अज्ञाताच्या वाटेवर...........!

Submitted by सुधाकर.. on 27 August, 2012 - 15:57

चल!.. आज नव्या वाटेने जाऊ,
जिथे असतील कळ्या ही उत्सूक,
गंध सांडून फूलण्यासाठी.
काट्यांचं ही दु:खं विसरून,
तुझ्या माझ्यासाठी.

अंगावर ऊठवाया पावलांची नक्षी,
अतूर असतील वाटा,
अन उर फोडून नाचत असतील,
ओढ लागलेल्या पाणलाटा.

खाली वाकलं असेल आभाळ,
जिथे रंग निळा घेऊन,
फक्त तुझ्या माझ्यासाठी.
तेथेच घडूदे आज एकदा
या हृदयाच्या गाठीभेटी.

ओसाड असलं रान तरी,
जे देईल अंतराची हाक
अनवाणीच जाऊ तिथे,
पावलावरती पाऊल टाक.

गुंतवून घेऊ पायात,
आडव्या तिडव्या वाटा,
रुतला जरी काटा,
वहिवाटेला देऊ फाटा.

मिसळून जाऊ एकमेकात,
स्वच्छ उन्हाच्या मृगजळात.
सावल्या ठेवू कोरून,
भिरभीरणार्‍या डोळ्यात.

आभाळाचा संधीप्रकाश
असेल जिथे गोठलेला.
गाणे गात जगत असेल,
अश्वथ ही पिळवटलेला.

चल.. जाऊ आज तिथे,
जिथे येईल मेघ उतरून,
गंध घेऊन सौख्याचा.
अन दु:खाचे ही गीत होऊन,
गाव लागेल आनंदाचा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users