तुझ्या पुस्तकामधले मी, मोरपीस होतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 August, 2012 - 12:07

गझल
तुझ्या पुस्तकामधले मी, मोरपीस होतो!
जणू तुझ्या हृदयाच्या मी, वळचणीस होतो!!

लपेटुनी छाया माझी, मी ऊन्ह सोसले!
समज तुझा झाला की, मी सावलीस होतो!!

सुखासीन लोकांना का याद मी न यावे?
दु:ख नाव माझे, मी तर, मदतनीस होतो!

तुझ्या सुखी संसाराला, मी जरी न साक्षी;
जरा आठवोनी बघ.....मी अडचणीस होतो!

फुलांभोवताली काटे, भोवती तुझ्या मी!
कोण इथे आले गेले, पाळतीस होतो!!

चार घास मिळता आता विसरणार नाही....
कसा पारखा मी झालो भाकरीस होतो!

तुझ्या पावलांच्या संगे पावले कुणाची?
तुझी सावली नव्हती....मी सोबतीस होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवपूरकर सर..

तुझ्या पुस्तकामधले मी, मोरपीस होतो!
जणू तुझ्या हृदयाच्या मी, वळचणीस होतो!!

खूप खूप सुंदर. ही नजाकत उर्दूतली. खूप मस्त झालाय शेर.

लपेटुनी छाया माझी, मी ऊन्ह सोसले!
समज तुझा झाला की, मी सावलीस होतो!!

लपेटुनी छाया माझी हे झेपलं नाही.

सुखासीन लोकांना का याद मी न यावे?
दु:ख नाव माझे, मी तर, मदतनीस होतो!

इथे घोळ वाटतोय. का याद मी न यावे ही ओळ सुखासीन लोकांना दु:खाची आठवण येणारच असं सुचवतेय. हाच अर्थ अपेक्षित आहे का ? मला वाटतं सुखासीन लोकांना दु:खाची आठवण होणारच नाही असा आशय अपेक्षित असावा तुम्हाला.

तुझ्या सुखी संसाराला, मी जरी न साक्षी;
जरा आठवोनी बघ.....मी अडचणीस होतो!

छान आहे.

फुलांभोवताली काटे, भोवती तुझ्या मी!
कोण इथे आले गेले, पाळतीस होतो!!

छान

चार घास मिळता आता विसरणार नाही....
कसा पारखा मी झालो भाकरीस होतो!

सुंदर विचार. मात्र नावीन्य नाही असं वाटलं. क्षमस्व !

तुझ्या पावलांच्या संगे पावले कुणाची?
तुझी सावली नव्हती....मी सोबतीस होतो!

वाह !!! आवडेश

आवडली गझल.
( मला स्वतःला गझल लिहीणे जमलेले नाही. एक सामान्य वाचक म्हणून प्रतिसाद दिलेला आहे Happy चु.भू.दे.घे )

संपुर्ण गझल आवडली Happy

लपेटुनी छाया माझी, मी ऊन्ह सोसले!
समज तुझा झाला की, मी सावलीस होतो!!

सुखासीन लोकांना का याद मी न यावे?
दु:ख नाव माझे, मी तर, मदतनीस होतो!

तुझ्या सुखी संसाराला, मी जरी न साक्षी;
जरा आठवोनी बघ.....मी अडचणीस होतो!

>>>>
हे तर अप्रतीम

शेवटचा हॅट्स ऑफ Happy

लपेटुनी छाया माझी, मी ऊन्ह सोसले!>>>>>लपेटुनी छाया माझी, ऊन्ह सोसले मी !>>>असे केल्यास सहज वाटते

जरा आठवोनी बघ.....मी अडचणीस होतो!>>>>मी अडगळीस होतो असे वाचले अर्थ लवकर समजला जास्त स्पष्ट वाटला

वैभवा!
तो शेर असा आहे.....
तुझ्या सुखी संसाराला, मी जरी न साक्षी;
जरा आठवोनी बघ.....मी अडचणीस होतो!

गद्य अर्थ असा आहे......
आज तुझा संसार सुखाचा चालला आहे, ते पहायला मी नाही, त्याचा साक्षी मी नाही. पण, तू जरा आठवून पाहिलेस तर तुला कळेल की, तुझ्या अडचणीच्या वेळेस मी तुझ्या सोबत होतो. इथे अडगळीस शब्द टाकून कसा चालेल?
इथे मी कुठे होतो, म्हणजे स्थान अशा अर्थाने अडचणीस हा शब्द वापरलेला नाही.
अडचणीच्या वेळेस या अर्थी वापरला आहे. इथे मी कुठे होतो या स्थानास महत्व नाही. मी तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर कोणत्या वेळेस होतो याला महत्व आहे.
........प्रा.सतीश देवपूरकर

हां SSSSS .....बरोबरय तुम्ही म्हणताय ते ........आत्ता समाजाला शेर
देवसर ; आपणास दिलेल्या तसदीबद्दल क्षमस्व !!

धन्यवाद