एवढंसं आभाळ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 29 September, 2008 - 10:17

एवढंसं आभाळ

कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो.

आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक.

प्रत्येक छोट्‍या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो. पण जेव्हा ते आई-वडिल एकमेकांपासून दूर होतात..... ते आभाळ फाटतं. त्याला कळतंच नाही की आता नक्की कुठलं आभाळ आपलं. आईच्या आभाळात आता दुसराच कोणी "पप्पा" असतो आणि त्याच्यासोबत त्याची कुठलंच नातं नसलेली भावंडं सुद्धा. त्याला गुदमरायला होतं. तसा दुसरा पप्पा काही वाईट नसतो. पण आईवरचा त्याचा एकाधिकार मात्र अगदीच संपतो. संपूर्ण त्याची असलेली आई आता त्याला अजून तिघांसोबत वाटून घ्यायची असते. इथेच तर सगळा घोळ होतो. आपल्या हातातून काहितरी निसटून जातंय असं त्याला वाटतं... तो धडपड करतो...पण काही गोष्टी अशा घडतात की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो. आईची होणारी घालमेल त्याला कळत असते पण तरी मन काही आपला हक्क सोडायला तयार नसतं.

ह्यातून आपल्या परीने तोच मार्ग सुचवतो.... पप्पांकडे जायची परवानगी मिळवतो. त्याला वाटतं की आपलं हरवलेलं आभाळ आपल्याला आपल्या पप्पांकडे नक्कीच मिळणार. तो खूप उत्साहात असतो. पण घरी पोचल्यावर त्याचं स्वागत बंगाली भाषेत बोलणारी आंटी करते. सोबत एक छोटं बाळ पण. म्हणजे इथेही आपल्याला पुन्हा वाटूनच घ्यावं लागणार आभाळ !

त्याला काही कळेनासंच होतं. इवल्याशा मनात प्रचंड उलाघाल होत असते.......कोणासोबत बोलावं मनातलं....आईसोबत...... पण तिला तर फारच दुखावून आपण आलो आहोत. पप्पा.....आज पप्पांसोबत बोलुयाच असं ठरवतो तर पप्पाच त्याला त्यांचा निर्णय सांगतात.... बोर्डींग स्कूलमधे जायचा. तो खूप प्रतिकार करतो. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्या क्षणी समोरुन आलेली वॉर्डन त्याला आईच वाटते. तो तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडतो....तिची माफी मागतो. पण नंतर त्याला जाणवतं की आई नाहीच. मग तो आपलं मन पक्कं करतो........बाबांकडे पाठ फिरवून होस्टेलच्या खोलीत येतो. तिथे त्याच्यासारखीच कितीतरी मुलं असतात.......पण सगळी हसरी मुलं...... कोणीच त्याच्यासारखी रडत नसतात. तो ही हसायचा कसानुसा प्रयत्न करतो.

तिथे त्याला छान मित्र मिळतो.... हळुहळु तो खुलत जातो.... फुलत जातो. आई-पप्पांची आठवण येत असते पण इथेही मजा असते. नवी जागा, नवे मित्रं, नवं ध्येय....... आणि अचानक एक नवं आभाळ सुद्धा !! ह्या अचानक सापडलेल्या आपल्या हक्काच्या आभाळाखाली तो खूप खूप सुखावतो. आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो. अतिशय सुंदर शेवट !! कुणालाही न दुखावता, कुणालाही न दुरावता.... त्याला त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होते. त्याचं एवढसं आभाळ आता खूप मोठ्ठं होतं आणि त्या आभाळाखाली तो स्वत:चं "मी पण" घडवणार असतो.

हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला........प्रचंड रडले बघताना. पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला.....खूप प्रश्न विचारले..... आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते.... आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा. नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो.

फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो. एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !!

गुलमोहर: 

नविन आहे का हा सिनेमा?? आधी ऐकलं नव्हतं कधी..
story चांगली वाट्ट्ये.. बघयला पाहिजे.. thanks ह्याविषयी लिहिल्याबद्दल.. Happy

हो मलाही पहायचा होता हा सिनेमा. पण जमलं नाही.
विषय चांगला वाटतोय

जयावी,
अश्या नावाचा सिनेमा आहे हे आत्ता इथे वाचल्यावरच कळले.

त.टी. हे तू मुद्दाम ललित म्हणुन लिहीले असेल तर ठीक नाही तर याचीच लिन्क तिकडे चित्रपट विभागात दे, तिथे ते लवकर सापडेल आणि जास्त लोकांकडुन वाचले जाईल असे वाटते. Happy

अरे सही रे!!!!!!
मी देखील पाहिला हा झी वर.
पाहिल्यापासुन विचार करत होतो. कि लिहाव का ह्यावर.
पण मला इतक छान जमल नसतच.
खुप छान लिहिल आहेस तु.
चित्रपटाच बोलायचच झाल तर खुपच संयतपणे हाताळला आहे हा विषय.
नाही कुठे त्या दोघांमध्ये घटस्फोट का झाला? त्याच्या मागची दोघांची भुमिका काय? किंवा इथे तेच दाखवत बसुन चित्रपट मेलोड्रॅमॅटिक केलेला नाहिये.
तसच त्याची सावत्र आई किंवा त्याचा सावत्र वडील. हे ही कुठेही टिपिकल सावत्र दाखवलेले नाहियेत्र.
उलट ते खुपच संमजस आणि स्पोर्टी दाखवले आहेत.
मग चुकल कुठे??
तर त्याच्या मनात एक चित्र आहे. आणि त्या चित्रात तो त्याची आई आणि त्याचे बाबा आहेत.
त्याच्या दुर्दैवाने ते चित्र फाटल आहे. आणि दोन वेगवेगळी चित्र झाली आहेत.
हे त्याच्या मनाला पटत नाही. त्यामुळे त्याची घालमेल होत जाते नुसती.
कुठेच ऍडजस्ट होत नाही तो. पण शेवट खुपच सकारात्मक आहे. Happy
सगळ्यानीच ऍक्टिन्ग मस्त केली आहे.

पाहीला नाही..पण पहायला हवा. एखादी चांगली चित्रकृती हातून निसटता कामा नये. थँक्स लिहील्याबद्दल.

जयावी,
फार छान लिहिलंयत तुम्ही. मी ही पाहीला सिनेमा पण पाहून जितका समजला नाही तितका तुमच्या लिखाणातून समजला. Happy
झकासशी ही सहमत, सिनेमाचा फोकस कुठेही शेवटपर्यंत सैल पडू दिला नाहीए. तो मुलगा आणि त्याचं मनोविश्व हाच सिनेमाचा मुख्य उद्देश होता आणि तो बरोब्बर साधलाय.

मी पण पाहिला. थेटरमध्ये बघायचा राहुनच गेला होता त्यामुळे अगदी हट्टाने बघितला. नवरा व लेक मागे लागले होते की बाह्र जाउयात म्हणुन पण मी जाम हलले नाही घरातुन.
खुप छान आहे सिनेमा. सगळ्यांचे अभिनय चांगले झाले आहेत.

मस्त वत्तल वाचुन
बर वत्ताय कि अश्य आश्यचे चित्र्पत येताय्त

जया, तू लिहिलस म्हणून कळतय, धन्स गं. कसतरी जमवेन पण बघीन.
फाटलेल्या आभाळाच्या तुकड्यांखाली जगावं लागणारी रोपटी.... शब्दांपलिकडलं आहे हे, सुंदर मांडलयस! चित्रपट छानच असणार.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

मलाही पाहयचा होता..पण काही कारणाने जमलं नाही..पण खरं सांगू का? माझ्या ताईने अगदी अशाच शब्दात त्याची गोष्ट मला काल सांगितली. खरच खूप भावस्पर्शी आहे जयावी तुझं लिखाण...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy