अजाणताच माणसांस जिंकतात माणसे!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 October, 2012 - 09:56

गझल
अजाणताच माणसांस जिंकतात माणसे!
कळायच्याच आत का दुरावतात माणसे?

नकोच गीत गायला, नकोच गंध द्यायला;
सुरांमुळे, फुलांमुळे दुखावतात माणसे!

फिरून पालटून वेष, तेच दु:ख भेटते;
निदान त्यामुळे तरी सुखावतात माणसे!

म्हणून जंगलात तो अशा खुशाल राहतो;
पशू तरी बरे, अशीच वागतात माणसे!

गुळास लागतात मुंगळे, असेल पाहिले.....
तसेच फायदा बघून झोंबतात माणसे!

प्रसिद्ध जोवरी न तोवरी विचारतात ती;
प्रसिद्ध जाहल्यावरीच टाळतात माणसे!

कधी धरा दुभंगते, कधी गगन दुभंगते!
असे कसे कळे न दु:ख सोसतात माणसे!!

जसे जमेल मी तसेच सांधतो तडे तडे!
घडी घडीस ही कशी दुभंगतात माणसे!!

न काळजास पोळते, न लोचनात आसवे!
जितेपणीच माणसास जाळतात माणसे!!

न धूरही दिसे कुठे, न जाळही दिसे कुठे;
मनातल्या मनात ती धुमसतात माणसे!

जनावरांत, माणसांत काय भेद राहिला?
जनावरांपरी कशी पिसाळतात माणसे?

भविष्य सांगतात, कोण वास्तुदोष सांगतो!
बघून काय काय ते, झपाटतात माणसे!!

नको बघूस अंत, हद्द सोसण्यासही असे;
कधी समस्त बंधने, झुगारतात माणसे!

जगास जोडण्यास नम्रताच एकटी पुरी!
बघून नम्रताच हात जोडतात माणसे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नकोच गीत गायला, नकोच गंध द्यायला;
सुरांमुळे, फुलांमुळे दुखावतात माणसे!

वा!! स्पेशली दुसरी ओळ आवडली..

छान

वैभवा!
हात टेकून मग जोडल्यासारखे वाटतात चित्रात!
जगास जोडण्यास नम्रताच एकटी पुरी!
बघून नम्रताच हात जोडतात माणसे!!
<<<<< या शेराचा पुन:प्रत्यय आला!

.........प्रा.सतीश देवपूरकर