मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - सफरचंद-बटाटा थालिपीठ- तिखट -अगो

Submitted by अगो on 26 September, 2012 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम सफरचंद
२ छोटे किंवा १ मोठा बटाटा
गरजेनुसार तांदळाचे पीठ
जिरं
भरडलेले मिरे
दाण्याचं कूट
हिरवी मिरची
कोथिंबीर
मीठ
तूप

क्रमवार पाककृती: 

सफरचंद सालासकट किसून घ्यावे.
बटाटा साल काढून किसून घ्यावा. ( बटाटा कच्चाच किसावा, उकडून नव्हे. )
त्यात आवडीप्रमाणे दाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, भरडलेले मिरे, मीठ घालून थालिपीठ थापण्यासाठी लागेल तेवढेच तांदळाचे पीठ घालावे ( साधारण तीन-चार छोटे चमचे. )
तव्यावर तूप सोडून पातळ थालिपीठ थापावे. झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी खालची बाजू सोनेरी कुरकुरीत झाली की उलटावे. झाकण न ठेवता दुसर्‍या बाजूनेही शिजवून घ्यावे.
गरमागरम खावे Happy

thalipeeth1.jpgthalipeeth2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ थालिपीठे.
अधिक टिपा: 

झटपट होणारा प्रकार आहे.
सफरचंद असल्याने वेगळी साखर घालायची गरज नाही.
गोड-तिखट आवडेल त्याप्रमाणे सफरचंद-बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करु शकता.

माहितीचा स्रोत: 
उपासाच्या बटाट्याच्या थालिपीठाची कृती फेरफार करुन.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन, किसलेल्या बटाट्याचं थालिपीठ रोस्टीसारखंच लागतं.
आडो, आज मी केलेलं अजिबातच गोड नाही लागलं. सफरचंद पाणचट चवीचं असावं. पण आपण एरवी अशा पदार्थांत साखर भुरभुरवतोच त्यामुळे तितपतच गोडसर लागेल.

अगदी रोष्टी ची आठवण झाली..पारंपारिक तरीही काही नवे असलेले ,सर्वाना आवडणारे थालीपिठ...खुपच छान.

झेपणेबल वाटतंय... >>> वेका + १.

मस्त सोप्पा आणि मुख्य म्हणजे १५ मिनिटांत होणारा प्रकार असल्याने करण्यात येईल.

मस्त!!!
अमेरिकेत ग्रॅनी स्मिथ अ‍ॅपल्स मिळतात, हिरवी आणि अगोड. ती अगदी चालतील ह्या रेसिपीत.
बटाटा उकडलेला आहे ना? का नाही?

थालपिठ तर आवडीचा पदार्थ, त्यामुळे ही अगळी, वेगळी रेसिपी नक्की ट्राय करणार..
अगो, दुसरा फोटो तोंपासू आलाय Happy

मी स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या सर्व पाककृती अगदी व्यवस्थित वाचल्या आहेत. तुमची पाककृती सर्वोत्कृष्ट आहे. १. नियमात अगदी बसते. उगीच 'लूपहोल्स' नाहीत. २. झटपट होणारी ३. चविष्ट ४. एकाच वेळी घरात कोणाचा हरितालिका, ऋषीपंचमी असेल तर तांदूळ न घालता आणि बाकीच्यांना घालून म्हणजे खरोखर गणपतीत करता येण्याजोगी ५. लेखनही उत्तम आहे. ६. फोटोही उत्तम आहे. (मी थालीपिठावर तुपाचा मोठ्ठा गोळा Happy आणि बाजूला तुम्ही ठेवल्याप्रमाणे कोथिंबीर ठेवून फोटो लावला असता. पण हाही फोटो अगदी छान आहे).
साधी वाटली (कमी कल्पक भासली तरी ही चांगल्यापैकी कल्पक आहे) तरी वेगवेगळ्या निकषांवर ही पाककृती उत्तम ठरते. अगो तुमचे मनापासून अभिनंदन Happy .

लई भारी अगो !
<< मलाही जमण्यासारखी वाटतेय >> +१०००० Proud (आमच्यासाठी हेच अति महत्वाचं. मास्टरशेफांच्या रेस्प्या बघून लाळ गाळण्यापलीकडे काही करता येत नाही)

वा! वा! एकदम मस्त प्रयोग आहे हा. फोटोही एकदम मस्त आला आहे. फोटोतलं थालिपीठ अगदी कुरकुरीत छान दिसते आहे. मी हि.मि.-ओल्या खोबर्‍याच्या चटणीबरोबर खाणार Happy

सफरचंदाचे थालीपीठ... मला आवडेल की नाही शंका आहे.. पण जो फोटो दिसतोय त्यावर तुटून पडावेसे वाटतेय.. Happy

सफरचंदाचे थालीपीठ... मला आवडेल की नाही शंका आहे.. पण जो फोटो दिसतोय त्यावर तुटून पडावेसे वाटतेय.. Happy

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सिमन्तिनी, तुला स्पेशल थँक्स Happy
बटाटा कच्चाच किसायचा आहे. मी रेसिपी संपादित करते शंका राहू नये म्हणून.
अगोड सफरचंद घालायची अजिबात गरज नाही. उलट गोड सफरचंदच छान लागते जास्त ( काल संध्याकाळी परत एक करुन बघितले. ) आपण रताळ्याचा कीस करतो तो गोडच असतो. आपल्याला त्या चवीची सवय आहे आणि आवडते Happy
सशल, हो तांदळाचे पीठ हे एरवीच्या राजगिरा / साबुदाणा पिठाला रिप्लेसमेंट म्हणून वापरले आहे. व्यवस्थित मिळून येते. पाणी अजिबात घालायचे नाही. सफरचंद-बटाट्याच्या रसात जाईल इतके शक्य तितके कमीतकमी पीठ वापरायचे. जितके कमी पीठ तितके थालिपीठ हलके, छान होते.

मस्त...:स्मित:

सशल, हो तांदळाचे पीठ हे एरवीच्या राजगिरा / साबुदाणा पिठाला रिप्लेसमेंट म्हणून वापरले आहे.
>>>
म्हणजी साबुदाणा पिठ घातलं तर हीच रेसेपी उपवासाची होईल ना?
बेस्ट
आजचं करून पहाण्यात येईल Happy

Pages