब्दसमूहाला पहिली ओळ न्याय देते का >> माझ्या मते देते!

गोजिरे बालक म्हणजे देखणे/सुंदर/छान बालक. इथे समग्र शेरात गोजिरे विशेषण खटकले. इथे निरागस/निष्पाप सारखे काही तरी हवे होते असे वाटले.>> अचूक पकडलेत!!

! रंगल्या पत्थराला म्हणजे देवाच्या/शेंदूर फासलेल्या मूर्तीच्या दगडाला असे आहे का?>> हो.

---------------------- धन्यवाद!!

======================================

सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार !!