विषय क्रमांक - १ - "चित्रपट आणि मी "

Submitted by मैथिलीपिंगळे on 28 August, 2012 - 00:53

माझ्यावेळेला असं होतं......... असं म्हणण्या इतकी मी खूप मोठी नाही.... चित्रपटांच आणि माझं नांत कुठून सुरु झालं ते अगदी तारीख ,वार ,साल ,असं अगदी सही सही सांगताही येणार नाही. पण माझ्या काही चित्रपटाबद्दल विशेष आठवणी मात्र आहेत . कारण काही चित्रपट मला त्या चित्रपटापेक्षाही त्यावेळी घडलेल्या घटनांवरून जास्त आठवतात, असा घटनांनी येणारा प्रत्येक चित्रपट माझ्या आयुष्यात आठवणींची सुमधुर प्राजक्त घेऊन बरसतो ........
आमच्या घरात चित्रपटाबद्द्ल अगदी टोकाच्या भूमिका कधीच नव्हत्या ....... म्हणूनच माझे वडील (अण्णा) आम्हाला चित्रपट पाहण्यास घेऊन जात भलेही मग त्यांना तो नायक आवडत असू देत किंवा नाही आम्हा तिन्ही भावंडांच्या आग्रहाखातर ते सगळ्यांनाच नेत आणि गंमत म्हणून नायकाच्या अभिनयावर टीकादेखील करत .... खर पाहता आता या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही कारण कालानुरूप माझ्या आवडीनिवडीत फारच बदल झालेला आहे पूर्वी मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला शाहरुख खान आवडत असे आणि वडिलांना मात्र तो अजिबात आवडत नसे त्यांना आणि भावाला आमीर खान आवडत असे, ती आवड आजही कायम आहे तरीही ते आम्हाला आमच्या आवडीचा चित्रपट पाहायला नेत, त्यांनी स्वत:ला आवडतील असेच चित्रपट बघण्याचे बंधन आमच्यावर कधीही लादले नाही.
मला आठवते त्याप्रमाणे आम्ही साऱ्यांनी मिळून त्यावेळचे सगळे हिट सिनेमे बघितलेले आहेत. त्यात "हम आपके हैं कोन" ,"हम हैं राही प्यार के " ,"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ",कुछ कुछ होता हैं " ,दिल तो पागल हैं", "प्यार तो होना हि था", असे आणखी बरेच सिनेमे सांगता येतील जे मी आई वडिलांसोबत बघितलेले आहेत . त्यावेळची आठवण म्हणजे चित्रपट बघण्याची उत्सुकता, तयारी, धडपड आठवली की आजही त्या आठवणींनी मनात अनेक आनंदाची कारंजी तयार होतात. कारण त्यासोबत असत ते म्हणजे मिळून मसाला डोसा खाणे, तीनचाकी सायकल रिक्षातुन जाणे, उन्हाळा असल्यास नागपुरच फेमस बडकस चौकातील अशोका आईस्क्रीम खाणे किंवा लस्सी पिणे या सगळ्या सुखद आठवणी जाग्या होतात आणि आता तसे आम्ही कधी पुन्हा एकत्र जाऊन तो आनंद लुटू शकत नाही याचे वैषम्यही वाटते.
लहानपणी दूरदर्शनवर जे चित्रपट दाखवले जायचे ते आणि तेव्हढेच बघायचे त्यासाठी जागरण करायचे, आईची बोलणी खायची ,मैत्रिणींमध्ये त्यावर चर्चा करायची फार मज्जा होती या साऱ्यात; आता तसे काहीही नाही . केबलचे वारे वाहू लागल्यावर वडिलांकडे केलेला हट्ट, पण तो त्यांनी जुमानला नाही म्हणून मग दूरदर्शन हेच दैवत मानून देवाला चांगले सिनेमे लागावेत म्हणून केलेली आळवणी ,नविन आलेला कलर टी. व्ही. त्याचा आनंद; मैत्रीणींना त्याचा वाटलेला हेवा हे सारे आठवले की आजही हसू येते आणि त्या साऱ्याची जादू मनभर पसरते. चित्रहार ,छायागीत हे कार्यक्रम कोणत्याही कारणाने पहायचे राहिले तर रडूच यायचे मला; आजही याबाबतीतला एका गंमतीदार किस्सा आठवतो मी तेव्हा साधारण आठवी ,नववी ला असेन दूरदर्शनवर बुधवारी चित्रहार लागायचा आणि त्यावेळी शाहरुख खान सेलिब्रेटी म्हणून येणार होता आणि त्याचीच गाणी लागणार होती, मी तर तेव्हा त्याची मोठी फॅन होती. तो येणार म्हणून मी आतुरतेने त्याची वाटपाहत होती. त्या दिवशी शाळेतुन मी आणि माझी मैत्रीण आरती एका मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो(कारण ती बरेच दिवसापासून आजारी असल्याने शाळेत आली नव्हती) तेही घरी न सांगता कारण आम्ही थोडयाच वेळात घरी जाणार होतो. आजारी मैत्रिणीची चौकशी केली आणि घरी लवकर जायचं म्हणून मैत्रिणीने सांगितलेल्या जवळच्या मार्गाने यायला निघालो ..त्यावेळी आमच्याकडे फोन नव्हता जवळचा तो मार्ग ओळखीचा नसल्याने आम्ही आधीच घाबरलो होतो आणि जवळ जवळ एक- दीड तास फिरूनही आम्ही घरी पोहोचलो नव्हतो. शेवटी आम्ही दोघी इतक्या निराश झालो की आता आपण घरी कधी जाऊ शकणार नाही या निष्कर्ष पर्यंत पोहचलो होतो. मला तर रडायलाच येत होते कारण आपण हरवलो ही भावना मूळ धरत होती आणि आता महत्वाचे म्हणजे आज मला माझा शाहरुख दिसणार नव्हता त्याची गाणी ऐकता येणार नव्हती त्यामुळे मला आणखी वाईट वाटत होते. आता हे सगळे आठवले की खूप हसू येते आणि आपण तेव्हा किती चित्रपट वेडे होतो यावर विश्वास बसत नाही. मला वाटते एक वयच असते चित्रपट वेडे असण्याचे त्याचेच हे प्रत्यंतर,
दैव बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप घरी पोहचलो आणि आज मी हे लिहू शकतेय.
याशिवायही माझ्या बऱ्याच चित्रपटांच्या आठवणी सांगता येतील पदवीच शिक्षण घेत असताना "बिनधास्त" हा मराठी चित्रपट आलेला आणि आमच्या मुलींच्याच महाविद्यालयाच्या समोरच्या सिनेमा गृहात तो चित्रपट लागलेला होता. मग काय आमच्या ग्रुपने सिनेमाला जायचं ठरवलेलं गुपचूप महाविद्यालयातून सटकलो आणि स्वस्तातलं तिकीटघेऊन बसलो, पण मागे बघतो तर काय आमचा आख्खा वर्गच आलेला सिनेमा बघायला मग काय अर्ध सिनेमा गृह आमच्याच महाविद्यालयातील मुलीनीं भरलेल.... आता तिथे आमचचं राज्य होता निदान काही तास तरी मग एकच जल्लोष झाला आणि टाळ्या, शिट्ट्या , हास्य यांची एक बरसातच झाली. या सगळ्यामुळे तो चित्रपट विशेष आठवणीत राहिला. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेत असतानां मुलामुलींनी मिळून बघितलेला "देवदास" चित्रपट आणि असं मुलमुली एकत्र घरच्यांना न सांगता परस्पर चित्रपट बघणं किती धोक्याच असू शकत हे आता लक्षात येत पण सुदैवाने तसा आमच्या बाबतीत विचित्र काहीही झालं नाही तरीही ते एकप्रकारच थ्रीलच होत आता त्याला थ्रील म्हणतेय कारण त्यानंतर काही दिवस तरी मला शाब्दिक चिडवाचिडविला तोंड द्याव लागल होत. त्याच कारणही तसच होत त्यासाठी "तेरे नाम " हा चित्रपट कारणीभूत ठरला. मुलमुली असं आमच्या ग्रुपनी मिळून तो चित्रपट बघितला तो माझा मुलांबरोबर बघितलेला पहिला चित्रपट त्यामुळे प्रचंड दडपण होत मनावर कोणी बघेल का अशी सारखी भिती वाटत होती पण तेही धाडस करायचं होतच . तसा चित्रपट काहीही न होता निर्विघ्नपणे पार पडला. मला काय माहित की, खरी मजा तर त्यानंतरच येणार आहे कारण त्यानंतर महाविद्यालयात आमच्याच ग्रुप मध्ये असे वाद निर्माण झाले आणि सगळे मला हैराण करायला लागले कारण मी एक घोड चूक केली होती सिनेमा पहिल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी ज्याप्रमाणे त्या सिनेमातील नायिका नायकाला गुजीया का काय तो पदार्थ देते तसाच मी आपला करंज्या हा पदार्थ प्रसाद म्हणून घेऊन गेलेली आणि सगळ्यांना देत होती तर मित्रानांही दिला त्यावरून सगळ्यांनी मला इतकं चिडवल कि मला मेल्याहून मेल्यासारख झालं त्यादिवसापासून मुलांसोबत सिनेमे बघण बंद केल. रंगीत आलेला " मुगले आझम" हा सिनेमा तर मी एम .ए . संस्कृत ला असताना माझ्या आख्या वर्गानीच मैत्रिणीच्या लग्नाची थाप मारून वेळेवर धावतपळत जाऊन बघितलेला ... एक दिवस कंटाळा येत होता म्हणून महाविद्यालयात न जाता दोघी मैत्रीनिणींच बघितलेला "नवरा माझा नवसाचा" त्यापूर्वी मी माझी मोठी बहिण आणि तिच्या मैत्रिणी असा" बादशाह" बघितलेला , "भगतसिंग" (अजय देवगणचा) हा मधूनच महाविदयालयातून मावशी कडे जाऊन एनवेळेवर तिच्या सोबत टुक्कार सिनेमागृहात बघितलेला. "कोई मिल गया" मराठी एम.ए.ला ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही जास्त वेळ थांबलो होतोच, अनायासे कारण होतच म्हणून मग वेळेवर जवळच्या सिनेमागृहात आम्ही दोघीच मैत्रिणी अक्षरक्ष: ज्ञानेश्वरी सहित घरी मैत्रिणीच्या वाढदिवसाची थाप मारून पाहिलेला.
लग्नानंतर "चायना टाऊन", "जस्ट मारिड" ,"3d अवतार","मुंबई -पुणे -मुंबई " असे काही मोजकेच चित्रपट सिनेमा गृहात बघितले. त्यानंतर जास्त घरीच CD आणून बघितले पण आता अमेरिकेत आल्यापासून खूप हिंदी ,मराठी अशी दोन्ही भाषेतील चित्रपट बघितले जातात. आणि इथला विशेष अनुभव मला सांगावासा वाटतो तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता कारण मी इथल्या सिनेमा गृहात imax 3D spiderman हा चित्रपट बघितला .... माझं छोटस स्वप्न पूर्ण झालेलं . तसेही आता मराठीत फारच दर्जेदार चित्रपट येत असल्याने मराठी सिनेमांशी असलेल नातं अधिकच घट्ट होत चालल आहे.माझ्या अजूनही बऱ्याच चित्रपटांशी निगडीत असलेल्या आठवणी सांगता येतील पण अशा आठवणीची आता माझ्या मनात खूप दाटी झाली आहे हे सांगु ते सांगु आणि काय, काय सांगु असं झालयं. पूर्वी चित्रपट बघून त्या सिनेमातल्या नायिकेप्रमाणे आपण असावं तसाच नायकही मिळावा असं स्वप्नरंजन असायचं त्यावेळी; किवां ती नायिका म्हणजे आपणच आहोत असदेखील वाटायचं हा स्वप्नील आभास एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा आता त्या विचारांनीदेखील मी त्या विश्वात फिरून येतेय .
आता मात्र चित्रपट फारच वास्तववादी झालेले आहेत आणि आपण म्हणजे ते नाही असं स्वप्नाचा अवास्तववादी पडदा फारच पूर्वी निघून गेलाय तरीही त्यातील काही आदर्श घेण्यासारखे चित्रपट पूर्वीही होते आणि आजही ते बघायला मिळतात. काही चित्रपट तर असे आहेत जे वय,स्थळ, काल या मर्यादा पार करून आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशा चित्रपटांची ही जंत्री बरीच मोठी होईल त्यात मला खऱ्या अर्थाने जगावासा वाटलेला सिनेमा म्हणजे मराठीतला "एक उनाड दिवस" आणि त्यातले चटका लाऊन जाणारे गाणे "हूर हूर असते तीच उरी " . इतक्यातच बघितलेले सारे मराठी सिनेमे उत्कृष्ट आहेत .... "काकस्पर्श","मसाला","दांडगी मुलं","एक कप च्या","साने गुरुजी" ,"आघात","हरीश्चन्द्राची फाक्ट्री " मी चित्रपट वेडी नाही पण तरीही भावनिक चित्रपट आजही मला हसवतात, रडवतात आणि आठवणीच्या हिंदोळ्यावरून वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात.
तरीही सगळ्यात महत्वाच म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला गेलेला अजरामर चित्रपट अर्थात "शोले" मी आता पर्यंत पाहिलेला नव्हता त्यासाठी नवऱ्याचं चिडवण सहन करत होते शेवटी आता या रविवारी मी तो पूर्ण बघितला आणि नंतरच चित्रपटाविषयी लिहिण्याचे धाडस केले...... अशी माझी चित्रपटांच्या आठवणींची साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी माझी चित्रपटांच्या आठवणींची साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.
>>>>>>>>>
हे नाही पटले... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. असे हवे इथे.. Happy

बाकी तुमचे बरेच अनुभव माझ्याशीही रीलेट झालेत.. अगदी ते चित्रहार चुकले म्हणून रडारड करायचाही.. आणि थिएटरमध्ये आपलाच क्लास भेटायचाही.. Happy