बघू ऐकून वा-याचे, बघू या काय होते ते!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 August, 2012 - 10:17

गझल
बघू ऐकून वा-याचे, बघू या काय होते ते!
धरू या बोट रस्त्याचे, बघू या काय होते ते!!

बनू बिनघोर अन् नौका करू स्वाधीन लाटांच्या;
म्हणू गाणे किना-याचे, बघू या काय होते ते!

किती लांबून हे आले इशारे माझियासाठी;
टिपू आवाज ता-याचे, बघू या काय होते ते!

असेही जायचे आहे, तसेही जायचे आहे....
पिऊ या जहर जगण्याचे, बघू या काय होते ते!

मला माहीतही नाही....मला माळून जाते ती!
खुडू या फूल गज-याचे, बघू या काय होते ते!!

कशी मी पोचवू माझी तिच्यापर्यंत बेचैनी?
बनू का फूल चाफ्याचे? बघू या काय होते ते!

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे, बघू या काय होते ते

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान . या गझलेचा बाज नक्कीच वेगळा आहे.

--------- पण ही तर एका बेफिकीर माणसाची गझल आहे. आपण कशी लिहीलीत सर? Wink

सुधाकरा!
बघू या काय होते ते.......या रदीफात तुझ्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.
टीप: ही गझल १९९५च्या जानेवारी महिन्यात कधीतरी लिहिली आहे. केवळ आठवले म्हणून नमूद केले.
.........प्रा.सतीश देवपूरकर

अ... प्र... ती... म..

गझल

रदीफ सुंदरच

अभिनदन प्रोफेसर साहेब

असेही जायचे आहे, तसेही जायचे आहे....
पिऊ या जहर जगण्याचे, बघू या काय होते ते!>> सिम्पली सुपर्ब!

तिने माळून जाणे, चाफा, वणवा>> एकसे बढकर एक!!

मजा आली चाचून!
आभारी आहे!

माफ करा मक्ता जरा वेगळ्या प्रकारे वाचायची गुस्ताखी केलीय ...क्षमस्व!!

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे , बघू या काय होते ते

चु भु द्या घ्या

कशी मी पोचवू माझी तिच्यापर्यंत बेचैनी?
बनू का फूल चाफ्याचे? बघू या काय होते ते!
>>

एकदम व्वा निघून गेले हो तोंडातून...जियो!

वैभवा! अभिनंदन!
छान बदल सुचवलास!
सलाम तुला!
बदल त्वरीत स्वीकारीत आहे!
जेव्हा जेव्हा हा शेर मुशाय-यात पेश करेन, तेव्हा तेव्हा तुझे नाव आवर्जून सांगेन!
.........प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद सर हा तुमचा मोठेपणा झाला

माझे मत असे आहे की एकदा का मी एखाद्याच्या शेरावर पर्यायी सुचवला तर तो त्याच क्षणी त्याचा होवून जातो
माझा त्यावर काहीच अधिकार मी मानत नाही

माझ्यातर्फे आपणास हा एक लहानसा नजराणा समजा हवे तर

हा शेर आपणास व इतराना आवडला याचेच जे काय ते समाधान:; ते फक्त माझे...... बाकी काही नाही !!

आपला नम्र
-वैभवा

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे, बघू या काय होते ते

सहकारी तत्वावर गझल आहे का ही? याने दिलेला एक शेर्,त्याचा दुसरा शेर.

धन्यवाद किरण, आमच्या प्रथम हौतात्म्यापूर्वीच्या गझलेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल व फार पूर्वी अनुभवलेल्या मायबोलीवरील सुखद दिवसांच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल!
चला, कुणी तरी आमच्या भूतपूर्व अवतारातील गझलांची नोंद आजही घेत आहे हे बघून आनंद झाला!
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
..........गझलप्रेमी
टीप: कोणतेही अक्षर बोल्ड करणे जाणीवपूर्वक टाळले आहे कारण ब-याच जणांना ठळक,स्पष्ट, परखड व नि:संदिग्ध शब्दांचा भलताच त्रास होताना आम्ही पाहिले व ऐकलेही आहे. ये बात नोट की जाय!

मस्त गझल. गजरा सोडून बाकीचे शेर उत्तम.
प्रोफेसर कुठे गेले हो? त्यांच्या controversial गझला नजरेत यायच्या , तेन्व्हा होते. आता चांगलीचं कौतुक करावं तर दिसत नाहीत!

असेही जायचे आहे, तसेही जायचे आहे....
पिऊ या जहर जगण्याचे, बघू या काय होते ते!

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे, बघू या काय होते ते>>>

जबराट!

तिलकधारी आला आहे.

बघू व या हे दोन शब्द वेगवेगळे लिहिल्याने 'सगळ्यांनी यारे, बघू काय होते ते' असे म्हंटल्यासारखे वाटत आहे. ते दोन शब्द जोडून असायला हवेत. जानेवारी १९९५ पासून अश्या बाबी दुर्लक्षित असणे हे केवळ अनाकलनीय आहे. खयाल चांगले आहेत. प्रतिमा 'प्रथमच हिरवे गवत पाहून उधळलेल्या गुरासारख्या' दिशाहीन भरकटल्या आहेत. समजा लांबून तार्‍यांनी कसलेतरी इशारे केले तर त्यांचे आवाज टिपणे यातून काय होणार आहे हे अनाकलनीय आहे, वर स्वतःच म्हणतोस बघू या काय होते ते! तारे कसले इशारे करणार, का करणार, त्यांचे आवाज म्हणजे काय, ते टिपणार कसे अश्या अनेक अशास्त्रीय बाबी काव्यात्मतेच्या बुरख्याखाली लपवून कोंबड्यांच्या बाजारात हळूच बदके विकायला ठेवलेली आढळत आहेत. तीही ब्लॅकमध्ये! असो.

असेही जायचे आहे, तसेही जायचे आहे....
पिऊ या जहर जगण्याचे, बघू या काय होते ते!

कशी मी पोचवू माझी तिच्यापर्यंत बेचैनी?
बनू का फूल चाफ्याचे? बघू या काय होते ते!

हे शेर छान आहेत,

स्मृतींचा भडका या शेरातील प्रतिमा अशीच 'जीम जॉईन केली म्हणून हजार रुपयांचा ट्रॅक सूट आणून तीन दिवसांनी जीम बंद करण्यासारखी' आहे.

तिलकधारी निघत आहे.

किती लांबून हे आले इशारे माझियासाठी;
टिपू आवाज ता-याचे, बघू या काय होते ते

एकाच वेळी सायन्सचा प्राध्यापक आणि एक कवी यांचं एक अजब मिश्रण इथं दिसून आलं. क्या बात है !
इतक्या लांबून जे इशारे आलेत ते अर्थातच चांदण्यांचे आहेत. चांदण्यांचे इशारे या शेराटल्या नायकासाठी होत असताना ता-यांची प्रतिक्रिया काय असेल हे सांगताना टिपू आवाज ता-याचे हे प्राध्यापकसाहेबांनी ज्या नजाकतीने नोंदवले आहे त्याला तोड नाही. ही नजाकत केवळ एका कवीकडे असू शकते. कवीच्या कल्पनेला ब्रह्मांडदेखील पार करता येतं. कदाचित यासाठीच गझलकाराने आधी कवी असलं पाहीजे असं म्हटलं गेलंय. नाहीतर अतिशय रूक्ष द्विपदी शेर म्हणून वाचण्याची पाळी येते.
(जे न देखे रवी, ते देखे कवी असं म्हणतात. आमचा एक मित्र म्हणतो
जे न करी रवी, ते करी कवी, देतसे शिवी.. अर्थात आपण पहिलाच रूढ अर्थ बघायचा आहे. मित्राचं म्हणणं कदाचित माझासारख्यांना लागू व्हावं... ).

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका!
जगू आयुष्य वणव्याचे, बघू या काय होते ते

पहिली ओळ (मिसरा म्हणायचं नाही का :हाहा:). ही कल्पना आताशा जुनी वाटेल. तरीही सरांनी गझल लिहीलेला काळ लक्षात घेता त्या काळी ही कल्पना प्रभावी असेल.

आठवणींची गर्दी इतकी झालीय कि काय सांगू... आतमधे आग पेटलीय. मनाच्या या अवस्थेचं वर्णनही फक्त एका कवीला शक्य आहे. हा खयाल केवळ ज्याने असा अनुभव घेतलाय त्याला दाद द्यायला लावणारच लावणार. आठवणी दाटून आल्याने केव्हढी प्रचंड तगमग, काहिली झालीये मनाची कि नायक प्रचंड वैतागाने, त्राग्याने म्हणतो कि या वणव्याचंच आयुष्य जगून बघू... काय होतं ते !!
नजाकत है बॉस. पहिल्या ओळीत तगमग पोचली आणि दुसरीत तो त्रागा !!

प्रोफेसर लिहीत रहा.. असेच लिहीत रहा.
तो तिलकधारी गेला ओपरेशन करून घ्यायला. आता येईल मिस माया दास बनून Lol

तिलकधारी,
आपल्या प्रतिसादतील कल्पनांच्या गरूडभरा-या चकीत करणा-या वाटल्या! असो आपल्या या आकाशाला गवसणी घालणा-या भरा-या पाहून/वाचून
एक आमचा पुराण शेर स्मरला........

आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू.....
नाही मलाच आली, घेता कधी भरारी!...........इति गझलप्रेमी

आता दुस-या शेरांमधील आपल्या तर्कवितर्कांबाबत थोडेसे...........

किती लांबून हे आले इशारे माझियासाठी;
टिपू आवाज ता-याचे, बघू या काय होते ते!<<<<<<<<<<

तारे, इशारे, ता-यांचे आवाज, लांबवरचे अंतर या आहेत शेरातील प्रतिमा, ज्यांची एक विशिष्ट गुंफण वरील शेरात आम्ही केली आहे!

तारे लांबवर आकाशात असतात!
इशारे काय फक्त हातांनीच करतात काय? ते हावभावांतून, नजरेतून, हालचालींतून, चेह-यारील रंगपालटातून, इत्यादींतूनही करता येतात!
इशा-यांचा ध्वन्यार्थ हा ऐकावा लागतो, जाणावा लागतो, टिपाया लागतो, ताडावा लागतो!

आता या प्रतिमांचे शाब्दिक/लाक्षणिक/ध्वन्यार्थ हुशार वाचकांवर सोडले आहेत!

आमच्या मनातील अर्थच लोकांनीही काढावा अशी इथे अपेक्षा नाही, तरीही आपण विषय काढलाच आहे म्हणून पलायनाची भूमिका न घेता हा गझलप्रेमी त्याच्या मनातील अर्थ वदत आहे, तिलकधारी, जिवाचे कान करून ऐका.......

माझ्या अंतरंगातही एक अनंत आकाश आहे, जे बाहेरील आकाशइतकेच अनंत व दूरवर असल्यासारखे मला वाटते! माझ्या अंतरंगातील अंतर्नाद फारच दूरवर असलेल्या ता-यांसारखे आहेत! ता-यांच्या लुकलुकण्यातही काही इशारे दडलेले वाटू शकतात.तद्वत माझ्या अंतरंगातील आकाशातल्या अंतर्नादरूपी ता-यांच्या लुकलुकण्यामधेही अनेक इशारे दडलेले वाटतात! दैनंदीन धांदलीत देखिल हे अंतर्नादरूपी ता-यांचे लुकलुकणे, त्यातील माझ्या भल्यासाठीचे इशारे हे मी टिपायला पाहिजेत, ज्यातच माझे भले आहे असे मला वाटते! अनेकवेळा अहंकारापोटी मी या आतल्या आवाजाकडे दुर्लक्षच केले, त्यामुळे हे आतले आवाज आजवर दबले गेले! म्हणून मी म्हणतो की, हे अंतर्नादरूपी ता-यांचे माझ्यासाठीचे इशारे, त्यांचा ध्वन्यार्थ टिपणे/ताडणे/जाणणे हेच माझ्यासाठी श्रेयस्कर असावे! म्हणून मी म्हणतो टिपू आवाज ता-याचे, बघू या काय होते ते!
टिपणे शब्दात ब-याच छटा दडलेल्या आहेत......

टिपणे म्हणजे वेचणे, अचूकपणे जाणणे, बरोबर ताडणे, कयास करणे आपल्या अंतरदेवतेचे म्हणणे ऐकायला शिकणे इत्यादी.
आम्हास वाटते एवढा खुलासा शेराचा अर्थ कळायला पुरेसा व्हावा, म्हणून थांबतो!

टीप: वरील शेरात ता-यांचे माझ्यासाठीचे इशारे दूरवरून आल्याची जाणीव होणे त्यांचे ध्वन्यार्थ (आवाज) बरोबर टिपणे या सगळ्यात संवेदनांचा कलात्मक वापर करण्याचा प्रयास आम्ही केला आहे जो शेरास अधिक व्यामिश्र, बहुपदरी करतो!
ता-यांचे लुकलुकणे (दिसण्याची संवेदना) त्यांच्यातील ध्वन्यार्थ ऐकणे/टिपणे (आवाज ऐकण्याची संवेदना) अशा दोहोंचे अलौकिक तरल मिश्रण या शेरात केलेले दिसते!

पुन:श्च स्मरण करून देतो की, वरील आमच्या मनातील अर्थ प्रत्येकास महसूस होईलच, असे काही सांगता येत नाही, ते ज्याच्या त्याच्या साहित्यिक जाणिवांवर, एकंदर सौंदर्य/काव्यबोधावर/ अभिरुचीवर, वैचारिक प्रगल्भतेवर, प्रतिभेवर, प्रज्ञेवर व कल्पनाविलासावर अवलंबून असते!

समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
..............गझलप्रेमी
...................................................................................

सर
तुम्ही स्वतःच केलेलं या शेराचं विश्लेषण थक्क करणारं. गझलेतल्या शेरात देखील इतकी खोली असू शकते हे केवळ दोन ओळीत सांगितलंत. या प्रतिभेला प्रणाम ! नि:शब्द !!

क्या बात है सर..

ग्रेट !!!

अशा शेरांची किंमत पैशात काय करणार ? शक्य तरी आहे का ? दोन पाच लाख रूपये ओवाळून एखाद्या चहाच्या टपरीतल्या पो-याला दिले आणि जा ऐश कर म्हटलं तर तेव्हढंच समाधान. या आनंदामुळे त्या बिचा-याची स्वतःची टपरी तरी चालू होईल Wink ( पण त्याला मी सांगेन ते नाव द्यावं लागेल टपरीचं Lol )

Pages