मरणगाथा.

Submitted by सुधाकर.. on 24 August, 2012 - 13:38

_____ खालील कविता ही दुष्काळग्रस्त शेतकर्‍याचे प्रतिनिधीत्व करते.
--------------------------------------------------------------------------

आभाळीच्या ऊन्हा म्या देऊनीया पाठ
दिसामाजी दिस म्या बांधली हॊ गाठ
असं भणंगाचं माझं म्या सांधलं हॊ जिणं
फुफाट्यात धुळीच्या गेलं जळूनीया बेणं.

भली बूरी अशी माझ्या जगण्याची गत
पावसाच्या थेंबापायी भेगूळलं शेत
चिराळले मन माझे म्या जाळले हो हात
अंधारल्या घरी माझ्या कशी ऊजडेना रात!

असा ऊघडा नागोडा, कुठे झाकावी म्या लाज,
माझाच हा जन्म मला मागे जगण्याचा रोज.
अशी वहीवाट अन असा अवकाळ
नाही बदलत माझं भणंगाचं कुळ.

वावरात काळी माती जणू काळजाची माया,
आपुल्याच लेकुराची तिने नाही केली गया.
असा पोरखा- पारखा नाही मज रया,
ओसाड या माळावर कुठं शोधावी म्या दया?

फाटलेल्या लक्तराची माझ्या करूनीया ऊशी,
देव सुदी माझ्या घरी रोज निजतो ऊपाशी.
असा आगळ्या या जन्मा कसा पडलो मी फशी?
पळपुट्या मरणा मी किती धरावं ऊराशी?

इमानाला रक्त दिलं काय माझा गुन्हा?
नका आता बोलावू मला माणसात पुन्हा.
जुलूमानं सारं माझं असं जगणं वारलं,
करपल्या मातीत म्या माझं मरण पेरलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users