भाग्य उ़जळले

Submitted by निशिकांत on 2 October, 2012 - 00:19

धूळ झटकुनी साफ सफाई
स्नान घातले भाग्य उजळले
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

आज संसदेमधे तुला रे
लबाड कोल्हे फुले वाहतिल
"वैष्णव जन" भजनाला गाउन
फोटोसाठी सूत काततिल
तत्त्व शोभते तुझे पुस्तकी
म्हणती पाळुन काय गवसले?
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

गांधी बाबा जुन्या तुझ्या रे
चष्म्याचा बघ लिलाव झाला
रक्ताने भिजल्या गवताला
भाव करोडो खरेच आला
तत्त्व तुझे बिनभाव घ्यावया
कुणी गिर्हाइक मला न दिसले
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

पंचा नेसुन जन्म काढला
कौतुक होते तुझे केवढे !
करदोडाही नसे कटीला
नागवले जनतेस एवढे
शासन, नेते दोन्ही अपुले
दूषण कोणा द्यावे कसले?
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

वस्त्र विदेशी किती जाळली
तुझा स्वदेशी ऐकुन नारा
परदेशी पुंजीत अचानक
दिसू लागला अता उबारा
तूच सांग दैवास आमुच्या
काळे इतके कुणी फासले?
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

झोपाया बाळास लागते
सुरेल आईची अंगाई
आर्थिक प्रगती होण्यासाठी
म्हणे जरूरी ही महागाई
जरी सारथी अर्थतज्ञ पण
चाक रथाचे आहे फसले
ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी
गांधी पुतळे मिष्किल हसले

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अप्रतीम कविता ...........'गीत' प्रकारातली

आशय विषय १००% पटला

धन्यवाद काका

आवडली.

पण

<< पंचा नेसुन जन्म काढला
कौतुक होते तुझे केवढे !
करदोडाही नसे कटीला
नागवले जनतेस एवढे >>>

हे पटले नाही.