विषय क्रमांक १ : सिनेमाची गोष्ट सांगण्याच्या आठवणी.

Submitted by शोभनाताई on 29 August, 2012 - 11:25

१५ ऑगस्टला टिव्हीवर 'जनगणमन' लागला होता. शेवटी झेंडा फडकतो सोनटक्के गुरूजी
सॅलुट करतात.नकळत मी हि उठुन सॅलुट केला.किती दिवसानी मी समरसुन सिनेमा पाहिला होता.गाथाचित्रशती लेखन स्पर्धेतिल लेख वाचतावाचता माझ जुन सिनेमाप्रेम आणि आठवणी जाग्या झाल्या.सोन%गुर्रजी पाहताना आमचे शाळेतील पाटीलसर आठवले. त्यानीच तर सिनेमाप्रेमाच बीज पेरल होत.
खानापुर हे तालुक्याच गाव सीमाप्रश्न आणि नंतर तेलगी प्रकराणामुळे माध्यमातुन झळकणार.तिथ सिनेमा थिएटर नव्हत. बेळगावला जाउन सिनेमा पाहण म्हणजे चैनिची परिसिमा.थिएटरमधे जाउन सिनेमा पहण्यापुर्वीच माझी सिनेमाचि ओळख झाली.भुगोलाच्या पाटिल सरांमुळे. ऑफ पिरिअड असला कि ते सिनेमाच्या गोष्टी सांगायचे ससुराल्,प्यार का सागर, भाभी,छोटि बहन, अशा कितितरि गोष्टी आम्ही त्यांच्याकडुन ऐकल्या.छोटी बहन नंतर थिएटरमधे पाहिला १००दिवस झाले म्हणुन सर्वाना मोतीचुर लाडु वाटले होते हेच जास्त लक्षात राहिल. पाहिलेल्या सिनेमापेक्षा ऐकलेली सरांची गोष्टच लै भारि वाटली होती.सिनेमा पाहिल्यावर गोष्टी सांगण्याचा संस्कार माझ्यावर इथेच झाला असावा. गोष्टी सांगताना फळयाचा वापर असायचा कथा रंगत जायची तसा फळाहि गिरगोट्यानी भरलेला असायचा.अस्मदिक तोंड उघड करुन मान वाकडि करुन ऐकण्यात दंग.आम्हा मुलांना अस बिघडवण्यावर(?) ना पालकांचा आक्षेप कि हेड मास्तरांचा.

आमच्या गावालाच तस सिनेमाच वावड नव्हत.बेळगावला कामाला जावो, लग्नाला जावो वा ट्रीपला संध्याकाळी सिनेमा पाहुन रात्रीच्या गाडिला परत यायच हे श्वास घेण्याइतक सहज असायच.काम लवकर आटोपल तर ३ते६ आणि ६ते९ असे सिनेमा पहायचे.अमक्याचा सिनेमा अमका सिनेमा यापेक्षा स्टेशनच्या जवळ असलेल्या रिझ, रेडिओ येथे सिनेमा पाहण सोयीच असायच.आमची बाळेकुन्द्री मोदगासिल्क फॅक्टरी अशी ट्रिप गेली तेंव्हा माणसाला पांख असतात हा सिनेमा पाहिला होता कितितरि दिवस 'पंख हवे मज पोलादाचे शुर लढायु जटायुचे'हे गाणे मोठ्याने म्हणायची. गुणगुणण हा प्रकार नसायचा.
कोल्हापुर,पन्हाळा ट्रिप गेली तेंव्हा बीस साल बाद पाहिला होता घड्याळाचा ठोका पडल्यावर आमच्यातल्या काहि जणी घाबरुन किंचाळल्या होत्या हे चांगल आठवत.पन्हाळ्याच्या दुतोंडी बुरुजावर सिनेमाच शुटिंग झाल्याच तिथल्या गाइडनी सांगितल होत.सगळच ग्रेट वाटल होत.ट्रीपहुन परत आल्यावर ट्रिपला न आलेल्या मैत्रिणीला ट्रिपच्या वर्णनाबरोबर सिनेमाची गोष्टहि सांगितली.वहिदाने विश्वजितने कोणते कपडे घातले होते. तिचे काका कसे दिसायचे कसे औषध द्यायचे.अस इतंभूत वर्णन सांगत गोष्ट २/३ तास चालली.सिनेमातल्या गाण्यासह ट्याणटण ढाणटण ढ्याणटण डा अस म्युझीकसह हे कथाकथन होत.वहिदाच्या काकांच्या चांगल असण्याच मी इतक रसभरीत वर्णन केल होत की मैत्रिणिला ते खुन करायचे हे खरच वाटत नव्हत.स्वतःचा मसाला घालणं खानापुरातल्या त्रिमुर्ती थिएटर्मुळे सुरु झाल होत.

त्याच अस झाल,खानापुरला त्रिमुर्ती हे सिनेमाच थिएटर झाल आणि माझ सिनेमा पहाण्याच प्रमाण थोड वाढल.होत.भरतभेट,संत तुलसिदास, चायना टाऊन आणि ज्यांची नाव हि आठवत नाहित असे कितितरि.सारखी फिल्म तुटायची.कधि फक्त चित्र दिसायच.तर कधी फक्त आवाज यायचा.३तासाचा सिनेमा४ तास चालायचा.'आप्पाचा सिनेमा'हा स्पर्धेतिल लेख वाचल्यावर यातील अडचणी समजल्या. .माझ्या गोष्ट सांगण्याला मात्र हे आव्हानच होत. न दिसलेल्या ठिकाणी न ऐकु आलेल्या ठिकाणि माझ्या गाळलेल्या जागा भरा असायच्या इथ कल्पनाशक्तीला मस्त वाव होता. त्रिमुर्तीचि हि हालत. त्यामुळे लोकाना मात्र बेळगावला जाउन सिनेमा पहाण्याचा पर्यायच जास्त सोइचा होता.परिणामी थिएटर बद पडल.तिथ लग्न व्हायला लागली.

एकुणात भुकेल्याने जिभेचे चोचले न करता समोर दिसेल ते अन्न निमुटपणे खाव.तस आमच असायच.सिनेमा म्हणजे त्याला एक गोष्ट असते एवढच सिनेमाबद्दल आकलन होत.तोपर्यंत आमच्याकडे रेडिओहि नव्हता. काकांकडे पहिल्यांदा रेडिओ आला मग दर बुधवारी बिनाका ऐकायला त्यांच्याकडे जायच. सिनेमाच ज्ञान वाढण्याच आणखी एक साधन वाढल.बिनाकामुळे नविन नविन सिनेमा समजायला लागले सिनेमाची गाणी पाठ व्हायला लागली.'शनि और मंगलका शुभ मिलाफ दो सितारोंका मिलन है उनका नाम है'अस म्हणत दिलिपकुमार आणि वैजंतीमालाच्या एका सिनेमाची अमिन सयानीच्या आवाजातील जाहिरात अजुन कानावर आहे.याच वैजन्तिमालाच्या राजकपुर बरोबरच्या संगमची जाहिरात जोरात होती.गाणी खुप गाजत होती सिनेमाला दोन मध्यंतर होती.
शाळेची बेळगाव ट्रिप मिलिट्री, महादेवाच देउळ ,किल्ला आणि संगम सिनेमा अशी गेली होती घरी येउन बहिणिला गोष्ट सांगितली सिनेमा मोठ्ठा त्यात सगळि गाणि पाठ झाली होती मग गोष्ट सांगता सांगता रात्र संपली होती.आजही अंताक्षरी मधे बहुतेकजण य अक्षराला ये मेरा प्रेमपत्र सुरु करतात तेंव्हा मी सांगते सुरुवात मेहेरबा लिखु पासुन आहे.
कॉलेजसाठी बेळगावला भावंडासह मामांच घर होत तिथ बिर्‍हाड केल. हे घर भटचाळ नावाच्या प्रसिद्ध चाळीत होत.हा सिनेमा पहाण्याचा सुवर्ण काळ होता.आमच्या शेजारी राहणारे देशपांडे रिझ टॉकिजचे मॅनेजर होते.रिझच्या मालकांची बेळगावात चार थिएटर होती त्यामुळे सौ. देशपांडेना बेळगावातील सर्व थिएटर मधे पास असायचा. श्रियुत देशपांडेना सिनेमात रस नसायचा आणि वेळहि नसायचा.मग आम्हाला त्या सिनेमाला बरोबर न्यायच्या.त्यांच्या घरी रसरंग यायचा. त्याच्या वाचनाने गोष्टीच्या पलिकडची सिनेमाची अंग समजायला लागली.नायक नायिका कथा याबरोबर दिग्दर्शक, गीतकार संगीतकार कोण आहेत हेही महत्वाचे वाटायला लागले.सलिल चौधरी मदन मोहन हे संगितकार अधिक आवडु लागले.राजकपुरच्या सिनेमातिल शैलेन्द्रची गीत, शंकरजयकिसनच संगीत ,देवानंदच्या सिनेमातला एसडिंचा वाटा अशा बाबीहि लक्षात यायला लागल्या.येथे दिग्दर्शक दिसतो, सारख्या गोष्टी सिनेमा पहाताना महत्वाच्य वाटायला लागल्या.आवडिच्या नटातल राजेन्द्रकुमारच स्थान घसरल.गुरुदत्त प्रथम क्रमांकावर आला. गोष्ट सांगण मात्र चालुच होत. गोष्ट सांगुन झाली कि मगच सिनेमाचा अस्वाद घेण पुर्ण व्हायच.ऐकणारेहि भेटायचे. उलट शोभानी गोष्ट सांगितली कि सिनेमा बघायचि गरज नाहि अस अनेकाना वाटायच.
बेळगावला आल्यावर गोष्ट ऐकणारी माणस बदलली.समोर राहणार्‍या भडगावकर काकु हक्काच गिर्‍हाइक.मोठ्ठा प्रपंच सतत कामात असायच्या.३तास सिनेमा पहायला वेळ घालवण्यापेक्षा माझि गोष्ट ऐकण त्याना चांगल.वाटायच.कारण त्यांच काम चालु असताना त्यांच्या मागेमागे फिरत मी गोष्ट सांगायचि.औरत,आरती दुल्हा दुल्हन हा राजकपुरच्या सिनेमात फारसा उल्लेखला न जाणारा.सिनेमा,उपकार,पाठलाग किती नाव सांगावी त्याला सिमाच नाही.गोष्ट ऐकणार्‍याना हव तिथ हसु,रडु आल नाही भिति वाटली नाही अस व्हायच नाही.याबाबत भडगावकर काकु आदर्श श्रोता वहिदाच्या खामोशीची गोष्ट सांगता ना तर मलाच रडायला येत होत ही गोष्ट अनेकाना सांगितली प्रत्येकजण रडायचे..

गोष्ट सांगितलेल्या दिवशी आमच्या स्वयंपाकाला सुटि असायची. काकुंच चविष्ट जेवण मिळायच.अर्थात इथ हिशोब नसायचा खुशीचा मामला होता.
माझ अति सिनेमा पहाण कोणा हितशत्रुनी माझ्या वडिलां पर्यंत पोचवल.मग आमच कॉलेजच्या रिडिंगरुममध्ये अभ्यासाला जाण सुरु झाल.पण तिथ गेल्यावर सुरुवातीचा वेळ फिल्मफेअर,स्टारडस्ट वाचनात जायचा सिने क्षेत्रातील विविध प्रकरण,एकमेकातील रुसवे फुगवे याबाबतच ज्ञानहि वाढायला लागल.वैजन्तिमालाचा नृत्य नसलेला एकमेव सिनेमा,सर्वाधिक कपूर लोकांबरोबर कामे करणारी नटी कोण असे सामान्य ज्ञानहि वाढु लागले.
गोष्ट सांगताना हाही मसाला वाढला.कॉलेजच्या मैत्रिणि या गोष्ट ऐकणार्‍या श्रोत्रु वर्गात वाढल्या.दिलिपकुमार आणि वैजयंतीमाला असलेला संघर्ष पाहिला.अतिशय गुंतागुंतीची कथा खुन किती पडले याला गणतीच नाही.याची गोष्ट आमच्या वर्गातल्या बर्वेला ऑफ तासाला सांगायला सुरुवात केली.पुढचा तास सुरु झाला. संपला तरि आम्हाला पत्ताच नाहि. लेडिज रुमचा शिपाई रुम बंद करायला आला आम्हाला बाहेर काढल.मग आम्ही घरी आलो पुरी गोष्ट ऐकली आणि मगच बर्वे तिच्या घरी गेली.घरी तिला बोलणी खावी लागली.
या काळात आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे घाल घाल पिंगा वार्‍या लिहिणारे निकुंब सर मराठी शिकवायला आले.साहित्य कला निसर्ग सर्वांकडे पाहण्याची एक वेगळि दृष्टी आली..त्यांच्याकडुन समिक्षा शिकताना अस्वादक समिक्षा कशि असावि याची जाण आली.
'शारदिचिये चंद्रकळेमाजी अम्रुतकण कोवळे
ते वेचती मनोमवाळे चकोर तलगे."
हे ज्ञानेश्वरांचे बोल समिक्षा कशी असावी यासाठी ते सांगायचे.इतकी हळुवार अस्वादकता आली नाही तरी अनेक श्रद्धा स्थानाना धक्का बसला.वाइट चांगल उत्तम यातला भेद समजायला लागला.फुकटचे मिळतात म्हणुन कुठले हि सिनेमा पहाण बंद झाल.आधी इथे दिग्दर्शक दिसतो सारखी भारी वाटणारि दृष्ये आता बटबटीत वाटायला लागली.गोष्ट सांगताना रडवण्यात.आनंद वाटेना.प्रभातचे कुंकु, माणुस वगैरे सिनेमा मॅटिनिला पैसे देउन पाहिले. गोष्ट आणि उत्तम गाणी असणारे सिनेमा मात्र इतर दोष पत्करुन हि आवडत होते.
लग्न होउन मी पुण्यात आले. माझ्या पतींना सिनेमाची अजिबात आवड नव्हती गोष्टी ऐकण तर त्याहुन नाही.पहिले काही दिवस ते माझ्यासाठी सिनेमा पहायला यायचे पण पहिल्या अर्ध्या तासात चक्क घोरायला लागायचे.सिनेमा पहाण्यातला उत्साहच संपायचा. हळुहळु ओळखी झाल्या पती ऑफिसला गेल्यावर मैत्रिणिबरोबर सिनेमा पाहण सुरु झाल.गोष्ट ऐकायलाहि हक्काच गिर्‍हाइक मिळाल.ते म्हणजे आमच्या घर मालकांचि मुलगी चित्रा. ती लहानपणी सारखी आजारी असायची.मग तिचा वेळ घालवायला तिच्याशी पत्ते खेळण आणि गोष्टी सांगण चालायच.आता तिचा मुलगाही नोकरीला लागला पण माझ्या गोष्टी सांगण्याच्या आठवणी अजुनही तिच्या मनात ताज्या आहेत.मध्यंतरी ती भेटली तर म्हणाली' "तु सांगितलेल्या दो चोर आणि कटि पतंगच्या गोष्टी आजही मला आठवतात. गाण्यासह.मी ते कधिहि पाहिले नाहीत पण मला पाहिल्यासारखेच वाटतात."
खर तर दो चोरच्याबाबत तनुजाबरोबर त्यात काम करणारा नायक कोण होता हेही मला आज आठवत नाही.
माझी भावंड, मैत्रिणी,शेजारी अशा अनेकाना मात्र माझ्या सिनेमाच्या गोष्टीच्या आठवणी आहेत.माझ सिनेमाप्रेम हळुहळु ओसरत गेल.मुल संसार नंतर नोकरी, पीएचडी यात मी पुरती बुडुन गेले.नंतर सिनेमा पाहिले तरी गोष्टी ऐकणार कोणी मिळाल नाही.अगदी हल्लीहल्ली 'वासुदेव बळवंत' सिनेमाची गोष्ट नातवाला सांगितली पण पुर्वीसारखी तीन तीन तास नाही सांगता आली. पण जुन्या आठवणी येत राहतात. गाथाचित्रशती स्पर्धेच्या निमिताने काही आठवलेल्या या आठवणी. स्पर्धेसाठी म्हणून फारशी मनाजोगती लिहिता आली नाही ही "गोष्ट सांगण्याची गोष्ट" . पण लेकीच्या आग्रहासाठी आणि माबोकरांशी शेअर कराविशी वाटली म्हणुन लिहिले. आठवणींनी दगा दिल्याने काही माहितीच्या चुका झाल्या असल्यास दुरुस्त करायला तज्ञ मायबोलीकर आहेतच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान नॉस्टॅल्जिया. आमच्या शेजारच्या काकू अगदी डिटेल गोष्ट सांगायच्या. अगदी नवर्‍यामुलीला हळद लावतात (विको टर्मेरिक ची जाहिरात) तिथेपासून.

Lol
मस्त आठवणी काकु.

आमच्या घरी स्वैपाकीणबाई, घरकामाच्या बाईं इतर मंडळी यांजकडून ष्टोर्‍या ऐकुन ऐकुन कान तयार होते. दिग्दर्शकाने कथा तरी २-३ तास ऐकली असेल की नाही कोण जाणे, तेवढ्या तपशीलात आम्ही ऐकलीये (आणि सांगीतली आहे). चौथीपाचवीत, आईला धक्का दिला होता इथ्यंभूत कहाणी ऐकवुन. ती स्वैपाकीणबाईंकडुन ऐकलेली.. Proud

'शारदिचिये चंद्रकळेमाजी अम्रुतकण कोवळे
ते वेचती मनोमवाळे चकोर तलगे>> वा!!

भारी लिवलयं!
माझ्या एका मैत्रीणीला पण ष्टोर्‍या सांगायला आवडायचं!
ऑफिसमध्ये लंचब्रेकात सुरुवात करायची. उरलेली ऑफिस संपल्यावर पार्किंगमध्ये! मुळात मला सिनेमाची आवड नसल्याने फार पकायला व्हायचं पण आता आठवुन तिला आणि मलाही मजा वाटते!

मस्त लिहिलं आहे.

माझ्या आईपाशी ही कला आहे. Happy आम्ही भावंडं लहान असताना आई सिनेमाची गोष्ट सांगतेय आणि आज्जी, आत्या लोकं तल्लीन होऊन ऐकताना पाहून फिदीफिदी करायचो ते आठवलं एकदम! आत्या लोकं मधून मधून प्रसंगाबरहुकूम अरे वा! बरं झालं! किती गं दुष्ट तो व्हीलन! वगैरे कमेंट्स टाकायच्या ते आठवलं Lol

आईशप्पथ ही खरेच एक कला असते.. माझ्या आईला सिनेमाची स्टोरी विचारली किंवा टीवी वर लागलेल्या मालिकेतील एखाद्या सीनची पार्श्वभूमी विचारली... तर अशी काही सांगते की अक्षरशा पकवून पकवून मारून टाकते.. उगाच नको तो सीन रंगवून सांगत बसते.. आणि सांगताना पात्रांची किंवा कलाकारांची नावे चटकन तिच्या तोंडात येत नाहीत तर आपला हा, आपला तो, तो नाही हा, हा.. असेच चालू असते.. Proud

छान आहेत आठवणी.. Happy

खरंच छान लिहिले आहेत. Happy

(आमच्या सोसायटीत एक गणेश देशपांडे म्हणून मित्र राहायचा. तो सुट्ट्या लागल्या की चित्रपट पाहायचा आणि दुपारी टोळक्याआ जमवून 'ष्टोरी' सांगायचा. त्याची खरोखर ती स्टोरीसुद्धा अर्धा पाऊण तास चालायची. त्यात तो स्वतःच म्युझिकही द्यायचा. उदाहरणार्थः "तितक्यात बच्चन आला ... ह्रंह्रं... " वगैरे. धमाल यायची. त्याची आठवण झाली).

आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा Happy

मस्त आठवणी !
आमच्याकडे अजुनही हा कार्यक्रम होतो. सगळे एकत्र जमले की 'सुकृत' नावाचा माझा मामेभाऊ सगळी लहान पोरं गोळा करतो आणि त्यांना (त्याच्या भाषेत) 'पिच्चरच्या ष्टोर्‍या' सांगतो, अगदी हाव-भावासहीत. हळु-हळु मोठी गँगपण जॉईन होवू जाते.
आवडला लेख ,शुभेच्छा ! Happy

बहुदा प्रत्येक घरात अशी स्टोरी सांगणारी मावशी, काका, आत्या असतातच!

माझ्याही घरी असे काका होते ते आम्हा मुलांना जमवुन सिनेमाची गोष्ट सांगायचे! त्यांच्या तोंडुन ऐकलेली "त्रिशुल" ची गोष्ट अजुनही आठवते आहे विथ साउंड इफ़ेक्ट!

लेख छान झालाय!

शुभेच्छा!

फारच सुरेख लिहिलंत तुम्ही - अगदी त्या आठवणीत रमून जाऊन.... हे जाणवलं हा लेख वाचून....

लहानपणी मित्रांकडून असे ऐकलेले चित्रपट तर कधी मी मित्राला सांगितलेले - असं सर्व आठवून किती तरी वेळ रमलो मी ही त्या आठवणीत....

शोभनाताई....

बेळगावातील "हंस टॉकीज" आणि कॅम्पातील 'ग्लोब टॉकिज" ही दोन थिएटर्स आम्हा कोल्हापूरवासीयांना भारी प्रेमाची होती एकेकाळी. "लॉन्गेस्ट डे", "डॉ.झिवागो", "लॉरेन्स ऑफ अरेबिया" आदी माईलस्टोन म्हटली जाणार्‍या मूव्हीज आम्ही ग्लोबमध्ये पाहिल्याचे स्मरते. चित्रा, नर्तकी ही अगदी गावातील....पण तिकडे जाण्याची फारशी संधी कधी आली नाही, कारण ग्लोब आणि हंसमुळे आमची भूक भागत असे. पुढे कोल्हापूरातही "संध्या' ने कात टाकून 'उमा' नाव घेतले आणि दुसरीकडे म्हादबा मेस्त्रीनी 'पार्वती' ची उभारणी केल्यावर मग आम्हा इंग्रजी चित्रपटप्रेमींना आनंदाचे भरते आले.

तरीही जी.ए.कुलकर्णी यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास 'बेळगावच्या आठवणीची बुत्ती कधी विसरली जाणार नाही."

ट्रक व्यावसिकायांशी मैत्री असल्याने स्टेशन रोडला ते ट्रक मालासाठी सोडले की आम्ही तीन मित्र पाचसहा तासासाठी रिकामटेकडे असू आणि त्याचाच फायदा मग कॅम्पात जाऊन इंग्रजी सिनेमे पाहाण्यासाठी होई. कोल्हापूरला परतल्यावर जे 'अनलकी' मित्र असत त्यांच्यासमोर 'सिनेमाची ईस्टोरी' सांगण्यामध्ये जी बढाई अंगी येत असे ती आजही स्मरते.

तुमच्या सुंदर आठवणींमुळे माझ्याही त्याच स्मृती जाग्या झाल्या. तीस चाळीस वर्षे ओलांडून गेली त्या अंगवळणी पडलेल्या प्रवासाला, पण बेळगावी 'हंस' 'ग्लोब' यानी मनाचा एक कोपरा कायमचा जपून ठेवला आहे.

अशोक पाटील

फार छान लेख आहे. मजा आली वाचताना. एखाद दिवस आम्हा माबोकरांना पण सांगा ना एखाद्या चित्रपटाची गोष्ट

छान आहेत सिनेमाच्या गोष्टी.. Happy माझी पण एक अशीच पुष्पा नावाची गोष्टीवेल्हाळ मै. होती. थोड्या ग्रामीण ढंगाने ती खूप डिटेलमधे स्टोरी सांगायची - तेव्हा नायक नायिकेने कोणत्या रंगाचे कपडे घातले होते, मग काय म्हणतो.. इ.इ. मज्जा यायची. Happy

मस्त!
सिनेमाची गोष्ट सांगायला मला पण खूप आवडायचं - आणि अजूनही माझ्या मैत्रिणी त्याची आवर्जून काढतात. माझी स्टोरी म्हणजे टायट्ल्स फुलात आहेत की रांगोळीत पासून ते नुसतच म्युझिक आहे की गाणं - सिनेमातल्या गाण्यात हिरो-हिरॉइन कपडे किती वेळा बदलतात (ती माझ्या आवडीची गोष्ट होती त्यावेळी - मला एकाच कपड्यात अख्ख गाणं अजिबात आवडायचं नाही - आता विचार केला की हसू येत) इतके डिटेल्स! त्या म्हणायच्या आम्हाला सिनेमा पाहिल्यासारखच वाटतं. - तुझ्या लेखामुळे या सर्व आठवणी ताज्या झाल्या.

स्पर्धेच्या द्रुष्टीने मी 'मीबाळ तान्हे' आहे याचि मला पुर्ण कल्पना आहे. दिनेश्दा सारख स्पर्धेबाहेरच या अनुभवाना ठेवणार होते पण अवल आणि लेकिच्या आग्रहा खातर इथे टाकले. तुम्ही सर्वानी वाचुन अभिप्राय दिलेत. मनापासुन धन्यवाद.अवलनी शुद्धलेखन दुरुस्त करुन दिल.हे इथ नमुद करायला हव.तिचे आभार म्हणायच धाडस माझ्यात नाही.

@ अनघा....

"थोड्या ग्रामीण ढंगाने ती खूप डिटेलमधे स्टोरी सांगायची....."

~ व्वा....म्हणजे अगदी माझ्या थोरल्या बहिणीचीच तुम्ही आठवण दिली वरील वाक्यातून. चित्रपट अगदी मॉडर्न थाटाच्या आशा पारेखचा 'जिद्दी', 'लव्ह इन टोकियो' असो वा जुन्या वळणाचा 'साहिब बिवी और गुलाम' असो, कथानक सांगण्याची तिची धाटणी अगदी ग्रामीण बाजाचीच [त्यातही आम्ही कोल्हापुरी, म्हणजे रफटफ धर्तीनेच] असायची. ती आणि तिची एक मैत्रिण स्थानिक बाजारपेठेच्या जाहिरातीच्या 'स्लाईड्स' करीत असत....ज्या मुख्य सिनेमाच्या अगोदर थिएटरमधील मशीन ऑपरेटर दाखवित असतो.....त्या स्लाईड्सचा जो मोबदला त्या दोघींना मिळत असे, त्या पैशापेक्षा थिएटर मॅनेजरकडून एका शो चे 'चकटफू पास' दोघींना मिळत, त्याचे आम्हाला खूप अप्रूप वाटायचे.

पिक्चर पाहून आल्यावर आम्ही धाकटे त्या दोघींकडे अगदी असूयेने पाहात असू. पण ते तिला जाणवणार नाही अशारितीने, कारण आम्हाला रात्री जेवणानंतर तिने 'इस्टुरी' सांगणार असल्याचे जाहीर केलेले असते.

कथानक सांगण्याची पद्धती अशी...."सुरुवातीला पडद्यावर पाट्या पडतात...." ~ आत्ता हसू येते, कारण कोणत्याही चित्रपटाचे टायटल्सच सुरुवातीला येत असणार....टायटल्सना ती 'पाट्या' म्हणत असे. पाट्या संपल्या की मग कथानक उलगडत जायचे.

शोभनाताईदेखील अशाच रितीने स्टोरी सांगत असतील. खूप मज्जा येत असे सभोवती गर्दी करून बसणार्‍या पोरांना.

अशोक पाटील

शोभनाताई..मस्त वाटत होतं वाचताना..
तुमचा लेख वाचताना माझ्यासारख्या अनेकांचा नॉस्टेल्जिया चाळवला गेला नक्की!! Happy
लहानपणी मी ही पाहिलेल्या (आणी ..कधी कधी न पाहिलेल्याही Proud ) सिनेमांच्या गोष्टी मैत्रीणींच्या घोळक्यात बसून सांगितल्यात, अगदी साग्रसंगीत!!!

शोभनाताई, खूप आवडला, लेख. माझ्या सासूबाईंची आठवण आली. त्यांना सिनेमाचा नाद आहे ही एक गोष्टं... पण त्यातलं सगळं इत्यंभूत रंगवून सागायलाही आवडतं... सिनेमाशी फारसं प्रेमाचं देणं-घेणं नसूनही त्यांच्यामुळेच तो सिनेमा एकदम "घरचा" होऊन जातो. कित्ती जुन्या जुन्या हिन्दी, मराठी अन इंग्रजीही सिनेमाची कथानकं झापड उघडं टाकून ऐकलीयेत त्यांच्याकडून...
फारच नॉस्टॅल्जिक केलत... त्यांच्या आठवणीनं.
"गोष्ट सांगण्याची गोष्ट" .... तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टीवेल्हाळांना सलाम...

एकदम मस्त लेख... आमच्या एका शेजारणीला ही "ष्टोर्‍या " सांगायची खुमखुमी होती. खुप सिनेमे पहायची ती. तिच्या तोंडुन "जय संतोषी मां " एकदम अ‍ॅक्शन सहित ऐकली होती.

माझे आजोबा फार कमी सिनेमे पहायचे. पण एकदा आम्ही नातवंडे खुप हट्ट करतो म्हणुन घरा समोरच्या "पुर्णीमा " थेटर ला ( कल्याणला) घेवुन गेले. तेंव्हा मॅटीनीला "कटी पतंग " लागला होता. नंतर अनेक दिवस आम्हाला कटी पतंगची स्टोरी न चुकता झोपवताना सांगायचे.