गोष्ट एका खर्‍या इडियटची - संयुक्ता (अनु. उषःप्रभा पागे)

Submitted by कविन on 10 September, 2012 - 06:18

"लाईफ मे सेटल होना मंगता है." हे जेव्हा रंगिलातला आमिर खान उर्मिला मातोंडकरला सांगत असतो तेव्हा हे सेटल होणं म्हणजे नेमकं काय? ह्याविषयी त्याचे त्याच्या लेखी फंडे अगदी स्पष्ट असतात.

तुझ्या लेखी सेटल होणं म्हणजे जे असेल तेच आणि तसच ते माझ्यालेखी असेल अस नाही. प्रत्येकाची स्वत:ची अशी वेगळी व्यख्या असु शकते पण मुख्य भाग हा की ही आपली आपल्या पुरती व्याख्या तरी नीटशी कळलेली असते का? ज्यांना ती कळते, किंवा किमान पक्षी कळलेय असं वाटतं ते भाग्यवान. माझ्या बाबतीत मी अजूनही चाचपडतेच आहे. किंवा असं म्हणता येईल की प्रत्येक टप्प्यावर ती व्याख्या माझ्यापुरती बदलत राहीलेय.

शाळा संपुन महाविद्यालयात जायची वेळ आली तेव्हा काय किंवा पदवी मिळाल्यावर पुढे काय? ह्या प्रश्नावर विचार करायची वेळ आली तेव्हाही धडपणे कळलच नव्हतं "आपली नेमकी आवड काय हे आणि करायचय काय हे ही."

पालक वर्गही आखून दिलेल्या रुळावरुन चालणारा आम्हीही तसेच. तसं त्यात त्यांचं काही चूक होतं असं नाही पण १० वी झालं की १२ वी मग पदवी मग अजून काही शिकायचं असल्यास ते पुर्ण केलं की मग नोकरी... ती एकदा लागली की लागलं आयुष्य मार्गी. गाठली सेटल होण्यातली पहिली पायरी. असा एकंदर साचा पडुन गेलेला त्यांचाही नी आमचाही.

अ+ब=६ हे समिकरण आम्ही तेव्हाच सोडवू शकतो जेव्हा आम्हाला ह्यातल्या "अ" किंवा "ब" ची किंमत ठावूक असते. (इथे आम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, आम्ही म्हणजे एकतर मी एकटीच ते आदरार्थी संबोधन समजू शकता किंवा मग माझ्यासारखे सगळे=आम्ही असही, जर असे असतील माझ्यासारखे तर समजू शकता)

पण दोन्ही माहिती नसतं तेव्हा आम्ही गोंधळतो. ठामपणे ४+२=६ ; ३+३=६ ; ५+१=६ असं वेगवेगळे मार्ग चोखाळुन ते ही कसे बरोबर आहेत हे दाखवायला कमी पडतो. जसं इथे मी (इथे मी म्हणजे मी एकटीच) उदाहरण द्यायला कमी पडलेय तसच. म्हणायचय ते हेच की एखादं उत्तर काढायचे एकापेक्षा अधिक मार्ग असू शकतात आणि जेव्हा एखादा साचा वापरायची सवय होते मनाला तेव्हा साच्याबाहेरचा पर्याय पटकन सुचत नाही.

म्हणुनच की काय धोपट मार्ग सोडून निराळ्या वाटेवरुन उत्तर शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या अनुभवावर आधारलेलं हे प्रामाणिक कथन माझ्या मनाला अतिषय भिडून गेलं.

संयुक्ता नावाच्या मुलीच्या शिक्षणाचा हा प्रवास ह्या साचेबद्ध मानसिकतेलाच छेद देत विचार करायला भाग पाडतो.

तिने जरी प्रस्तावनेत म्हंटलं असलं की हे पुस्तक लिहिण्याचं कारण तिच्या वयाच्या मुलामुलींना वेगळे पर्याय असतात ते वापरुनही यशस्वी होता येतं हे कळावं असं आहे तरिही मला वाटलं हे नुसतंच तिच्या वयाच्या मुलांसाठी नाही तर तिच्या पालकांनी दाखवलेल्या सजग पालकत्वामुळे हे पुस्तक माझ्यासारख्या पालकांसाठीही आहेच.

तिचा प्रवास हा जितका तिचा आहे तितकाच तो तिच्या पालकांचा आहे. एक पालक म्हणून तिचे अनुभव कथन वाचताना जाणवत रहातं ते हेच की हा साच्या बाहेरचा स्व: शोधनाचा, स्वयंअध्ययनाचा नी वेगळ्या वाटेवरचा प्रवास तिला शक्य झाला तो केवळ तिच्या पालकांनी वेळोवेळी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर. तिचा मार्ग हा धोपट मार्ग नव्हता त्याचा रस्ता झालेला नव्हता त्याच्या गाईडलाईन्स रेडिमेड नव्हत्या. हा रस्ता चुकला तर? पुन्हा मागे येऊन नव्याने सुरवात करावी लागली असती. एक पालक म्हणून ह्या सगळ्या पुढच्या जर तर चे विचार कधीतरी मनात आलेच असतील की त्यांच्या. पण तिला तिचा वेळ घेऊ देऊन, तिचा निर्णय होईपर्यंत किंवा निर्णय झाल्यावरही तिच्या संपुर्ण प्रवासात ज्यांनी तिच्यावर विश्वास दाखवून ज्या पेशन्टली आणि प्रगल्भतेने त्यांच्यातल्या नात्याला सांभाळले ते पाहून खरच वाटत रहातं माझ्या लेकीला तिचे निर्णय घेऊ देऊन त्यातले टक्के टोणपे खाऊ देण्या इतपत आणि गरज पडेल तेव्हाच मदतीचा हात देण्याइतपत प्रगल्भ पालक होणं मला जमायला हवं त्याचबरोबर काही लागलं चुकलं खुपलं तर आई बाबा आहेतच हाही विश्वास तिला वाटायला हवा ते ही जास्तीची लुडबूड तिच्या निर्णयात न होता.

संयुक्ताच्या अनुभव कथनात तिच्या पालकां विषयी मुद्दाम वेगळ असं दरवेळी लिहीलेलं नसलं तरी जे जाणवतं ते हेच सजग पालकत्व. हे जमलं पाहीजे आपल्यालाही असं वाटत रहातं.

पुस्तक माझ्या वयाच्या १४-१५ वर्षी हातात येतं तर मी मला तिच्या लेखी समजून ते वाचलं असतं पण आज वाचताना जाणवत रहातं ते हे की तिला हे जमु शकलं त्यात तिच्या बरोबरीने तिला असा विश्वास देणारे पालक होते म्हणून.

अशी संयुक्ता माझ्याही लेकीत असेल पण तिच्या पालकां प्रमाणे आम्हालाही एकाच वेळी आधार वाटणार पण बंधन न वाटू देणारं पालकत्व जमायला हवं.

वाट चुकण्याचं भय बाळगू नकोस मात्र वाट शोधाविशीच न वाटणं ह्या वृत्तीच मात्र भय बाळग. चूक झालीच तर मागे फिरुन दुसरी वाट तितक्याच समर्थपणे निवडता येते हा आत्मविश्वास आमच्या संयुक्ताला आमच्याकडुन मिळायला हवा. हे जाणवलं पुस्तक वाचून.

सर्वात शेवटी अजून एका कारणासाठी हे पुस्तक आवडलं ते म्हणजे हे की पुस्तक लिहीताना "माझं तेच खरं" कींवा "१००% यशस्वी होण्याचा मार्ग" असं कुठूनही सुचीत होत नाही. उलट हे जरी ट्राईड ऍन्ड टेस्टेड पद्धतीचं (अनुभव)कथन असलं तरीही प्रत्येक पद्धतीत फायदे तोटे असतात तसेच ते ह्या साच्याबाहेरील शिक्षण प्रवासातही आहेत. आणि ही पद्धत तिच्यासाठी योग्य ठरली म्हणून ती प्रत्येकासाठीच ठरेल असही नाही हे मान्य करण्याचा प्रामाणिक पणाही ह्यात आहे.

काही वेळा एखादं पुस्तक दुसर्‍यर्‍यांदार्‍यांदा वाचताना वेगळं असं काही उलगडत जातं. कधी "बिटवीन द लाईन्स" म्हणतो असं काही जाणवून जातं. कधी काही वेगळा परस्पेक्टीव्ह समोर येतो. कधी पुर्वी वाटलेलं ते पुन्हा वाचताना तितक्या तीव्रपणे जाणवतही नाही आणि कधी आधी न जाणवलेलं असं काही नव्याने जाणवून जातं. कदाचित प्रत्येकालाच असं वाटत असेल.. कदाचित माझ्याच कच्च्या मडक्याचा हा दोष असेल.

जे काही असेल ते ते सर्व तुमच्या बरोबर शेअर करावं कदाचित ह्या पुस्तका बद्दल तुमच्या पोतडित अजुन काही वेगळा अनुभव जमा असेल तो ही ह्या निमित्ताने कळेल ह्या हेतूने ह्या कागदाच्या घडीला होडी करुन पाण्यात सोडलं इतकच... बाकी काहीच नाही

____________________________________________

तर आता पुस्ताकाची माहिती...

मराठी अनुवादाचं नाव: गोष्ट एका खऱ्या "इडियटची"

अनुवादक: उष:प्रभा पागे

प्रकाशकः राजहंस प्रकाशन

आय एस बी एन: ९७८-८१-७४३४-४९८-४

किंमत: १००/-

मुळ पुस्तकाचं नाव: लर्निंग द हार्ट वे

मुळ लेखिका: संयुक्ता

मुळ पुस्तकाचे प्रकाशक: अदर इंडिया प्रेस

(मुखपृष्ठावरचा इडीयट मधला ड हा उलटा आहे. त्यामागचा चित्रकाराचा विचार मला खुप आवडला. वेगळा मार्ग किंबहूना प्रवाहाच्या विरुद्धचा मार्ग निवडल्याचं दाखवणारा हा उलटा ड मला एकदम योग्य/ परिणामकारक वाटला. मुखपृष्ठावरचा दोर्‍यांचा गुंता हा देखील जितका तिचा विणकाम प्रवासा विषयी तितकाच वाटेवरचा गुंता सोडवण्या विषयी किंवा एकंदरीतच निर्णया पर्यंत पोहोचताना गुंता सोडवावा लागतो ह्या विषयीही असावा असं वाटलं)

Resize of Resize of sanyukta.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, भारावून जाऊन लिहिलंयस, कवे Happy

प्रगल्भ पालकत्व ही खरंच काळाची गरज आहे. आणि एक पालक म्हणून हे नक्की सांगते, की ती अतिशय सुंदर गोष्ट आहे. दर स्वयंनिर्णयागणिक पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाला जो एक पैलू पडतो की नाही, तो अतिशय कोरीव आणि खणखणीत असतो. यासाठी आपल्या मनाची खूप तयारी करावी लागते; शांतपणे, धीरानं घ्यावं लागतं. (याचा नुकताच एक अनुभव घेतलेला आहे. त्याबद्दल प्रत्यक्ष भेटीत कधीतरी.)

छान ओळख.
अगदी नेटका पुस्तक परिचय.
पुस्तक वाचावेसे वाटायला लागलेय म्हणजेच तुमची कागदाची होडी पैलतीरी पोचलीय. Happy

फार आवडलं.

>>माझ्या लेकीला तिचे निर्णय घेऊ देऊन त्यातले टक्के टोणपे खाऊ देण्या इतपत आणि गरज पडेल तेव्हाच मदतीचा हात देण्याइतपत प्रगल्भ पालक होणं मला जमायला हवं त्याचबरोबर काही लागलं चुकलं खुपलं तर आई बाबा आहेतच हाही विश्वास तिला वाटायला हवा ते ही जास्तीची लुडबूड तिच्या निर्णयात न होता.
लाखमोलाचं!!!

मस्त लिहिलंयस कविता. पुस्तक मिळवून नक्कीच वाचणार.

प्रस्तावना तर आवडलीच, पण मुखपृष्ठाविषयीही लिहिलंस ते विशेष उल्लेखनिय आहे Happy