त्या तुझ्या सर्व शपथांची, वचनांची अठवण येते!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 August, 2012 - 04:44

गझल
त्या तुझ्या सर्व शपथांची, वचनांची अठवण येते!
त्या मंतरलेल्या सा-या दिवसांची अठवण येते!!

डोळ्याला माझ्या डोळा आताशा लागत नाही;
त्या साखरझोपेमधल्या स्वप्नांची अठवण येते!

मी शब्द शब्द स्पर्शांचा गोंदला काळजामध्ये;
त्या मधाळ स्पर्शांमधल्या शब्दांची अठवण येते!

चुकवीत जगाचे डोळे दोघेही चालत होतो;
त्या सर्व आडवाटांची, वळणांची अठवण येते!

बघताना वळून मागे, सुखही रडवेले होते!
भोगल्या वेदना त्यांची, दु:खांची अठवण येते!!

पोचलो किना-यावरती मी, बरीच वर्षे झाली;
पण क्षणाक्षणाला मजला लाटांची अठवण येते!

बहरल्या तरूला सुद्धा छळतात वेदना काही!
शिशिरात गळालेल्या त्या पानांची अठवण येते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली बरी आहे ..........
आ -ठ- व -ण असा शब्द वाचत आलो होतो आजवर ..............
असो

गझल बरी आहे म्हणजे वाईट नक्कीच नाही आहे असे म्हणायचे आहे !!

वैभवा, रणजीत!
मला मतला लिहिताना आठवण/अठवण/स्मृती/स्मरण/ याद/ध्यान/आठव...........हे शब्द मनात आले. आठव शब्द वापरून पाहिला. पण तो कानाला गोड वाटला नाही. म्हणून अठवण शब्द वापरला.
यात मी कोणतीही सूट घेतलेली नाही, वा वृत्तात बसत नाही म्हणून तडजोडही केलेली नाही.

अठवण बरोबर आणि आठवणही बरोबर!
संदर्भ: अभिनव मराठी-मराठी शब्दकोश,
संपादक: द. ह. अग्निहोत्री,
खंड १
>.........प्रा.सतीश देवपूरकर

असेल.. नक्कीच असेल. पण तरी माझी सारासार विचारशक्ती हे पटवून घेऊ शकत नाही. मी आजपर्यंत 'अठवण' असं कधीच म्हटलं, लिहिलं, वाचलं किंवा ऐकलंही नाही.

असो..!

अतिशय छान गझल. Happy

बहरल्या तरूला सुद्धा छळतात वेदना काही!
शिशिरात गळालेल्या त्या पानांची अठवण येते!! ........ अफलातुन


अठवण बरोबर आणि आठवणही बरोबर! ....होय! अनेक मराठी शब्दकोशांमध्ये अशी कित्तेक उदाहरणे आहेत. जसं----- हलणे -- हालणे, चालणे -- चलणे.

रणजीत!
असेल.. नक्कीच असेल. पण तरी माझी सारासार विचारशक्ती हे पटवून घेऊ शकत नाही. मी आजपर्यंत 'अठवण' असं कधीच म्हटलं, लिहिलं, वाचलं किंवा ऐकलंही नाही.<<<<<
असेल नव्हे निश्चितच आहे. संदर्भ दिलेला आहे. पडताळून पहावा.
टीप: मराठी भाषा ही वरून वाटते, तितकी सोपी नाही असे माझे तरी मत आहे.
मराठी माझी मायबोली असूनही मी माझी मराठी चांगली आहे असा दावा आज ५८व्यावर्षीही करू शकत नाही. रोज लिहिताना, वाचताना, ऎकताना, वावरताना नवीन काही तरी शिकायला मिळते. आतापर्यंत ऎकले नव्हते म्हणून मी नव्या वाटणा-या गोष्टीचा आव्हेर कधीच करीत नाही. त्यामुळे माझ्या भाषासमृद्धीला वाव मिळतो, व त्याचा मी माझ्या लिखाणात नम्रपणे नियोजीत व विपुल वापरही करतो, ज्याने माझी अभिव्यक्ती सशक्त व समर्थ व्हायला मदत होत आहे, असा मला तरी अनुभव येतो. कालपेक्षा आज मी जरा जास्त जोरकस अभिव्यक्त होत आहे ना, याच्याकडे माझा तरी कटाक्ष असतो.
.........प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद प्रणू! गझल आवदलि म्हनून.
रसिक हृदय असेल व रचनेत जर दम असेल तर, काव्य हे पसंतीस उतरतेच उतरते !
प्रा.सतीश देवपूरकर

टीप का लिहिली ते कळलं नाही..! असो.

आणि ठळक का लिहिलं ते तर अजिबातच कळलं नाही. ईंटरनेटच्या प्रचलित प्रोटोकॉलनुसार संपूर्ण लिखाण ठळक अक्षरात लिहिणं राग, तीव्र नापसंती दर्शविण्याचं द्योतक मानलं जातं. तसं असल्यास सांगावं म्हणजे पुन्हा आपणांस पीडा देणार नाही.