गळताच पान झाडाचे, काळीज फाटते माझे!

Submitted by सतीश देवपूरकर on 7 September, 2012 - 11:07

गझल
गळताच पान झाडाचे, काळीज फाटते माझे!
वाजता पाय वा-याचे, काळीज फाटते माझे!!

लागली दृष्ट गगनाला, केवढ्या गळाल्या उल्का!
पाहून तेज ता-याचे, काळीज फाटते माझे!!

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!

थडग्यांत घरादारांच्या संपूर्ण गाव निजलेले;
आठवू नाव कोणाचे? काळीज फाटते माझे!

बोलतो कुणीही काही, मी मात्र सोडुनी देतो....
पण, रुतता शर शब्दाचे, काळीज फाटते माझे!

मी खुशाल प्यालो जे जे, वाट्याला माझ्या आले!
भिनताच जहर जगण्याचे, काळीज फाटते माझे!!

वाट्याला माझ्या कोठे, आलीत फुले किरणांची?
ते काटे काळोखाचे....काळीज फाटते माझे!

ते बंध असो रक्ताचे! वा बंध असो स्नेहाचे!
तुटताच बंध नात्याचे, काळीज फाटते माझे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!..

शेर खूपच सुंदर..

पण उला मिसऱ्यात 'मलाही' असे आल्यावर पुन्हा 'मला' असे येणे अनावश्यक वाटले..विचार व्हावा...

लागली दृष्ट गगनाला, केवढ्या गळाल्या उल्का!
पाहून तेज ता-याचे, काळीज फाटते माझे!!
>> मस्तच!

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!
>>'मला' ची द्वीरुक्ती खटकतेय का? का मलाच फक्त असं वाटतंय?

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!...अफाट शेर.. वाह!

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!.....हा मिसरा यातील 'मला'च्या द्विरुक्तीमुळेच जास्त वाचनीय वाटला. (मावैम)

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!..

शेर खूपच सुंदर..

पण उला मिसऱ्यात 'मलाही' असे आल्यावर पुन्हा 'मला' असे येणे अनावश्यक वाटले..विचार व्हावा...

वैभव फाटक काय पण काय? कदाचीत आपणास हा शेर कळला नसेल.

त्या शेराचा अर्थ असा आहे की, ---- अद्याप मीच मला ओळखले नाही किंवा मीच मला अजून गवसलो नाही. त्यामूळे मलाही आणि मला हे शब्द एका पाठी एक येणारच. Happy

सर्व रसिकांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
माझा शेर असा आहे.......
अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!

शेराचा गद्य अर्थ.........
(इतरांचे सोडा), मलाही/मला सुद्धा/मला देखिल अद्याप स्वत:ला, म्हणजेच “मला” वेचता आलेले नाही. (कारण) हे माझे पाचोळ्यासारखे जिणे/जगणे, ज्यामुळे (जगताना) माझे काळीज फाटते!
इथे काय/कुणाला वेचण्याचा विषय आहे?.......स्वत:ला म्हणजेच शायराच्या भाषेत “मला”. मला हे वेचण्याचे object आहे. वेचणारे कोण इतर लोक व स्वत: शायर. मलाही वेचता आले नाही, असे का म्हटले, तर इतर लोकांना पण ते जमले नाही, हे सुचवायला “मलाही” असा शब्द योजला आहे. कुणाला वेचायचे? तर ते “मला” वेचायचे. म्हणून मलाही असून सुद्धा मला हा शब्दप्रयोग केला आहे, ज्याने शेराचा थेटपणा, बोलकेपणा, व सौंदर्य वाढते असा मला feel आला.

आता शेराचा लाक्षणिक/ध्वन्यार्थ................
इथे शेरातील दुसरी ओळ अत्यंत महत्वाची आहे. त्यात देखिल दुस-या ओळीचा पूर्वार्ध...........हे जगणे पाचोळ्याचे........... ज्याने या शेराचे सौंदर्य वाढले आहे. कसे ते खुलासेवार सांगतो..........
मी म्हणतो, माझे आयुष्य हे पाचोळ्याचे आहे. पाचोळ्याची प्रतिमा मी का वापरली? क्षूद्रपणा, निम्नस्तरीय आयुष्य, दुस-याच्या लहरीवर चालणारे आयुष्य, केविलवाणे, दयनीय आयुष्य वगैरे भावना अभिव्यक्त करायला पाचोळ्याचे प्रतिक झटकन माझ्या मनात आले.

पाचोळा हा वा-याबरोबर कुठेही उडत, भरकटत जातो. त्याला स्वत:ची दिशा नसते. पाचोळा निर्जीव वाटतो, जसे मी देखिल जगताना निष्प्राण झालेलो आहे! परिस्थितीच्या वा दैवाच्या वा-याबरोबर, त्याच्या लहरीवर उडत/भरकटत जाणारा! पाचोळा इकडे तिकडे विखुरतो, पसरतो, पसा-यासारखा दिसतो. आपण काय करतो पाचोळ्याचा केर काढून तो कचरापेटीत टाकतो. त्यासाठी पाचोळा आधी वेचायला/गोळा करायला लागतो, म्हणजे पाचोळ्याचा पसारा आवरला जातो.
पाचोळ्यालाही मन असते, हृदय असते, भावना असतात, स्वप्ने असतात, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ असतात. त्याला देखिल वादळे, वारा सोसायला लागतात. पण हतबलपणे, त्याला बिचा-याला वा-याच्या लहरीवर इकडून तिकडे, तिकडून इकडे उडायला/जायला लागते. तो विखुरला जातो, पसारा वाटतो. पाचोळ्याचा पसारा आवरायचे झाल्यास तो पाचोळा गोळा करावा लागतो, वेचायला लगतो. भले पसारा आवरला तरी पाचोळ्याच्या नशिबात कचरापेटीच असते. माझ्या आयुष्याला, माझ्या अस्तित्वाला मी पाचोळ्यात पाहिले, व मला माझेच प्रतिबिंब पाचोळ्यात दिसले, म्हणून पाचोळ्याची प्रतिमा मी या शेरात वापरली.
एखद्या पाचोळ्यासारखे, आयुष्य विखुरले होते. माझा हा आयुष्याचा पसारा कुणालाही आवरता न येण्याजोगा होता. इतरांचे सोडा, मला सुद्धा स्वत:ला अजूनही वेचायला जमले नाही! कारण मी होतो एक उडणारा, हलका, हतबल पाचोळा! त्यामुळे, परिस्थितीचा वारा वा वादळ आले की, माझे काळीज जणू फाटते, काळजाचे जणू पाणी, पाणी होते!

इथे पाचोळ्याचे जगणे, स्वत:ला देखिल स्वत: वेचता /गोळा करता न येणे, दुस-यांना देखिल ते न जमणे, म्हणून इतके अस्ताव्यस्त व हतबल आयुष्य वाट्याला येणे, अशा आयुष्यामुळे काळीज फाटणे, काळजाचे पाणी पाणी होणे..............इत्यादी व्यामिश्र भाव शेरात आल्याने शेरातील दोन्ही मिसरे एकजीव होवून शेर काळजाचा ठाव घेतो असे मला तरी वाटते.
टीप: मास्तर असल्याने फोड करून रसाळ उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आपण वाचण्याचे श्रम घेतल्याबद्दल आपले आभार!
असाच गरिबावर लोभ असावा!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!..
<<<

छान शेर, पण रदीफ पटली नाही या शेरात

अद्याप मलाही नाही, वेचता मला आलेले!
हे जगणे पाचोळ्याचे.....काळीज फाटते माझे!!..<<<

यात दोन वेळा 'मला'चे प्रयोजन समजले नाही, बहुधा वरील चर्चेत सांगितले गेले असावे, वाचतो

मला चे प्रयोजन योग्यच आहे. पण, रदीफ तीन शब्दांचा असल्याने शेरावर मर्यादा आल्यासारखी वाटते आहे. त्यातही 'काळीज फाटते माझे!!' असे घेतल्यामुळे व्यक्ततेलाच मर्यादा आल्या आहेत असे वाटते.
असो.
शेवटी निर्णय गझलकाराचाच...!