तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 September, 2012 - 11:27

गझल
तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते!
आठवणींची गजबज होते, मन माझे अन् गांगरते!!

ताटावरुनी उठून गेले, पोर कधीचे कामाला.....
अजून नाही पत्ता त्याचा, घर केव्हाचे हंबरते!

हवा मोकळी आहे, झुळझुळ झुळूक वाहे वा-याची;
तुझी गंधवार्ताही नाही, अंतरंग हे गुदमरते!

काय फरक पडतो हत्तीला? खुशाल भुंकू दे कुत्री!
जे जे त्याच्या पायाखाली येते, ते ते चेंगरते!!

तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
माय, मुलासाठी हृदयाच्या पायघड्याही आंथरते!!

निजलेल्या बाळास कुणाची नजर न लागो म्हणून ती....
माय तिच्या बाळावरती त्या पदर स्वत:चा पांघरते!

म्हणून माझ्या संसाराचा गाडा इथवर आलेला!
किती पसारे करतो मी, पण, पत्नी सारे आवरते!!

मूर्तिमंत सौजन्य जणू तो! स्नेहाचा निर्झर आहे!
शब्दाशब्दामधून त्याच्या प्रेम केवढे पाझरते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ताटावरुनी उठून गेले, पोर कधीचे कामाला.....
अजून नाही पत्ता त्याचा, घर केव्हाचे हंबरते!

वा व्वा ! मस्त शेर.

'तिन्हीसांज' हा इतका ठसठशीत शब्द आहे, की सूट घेऊन त्याचे 'तिनिसांज' काही केल्या पचत नाही ! (दोन्ही बरोबरच आहेत, असे म्हणू नका प्लीज.) 'कातरवेळी' वगैरे सोपे पर्याय आहेत.

तिनिसांजेला
मला वाटतं तिन्हीसांजेला असा शब्द आहे.

पोकळी वावरते
पोकळी असते,पोकळी निर्माण होते,परंतु पोकळी कधी वावरत नाही.

तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
माय, मुलासाठी हृदयाच्या पायघड्याही आंथरते!!

पायघड्या या शब्दास ही हा प्रत्यय चूक आहे.
हृदयाच्याही पायघड्या असे म्हणायचे आहे,परंतु वृत्तशरणतेमुळे हा सव्यापसव्य.

निजलेल्या बाळास कुणाची नजर न लागो म्हणून ती....
माय तिच्या बाळावरती त्या पदर स्वत:चा पांघरते!

''तिच्या'' ''त्या'' ''स्वतःचा'' हे भरतीचे शब्द आहेत.

बाकीचे शेर ठीक आहेत.

-कावळा

सव्यापसव्य>>>

आमचे कवी मित्र बेफिकीर ह्यांचा एक शेर आठवला,

कुणी सव्यापसव्यांनी झिजवली जानवी त्यांची
मला ब्राम्हण्य आल्यावर नशीले आचमन झाले.

>>धन्यवाद विदिपा, मायबोलीवर गझल लिहीत चला अशी विनंती तुम्हाला>>>>>

बेफीजी तुम्हीदेखील लिहा ही विनन्ती<<

वैवकु,

तुम्हालाही!!

छान Happy

ज्ञानेशजी! आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तिन....मूळ संस्कृत शब्द आहे त्रि, जे विशेषण आहे, ज्याचा अर्थ आहे तीन म्हणजेच ३ ही संख्या.
तिनव्या (विशेषण) म्हणजे तिस-या.
तिनसांज / तिनिसांज (एकवचनी).......म्हणजे संध्याकाळी.
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हीसांजा (अनेकवचनी).
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हिसांजां (क्रियाविशेषण).....संध्याकाळी.
तिनसान......म्हणजे संध्याकाळ.
फुटक्या तिनिसांजा....म्हणजे ऎन संध्याकाळी.
तिनीत्रिकाळ......म्हणजे तिन्ही वेळा......सकाळी, दुपारी व संध्याकाळी.
तिन्ही लोक .......म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ.
तिनतेरा (विशेषण / क्रियाविशेषण).......म्हणजे उधळलेले, नाश पावलेले इत्यादी.

वर दिलेले सर्व नित्य वापरातील शब्द आहेत. कोणताही शब्द मला वृत्तात बसवता आला असता. ते काही कठीण नव्हते.
तिन्हिसांजेला (एकवचनी) असेही म्हणता आले असते.
तिनिसांजेला असे पण म्हणता येते.
तिन्हीसांजा असा अनेकवचनी शब्दप्रयोग आहे.
एकवचनी....तिनिसांज किंवा तिन्हिसांज.
तिन्हीसांज नव्हे.

कातर वेळ शब्द पण योग्य आहे. पण माझ्या ओठावर, माझ्या पिंडानुसार, जो शब्द आला व जो बरोबर आहे याची मला खात्री होती, तो मी वापरला. असो.
शेवटी ज्याची त्याची शब्दकळा, शैली वेगळी असते, हेच खरे!

..........प्रा. सतीश देवपूरकर
..................................................................................

बेफिकीरजी!
आपला पहिला उस्फूर्त प्रतिसाद (.)........अगम्य वाटला!

घर हंबरणे म्हणजे काय?..........<<<<<<

हंबरणे किंवा हंबारणे याचा शाब्दिक अर्थ आहे......गाय, बैल इत्यादींचे हम्मा! असे ओरडणे.

हंबरणे शब्दात हंबरडा किंवा हंबारडा या शब्दाची छटा व्यक्त होते जिचा अर्थ आहे गाईबैलांचे ओरडणे.

हे झाले वरवरचे अर्थ. लाक्षणिक अर्थ आहे.....आक्रोश, दीनवाणे रडणे.....हंबरडा फोडणे.

घर केव्हाचे हंबरते............ म्हणजे जशी एखादी गाय वासरासाठी हंबरते, हंबरडा फोडते, तसे सर्व घर, म्हणजेच घरातील सर्व लोक, ताटावरून उठून कामास म्हणून गेलेल्या व अजून न आलेल्या पोरासाठी, जणू हंबरते आहे.....आक्रोश करते आहे. दीनवाणे रडत आहे!

हा आई, वडील व घरातील इतरांचा पोरासाठी चालू असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी हंबरणे ही क्रियात्मक प्रतिमा माझ्या मनात पटकन आली. म्हणून मी लिहिले आहे घर केव्हाचे पोरासाठी हंबरते आहे, आक्रोश करत आहे.
..........प्रा. सतीश देवपूरकर
.................................................................................

कावळे महाराज!
विस्तारीत व चिकित्सक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

पोकळी(स्त्री)......शब्दश: अर्थ आहे वनस्पतीच्या पेशीतील सौम्य (dilute) पातळ रसाने भरलेली पोकळ जागा, ज्याला वनस्पतीशास्त्रात इंग्रजीत म्हणतात vacuole.
ही vacuole पेशीमधे जागा बदलू शकते.....सरकू शकते

पोकळ हे विशेषण आहे ज्याचा अर्थ आहे भरीव नसलेला. संस्कृत शब्द आहे पुष्कर!
लाक्षणिक अर्थ आहे .......... रिकामा, शून्य, ढिला, अर्थहीन, फोल, बिनफायद्याचा, हलका, सोपा, मोघम, अनिश्चित, पुरा न केलेला इत्यादी.

पोकळीचा लाक्षणिक अर्थ आहे.......वरकरणी, निरर्थक, निर्जीव.

पोकळी(स्त्री)......म्हणजे पोकळपणा, पोकळ जागा, अवकाश.

पोकळीस जाणे.....म्हणजे प्रयत्न निष्फळ होणे.
पोकळी किंवा पोकळकी म्हणजे बाण, काडतुसे ठेवण्याची कागदाची नळी.
पोकळीक म्हणजे रितेपणा. वगैरे......

पोकळी शब्द मतल्यात प्रतिक म्हणून वापरला आहे. तिनिसांजेसारख्या कातर वेळी माणूस गंभीर, विषण्ण, भावूक होतो.

इथे पोकळी प्रतिक आम्ही वापरले ते आम्हास वाटणारे खालीपन, रितेपण, फोलपणा, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, हुरहूर वाटणे, कशातच राम नाही असे वाटणे इत्यादी आमच्या संमिश्र भावनांचा कडेलोट व्यक्त करण्यासाठी!
हे सर्व पोकळी या शब्दाचे लाक्षणिक अर्थ आहेत, जे तिनिसांजेला उत्पन्न होणा-या विचित्र भावभावनांचे प्रकटीकरण करतात.

इथे पोकळी या शब्दाचे, रितेपणाचे आम्ही personification केले आहे.
म्हणून.......तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते....ही उला मिस-यातील शब्दयोजना!
ऊर म्हणजे छाती.
ऊर दडपणे, ऊर दाटणे, भरणे, ऊर फाटणे, ऊर फोडणे, ऊर बडवणे, उरस्फोड करणे, ऊरदुखी इत्यादी नित्य वापरातील शब्द आम्हाला आठवले.
म्हणून ऊर शब्द या भावना प्रकट करायला मला बोलका वाटला.
उरात/छातीत धडधडणारे हृदय असते, ज्यात रक्ताभिसरण, प्रवाह वा वावरणे चालू असते. या सर्व गोष्टी मनात आल्यावर आमचे रितेपण, खालीपन याचे पोकळी शब्दाने personification करून जणू ती पोकळी रक्ताऎवजी, आमच्या उरात वावरते आहे असे म्हणून आमच्या भावभावना व्यक्त केल्या.

इथे पोकळी शब्दाचे लाक्षणिक अर्थ आमच्या भावभावनांना चपखल लागू होतात.
रक्ताभिसरणाऎवजी पोकळी/खालीपन/रितेपण इत्यादींची हालचालच म्हणजेच वावर जणू आम्हाला जाणवतो, असे आम्ही म्हणतो.

शांत बसलेले असताना छातीवर हात ठेवले की, हृदयाची धडधड, रक्ताचे अभिसरण सुद्धा आपणाला जाणवू शकते. आम्हास तिनिसांजेच्या कातर वेळी उरात जणू एक रितेपणच वावरताना दिसते/जाणवते!

ही सर्व प्रतिकांची, काव्याची भाषा झाली.
इथे पोकळी असते, पोकळी निर्माण होते, वावरत नाही असे ठाशीव, वरवरचे अर्थ घेणे अपेक्षित नाही.
बर, तसे वैज्ञानिकदृष्ट्या म्हटले तर, पोकळीची जागा ही बदलू शकते, म्हणजेच पोकळी सरकू शकते म्हणजेच वावरू शकते! जसे, पेशीतील पोकळी म्हणजे vacuole सरकू शकते!

इथे पोकळीचे वावरणे म्हणजे रितेपणाच्या हालचाली उरात जाणवणे, असे आहे. त्याला वावरणे असे म्हटले आहे. वेदना जशी इथे, तिथे वेगवेगळ्या वेळी स्थानबदल करू शकते, तसेच रितेपणा, खालीपन, पोकळी देखिल आमच्या उरात आम्हास हलताना जाणवतात!

हृदयाच्या पायघड्याही आंथरते!..........
इथे ही हा प्रत्यय हृदयाच्या पायघड्या देखिल आंथरते अशा अर्थी आहे.
पायघड्या शब्दामधे अगत्य, आर्जव आहे.
मूल परत घरी यावे म्हणून वाट पहाणारी आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते, डोळ्यात प्राण आणून वाट पहाते. हिंदीत आखें बिछाना असे म्हणतात.

आई मुलाच्या वाटेवर आपले हृदय, आपले काळीज, आपले डोळे, आपली नजर इत्यादी आंथरू शकते. म्हणून हृदयाच्या पायघड्याही/ पायघड्या देखिल आंथरू शकते असे आम्ही म्हटले आहे. नुसतेच पायघड्यांना ही हा प्रत्यय नाही, तर हृदयाच्या पायघड्यांना ही हा प्रत्यय देखिल अशा अर्थी वापरला आहे.

हे वृत्त माझ्यासाठी इतके अवघड नाही की, ज्यात शब्द बसवणे मला अवघड जावे व प्रत्ययांच्या कुबडया मला लागाव्यात. मी शब्दयोजना सहज, लीलया बदलू शकलो असतो. पण, जे भावले, पटले ते लिहिले!
तेव्हा वृत्तशरणता, सव्यापसव्य वगैरे शब्दखोर शेरे मला तरी अप्रस्तुत व हास्यास्पद वाटतात.

तिच्या, त्या, स्वत:चा......हे शब्द आपणास भरतीचे वाटत आहेत, जे व्यक्तीसापेक्ष आहे. मला स्वत:ला शेरात प्रत्येक शब्दाची जागा अनमोल वाटते. मी स्वत:च अनावश्यक शब्दांना लिहिण्याआधीच, मनातच डच्चू देतो! असंख्यवेळा गुणगुणतो, आतला आवाज ऎकतो व मग शेवटी कागदावर उतरवतो!
ज्याला आपण भरतीचे शब्द म्हणता त्यांच्यामुळेच मिसरा बोलका झालेला मला तरी वाटतो.

तिच्या.....मातेकडे निर्देश.
ते.......निजलेल्या तिच्या बाळाकडे निर्देश करते.
बाळाच्या अंगावर इतर कोणतेही पांघरूण ती घालू शकली असती. पण, स्वत:चा पदर ती बाळाला पांघरते.
इथे स्वत:चा हा शब्द ते बाळ म्हणजे तिच्या अंगचाच एक भाग आहे....ही भावना व्यक्त करते.
मिसरा चित्रदर्शी व्हावा, बोलका व्हावा यासाठी असे शब्द आमच्या ओठी आले.

टीप: मला कुठल्याही मिस-यातील वृत्तबद्ध शब्दयोजना बदलणे हे बिलकुल अवघड नव्हते. हा ज्याच्या त्याच्या पिंडाचा, शैलीचा, सौंदर्यबोधाचा, आकलनाचा व प्रवृत्तीचा प्रश्न आहे.

बाकी, बाकी शेर आपणास ठीक वाटल्याबद्दल धन्यवाद!
.........प्रा.सतीश देवपूरकर
.........................................................................................................

विजयराव!
बेफिकीरजींच्या जानव्याच्या सव्यापसव्याचे, ब्राम्हण्य येण्याचे व आचमन नशीले होण्याचे व आमच्या या गझलेतील कुठल्याही शेराचे काय नाते आपण जोडत आहात हे मला समजले नाही.

बेफिकरजींचे आपणास धन्यवाद..........कशाबद्दल बुवा?

“तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो!”.........हेच खरे!
म.भा. झिंदाबाद!

एक शंका.............

पहिले तुम, पहिले तुम.........हे काय?

हे शायरदाक्षिण्य चालले आहे का?

लिहा असे सांगायला का लागते?

उचंबळून आले की, माणूस आपोआपच लिहितो!

हां, लेखन कोणत्याही संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे का? लोक ते समजू शकतील का? लोक काय म्हणतील? अशा विचारांनी कुणी मागे हटू शकतो हो!

टीप: वरील प्रकारची कुठलीच भीती निदान मला तरी कधीच वाटत नाही!

..................प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

@ देवपूरकर सर-

नेहमीप्रमाणे कंटाळून नाद सोडण्याचा मोह अनावर होतो आहे, पण तुम्ही आक्षेपाचे योग्य निराकरण केले असा तुमचा समज होऊ नये म्हणून लिहितो.
त्याच त्या शब्दांचे अगडबंब धुके तयार करून त्यामागे आपल्या त्रुटी लपवण्यापेक्षा सत्याला सामोरे जावे.

तिन....मूळ संस्कृत शब्द आहे त्रि, जे विशेषण आहे, ज्याचा अर्थ आहे तीन म्हणजेच ३ ही संख्या.
तिनव्या (विशेषण) म्हणजे तिस-या.
तिनसांज / तिनिसांज (एकवचनी).......म्हणजे संध्याकाळी.
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हीसांजा (अनेकवचनी).
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हिसांजां (क्रियाविशेषण).....संध्याकाळी.
तिनसान......म्हणजे संध्याकाळ.
फुटक्या तिनिसांजा....म्हणजे ऎन संध्याकाळी.
तिनीत्रिकाळ......म्हणजे तिन्ही वेळा......सकाळी, दुपारी व संध्याकाळी.
तिन्ही लोक .......म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ.
तिनतेरा (विशेषण / क्रियाविशेषण).......म्हणजे उधळलेले, नाश पावलेले इत्यादी.

इतके लिहायची गरज नव्हती. (कधीच नसते.) शब्दांच्या व्युत्पत्ती आणि शब्दार्थ यांचे बेसिक ज्ञान सगळ्यांनाच असते. तिनसांज / तिनिसांज (एकवचनी).......म्हणजे संध्याकाळी. अशा ठोकून दिलेल्या विधानाला काही अर्थ नाही. हे तुमचे मत आहे, की कुठल्या शब्दकोशाचा आधार घेऊन लिहित आहात?

वर दिलेले सर्व नित्य वापरातील शब्द आहेत. कोणताही शब्द मला वृत्तात बसवता आला असता. ते काही कठीण नव्हते.

वर एकच शब्द दिलेला आहे तुम्ही.

तिन्हिसांजेला (एकवचनी) असेही म्हणता आले असते.
तिनिसांजेला असे पण म्हणता येते.
तिन्हीसांजा असा अनेकवचनी शब्दप्रयोग आहे.

यासुद्धा अशाच लोणकढी थापा आहेत. कोणी सांगीतलंय हे? काय आधार आहे या वाक्यांना? वेलांटी बदलली की वचन बदलते का? 'तिन्हिसांज' हे एकवचन, आणि 'तिन्हीसांज' हे अनेकवचन हे विधान सिद्ध करून दाखवावे असे आव्हान देतो. मी मायबोलीवर लिहिणे सोडून देईन. Happy
सिद्ध करता आले नाही तर बिनशर्त ही विधाने मागे घ्या. आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा.
उगाच कोणी प्रतिवाद करत नाही म्हणून काहीही लिहायचे?

इतके लिहूनसुद्धा 'तीन' (तिन नव्हे !) या आकड्याचा या शब्दात का अंतर्भाव झाला, हे सांगू शकला नाहीतच तुम्ही ! संध्याकाळला 'तिन्हीसांज'का म्हणत असावेत?
अर्वाचीन मराठीत 'सांज' हा शब्द 'संध्याकाळ' अशा अर्थाने वापरला जात असला, तरी मूलतः साधारण दीड प्रहरांएवढा (चार-साडेचार तास) काळ हा 'सांज' असतो. सकाळची एक सांज असते, दुपारची एक, आणि संध्याकाळची एक. हा अप्रचलित अर्थ आहे. 'सांजसकाळी' चा अर्थ सकाळ-संध्याकाळी असा होत नाही, तर सकाळच्या सांजकाळी (दिवसाचे सुरूवातीचे तीनचार तास) असा होतो. हिंदीत 'सांझसबेरे' याच अर्थाने वापरतात.
याप्रमाणे सकाळची एक सांज, दुपारची दुसरी, आणि संध्याकाळची तिसरी. या तिन्ही सांजा उलटून गेल्या, म्हणजे साधारण अंधार पडू लागला, रात्र नुकतीच सुरू झाली- त्या वेळेला 'तिन्हीसांजा' झाल्या असे म्हणतात. दादा कोंडकेंच्या सिनेमातले गाणे ऐकले असेलच- "झाल्या तिन्हीसांजा, करून शिणगार साजा, वाट पहाते मी गं, येणार साजण माझा !"

'तीन' या शब्दाला 'ही' प्रत्यय लागल्याने 'तिन्ही' शब्द झाला आहे. 'तिनि' ला तसा काहीच अर्थ नाही.
दोन + ही = दोन्ही. या शब्दाला 'दोनि' म्हटले तर ते जितके चुकीचे आहे, तितकेच तुमचे 'तिनि' चुकीचे आहे.

वृत्तात बसवण्यासाठी तडजोडी करणे ठीकच आहे, पण त्या ठिगळालाही नक्षीदार वेलबुट्टी म्हणण्याचा तुमचा अट्टाहास हास्यास्पद आहे. आम जनता पागल आहे असे समजून केलेले काहीही यशस्वी होत नसते, प्रोफेसरसाहेब.
"कातरवेळी मनात माझ्या एक पोकळी वावरते" ही ओळ तुमच्या ओळीपेक्षा कितीतरी सहज आणि प्रवाही आहे, हे तुम्हालाही कळते आहे. पण तुम्ही ते मान्य करणार नाही आहात, हे नक्की. कारणे प्रत्येकाला माहीत आहेतच. Happy

कातर वेळ शब्द पण योग्य आहे. पण माझ्या ओठावर, माझ्या पिंडानुसार, जो शब्द आला व जो बरोबर आहे याची मला खात्री होती, तो मी वापरला. असो.
शेवटी ज्याची त्याची शब्दकळा, शैली वेगळी असते, हेच खरे!em>

टाळ्या !
हे जे आपल्या पिंडानुसार शब्द निवडण्याचे, आपल्या शैलीने लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे- ते तुम्ही इतरांना का देत नाही? इतरांनी आपल्या पिंडाने लिहिलेल्या गझला "मी हा शेर असा लिहिला असता" असे म्हणत एकाच एक देवपूरकरी रंगात रंगवण्याचा अट्टाहास कशासाठी? तुमच्या गझलेतला एक चुकीचा शब्द एडिट केला, तर तुम्हाला इतका त्रास होतो, ती चूक लपवण्यासाठी तुम्ही इतकी केविलवाणी धडपड करता.. विचार करा, इतरांचे सगळे शेर एडिट केल्यावर त्यांना कसे वाटत असेल?

असो.
जमल्यास विचार करा.
बाकी अपेक्षा कुठलीही नाहीच.

प्रोफेसर साहेब, या गझलेवर मी दिलेला मूळ प्रतिसाद मीच संपादीत केला व एक टिंब फक्त राहू दिले. आपल्याला उत्सुकता असेल की मी मूळ प्रतिसादात काय लिहिले होते. त्याचा सारांश खाली लिहीत आहे.

"प्रोफेसर साहेब, गझल ही एक तारेवरची कसरत आहे, जी आपण लांबवर ठेवलेल्या आरामखुर्चीवर बसून पाय ताणून बघत आहात. ती कसरत आपल्याच्याने होणे नाही"

मी असा प्रतिसाद देण्याचे कारण हे होते की आपण निबंधस्पर्धेत भाग घेतल्याप्रमाणे ज्ञानवाटप केल्यासारखे जे प्रदीर्घ प्रतिसाद आणि भटांच्या भारदस्त आठवणी सांगत असता, त्याच्या पासंगाचीही गझल तुमच्याकडून स्वतःकडून होत नाही. गझल तर खास जमेना आणि गझलेवरच्या वादात मात्र तुम्ही कायम शेर्पा तेनसिंगसारखे झेंडे फडकवणे हे दोन चार महिने जे काय झाले असतील त्यात पाहिले आम्ही सर्वांनी. या प्रक्रियेत आपल्याला काही शागीर्दगणही मिळाले, जे आता पुढच्या प्रतिसादात तुम्ही म्हणालच की तो माझ्या गझलेचा हेतू नसून उत्कृष्ट गझलेचे आपोआप अनेक चाहते निर्माण होतात इत्यादी.

आता या वरील रचनेचा जो मतला आहे त्याची पहिली व शीर्षक ओळ वाचून माझ्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. तिनिसांज व तिन्हीसांज याबाबतचे विवेचन ज्ञानेशने केलेलेच आहे. त्यात पडण्याइतके ज्ञान मी संपादीत केलेले नाही कारण मराठी हा माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता. त्यामुळे जितके मराठी येते तितक्यातच मी गझल रचू शकतो व अधिक शब्दसंख्या व व्याकरणज्ञान प्राप्त करणे याचे कष्ट घेत नाही. पण ज्ञानेशने म्हंटलेले सर्व काही मला समजले व पटले. इतके नक्कीच सांगतो की अभ्यास नसूनही 'तिनिसांज' हा शब्द मात्र मला पटत नव्हता.

पण या ओळीने निर्माण केलेल्या अपेक्षा पुढच्या ओळीने नष्टच केल्या इतकेच नाही तर पुढचे शेर वाचण्याची इच्छाही कमी केली. याचे कारण पहिली सुंदर ओळ जे सांगते त्याचे केवळ एक प्रोजेक्शन पुढच्या ओळीत येत आहे. दुसर्‍या ओळीचा तिनिसांज या शब्दाशीही काही खास संबंध नाही. (संध्याकाळी ते अधिक होते वगैरे माहीत आहे मला), तरीही). पोकळी उरात वावरल्यानंतर आठवणींची गजबज होणे आणि मन गांगरणे हे केवळ भू़ लागल्यावर मी जेवलो, दोन चार दिवस जागरण झाल्यामुळे झोपलो, अश्यासारखे क्वॉलिफाइंग आहे. याच दोन ओळी उलटसुलट केल्या तर अधिक चांगला शेर (मतला) होईल, पण आता तो कसा चांगला होणार नाही त्यावर तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहेच.

कैसर आझमींचा हा शेर पाहा, जो अगदी तुमच्या मतल्यासारखा आहे. हा योगायोगही छान वाटला.

दुनियाभरकी यादे हमसे मिलने आती है
शाम ढले इस सुने घरमे मेला लगता है

शब्द वृत्तात बसवणे म्हणजे गझल नाही. तसेच, पन्नास एक गझला झाल्यानंतर (आपल्या खूप अधिक असतील हेही जाणतो मी) त्यातील दोन चार गझला सर्वांना चांगल्या वाटणे ही आत्मपरिक्षणाची घटिका मानावी.

तुम्ही माझ्या खालील शेरावर असा प्रतिसाद दिला होतात की 'म्हण शेरात वापरण्याचा सोस आहे, याशिवाय या शेरात काहीही नाही':

माझा तो शेर:

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले

आता तुमचा हा शेर पाहा:

काय फरक पडतो हत्तीला? खुशाल भुंकू दे कुत्री!
जे जे त्याच्या पायाखाली येते, ते ते चेंगरते!!

(बाकी यात तुम्ही बहुतेक स्वतःला हत्ती व इतर गझलकारांना कुत्री म्हणत असावात असे आपल्या आत्तापर्यंतच्या वावराच्या अभ्यासावरून मला तरी वाटतच आहे, किंवा फार तर भटांना हत्ती आणि इतर सर्वांना कुत्री वगैरे)

पण या शेरात काहीतरी दम आहे का प्रोफेसर साहेब? ही निव्वळ एक म्हण आहे. कुत्तोंको भौकने दो, हाथी क्यूं अपनी चाल बदले वगैरे! या शेरांसारख्या शेरांना तुम्ही स्वतःच्या गझलेत स्थान द्यावेत आणि कधीतरी भटांनी तुम्हाला कडकडून भेटून उड्या मारल्याच्या आठवणी सांगाव्यात हा हास्यास्पद, संतापजनक आणि थक्क करणारा विरोधाभास आहे.

आता तुम्ही मला पर्यायी शेर याच जमीनीत करून दाखवायला सांगाल, मला ते करता येतीलही, माझ्या गझलेची स्तुती करणारे माझ्या त्या गझलेची वारेमाप स्तुती करून कंपूबाजीचा भासही निर्माण करतील, त्यावर तुम्ही निबंधही लिहाल. पण स्वतःच्या मनाला विचारा की खणखणीतपणा तुमच्या हत्तीच्या शेरात आहे का?

प्रोफेसरह साहेब, तुमचे वय, अनुभव, गझललेखनाची प्रदीर्घ सवय, थोर गझलकारांचा मिळालेला सहवास, तुमचे क्वॉलिफिकेशन, तुमची सामाजीक पातळी आणि मायबोलीवरील तुमची चर्चेची एक संयत शैली या सर्वाचा पूर्ण मान आम्हा सर्वांच्या मनात आहे. मात्र तुमची गझल तुमच्यापेक्षा जास्त बोलत आहे आम्हा सर्वांशी. ती जे बोलत आहे ते तुम्ही जे बोलत आहात त्यापेक्षा कमी पातळीचे होऊ देऊ नका. तुम्ही व्यक्ती व गझलकार म्हणून आमच्याही जे जे काय बोलत असता त्याच पात्रतेचा संवाद तुमच्या गझलेनेही आमच्याशी करावा अशी अत्यल्प अपेक्षा आमच्या मनात आहे.

-'बेफिकीर'!

ज्ञानेश, बेफिकीर

कुठे डोकेफोड करताय आणि अपेक्षा करताय?

बाकी प्रोफेसरसाहेब,

तुमची गझल तुमचा दर्जा दाखवून देत आहे. बाकीची पोपटपंची नाही केली तरी चालण्यासारखे आहे.

कुणी कुणाला लिहायला सांगते ह्यावरून आपल्याला पोटशूळ उठतोय ह्याचे आश्चर्य अजिबातच वाटले नाही.

वरील प्रकारची कुठलीच भीती निदान मला तरी कधीच वाटत नाही!>>> खरे असावे, आपण चंगेजखान देवपूरकर असे नाव घ्या आता.

प्रा.साहेब सोडून सगळ्यांचे प्रतिसाद पटले
खूप काही शिकायला मिळते आहे
धन्यवाद

_____________

म्हणी व वाक्प्रचार बाबत प्रा. साहेब बेफीजीन्च्या शेरावर जे म्हणाले होते ते लक्षात होते(कारण तो शेरच तसा अविस्मरणीय आहे) मी प्रा.सा. ना त्या 'सात नाकवाल्या' गझलेवरच त्या दिवशी ती आठवण करून देणार होतो पण टाळले

प्रा. साहेबाना आमच्या 'विठ्ठलाळलेले' या शब्दातून भक्तीचा आव दिसला होता वर म्हणालेले की डिक्शनरी बाहेरचे शब्द गझलेला चालत नाहीत वगैरे
मध्यंतरी चौर्याकर्माचा आळ आला होता तेंव्हा प्रा सा. असे म्हणाले होते की शब्दाना नाही तर त्याच्या अर्थाना महत्व असते अन वर ब्लाब्लाब्ला.... असे बरेच काहीबाहे बोलले होते

आजकाल प्रा. साहेब काहीही बोलले की ब्लाब्लाब्ला इतकेच ऐकू येते

असो आपल्याला काय हाकानाका !!

इथली सगळी पापे इथेच फेडावी लागतात म्हणे !!!!

तिन....मूळ संस्कृत शब्द आहे त्रि, जे विशेषण आहे...................>>>>

(किती मोठी थाप मारायची याला काही लिमिट.........????????)

माझ्या महितीप्रमाणे

त्रिण्...मूळ संस्कृत शब्द आहे त्रि, जे विशेषण आहे....

तिन/तीन हा त्याचा अपभन्श आहे केवळ

सन्स्कृतात ३ सन्ख्या दाखवणारे मला माहीत असलेले सगळे शब्द "त्र" ने सुरू होतात
उदा:त्रिलोक, त्रिदेव ,त्रिमूर्ती ,त्रिकाल, त्रयस्थ, त्रिपुरसुन्दरी, त्रेधा, त्रिशन्कू, त्र्यम्बक ,त्रिफला, त्रिशूल इत्यादी

अजूनही शब्द आहेत पण ते ३ शी सम्बन्धित आहेत का माहीत नाही
उदा :त्रिज्या, त्रस्त , त्रूटी,

धन्यवाद !!

ज्ञानेश महोदय!
शब्दांची इतकी फोड करून देखिल, आपणास ते शब्दांचे अगडबंबब धुके वाटत आहे, हे पाहून आपल्या संवेदनांची व कल्पक बुद्धीची कीव येत आहे.
बाकी सत्याला सामोरे जावे, हे एखाद्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला कुणी सागतो आहे हे पाहून आम्हाला हसू अनावर होत आहे!
आपण ज्याला बेसिक ज्ञान म्हणता , ते माझ्याकडे आहे असा दावा मी तरी करत नाही.
मी विज्ञानाचा विद्यार्थी प्राध्यापक आहे, मराठीचा नाही.
हां, पण कसदार मायबोली शिकण्यासाठी धडपडणारा जरूर आहे!

आपण ज्याला ठोकून दिलेले वगैरे म्हणत आहात, त्यासाठी आपल्या साहसी बुद्धीचे कौतुक वाटते!
मी कुठेही लिखित वा प्रकाशित असलेले वाचल्याशिवाय माझ्या मनाचे मराठी गझलेतच काय, पण भूशास्त्रात देखिल कुठले वाक्य , विधान केलेले नाही.
आज ३६ वर्षे झाली, मी भूशास्त्र शिकवतो आहे. पण, आपल्यासारखी बेधडक, बिनबुडाची विधाने मी कधी केली नाहीत. जिथे मी वैयक्तिक मत मांडतो तिथे मी तसे स्पष्ट लिहितो.

आता आपण तोडलेल्या ता-यांची डागडुजी मी करत बसणार नाही. तेवढी माझ्याकडे उसंत नाही व खरोखरी त्याची जरूरही वाटत नाही!
ज्याला अज्ञानातच समाधान मानायचे असेल त्याने खुशाल मानावे. पण, मी जे लिहिले आहे त्यात एकही शब्द माझ्या मनाचा नाही. प्रत्येक शब्द लिखित आहे.
हां, आता ज्या तज्ञांनी ते केव्हाच लिहून ठेवले आहे, त्यांच्या ज्ञानाबाबतीत आपण जर संशय घ्याल तर मात्र माझा नाईलाज आहे बुवा!

लोनकढी थापा?.....आहो डोळे फाडून जरा पहा......मराठीतील तज्ञांना
(आपण सोडून) भेटा. दोन चार references बघा. केवढी ही प्रौढी हो!

सिद्ध करून दाखवा वगैरेसाठी माझ्याकडे वेळही नाही व त्याची गरजही वाटत नाही.
आणि इतके मोल मी आपणास का द्यावे, जेव्हा आपल्या प्रतिसादाची भाषा देखिल इतकी पातळी सोडणारी आहे. या तुमच्या बिनबुडाच्या वल्गनांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही.

बाकी सांज शब्दाचे आपण सांगितलेले अर्थ पटले. मला नवीन होते ते. त्याबद्दल धन्यवाद! मी यावर अजून वाचायचा प्रयत्न करेन, जसा वेळ मिळेल तसा.

आपण ज्या मर्कटटाळ्या वगैरे पिटल्या त्याबाबत थोडेसे.............
मी कुणाचेही काही एडिट करत नाही. माझे खयाल फक्त देत असतो. कुणीही ते स्वीकारावेत, टाळ्या पिटाव्यात यासाठी नव्हे!
एखाद्याला एखाद्या व्यक्तीचे, त्याच्या रंगाचेच वावडे असेल तर, मी काही करू शकत नाही.
अट्टहास तर कसलाच नाही! उलट एखादी गोष्ट कुणाला समजत नसेल तर त्या जिज्ञासूसाठी मी एक काय शंभर वेळा स्पष्टीकरण द्यायला तयार असतो.
पण टुकारांसाठी, टारगटांसाठी, झोपेचे सोंग घेतलेल्यांसाठी, माझ्याकडे वेळ नसतो.

कुणीही माझे लेखन एडिट केले तरी मला कसलाही राग येत नाही, कुठलाही त्रास होत नाही. उलट मी म्हणतो माझा प्रत्येक शेर एडिट केला जावा. निदान मला तरी माझा सौंदर्यबोध तपासून घेता यईल, काही तरी शिकता येईल!
टीकेला मी तर कधीच घाबरत नाही. अन्यथा मी माझ्या गझला दडवून नसत्या का ठेवल्या? इथे कशाला प्रसिद्ध केल्या असत्या?

कुठलीही चूक परत परत करणे माझ्या रक्तात नाही! चुकीचे समर्थन करणे तर दूर......
उलट आपल्या या तथाकथित अधिकारवाणीने दिलेल्या प्रतिसादातला आव बघून तुमच्या दीनवाण्या धडपडीचीच मला कीव येत आहे! असो.
बाकी, लिहिणा-याला विचार करावाच लागतो. त्यास तसे कर असे सांगावे लागत नाही.
बाकी मी आपणास काय सांगू? आणि आपल्याकडून कसल्या अपेक्षा तरी करू?
इतका तर मी थोर नाही.
जाता जाता एक शेर देतो आणि थांबतो........

इतकी अजून मोठी माझी तहान नाही!
इतका तुझ्याप्रमाणे मीही महान नाही!!

.........प्रा.सतीश देपूरकर

सुधारक कावळे महाराज!
अगदी तुमच्या मनातील बोललात! हेच जर आधी मन उघडे केले असते तर, माझा वेळ तरी वाचला असता!
बाकी कल्पक व आशयघन प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
.........प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................

डॉक्टर कैलासराव!
इतरांची री पुढे ओढण्या ऎवजी आपले म्हणणे मांडले असते तर बरे झाले असते!
टीप: मायबोलीवर बाकी हांजी बाबांची फारच वर्दळ असते हल्ली!
..........प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

बेफिकीरजी!

गझल.....तारेवरची कसरत.......काही समजले नाही बुवा!
गझललिखाण म्हणजे काय डोंबा-याची कसरत आहे? खेळ आहे?
तसे असेल तर, ती कसरत मी करणार नाही. कारण माझा कसरतीवर विश्वास नाही.
कल्पकतेवर, प्रतिभेवर, प्रज्ञेवर मात्र विश्वास आहे. असो.
निबंध, प्रबंध लिहिण्याची मला हौस नाही.
मी ज्ञानदानाचे (ज्ञानवाटपाचे म्हणा हवे तर) पवित्र काम करतो, ज्याचा मला अभिमान आहे.
अज्ञानदान वा आज्ञानवाटप कधीच करत नाही.

कोण कोणाच्या पासंगाची गझल लिहितो, त्याची तपासणी करायची वा तसे प्रशस्तिपत्रक द्यायची कुणालाही आवश्यक्ता नसते.
ज्याला त्याला तो किती पाण्यात आहे, ज्याचे त्याचे हेतू , ज्याची त्याची बदमाशी वगैरे माहीत असते.
झेंडे फडकावणे/गाडणे वगैरे मी कधीच करत नाही शेर्पा तेनसिंग तर दूर.........

शागिर्द, चेले, भक्त, शिष्य, पट्टशिष्य वगैरे शोधायची मला गरज नाही.
माझे कुठलेच कंपू नाहीत.
माझा माझ्या लिखाणावर पूर्ण विश्वास आहे. कुणीही माझ्या शेरांना पर्यायी शेर द्यावेत! मला आनंदच होईल! असो.

चाहत्यांची वानवा मला कधीच नव्हती. सुदैवाने इतके दारिद्र्य ईश्वर कृपेने माझ्याकडे कधीच नव्हते! नेटवर आताशा मी आलो आहे. पण यापूर्वी देखिल मला अशी वानवा कधीच वाटली नाही!
दुर्दैवाने आपला थेट परिचय नाही, याचे वाईट वाटते.

ज्ञानेशजींनी जे तारे बेधडक तोडले आहेत, ते पाहता तेवढे ज्ञान मी देखिल संपादीत केलेले नाही.
मराठी हा माझा पण अभ्यासाचा विषय नव्हता. पण, मराठी शिकण्यासाठी मात्र मी जरूर धडपड करत असतो!
तिनिसांज वगैरे विषयी तज्ञांचे म्हणणे(लिखित) मी माझ्या इतर प्रतिसादात वरती दिले आहे.

भूषणराव! एक विचारू का? थट्टा नाही........
शेरातील दोन ओळींमधे कशा प्रकारचे नाते असावे असे आपणास वाटते?
शब्दिक नाते, प्रतिमांचे नाते, भावार्थाचे नाते, मूडचे नाते, विरोधाभासाचे नाते, पूरकतेचे नाते, नेमके कोणते नाते?
चकीत करणे, थक्क करणे, चमत्कृती करणे, काही तरी चमकदार करणे, शाब्दिक कोटट्या करणे, शब्दांचे पिसारे फुलवणे, शब्दांचे खेळ करणे, केवळ विरोधी अर्थांच्या शब्दांची जोडगोळी मांडणे, वगैरे शेरात असायला हवेतच का?

माझ्या मते शेरातील दोन ओळी एकजीव होवून एक समग्र सत्य, भाव, कल्पक विचार कलात्मकरित्या प्रकट झाला की, शेर कामयाब व्हावा.
अर्थात या दोन ओळी काळजातून याव्यात, रचलेल्या वा आव आणून, पवित्रेबाजपणे लिहिलेल्या नसाव्यात.
अर्थात हे सर्व सापेक्ष आहे, असे कोणी म्हणेल. पण, ते सर्व चाणाक्ष रसिकांच्या वाचल्या वाचल्या लक्षात येतेच!
माझ्या मते सच्चा कामयाब शेर टचकन काळजास लागतो. त्याचे सौंदर्य निमिषार्धात अंतरंगात उलगडते.
खरा शेर आपल्याला विचार करायला लावतो. शेरातील दोन ओळींतला समग्र अर्थ हा महत्वाचा असतो. त्या अर्थाची, शेरातील ओळींच्या लांबीमधील टक्केवारी ही गौण असते. तेव्हा projection/extensionवगैरे मला काही समजत नाही. शेर पूर्ण वाचल्यावर काय परिणाम साधतो, कोणते अर्थ, भावभावना निनादत रहातात, हे समजते. असो.

कोणत्याही मूडचे, गोष्टीचे कलात्मक, प्रामाणिक प्रकटीकरण करण्याने शेर व्हावा असे मला वाटते.

तिनिसांज हा एक प्रहर आहे, ज्याचे स्पष्टीकरण मी माझ्या प्रतिसादात केले आहे. त्या प्रहरातील आमची अवस्था मतल्यात मांडली होती. आता या अवस्थेचे शवविच्छेदन ज्याला करायचे त्याने ते करावे! फक्त शेर शववत नसावा हे मात्र निश्चित! भूक लागल्यावर जेवणे, जागरण झाल्याने झोपणे वगैरेंशी जी आपण तुलना केली आहे, त्याने तर मी अवाकच झालो! हा नक्की भूषणरावांचाच प्रतिसाद आहे ना, म्हणून मी स्क्रोल करून खात्री करून घेतली.

शेरातील दोन ओळी लिहिल्यावर कोणती ओळ पहिली, कोणती दुसरी, याबाबत, भूषणराव ब-याचवेळा माझाही गोंधळ उडतो, हे मी कबूल करतो. अशा संभ्रमाच्या वेळी मी अक्षरश: शेकडोवेळा आलटूनपालटून ओळी गुणगुणून पहातो व माझी मनोदेवता जे सांगते, ते मी स्वीकारतो!

(अवांतर: डॉक्टर सुरेशचंद्र नाडकरणी सरांशी याबाबत माझी ब-याचवेळा चर्चा झाली. असो.)

पहिली ओळ, मग दुसरी ओळ असे मी तरी बंधन मानत नाही. जो मिसरा जसा प्रसवेल तसे मी त्याला प्रसवू देतो. मी स्वत: त्याच्या आड येत नाही. असो.
शेवटी कुठली ओळ पहिली असावी, कुठली दुसरी, हा ज्याच्या त्याच्या टेस्टचा प्रश्न आहे. बाकी, मी आपल्या सूचनेचा आदर करतो!

कैसर आझमीच्या शेराचा उल्लेख जो आपण केला होता, त्याबाबत..........
बारकाईने विचार केल्यावर मला हे उलगडले.............
त्यांच्या व माझ्या शेराचा भाव सारखा आहे. शेवटी मानवी भावभावना सारख्याच असतात. त्यांची अभिव्यक्ती व्यक्तीगणीक व्यक्तित्वानुसार बदलते हेच खरे!

कैसर म्हणतात.........
संध्याकाळ ढळताना, म्हणजेच तिनिसांजेला, या माझ्या सुन्या घरात (मनरुपी घरात) एक आठवणींची जत्राच भरते. जणू सगळ्या दुनियेभरच्या आठवणी आम्हाला भेटयला येतात!.....वा! वा! सुंदर

मी हा शेर वाचला नव्हता वा ऎकला नव्हता. आपण तो इथे उधृत केल्याबद्दल धन्यवाद!
हा योगायोगही छान वाटला<<<<<आपले हे वाक्य भिडले!
हे वाक्य शालजोडीतले नाही ना, भूषणराव?
इथे वरवरचे शाब्दिक साधर्म्य जरूर आहे.
जसे शाम ढले............तिनिसांजेला
यादे...........आठवणी
घरमे मेला लगना...........आठवणींची गजबज इत्यादी.

पण, भूषणराव, जरा खोलात जावून विचार केला तर इथे दोन व्यक्तींच्या व्यक्तीत्वातला फरक त्यांच्या अभिव्यक्तीत पडतो, कसा ते सांगतो........
इथे आम्ही उरात एक पोकळी वावरते असे लिहिले आहे. ही पोकळीची प्रतिमा कैसरांच्या शेरात तितकी प्रकर्षाने नाही. सुने घरमें अशी शब्दरचना आहे. भाव तोच आहे. पण एक रितेपण वावरणे म्हणजे व सुने घर म्हणजे यात बराच फरक आहे, (सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या) असे मला वाटते. बाकी मेला लगना, आठवणींची गजबज हे सारखे आहे, हे मला कबूल आहे. पण या माझ्या शेरात पोकळीचे वावरणे ही प्रतिमा मला शेराचे बलस्थान, सौंदर्यस्थान वाटते. हे दोन्ही शेर आपण तज्ञांसमोर मांडा,पहा काय म्हणतात ते.

माझ्या मते दोन्ही शेर आपापल्या जागी सुंदरच आहेत! हे दोन्ही शेर एकच भावना, मनाची अवस्था, प्रत्यय प्रकट करतात. असो.

अवांतर: मी साधारणपणे १९९५ मध्ये नागपूरजवळ असणा-या तुमसरला एक परिक्षक म्हणून गेलो होतो. तिथे माझे गझलवेड पाहून तिथल्या एका शिक्षकाने मला एक पुस्तक भेट दिले. पुस्तकावर तारीख मिळाली. २५-०४-१९९५.
(बखिदमत जनाब प्रा.सतीश देवपूरकर साहबकी नजर! २५-०४-१९९५.) असे त्यावर लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे “रूबरू” .....आधुनिक उर्दू शायरी, संपादक....उमेश शिवहरे.

हे एक अप्रतिम पुस्तक आहे, भूषणराव! अजून हे पुस्तक माझ्या पचनी पडलेले नाही. अजूनही वाजतो अधूनमधून.
काय आहे या पुस्तकात?...........

उमेश शिवहरेंच्या शब्दात...........

एकही भावभूमी पर दो अलग अलग शायरों के नजरिये को एक साथ रखा गया है!
“रूबरू” उर्दू शायरी के संकलन में एक नया प्रयोग है!

इथे एकच भावभावना व्यक्त करणारे दोन शायरांचे शेर जोडीने दिले आहेत.
पुस्तक अभ्यासण्याजोगे व रसाळ आहे.

एक उदाहरण देतो...........

यहॉं दरख्तोंके सायेमें धूप लगती है
चलो यहॉं से चले और उम्र-भर के लिये
..............दुष्यंत कुमार

तमाम उंचे दरख्तों से बचके चलता हूं
मुझे खबर है कि साया किसी के पास नही
.................मुमताज शकेब

वरील दोन्ही शेर अप्रतिम आहेत, आपापल्या जागी. इथे आपण त्यांच्या सौंदर्याची तुलनाच करू शकत नाही. केवळ दरख्त, साया शब्द सामाईक आहेत. हा कसा योगायोग असे म्हणू शकत नाही.

हे वाचनात यायच्या आधीच मी लिहिलेला मतला देत आहे......

झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!!

अजून एक उदाहरण देतो..........

वो शख्स जिसको खिजा ले गई बहारोंसे
कभी चमनमें शिगुफ्ता(खिला हुआ) गुलाब जैसा था
........................नसीम महमूदी

सदियों में फैलने की तमन्ना लिए हुए
क्या शख्स था जो खो गया लम्होंकी भीड में
.....................ईर्फान दानिश

माझा एक मतला देत आहे...........

नकोस माझी पुसू खुशाली कळीकळीला!
विचार माझा ठावठिकाणा पानगळीला!!
...............प्रा.सतीश देवपूरकर
तात्पर्य: असे विलक्षण योगायोग ब-याच ठिकाणी येवू शकतात!
..........................................................................................................

पुढील शेर वाचण्याची इच्छा कमी केली...........वगैरे......हे निराळेच आहे!

हत्तीच्या शेरावर आपण जे लिहिले, त्या बाबत एक गोष्ट सांगू इच्छितो........

या शेरातील पहिल्या ओळीत म्हणीचा वापर आहे........जरूर!
पण, दुस-या ओळीचे काय?........

“जे जे त्याच्या पायाखाली येते ते ते चेंगरते!”
या ओळीकडे आपण कसे दुर्लक्ष केले भूषणराव?
सामर्थ्यवान व्यक्तीच्या वाटेत कुणीही जरी आला तर त्याची अवस्था काय होते हे चेंगरते या काफियात सांगितले आहे. त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष झालेले दिसते!

आता या शेरात किती दम आहे, हे ज्याने त्याने ठरवावे! हां, इतर शेरांच्या तुलनेत हा शेर तितका प्रभावी नाही हे मी कबूल करतो. असे डावे उजवे हे गझलेत असू शकते. सगळेच शेर, फार विरळच, सारख्या सामर्थ्याचे असतात (काही श्रेष्ठ शायरांचे अपवाद सोडून).

कोणत्या शेराला कुणी कोणाच्या गझलेत स्थान देणे व कुणाच्या आठवणी अशी तुलना करणेच मला अप्रस्तुत वाटत आहे.
आठवणी या घडून गेलेल्या गोष्टींच्या पाऊलखुणा असतात. अगदी त्या बरहुकूमच वर्तमान हरेक क्षणी चालेल, असा काही नियम असतो का? बर, प्रत्येक वेळी शेरात सर्वांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करता येतात का?
प्रत्येक शेर स्वयंपूर्ण कविता असते.
एखाद्या कवीची प्रत्येक कविता ही आवडायला हवी का? त्यावरून त्याला कुठले लेबल चिकटवायचे असते काय?

हत्तीच्या शेरात तितका खणखणीतपणा नाही हे मी कबूल करतो.

बाकी, भूषणराव शेवटचा परिच्छेद जो आपण लिहिला आहेत, त्याचा मी आदर करतो व त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

आपल्या शेवटच्या ओळीतील अपेक्षा मी पूर्ण करण्याचा निकराने प्रयत्न करेन. आपल्या अपेक्षेचा मला आदर आहे. मी तिची जाणीव सदैव माझ्या मनात ठेवेन, एवढे सांगून थांबतो!
महाविद्यालयात जायला हवे, ती माझी भाकरी आहे!
...........प्रा.सतीश देवपूरकर

टीप:
भूषणराव, काही चुकीचे बोललो वा लिहिले असल्यास कृपया माफ करावे! मी आपली गझल संबधित पोटतिडीक समजू शकतो. आपण दोघेही एकाच नावेतील प्रवासी आहोत.
अगम्य प्रतिसादाचा खुलासा वाचून, जे सुचले ते ते लिहिले.
धन्यवाद!
...........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................

Pages