'' माझा बाप '' -- ए.के.शेख

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 September, 2012 - 05:51

मला भावलेली ए.के.शेख यांची एक गझल.... त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.

घरट्यासाठी झिजतो,कुढतो,मरतो माझा बाप
फुले अम्हाला यावी म्हणुनी रुजतो माझा बाप

भावासंगे भाऊ होतो,ताई संगे ताई
बोल बोबडे त्यांच्याशी बडबडतो माझा बाप

अस्मानी सुलतानी संकट येवो अंगावरती
पाय रोवुनी मुकाबल्याला धजतो माझा बाप

धाय मोकलून रडला जेव्हा आजी सोडुन गेली
जीवनभरचे दु:ख मोकळे करतो माझा बाप

शाळेमध्ये पहिला नंबर येता माझा कधी
उचलुन घेतो, हसतो,गहिवरतो माझा बाप

तळहाताच्या फोडासम जपतो आम्हा सार्‍यांना
आम्ही असतो वाघ्,सोबती असतो माझा बाप

डोंगर्,झाडे,किरणे,निसर्ग अन गरुडाची शक्ती
सोबत घेउन परिस्थितीशी लढतो माझा बाप

आई म्हणजे आई असते सौख्याची सावली
झाड होऊनी उन्हात वाळत असतो माझा बाप

-- ए.के. शेख

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त