तुलाच ठाउक नाही..!

Submitted by रसप on 12 September, 2012 - 05:47

एक जराशी जुनी गझल..

(किती टाकी ते आठवत नाही.. बत्तेचाळिस असावी.)

मी तुझ्याचसाठी कविता लिहितो, तुलाच ठाउक नाही
मी तुला पाहण्या डोळे मिटतो, तुलाच ठाउक नाही

तो बागेमधला गुलाब हसता, तुझाच दरवळ भासे
तू गुलाब अन् मी काटा बनतो, तुलाच ठाउक नाही

तव कानाच्या पाळीवर झुलते हलके चांदण झुंबर
मी मनात त्याचा चंद्रच बनतो, तुलाच ठाउक नाही

डोळ्यांच्या गहिऱ्या मेघांमधुनी जेव्हा श्रावण झरतो
मी तहानलेला चातक भिजतो, तुलाच ठाउक नाही

ज्या वाटा जाती तुझ्या घरी मी रोज तिथूनच जातो
पाहून तुला मग ठोका चुकतो, तुलाच ठाउक नाही

माझ्यावर हसते दुनिया सारी, मजला राग न येई
मी तुला आठवुन मश्गुल असतो, तुलाच ठाउक नाही

तू संध्येचे ते रंग ओढुनी रजनी बनून यावे
मी अश्याच आशेवरती जगतो, तुलाच ठाउक नाही

आहेस जरी तू झुळझुळ निर्झर, तू अवखळशी सरिता
पण मीच तुझा अंतिम सागर तो, तुलाच ठाउक नाही

....रसप...
१५ जानेवारी २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/01/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कविते"साठी काय हवं ?
'तुलाच ठाउक नाही..!'
अ‍ॅडमिनने तरी आता कवितांची शीर्षके बघून क्रम ठरवला पाहिजे!
छान गझल.