नाही !(दोन शेर)

Submitted by राजीव मासरूळकर on 26 August, 2012 - 03:07

@@नाही@@

गोडवा संपून गेलेला कुठेही ऊस नाही
क्रुरतेने वागतो जो , तो पशू , माणूस नाही !

मायभू आधार देते , कास्तकाराच्या पिकांना
सावलीचे सोंग घेतो तो खरा पाऊस नाही !

- राजीव मासरूळकर
दि २४.८.१२
सायं. ५.४५ वा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजीव!
मुळात तुझ्या काळजात स्फुरलेले काव्य बेहतरीन आहे असे दिसते, पण त्यावरील तुझे चिंतन जरा कमी पडलेले दिसते. तुझी वृत्तावरची पकड आवडली. पण वृत्तवशता आली म्हणून लिहिताना उतावीळपणा कधीच करू नये. सुचलेला खयाल हृदयात नीट मुरू द्यावा. सखोल चिंतन करावे. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे याचा आत्मशोध घ्यावा. त्यातील काव्य कसे आहे याची जाणीव आपोआप आत्म्यास जाणवू लागते. प्रतिमा कोणत्या सुचल्या आहेत, त्या नीट न्याहाळाव्यात, त्यांच्या अर्थांच्या सीमांची चाचपणी करावी. प्रतिमांचे संलग्नीकरण ठीक आहे ना हे पहावे. आपल्याला नेमके जे म्हाणायचे आहे, त्यासाठी या प्रतिमा सक्षम आहेत ना हे पहावे, त्याशिवाय त्या प्रतिमांना मनात थारा देवू नये वा त्यांना शरणही जावू नये.
सखोल व सुचलेल्याला एकनिष्ठ राहिले की, नव्या अनुकूल प्रतिमा अलगद, आपोआप मनात अवतरतात. मग राहिली प्रतिमांची यथायोग्य गुंफण, जे चिंतनाने, तपस्येने प्रत्येकास साधते. शेवटी साक्षात्कार झाल्यागत योग्य मिसरेच्या मिसरे ओठवर येतात. एक मिसरा आधी स्फुरतो. थोडी अजून खोल हृदयात बुडी घेतली की, अनुरूप दुसरा मिसरा ओठावर येतो व सच्चा कामयाब शेर हातोहात कागदावर उमटतो.

राजीव! मी जे आचरतो ते, तुझ्यापुढे ठेवतो आहे.
ही शेराची/गझलेची/कवितेची निर्मिती प्रक्रिया, जी कधी कधी जीवघेणी असते.
सुचलेल्या काव्याच्या घनतेवर ती बरीचशी अवलंबून असते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला लागणारा कालावधी हा कमी/अधिक असू शकतो. आपल्याजवळ पाहिजे श्रद्धा, सबूरी, थांबण्याची तयारी, लेखनगर्भ निष्ठा, साहित्यिक विनय, व वाजवी परखडपणा. मग आपण जे लिहू ते कामयाबच होते वा आपले लिखाण त्यादिशेने वाटचाल तरी करू लागते. लिहिल्यानंतर, लिहिलेले सुचले, त्याबरहुकूम आहे ना, हा कौल आपले हृदय निश्चितच आपल्याला देते व नवनिर्मितीचा एक परमानंद आपणास मिळतो, व नंतर आपण धन्य होतो.
निर्मितीच्या कळांमधून आपली सहीसलामत सुटका झालेली असते व मग आपला जीव सुखवतो, विसावतो.

आता तुझ्या दोन शेरांविषयी...........

शेर नंबर १)

शेरातील मध्यवर्ती कल्पना आवडली. कल्पना, तुलना ठीक वाटली.
पण शेराची अभिव्यक्ती जरा वेगळी, अजून जोरकस असायला हवी होती, असे वाटून गेले.

माणूस, ऊस, गोडवा अशा प्रतिमा असताना, अजून एक संलग्न प्रतिमा मला सुचली व ती म्हणजे माणुसकी.
गोडवा संपून गेलेल्या ऎवजी एक सुंदर आटोपशीर व थेट वाटणारी प्रतिमा सुचली, ती म्हणजे चिपाड, जी ऊसाशी निगडीत आहे.

आता माणूस, माणुसकी, ऊस, गोडवा व चिपाडे या सर्व प्रतिमांची गुंफण अशी काही सुचली की, माणूस व ऊस या दोन गोष्टींची एक सुंदर काव्यमय तुलनाच सशक्तपणे अभिव्यक्त झाली व मला असे लिहावे वाटले...........

आत नाही गोडवा, नुसती चिपाडे......ऊस नाही!
आज माणुसकीच नाही, त्यामुळे माणूस नाही!!
................................................................................................

शेर नंबर २)

या शेरातील पहिली ओळ छान. दुस-या ओळीतील पाऊस हा काफिया सुंदर.
पण, दुसरी ओळ पहिल्या ओळीस न्याय द्यायला कमकुवत वाटली. कारण सावलीचे सोंग या शब्दयोजनेमुळे. खरा पाऊस व सावलीचे सोंग या प्रतिमा अर्थाने दुरावलेल्या वाटतात. तेव्हा शेरातील दोन्ही ओळी एकजीव करण्यासाठी दुसरी ओळ व हा शेर मला असा वाचावा/लिहावा वाटला..........

मायभू आधार देते, कास्तराच्या पिकांना....
पावसाळी भास नुसता, पण, खरा पाऊस नाही!

..........प्रा. सतीश देवपूरकर
टीप: हा प्रतिसाद संपवताना आम्हाला दुस-या शेरातील दुसरी ओळ अशी सुचली..........
पावसाळी सोंग नुसते, पण, खरा पाऊस नाही!
कोणता पर्याय बरा वाटतो ते तुझ्यावर सोपवतो.
तुझ्या पुढील गझललेखनास आमच्या हार्दिक शुभेच्छा!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

दोन शेरांवर दोनशे ओळी. पापे कुठे फेडाल सतीश देवपूरकर? सखोल चिंतन म्हणजे काय हो? गझलेची वही घेऊन विहीरीत जाऊन बसायचे का? सखोल चिंतन म्हणे. माय लिटल जिमी इज गडाबडा लोळिंग

दोन शेर तर छान आहेतच. परंतू देवसरांनी लिहीलेले 'काव्याची निर्मित्तीप्रक्रिया' हे प्रकरण ही छान आहे. खरंतर या गोष्टी इतक्या सहजतेने शब्दात सांगता येत नाहीत. पण सरांनी त्याची सहज सुंदर माडणी केली आहे.

----------- धन्यवाद सर.

खरंच , देवपूरकर सरांनी बरंच काही स्पष्ट केलं आहे . त्यांच्या स्पष्टीकरणातून त्यांचा अभ्यास व्यासंग निश्चितच अधोरेखित झाला आहे !
धन्यवाद प्रा सतीश देवपूरकर सर , सुधाकर सर , मोहीनी पवार म्याडम .

मायभू आधार देते , कास्तकाराच्या पिकांना
सावलीचे सोंग घेतो तो खरा पाऊस नाही ! >>> फारच आवडले...

मोहिनी पवार यांचा प्रश्न फारच मिश्किल आहे !
(कोरड्या विहिरीत जाऊन बसायचे कि विहिरीतल्या पाण्याखाली बसायचे हेसुद्धा त्यांनीच स्पष्ट करावं आता . संत तुकारामांची गाथा तरली होती , माझ्या गझल बुडवण्याचाच विचार दिसतो बहुतेक त्यांचा ! )

धन्यवाद पराडकर सर .
धन्यवाद पुरंदरे सर .

तुकारामांची गाथा तरली होती , माझ्या गझल बुडवण्याचाच विचार दिसतो बहुतेक त्यांचा>>>>>>>>
पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे माझाच एक शेर आठवला(मला आजकाल ही एक वाईट खोडच लागलीय की काय न कळे! असो..........तर शेर असा आहे बरकाsssss)

चंद्रभागेच्याच डोही त्या तुझ्या गझला बुडव रे
वैभवा तरतील बघ पाण्यात भीमेच्यातिरावर

पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद!