करंटा

Submitted by UlhasBhide on 1 October, 2012 - 12:21

देवपूरकरांनी गझल विभागात तरही मिसरा दिला होता :
"आले रडू तरीही रडता मला न आले"
गझल लिहिण्याची माझी पात्रता नाही.
परंतु, त्या ओळीवरून काहीतरी (की काहीतरीच ?) सुचलं ते असं :

करंटा

आले रडू तरीही रडता मला न आले
पूरात आसवांच्या बुडता मला न आले

खच्ची मनात हिम्मत रुजली कधीच नव्हती
हातात शस्त्र असुनी लढता मला न आले

होती अतीव इच्छा मीही फुलून यावे
माती सदोष होती रुजता मला न आले

झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले

घडला प्रमाद फिरुनी विश्वास टाकण्याचा
गत अनुभवामधूनी शिकता मला न आले

पोशीत नित्य आलो मी अंतरी निखारे
उन्मुक्त होउनीया जळता मला न आले

का मी असा करंटा ? माझे मला कळेना
घडवू शके न काही, घडता मला न आले

हे दैवदुर्विलासा ! झाली तुझीच फत्ते
गेली हयात सारी, जगता मला न आले

.... उल्हास भिडे (१-१०-२०१२)
=================================================

आणि ही थोडी भंकस / थोडा टीपी : ------ Proud

आले कितीक गेले, गेले कितीक आले
मी यत्नही करूनी गणता मला न आले

फ़क्कड चहाचि तल्लफ अधुरीच राहिली रे
शोधून फ्रीज अवघा मिळता मला न आले

कित्येक पाडल्या मी कविता तरी अजूनी
शब्दात आशयाला भरता मला न आले

‘तरही’वरी लिहावी वाटे गझल तरीही
मिसरेहि दोन अवघे रचता मला न आले

‘उल्हास’ खूप होता प्रेमात मी पडावे
टाळून या ‘भिडे’ला पडता मला न आले

.... उल्हास भिडे (१-१०-२०१२)
================================================

आज अचानक आणखी एक द्वीपदी सुचली

झाले फितूर अश्रू, देती दगा असा की
सरणावरी सुखाने जळता मला न आले

(ही द्वीपदी बरी/चांगली/बीभत्स/चमत्कारिक/की हास्यास्पद आहे ते ठाऊक नाही.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होती अतीव इच्छा मीही फुलून यावे
माती सदोष होती रुजता मला न आले

झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले

घडला प्रमाद फिरुनी विश्वास टाकण्याचा
गत अनुभवामधूनी शिकता मला न आले
>>
वाह!
क्या बात है
मस्त!!!!!!!!!

उकाका गझल विभागात हलवा प्लीज
देवपूरकराना विपूतून नक्की पाठवा त्याना खूप आनन्द होईल
मला बेहद्द आवडल्या अनेक द्वीपदी (शेर)

>झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले
क्या बात!

>>उल्हास’ खूप होता प्रेमात मी पडावे
टाळून या ‘भिडे’ला पडता मला न आले

हे सर्वात जबरी! Happy
भंकस देखिल ईतकी काव्यमय... यालाच "हाडाचे" कवी म्हणतात का?

सर्वांना धन्यवाद.
---------------------------------------------------------------------------------------------------
आज अचानक आणखी एक द्वीपदी सुचली

झाले फितूर अश्रू, देती दगा असा की
सरणावरी सुखाने जळता मला न आले

(ही द्वीपदी बरी/चांगली/बीभत्स/चमत्कारिक/की हास्यास्पद आहे ते ठाऊक नाही.......)

काका नो सरण प्लीज Proud
बादवे, सर्व द्विपदी खर्‍याच आवडल्यात...

झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले>> दैव देते अन कर्म... ची उपरती शब्दांत मस्त पकडलीये..

टीपी ही छान Happy

मस्त काका ..

रवी जोशींची कविता आठवली

हृदयातल्या सखीला जगणे बहाल केले
शव एक मी असे की जळता मला न आले...

होती अतीव इच्छा मीही फुलून यावे
माती सदोष होती रुजता मला न आले

झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले

<< क्या बात !

वा! उल्हासजी, इथे नियमितपणे गझल लिहिणार्‍या कैक लोकांच्या तुलनेत तुम्ही अतिशय सशक्त अशी गझल लिहू शकता हे सिद्ध केलंत...अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
आधीच सांगतो की मी काही गझलेतला जाणकार वगैरे नाहीये पण रसिक मात्र नक्कीच आहे आणि त्याच नात्याने मला जे जाणवलं तेच इथे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय..... इथल्या बहुतेक गझलकारांनी गझलेचे तंत्र व्यवस्थितपणे अवगत केलेलं आढळून येतं... गझलांमध्ये अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे गझलियत ती मात्र दूर्दैवाने इथल्या गझलांमध्ये कमी प्रमाणात आढळते... मला इथल्या सर्व गझलकारांना असं मैत्रीपूर्ण आवाहन करायचं आहे की...तंत्र शिकलात, आता मंत्रही शिका...उत्तमोत्तम कविता,गझला वाचा, त्या समजून घ्या...तुमच्यात तशी समज नक्कीच आहे... गझल रचतांना त्यात काव्यगुण आहेत की नाहीत ह्यावर जरूर लक्ष द्या...केवळ रदीफ-काफियात अडकून राहू नका...त्याचा तुम्हाला इतका सराव झालाय की ते आपोआप येतीलच...तेव्हा त्याची काळजी सोडा.

प्रतिक्रिया न आवडल्यास/न पटल्यास जितक्या सहजतेने माझ्या चालींकडे दूर्लक्ष करता तेवढ्याच सहजतेने ह्याकडेही दूर्लक्ष करावे....हे सांगायची खरं तर गरजच नाही म्हणा! Proud

मस्त आहे. आवडली कविता Happy

‘उल्हास’ खूप होता प्रेमात मी पडावे
टाळून या ‘भिडे’ला पडता मला न आले >>> आवडलाच हा शब्दांचा खेळ Happy

सर्वांना धन्यवाद.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रमोदजी, तुमच्या प्रतिसादाचा आणि भावनांचा आदर राखून इतकंच सांगावसं वाटतं की काव्यक्षेत्रात मी खूपच नवखा आहे. माझ्या हातून जर काही चांगलं लिखाण झालं असेल तर ते इथल्या अनेकांच्या रचना वाचल्याचा,
अभ्यासल्याचा परिणाम असल्याने त्याचं श्रेय मी त्यांनाच देतो. बाकी चुका/त्रुटी हा माझा दोष.

गझल, आणि तीदेखील सशक्त लिहिणं हा माझ्या दृष्टीने खूप दूरचा टप्पा आहे..... असो !..... तुम्हां सर्वांच्या शुभेच्छा लाभाव्यात इतकीच अपेक्षा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद.

उल्हासजी,प्रयत्न छानच होता.. गझल ही एकीकडे एक वृत्ती आहे अन एक तंत्रसुद्धा. गझलची परंपरा अन अभ्यास यांचा दबदबा मोठा..पण शेवटी कविताच ना ती,कवितेवर मनःपूर्वक प्रेम करणं तिच्या सर्व रूपांवर भाळायला आपल्याला शिकवतं..
पु.ले.शु.

मला गझल वगैरे काही समजत नाही. पण जी कलाकृती मनाला आनन्द देऊन जाते ती चांगली मग ती कविता असो, कथा असो किंवा काही असो. मला मूळ आणि भंकस दोन्ही खूप आवडले. तशा जवळपास सगळ्याच तुमच्या कविता मला अवडतात, कारण.....