विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं

Submitted by सशल on 27 August, 2012 - 18:50

"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे. मी सिनेमाशी संवाद साधू शकते, त्याच्याकडून चार उपदेशाच्या गोष्टी ऐकू शकते, माझ्या मनात येणारे विचार पडताळून पाहू शकते, आणि असल्या बर्‍याच फिलॉसॉफिकल वाटतील असल्या बाता ह्या मित्राबद्दल मारू शकते. सिनेमा मला खळखळून हसवू शकतो, घडाघडा रडवू शकतो, प्रेम, राग, लोभ, मत्सर वगैरे वगैरे जितक्या काही भाव-भावना मनुष्याला माहित आहेत त्या सर्व मला सिनेमांत दिसतात, सिनेमातून माझ्यात उमटतात.

ह्या माझ्या सर्वात लाडक्या मित्राची पहिली ओळख कधी झाली ते मला नीटसं आठवत नाही पण मेंदूला त्याकरता ताण द्यायचा म्हंटलं तर रविवारी संध्याकाळी ६ वाजता दूरदर्शनवर दाखवण्यात येणारे हिंदी सिनेमे आठवतात. आधी बहुतेक फक्त हिंदी सिनेमे दाखवत पण मग हळू हळू शनिवारी संध्याकाळी मुंबई दूरदर्शनवर मराठी सिनेमा आणि रविवारी दुपारी दीड वाजता प्रादेशिक सिनेमे दाखवायला सुरूवात झाली. आमच्या घरात आईला सिनेमा, नाटकं, सिने-संगीत ह्याची खूप आवड होती त्यामुळे साहजिकच तिच्या बरोबरीने मीही टीव्हीवर दाखवण्यात येणारे हे सिनेमे बघायला लागले. टिव्हीबरोबरच कधीतरी "थेटर"ला जाऊनही पिक्चर बघितला जात होता (आता अमेरिकेत आल्यावर, नी वेगवेगळी शिंगं फुटल्यावर कळलं की "थेटर", "पिक्चर" हे शब्द चुकीचे होते. पण तेव्हा मात्र हेच शब्द परिचीत होते, आवडत होते). रविवारी संध्याकाळी पिक्चर बघायचा म्हणजे कोण एक्साईटमेन्ट असायची. रोजच आईच्या हातचं जेवण असलं तरी रविवारी मात्र अपवाद असायचा. सहा वाजायच्या आत घराजवळच्या "गुप्ताकडून" भेळ, शेवपुरी ची पाकीटं बांधून घरी घेऊन यायची आणि मग त्यावर ताव मारत सिनेमा बघायचा. त्यातून सिनेमा "अमिताबच्चन" चा असेल तर तो आनंद अगदी द्विगुणीत व्हायचा. त्याची उंची, त्याची स्टाईल, त्याची मारामारी, तो गात असलेली गाणी हे सगळं फार फार आवडायचं आणि अमिताभ अगदी "हीरो" वाटायचा. त्या लहान, नकळत्या वयातला अमिताभ हा माझा पहिला क्रश असावा. आपण त्याच्या हिरॉइन्स् सारखं दिसावं, तसे ड्रेसेस् घालावे किंवा मग थेट त्याच्याचसारखं (जॅकेटच्या) खिशात हात घालून चालावं आणि त्याच्यासारखीच "ए ढिशुम्, ढिशुम्" मारामारी करावी असं नेहेमी वाटायचं. अमिताभ बच्चनचा सिनेमा नसेल तरी बाकीचे म्हणजे विनोद खन्ना, राजेश खन्ना, शशी कपूर, शम्मी कपूर ह्यांचेही सिनेमे आवडायचे पण तेव्हाही कळायचं की ती आवड दुय्यम दर्जाचीच. अमिताभचं स्थान पहिल्यापासून सगळ्यांपेक्षा वेगळं, अगदी पहिल्या दर्जाचं. देवानंद च्या सिनेमांशी माझी ओळख बर्‍याच उशीरा झाली. राज कपूर, दिलीप कुमार ह्यांचे सिनेमे मात्र समहाउ तेव्हा पहावेसे वाटले नाहीत. ह्याआधीच्या दिग्गजांची ओळखही नंतर झाली किंवा पूर्णपणे झालीच नाही. आणि बाकी इतर म्हणजे राज कुमार, राजेंद्र कुमार वगैरे वगैरे ह्यांच्याशी ओळखही करून घ्यावीशी वाटली नाही. तेव्हा फक्त एकच ठाऊक होतं, मारामारी करता आली तरच तो हीरो, बाकी सगळे झीरो :).

हळू हळू मराठी सिनेमांशीही ओळख व्हायला लागली पण ते काही "पॉश" नसायचे तेव्हा. नऊवारी साड्या नेसलेल्या बायका, तमाशे, बर्‍याच अंशी ग्रामीण कथा, भाषा, पेहेराव ह्यांचा प्रभाव ह्यामुळे हिंदी सिनेमांपुढे फिके वाटायचे पण बघितले जायचे. अरूण सरनाईक हा त्यावेळी मला आवडलेला पहिला मराठी हीरो बहुतेक. सूर्यकांत-चंद्रकांत ह्यांचेही बरेच सिनेमे बघितलेले आठवतात आणि चंद्रकांत ने काही वेळा खलनायकी रोल्स् केल्यामुळे तो आवडेनासा झाला असं आठवतं. निळू फुलेंच्या आवाजाची मला लहान असताना भिती वाटायची आणि "पिंजरा" बघितल्यावर संध्या, श्रीराम लागू, तमाशा अशा सगळ्यांचाच राग आला. "साधी माणसं" मधला टोकाचा साधेपणा बघून मराठी सिनेमांत हिंदीत असते तशी मजा नाही हे जाणवलं. माझ्या आजोबांनां एकूणच सिनेमे आणि त्यातून इंग्रजी सिनेमे ह्यांची फारच आवड. ते बर्‍याच वेळा माझ्या भावाला घेऊन सिनेमांनां जायचे थिएटरमध्ये. एकदा मीही त्यांच्याबरोबर जायचा हट्ट धरला आणि माझं ऐकून अमिताभचा "नसीब" दाखवण्याकरता ते भावाबरोबर मलाही घेऊन गेले. पण पूर्ण सिनेमाभर "नाना, बाथरूम" असं सांगून सांगून म्हणे मी त्यांनां इतकं भंडावून सोडलं की त्यानंतर मला घेऊन परत कधी सिनेमाला जाण्याबद्दल त्यांनीं कानाला खडा लावला :हाहा:. पण एकूण ह्यामुळे त्यांच्याबरोबर इंग्रजी सिनेमे बघता आले नाहीत आणि ती ओळख मात्र बर्‍याच उशीरा झाली.

"राम तेरी गंगा मैली" हा सिनेमा यायच्या आधी थिएटर मध्ये घरचे आम्ही सर्वजण जात असू सिनेमासाठी. पण "राम तेरी .. " बघायला मात्र आम्हाला आजीजवळ ठेवून आई-बाबा एकटेच गेले आणि ह्याचं कारण तो एक "अ‍ॅडल्स" सिनेमा आहे अशी नव्यानेच ज्ञानप्राप्ती झाली. ह्या नविन प्रकाराबाबत उत्सुकता तर होतीच त्यामुळे घरी आजीला आणि आई-बाबा परत आल्यावर त्यानां मी सिनेमाची गोष्ट विचारून विचारून हैराण करून सोडलं होतं. पण त्यानीं सांगितलेल्या गोष्टीमधून काही उलगडा झाला नाही "अ‍ॅडल्स" पिक्चर म्हणजे नक्की काय त्याचा. वाढत्या वयाबरोबर समोर येतील तसे सिनेमे बघत अनुभवविश्व वाढत होतंच. "कर्मा" मधला डॉ. डॅन अनुपम खेर आणि "हीरो" मधला अमरीश पुरी हे दोन खलनायक फार फार वाईट असे तेव्हापासून डोक्यात बसले आहेत. तर प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, रणजीत हे रेप करणारे आणि त्याहूनही वाईट. त्या काळात अमितभ बच्चनच्या सिनेमेतर प्रकरणांची बरीच चर्चा असे, बोफोर्स, टॅक्स बुडवणे, रेखा इत्यादी प्रकरणं. तेव्हा वयाहून मोठ्या एका मैत्रिणीने मला तिचा "थंब रुल" सांगितला की जे लोक सिनेमात व्हिलन्स् असतात ते खर्‍या आयुष्यात खूप सज्जन असतात आणि जे लोक सिनेमात हीरो असतात (म्हणजे एकच, अमिताभ बच्चन) ते खर्‍या आयुष्यात व्हिलन्स् सारखे वागतात. ते ऐकून मात्र मला फार फार वाईट वाटलं होतं. नाही म्हणायला प्रेम चोप्राबद्दलचं मत थोडं चांगलं नक्कीच झालं त्या थम्ब रुलमुळे :).

वय थोडं वाढलं आणि माझ्या गुलाबी चॉकलेटी वर्षांत रोमॅन्टिक हिंदी सिनेमांचा काळ सुरू झाला. तीन खान आले. त्यापैकी "कयामत से कयामत तक" बघायच्या आधी आमीर खानबद्दल बरंच हाईप ऐकायला मिळत होतं. काय दिसतो, काय गाणी, काय जोडी, काय रोमान्स. पण QSQT बघून मला काही विशेष वाटला नाही आमीर खान. "मैने प्यार किया" मधला सलमान खान थोडासाच आवडला आणि काही वर्षांपुर्वी टिव्हीवरच्या "फौजी" सिरीयलमधल्या समस्त मुलींची "दिलकी धडकन" झालेल्या शाहरुख खानने तर अगदीच निराशा केली "दीवाना" मधून. सगळ्यांत जास्त भावला तो अरविंद स्वामी चा "रोजा" मधला "गाँव की कबुतरी" आणि " S O R R Y सॉरी" तला रोमान्स. आतापर्यंत "हीरो" वाटत आलेले सर्व हीरो लोक मारामारी करायला डमीज् वापरतात ह्या गोष्टीची पहिल्यांदा जाणीव झाली ती "खिलाडी" मधल्या अक्षय कुमारला आणि "फूल और काँटें" मधल्या अजय देवगण ला बघून. मग त्यानंतर काही काळाकरता तेच फक्त "हीरो" वाटायचे, बाकीचे फक्त नुसतेच आवडायचे.

हिंदी सिनेमांतल्या सतत बदलत्या चित्राप्रमाणेच मराठी सिनेमेही बदलत होते. सचिन, महेश कोठारे ह्यांच्या करमणूकप्रधान सिनेमांची चलती व्हायला सुरूवात झाली होती. मला स्वतःला महेश कोठारे चे सिनेमे कधीच आवडले नाहीत. सचिनचे सिनेमे मात्र खूप एंजॉय केले आणि त्याचा सगळ्यात विशेष आवडता सिनेमा म्हणजे "गम्मत-जम्मत". त्याचं कारण असं की ह्या सिनेमातूनच माझा सगळ्यांत लाडका गायक थेट माझं नाव घेऊन "ये ना" म्हणून गेला आणि मराठी जनमानसांत माझं नाव अजरामर करून गेला. सगळ्या गाण्यांच्या प्रोग्रॅम्स् मध्ये एकदा तरी "अश्विनी ये ना" गायलं जायचंच आणि लोकांचा जल्लोष बघून माझ्या मनाला फार गुदगुल्या व्हायच्या.

अजून काही प्रकर्षाने आठवणारी नावं म्हणजे "कळत नकळत", "अर्थ", "मासूम, "इजाजत" बघून नाती कशी गुंतागुंतींची असतात ते जाणवलं. "माचिस" च्या आधी सामाजिक प्रश्नांवरचे सिनेमे बघितले नव्हते असं नाही पण "माचिस" मात्र स्वतःची अशी वेगळीच छाप सोडून गेला. "प्रहार" बघितल्यानंतर नाना पाटेकरमधला "भडक"पणाही आवडायला लागला. "गोलमाल", "चुपके चुपके" मधला साधेपणा परत कधी दिसला नाही आणि "आनंद" बघितल्यावर आहे तो क्षण पूर्णपणे जगण्यातून मिळणारा आनंद कळला.

वय वाढलं तसं "ग्लॅमर म्हणजे काय, कुठले सिनेमे तद्दन फालतू, कुठले वैचारीक, कुठल्यात मनोरंजनात्मक मुल्य अधिक, कुठले विषय मला अधिक भावतात, काय बघून आतून वाईट वाटतं, कशामुळे आनंद होतो, कुठले रिअलिस्टीक वाटतात, कशामुळे मनात दीर्घकाळ आणि खोलवर काहीतरी प्रभाव होतो" असले अनेक प्रश्न सिनेमा बघताना पडू लागले आणि त्यांची उत्तरं शोधली जाऊ लागली. सिनेमा आणि माझ्यातलं अवखळ नातं थोडं प्रगल्भ व्हायला लागलं. "प्रगल्भ" असा शब्द जरी वापरला तरी त्यातला "अवखळपणा" कधी कमी होईल असं वाटत नाही. पण त्याबरोबरच प्रत्येक सिनेमा बघताना डोक्यात येणारे विचार, मनात उमटणार्‍या भावना ह्यांची सुस्पष्टता वाढल्यासारखी जाणवायला लागली आणि असा एखादा लेख लिहीण्याची उर्मीही येऊ लागली.

मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांचा सिस्टिमॅटीक आढावा वगैरे घेण्याचा माझा उद्देश नाही. कारण इतके अगणित सिनेमे बघितलेत की कशावर लिहावं आणि कशावर नाही हे ठरवणं कठिण आहे. पण "सिनेमा" ह्या लाडक्या मित्रा बद्दल लिहायचं म्हणून मनाचा तळ ढवळल्याबरोबर पटकन बाहेर पडलेल्या ह्या काही आठवणी शेअर केल्या आहेत फक्त. मी सुरूवातीला म्हंटलं तसं मला खात्री आहे की कमी-अधिक फरकाने सिनेमा आवडणार्‍या प्रत्येकाच्या अशाच काही आठवणी असतील आणि त्या नव्याने जगताना सिनेमाबद्दलचं प्रेम आहे त्यापेक्षा काकणभर अजूनच वाढत असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही! आवडला लेख, विशेषतः पहिला अर्धा भाग.

थेटर, पिक्चर शब्द मला चुकीचे वाटत नाहीत. फक्त आता, आणि त्यातही जास्त अमेरिकेत, प्रचलित नाहीत एवढेच. 'द मॅजेस्टिक' या जिम कॅरेच्या चित्रपटात याच नावाच्या चित्रपटगृहाचा उल्लेख 'थेटर' (थिएटर) असाच आलेला आहे.

तेव्हा वयाहून मोठ्या एका मैत्रिणीने मला तिचा "थंब रुल" सांगितला की जे लोक सिनेमात व्हिलन्स् असतात ते खर्‍या आयुष्यात खूप सज्जन असतात आणि जे लोक सिनेमात हीरो असतात (म्हणजे एकच, अमिताभ बच्चन) ते खर्‍या आयुष्यात व्हिलन्स् सारखे वागतात.

अगदी सहमत. Happy

खरेच सिनेमाशी आपले नाते शोधायला गेलो आणि सिनेमाला आपल्या आयुष्यातून वगळून ते कसे असेल असा विचार केला तर खरेच बाकी शून्य राहिल्यासारखे वाटते...

सध्या तर या स्पर्धेच्या फीवरमुळे, एवढे सुंदर सुंदर लेख आणि खास करून मनातून उतरलेले अनुभव वाचून, सारखे हेच विचार डोक्यात घोळून तर आणखी पक्के झालेय हे सिनेमाप्रेम.. Happy

पण "सिनेमा" ह्या लाडक्या मित्रा बद्दल लिहायचं म्हणून मनाचा तळ ढवळल्याबरोबर पटकन बाहेर पडलेल्या ह्या काही आठवणी शेअर केल्या आहेत फक्त. मी सुरूवातीला म्हंटलं तसं मला खात्री आहे की कमी-अधिक फरकाने सिनेमा आवडणार्‍या प्रत्येकाच्या अशाच काही आठवणी असतील आणि त्या नव्याने जगताना सिनेमाबद्दलचं प्रेम आहे त्यापेक्षा काकणभर अजूनच वाढत असेल<<<

खूप सुंदर लिहिले आहे

शुभेच्छा सशल

बेशक मस्तच! चित्र नव्हे मित्र ! बाकि ते राम तेरि नंतर विचारलेले प्रष्ण 'मुले लाजवतात तेंव्हा" मधे लिहिलेस कि नाही? Proud

छान लिहिलय.

सिनेमा मला खळखळून हसवू शकतो, घडाघडा रडवू शकतो, प्रेम, राग, लोभ, मत्सर वगैरे वगैरे जितक्या काही भाव-भावना मनुष्याला माहित आहेत त्या सर्व मला सिनेमांत दिसतात, सिनेमातून माझ्यात उमटतात. >>> जियो!!!!!

सिनेमाला मित्र म्हटलंय, ते आवडलं Happy (पण ती मैत्री लेखात अजून उतरायला हवी होती - असंही वाटलं.)

आमच्या घरचे असेच आम्हाला सोडून 'अंधा कानून' पहायला गेले होते, कारण तो 'फक्त प्रौढांसाठी' होता. नंतर काही वर्षांनी तो पाहिल्यावर असं वाटलं, की त्यात नक्की होतं काय 'प्रौढांसाठी'? Lol

छान लिहिलंय.
<< अमिताबच्चन,
अरविंद स्वामी चा "रोजा" मधला "गाँव की कबुतरी" आणि " S O R R Y सॉरी" तला रोमान्स >>........अगदी अगदी Happy

धन्यवाद सगळ्यांनां .. Happy

फारेण्ड, तू म्हणतोस ते बरोबर आहे .. "थिएटर" हा शब्द तर सर्रास वापरला जातो .. "सेंच्युरी थिटर्स" आहेतच की आपल्याकडे ..

पेशवे, Lol

ललिता, पटलं .. बालपणातल्या मैत्रीबद्दल भरभरून लिहीलं गेलं, "प्रगल्भता" आल्यानंतर मात्र आळस केला बहुदा .. कदाचित ही "प्रगल्भता" अजून प्रगल्भ झाली की मग त्याबद्दलही तेव्हढंच भरभरून लिहीता येईल .. Happy

आम्हाला सोडून आई आणि मावशी फक्त मोठ्या(१८+) असलेल्या मावसबहिणीला घेवून प्रतिघात पहायला गेल्या होत्या ते आठवलं.
बेताब पहायचा म्हणून आम्ही धोशा लावला होता. मामा आणि बाबा तिकिटे काढायला म्हणून गेले आणी आम्हाला आणायला घरी न येता फक्त तेच दोघे सिनेमा पाहून आले यावर मग घरी आम्ही रडून गोंधळ घातला मग शेवटी शेजारची मावशी आम्हाला घेवून दुसरे दिवशी बेताब दाखवायला घेवून गेली होती Happy
शेवटी अमिताब हीरो बाकी सगळे झीरो हे मान्य आहे तर तुला Wink

छान आहे लेख.
पण.. ... सशल चा लेख असून त्यात माधुरी काकुंचा सिनेमा नाही Proud
Btw, तो थंब रुल शक्ति कपुर ने मोडून इतिहास रचला Wink
मला लहानपणी अमिताभ चा फोटो हेअर कटिंग सलोन , पानवाल्यांची टपरी, उसाचं गुर्‍हाळ अशा ठिकाणी दिसायचा, ते ही असे वाढलेले केस, भडक शर्ट्स, शर्टाची बटनं उघडी, तोंडात विडी स्टाइल चा.. लहान पणी अमिताभ= गुंड एवढच समजायच :).
बच्चन चे सिनेमे मी बर्‍याsssच उशीरा पहायला सुरवात केली... पाचवीत असताना पहिला बहुदा त्याचा मुव्ही, आमच्या शाळेत दाखवला होता, जंजीर !
आईने सांगितलं होतं छान आहे म्हणून पण मला एवढच अपिल झालं कि हिरो काय मस्तं लांब लांब पायांनी लाथा मारतो व्हिलन ला , बाकी जंजीर सिनेमा मात्रं 'जुन्या अंगाचा' वाटला होता, कारण त्या वेळच्या नव्या सिनेमांच्या झगमटात जुना सिनेमा बघताना एकदम कमी जॅझी वाटला होता !
त्या नंतर व्हीसीआर भाड्याने आणण्याची ट्रेंड होती, तेंव्हा १२ तासात अभिमान, दिवार, त्रिशुल, मि.नटवरलाल धपाधप पाहिले होते :).
शेजारी पाजार्‍यांनी सगळ्यांनी मिळून व्हीसीआर भाड्यानी आणाणे हा प्रकारच सही असायचा, एकत्र बसून मुव्ही बघणे, स्वयंपाकात आई पण वेळ घालवायची नाही तरी इडली सांबार-आइस क्रिम असे शॉर्ट कट बेत पण आवडते असायचे !

सशल,नोस्टॅल्जिक केलंस. प्रत्येकाचा प्रवास एकाच दिशेने पण वेगळ्या तपशिलांनिशी होतो हे जाणवलं.छान लिहिलंयेस.

Pages