रोज तेच तेच ते...

Submitted by अजय प्रभाकर on 4 October, 2012 - 05:16

रोज तेच तेच ते हे असे सहायचे
वाटते नको जरी जगासवे वहायचे

भेटते कुठे कुणी साधते न टाळणे
चेहर्‍यास फसवुनी कसे तरी हसायचे

श्वास कोंडतो परी राहतो जिवंत मी
रोज मरण त्यातुनी कधी कधी जगायचे

लाभते न जे कुणा सहज खुणविते मला
जिंकणार त्या क्षणी ठरवुनी हरायचे

भोवती उभारले विश्व कैकदा नवे
सोहळ्यास तेथल्या मी कुठे नसायचे

शब्द गोड पेरुनी वागणे निलाजरे
हात मिळवुनी तिथे पुन्हा पुन्हा फसायचे

----- अजय प्रभाकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोवती उभारले विश्व कैकदा नवे
सोहळ्यास तेथल्या मी कुठे नसायचे

शब्द गोड पेरुनी वागणे निलाजरे
हात मिळवुनी तिथे पुन्हा पुन्हा फसायचे >>> सुरेख...

मस्त ! गझलिश रचना .............वा
खूप आवडली

जिंकणार त्या क्षणी ठरवुनी हरायचे>>>>माझा एक शेर आठवला........तसेतर दोन आहेत..........

एक संधी जिंकण्याची लाभलीही
का मला मग वाटले की मी हरावे

आणि

जिंकताना हारलो कित्येकदा मी
जिंकण्याची माहिरी जमलीच नाही

धन्यवाद

वैभवजी धन्यवाद ! तुमचे दोन्हीही शेर वाचले. खरोखरीच छान आहेत. अर्थ जरी एकच असला तरी प्रतिभा कशी शब्दातुन खेळते याचं आश्चर्य वाटतं.