विराणी

Submitted by ओवी on 30 August, 2012 - 12:57

तू जवळी नसशील जेव्हा,
मी क्षणांचे हार करावे..
ह्ळूवार क्षण ओवतांना,
दिन-रातीचे भान हरावे.

मम मनीची आर्त विराणी,
रात्र तेव्हा गात असावी..
एक-एक त्या सुरासंगती,
चांदणी अलवार फुलावी.

आठवणींच्या झोपाळ्यावर,
हुरहुरतांना हिंदोळावे..
दाटणार्‍या अन् आसवांनी,
पापणीतले स्वप्न विरावे.

जणु तृषार्त धरणीवरती,
मुक्त वळिवाने बरसावे..
गंध तयाचा लेऊन संगे,
असे अचानक तू परतावे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओवी..... अतिशय छान, याचे एक सुंदर गाणे ही होऊ शकते पण थोडक्यात कुठे-कुठे किरकोळ चुकांमुळे लय अटकते कृपया जमल्यास पुन्हा दुरुस्ती व्हावी असे मनापासून वाटते.

छान Happy

सुंदर!

<एक-एक त्या सुरासंगती,
चांदणी अलवार फुलावी.<< खुप आवडले. Happy

ओवी, सुंदर लिहीलीस...
चढत जाते कविता, शेवटच्या दोन ओळी तर खासच, अशी कविता खास होत जाऊन थांबली की आत कुठेतरी फार छान वाटतं!
शुभेच्छा!

ओवी,
तू जवळी नसशील जेव्हा,
मी स्मरणांचे हार करावे..
ह्ळूवार क्षण ओवतांना,
दिन-रातीचे भान हरावे.

असा एक बदल करावासा वाटला,मात्रा कमी पडतेयसे वाटून.

कविता मस्त अन हळूवार

ओवी, जियो. एकदम बढियां कविता. मला तर रेडिओवरच्या भावगीताच्या ओळी वाचते आहे असं वाटलं. सुरेख. Happy

खूप छान नाजुक भावना!

लय मलाही थोडी विस्कळीत वाटली. तिथे लक्ष देता आले तर छानच! Happy

अशी कविता खास होत जाऊन थांबली की आत कुठेतरी फार छान वाटतं! >>> +१