विषय क्र. ३ : माझ्या मनातला मराठी चित्रपट

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 11:44

सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.

नाटक संपले आणि कुठलातरी तद्दन विनोदी मराठी सिनेमा सुरू झाला. मनात तेव्हाच तिडीक उठली. मराठी सिनेमाबद्दल कधी बारकाईने विचार करीन असं वाटलं नव्हतं. मन मागे गेलं. सामना वगैरे सिनेमात रमून मग एक गाव बारा भानगडीपर्यंत गेलं. एक गाव बारा भानगडी हिट झाला. सिनेमा हिट होणे ही चांगली गोष्ट असली तरी मराठी सिनेमाच्या वाटचालीतलं ते एक दु:स्वप्नं ठरलं. हा माझा मार्ग एकला, जगाच्या पाठीवर, ऊनपाऊस असे एका पेक्षा एक सुंदर सिनेमे देणा-या या चित्रपटसृष्टीला तमाशाचं व्यसन लागलं. ज्याला टिपीकल तमाशापट म्हणावे अशा चाकोरीत मराठी सिनेमा अडकला. पडद्यावर घुंगरू वाजू लागले आणि स्वस्तात सिनेमा बनवून गल्ला जमवायची वृत्ती बोकाळली. पुढे पुढे तर तमाशाच्या थिएटरमधेच मराठी सिनेमा बनतो कि काय अशी शंका यावी असे सिनेमे बनले. मात्र याच तमाशा या विषयावर गणानं घुंगरू हरवले सारखे काही संवेदनशील सिनेमेही आले आणि याच तमाशावर पिंजरा सारखी अजरामर कलाकृतीही याच मराठी सिनेमाने दिलीय. पिंजरामध्ये आणि या तद्दन तमाशापटांमधे असलेला फरक अनेक निर्मात्यांना समजला नाही.

एकीकडे तमाशा तर दुसरीकडे थोरली जाऊ, हळद रूसली कुंकू हसलं. अष्टविनायक असे कौटुंबिक किंवा देवदेवस्कीप्रधान सिनेमे किंवा पाटील-सावकार यांच्या जाचात अडकलेली मदर इंडीया वरून बेतलेली कथा या दुष्टचक्रात अडकलेल्या सिनेमाला सचिन आणि महेश कोठारे यांनी बाहेर काढलं. मराठी पडद्याला ब-याच दिवसांनी फ्रेश चेहरे मिळाले, गाणी मिळाली आणि प्रेक्षक सुखावला. पण हे सुख खूप दिवस टिकलं नाही. तमाशा मधून बाहेर पडून इनोदी सिनेमाची लाट तयार झाली. अगदी सचिन देखील या लाटेवर वाहवत गेले आणि सत्ते पे सत्ता हा सिनेमा आपल्या प्रेक्षकांना माहीतच नाही या थाटात त्यांनी आम्ही सातपुते बनवला. बॉम्बे टू गोवा सारख्या सिनेमावर नवरा माझा नवसाचा बनवून सचिनने नेमकं काय साधलं हेच समजत नाही. आपल्या प्रेक्षकाबद्दल सचिनसारखे लोक काय विचार करतात हे असे सिनेमे पाहीले कि कळत नाही.

एकीकडे काही जण मात्र नेटाने वेगळेपण टिकवून होते. सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा द्वारे जब्बार पटेलांनी मराठी सिनेमा जिवंत ठेवला. सरकारनामा सारखा सिनेमाही येऊन गेला. स्मिता तळवलकरांनी दर्जेदार सिनेमे देऊ केले. सवत माझी लाडकी सारखा बासुदांच्या तोडीचा सिनेमाही त्यांनी आपल्याला दिला. पण हे मृत्यूशय्येला लागलेल्या मराठी सिनेसृष्टीसाठी सलाईन होतं. या व्हेंटिलेटरवरच्या मराठी सिनेमाला ख-या अर्थाने श्वास दिला तो श्वास या मराठी सिनेमानेच.. आणि मग मराठी सिनेमाने खरोखरच मोकळा श्वास घेतला. तेव्हापासून ताज्यातवान्या सिनेमांची स्पर्धा असावी असं वातावरण निर्माण झालं. विषय आणि सादरीकरणातलं वैविध्य सुखावणारं होतं. पण रसिकांचा म्हणावा इतका प्रतिसाद नव्हता.

अशातच मराठी पडद्यावर दोन बैल अवतरले. एकाचं नाव टिंग्या आणि दुस-याचं वळू. या दोन बैलांनी मराठीची गाडी योग्य वळणावर आणून ठेवली आणि पहिल्यांदाच प्रेक्षकांनीही मल्टिप्लेक्समधे मराठी सिनेमा पहायला सुरूवात केला. पैकी टिंग्या हा बैल जरा रडका होता मात्र त्याने मंगेश हाडवळे सारखा मनस्वी दिग्दर्शक दिला , रोहीत नागभिडे सारखा उमदा संगीतकार दिला. वळू मात्र मिस्कील निघाला. या बैलाने पोट धरधरून हसवलं. हसवता हसवता विचारही करायला लावला आणि मग हा बैल सुसाट सुटला. देऊळ साठी सुवर्णकमळ घेऊनच आला.....

पण यावर समाधान मानावे का ?

दक्षिणेकडे हॉलीवूडच्या तोडीचे सिनेमे बनतात. रोबो सारखा खर्चिक सिनेमा बनू शकतो. या सिनेमांना प्रादेशिकतेच्या मर्यादा नाहीत का ? मराठीत रोबो बनवावा असं इथं कुणी म्हणत नाही. पण त्याच वेळी भाषेचं कारण देऊन आपण निर्मितीमूल्यांच्या बाबतीत हात आखडता घेतल्यानं सिनेमा या माध्यमामधे कलाकृती पेश करण्याला आपसूकच मर्यादा येत नाहीत का ? निर्मितीचा विचार करतानाच काही विषय बजेट ही बाब हद्दपार करायला लावते. सृजनाला अशा मर्यादा असणे भूषणावह नक्कीच नाही. माझ्या स्वप्नातल्या मराठी सिनेमालाही कुठलाही विषय परवडत नाही म्हणून वर्ज्य नसेल.

याचा अर्थ खर्चिक सिनेमे म्हणजेच दर्जा असा मुळीच नाही. पण गोदो ने जो अनुभव दिला तो "प्रभातकाल" वगळता आजवर कुठल्या मराठी सिनेमाने दिला याची उजळणी केली तेव्हां माझ्याकडे उत्तर नव्हतं ! आमचा आवडता स्टीव्हन स्पिलबर्ग जुरासिक पार्क, इंडीयाना जोन्स सारखे खर्चिक सिनेमे बनवत असतानाच एकीकडे शिंडलर्स लिस्ट सारखा ऑफ बीट सिनेमा बनवतोच कि ..! साँग ऑफ द स्पॅरोज या इराणी सिनेमाचं बजेट काय असणार ? दो बिघा जमीन काही बिग बजेट सिनेमा नाही. पण हिंदीतले सर्वश्रेष्ठ साहीत्यिक प्रेमचंद यांच्या कथेवर सिनेमा बनवणारे निर्माते हिंदीला लाभले. एक होता विदूषक सारखा अपवाद वगळता असे प्रयत्न मराठीत झालेत का ? अलिकडे नटरंगने असा प्रयत्न करताच रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आपण पाहीलंय.

दुस-या बाजूला जे लोक इंग्रजी सिनेमाचे प्रेक्षक आहेत, तेच हिंदी सिनेमाचेही प्रेक्षक आहेत आणि तेच मराठी सिनेमाचेही ! असं असताना त्याला गृहीत धरण्याची चूक मराठी सिनेमाने करता कामा नये. प्रेक्षकही हॉलिवूडपटाकडून ज्या अपेक्षा ठेवत असतात त्या बॉलिवूडपटाकडून ठेवत नाहीत आणि बॉलीवूडपटाकडून ज्या अपेक्षा असतात त्या मराठीकडून ठेवत नाहीत. प्रत्येक ठिकाणी संस्कृती वेगळी आहे, मर्यादा आहेत याची जाण आपल्या प्रेक्षकाला नक्कीच आहे. म्हणूनच मराठी सिनेमाला मराठी मातीचा वास आला पाहीजे या म्हणण्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगला पाहीजे. मराठी मातीचा वास याचा अर्थ चौकटीत कोंडून घ्या असा घेऊ नये असं वाटतं. टायटॅनिक हिट झाला तेव्हां रामदास या कोकणाजवळ बुडालेल्या जहाजावर मराठीत सिनेमा का निघू शकत नाही अशा अपेक्षा व्यक्त झाल्या होत्या. असाही त्याचा अर्थ असू नये असं वाटतं. टायटॅनिक हा एक अविष्कार होता आणि जेव्हां तो पहिल्यांदा सादर झाला तेव्हाच त्यातलं वेगळेपण अधोरेखित झालं. पुन्हा तसा सिनेमा वेगळ्या भाषेत बनवणं ही मराठी सिनेमाकडून अपेक्षा नाहीच. त्यात अस्सलपणा काय असणार ? अगदी तोडीस तोड खर्च केला तरीही !

याउलट चिनी सिनेमातली अ‍ॅक्शन आज हॉलिवूडने आत्मसात केलीय, इराणी सिनेमाने इराणी मातीतले सिनेमे बनवताना आपलं आंतरराष्ट्रीयत्व सिद्ध केलंय. आपल्या शेजारच्या गुजराती चित्रपटसृष्टीला मुंबईसारखं शहर लाभलेलं नाही. मात्र भवानी भिवई हा गुजराती सिनेमा पाहताना भाषेचा अडसर जाणवला नाही. अस्वस्थ केलं या सिनेमाने. चक्क दोन दोन शेवट असणारा हा सिनेमा कथेची अनेक उलटसुलट वळणं ज्या पद्धतीने पडद्यावर पेश करतो ते पाहून रोलर कोस्टरचा अनुभव आला. दक्षिणेत शंकरा भरणम, सागर संगमम सारखे कलेला वाहिलेले सिनेमे कलात्मकता आणि ड्रामा यांचा जबरदस्त मिलाफ आहेत. या सिनेमाला स्वतःची ओळख आहे. या शंकराभरणम वरून सूरसंगम हा सिनेमा हिंदीत आला होता.

म्हणूनच हॉलीवूड किंवा बॉलिवूड च्या सिनेमांनी प्रभावित होण्याचा ट्रेंड थांबून उलट ट्रेंड सुरू करणारा सिनेमा मराठीत बनायला हवा. साऊथच्या व्यावसायिक सिनेमांवरून बॉलिवूडमधे सिनेमे बनतात. मराठीत बॉलिवूड किंवा हॉलिवूडला भुरळ पडावी असे सिनेमे बनतील का ? सिंघम हा सिनेमा हिंदी भाषेतला मराठी सिनेमा होता असं म्हणता येईल का ? सिंघमचं मराठीपण संपूर्ण भारतभर प्रेक्षकाला आवडलं. एकाच वेळी मराठी निर्माते मराठी आणि हिंदीत सिनेमा बनवू शकतील का ? पूर्वी प्रभातने असे प्रयोग केलेले आहेत. मराठी सिनेमानेच बॉलिवूडला जन्म दिलाय हे विसरून कसं चालेल ? व्यावसायिक आणि ऑफ बीट अशा दोन्ही क्षेत्रात मराठी सिनेमा इतरांसाठी आदर्श असायला हवा असं प्रभातच्या इतिहासात डोकावल्यावर वाटल्याशिवाय राहवत नाही. तंत्र आदि काही चांगल्या गोष्टी दक्षिणेकडून किंवा इतर ठिकाणाहून नक्कीच घ्याव्यात. ते अनिवार्यच आहे. मात्र संपूर्ण सिनेमा उसणवारीवर काढलेला असू नये. मराठी सिनेमाकडून माझ्या अस्सलतेच्या अपेक्षा आहेत. सिनेमागृहातून बाहेर येतांना डोक्यात सिनेमा असला पाहीजे. गोदो सारखा अस्वस्थ अनुभव असो किंवा आनंद सारखा चटका असो..किंवा बासूदा, हृषिदांसारखे हलकेफुलके सिनेमे असोत जे काही असेल ते अस्सल आणि दर्जेदार हवंय.

कोण म्हणतं टक्का दिला सारखं हलवून टाकणारं नाटक असो, बामणवाडा सारखा कानाखाली जाळ काढणारा अनुभव असो ही रंगभूमी ज्या भाषेत आहे त्या भाषेतल्या सिनेमाला विषयांचा दुष्काळ जाणवावा ? हिंदीतल्या थ्री इडीयटस ची भ्रष्ट नक्कल करणारे सिनेमे आपल्या इथे बनावेत ? योनीच्या मनीच्या गुजगोष्टी सारखं बंडखोर नाटक रंगभूमीवर येत असताना मराठी सिनेमाने बिचकत बिचकतच बोबडे बोल कुठपर्यंत बोलावेत ? जे सांगायचंय ते थेट हे मराठीत घडायला हवं ही अपेक्षा फार नसावी. शापीत सारखे सिनेमे याच भाषेत बनलेत याची आठवण अशा वेळी होते.

कुठल्याही हिंदी सिनेमाच्या तोंडीस तोड असा वारणेचा वाघ हा सिनेमा अण्णाभाऊंच्या कादंबरीवर बनलाय. आजही हा सिनेमा खिळवून टाकतो. तंत्राने अगदीच मागास, बजेटच्या बाबतीत अगदीच दरिद्री असणारा हा सिनेमा कशाच्या जीवावर आपल्याला खिळवून ठेवतो असं वाटतं ? अण्णाभाऊ साठेंच्या कादंब-यांमधे सिनेमाचं मटेरियल आहेच आहे. पण गारंबीचा बापू सारखा कादंबरीवर आलेला सिनेमाही खिळवून ठेवतोच कि ! शेवटी हे माध्यम सृजनाचं आहे, अनुभूतीचं आहे हे विसरून कसं चालेल ?

माझ्या स्वप्नातल्या मराठी सिनेमाला कथेची वानवा नसेल. विनोदी सिनेमात दमांच्या कथेतली पात्रं असतील. नाना चेंगट, बाबू पैलवान, गणा मास्तर, शिवा जमदाडे ही मंडळी पडद्यावरही अवतरलेली असतील. व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर या कथांवर अजरामर सिनेमे बनलेले असतील. ताजमहालमधे सरपंच सारख्या शंकर पाटलांच्या अस्सल विनोदी कथेचं पडद्यावर सादरीकरण होत असेल. आणि कधी कधी भौगोलिक मर्यादा ओलांडून मराठीपणाच्या चौकटी मोडणारा नाझी भस्मासूराचा उदयास्त या कादंबरीवरचा युद्धपटही पहायला मिळेल. मुघल ए आझम सारखी अतिभव्य प्रेमकहाणी बाजीराव मस्तानीच्या कहाणीवर का पडद्यावर येऊ नये ? या अवास्तव अपेक्षा नसाव्यात.

फ्रेश आणि नवे चेहरे मराठी पडद्यावर दिसावेत हे हल्ली जाणवू लागलंय. तेच तेच चेहरे प्रत्येक सिनेमात आणि मालिकेत पाहून कंटाळा येतो. मालिका आणि सिनेमात काही फरक जाणवतच नाही. वेडावाकडा चेहरा केला कि विनोदी अभिनेता म्हणून मिरवणारे आणि त्याच त्या शैलीत २४ तास बोलणारे सुपरस्टार्स यापासून मराठी सिनेमाला मुक्ती मिळण्याची गरज आहे. कथेच्या अनुषंगाने नव्या चेह-यांची चाचपणी होतेय हे जाणवतच नाही. त्यात त्या मूठभर नावांपलिकडे शोध जातच नाही. मग अजिंठा सिनेमात पारोच्या भूमिकेसाठी काळी पावडर फासून सोनाली कुलकर्णी विनोदी पद्धतीने संवाद बोलत राहते तेव्हाच त्या सिनेमातला आत्मा निघून जातो.

खूप काही अपेक्षा नाहीत मराठी सिनेमाकडून. अगदी व्यवहार्य आणि कलेच्या दृष्टीने आवश्यक अशा अपेक्षा आहेत असं मला वाटतं. अलिकडचा मराठी सिनेमाचा प्रवास पाहिला तर गंभीर झालेले निर्मातेही त्यावर नक्कीच विचार करतील याबाबत शंका नाहीच. शेवटी मराठी सिनेमाचा झेंडा निर्माते दिग्दर्शक यांनीच स्वखर्चाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. व्यवहार आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा यांची सांगड त्यांनाच घालायची आहे. मात्र जेव्हा असे प्रयत्न होताना दिसतील तेव्हा मराठी माणसानेही या सिनेमाला लोकाश्रय देणं गरजेचं आहे, नव्हे ही त्याची जबाबदारीच आहे हे शेवटी आवर्जून सांगावंसं वाटतं.

- Kiran

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यावसायिक आणि ऑफ बीट अशा दोन्ही क्षेत्रात मराठी सिनेमा इतरांसाठी आदर्श असायला हवा >>
व्यवहार आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा यांची सांगड त्यांनाच घालायची आहे. मात्र जेव्हा असे प्रयत्न होताना दिसतील तेव्हा मराठी माणसानेही या सिनेमाला लोकाश्रय देणं गरजेचं आहे >> परफेक्ट. Happy

दोन कोटी ही रक्कम मराठीतही रिकव्हरीसाठी आता अवघड नाही. फिल्म चांगली केली तर काहीच प्रश्न नाही. आता तर मराठीत डिस्ट्रीब्युटर्स पण परत आलेत. थिएटर्स मिळत नाहीत पासून सगळी कारणे अर्धीच खरी आहेत हे माझे मत. >> अनुमोदन.

दिनेश....

"पिंजरा" ची मूळ कल्पना मार्लिन डिट्रीच अभिनित 'ब्लू एन्जेल' मध्ये आहे असा स्पष्ट उल्लेख मधुरा जसराज लिखित "शांतारामा" मध्ये आला आहेच. शांतारामबापूनी आपल्या जर्मन वारीत तो चित्रपट पाहिला आणि त्या कथानकाला अस्सल मराठी बाज देता येऊ शकेल अशी त्यांची खात्री पटली होती.

'लोला' ही ब्ल्यू एन्जेल ह्या कॅबरे डान्स क्लबची मुख्य नर्तकी. तिचे घायाळ करणारे सौंदर्य आणि नृत्य पाह्यला वर्ग चुकवून जाणारे इमॅन्युअल रॉथ या शिक्षकाचे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना 'धडा' शिकविण्याच्या उद्देश्याने शिक्षक रॉथ त्या क्लबमध्ये चोरून जातात आणि लोलाला पाहून स्वतःच घायाळ होतात. त्यांच्या त्या नादापायी शाळेत आणि गावात त्यांची थट्टा होते, नोकरीही जाते. आणि मग याच 'ब्ल्यू एन्जेल' क्लबमध्ये लोलासाठी झुरणारे रॉथ चक्क विदुषकाचे काम स्वीकारतात.....पुढे लोलाही त्यांच्या प्रेमात पडते, पण लग्नानंतर ती नृत्याचे काम सोडत नाही, त्यामुळे दोघात होणारा बेबनाव....त्याची कुतरओढ, भूकमार आदी संकटांनी तो बेजार होऊन, परत आपल्या 'शिक्षकी' पदाला जवळ करण्यासाठी भणंग अवस्थेत गावी परततो, पण गाव असल्या नादीष्ट शिक्षकाला स्वीकारत नाही आणि त्या धक्क्यामुळे रॉथ आपल्या आवडत्या वर्गात शेवटचे एकदा जाऊन यावे म्हणून तिथे कुणी नसताना प्रवेश करतात आणि त्यांच्या जुन्या नित्याच्या टेबलचा आधार घेतात, तिथेच कोसळतात, मृत्यू पावतात.

~ या कथानकाला बापूंनी छानच मराठी चेहरा दिला....आणि तो प्रेक्षकाला किती भावला, हे वेगळ्याने लिहिण्याचे कारण नाही.

हो ना चांगल्या कथानकाचे रुपांतरणही नीट जमले पाहिजे.

गेल्या काही वर्षात, मराठी चित्रपट बघितले ते सिडी, यू ट्यूब ( ऑफिशियल रिलीज ) आणि एमिरेट्स्च्या उड्डाणात,
त्यामूळे या माध्यमांचा पण विचार व्हायला हवा.

नायजेरियात नाटकांची मोठी परंपरा आहे. कुणालाही हेवा वाटेल असे सुंदर नाट्यगृह आहे तिथे. पण ते आहे
राजधानी लेगॉस मधे आणि तो देश भला मोठा, त्यामूळे तिथे गेल्या काही वर्षापासून व्हीडिओपटांची निर्मिती होतेय.
ते एवढे लोकप्रिय आहेत कि बाकीच्या आफ्रिकन देशात, ( भाषा वेगळी असूनही) लोकप्रिय होताहेत. एथिओपियनच्या विमानात, तेच दाखवतात. तो उद्योग स्वतःला नॉलीवूड म्हणवून घेतो. स्थानिक कथानके, मर्यादीत बजेटमधे ते निर्माण केलेले असतात. आपल्याला त्यांच्या संस्कृतीची ओळख नसल्याने, आपल्याला
रुचत नाहीत, पण तिथे प्रचंड लोकप्रिय आहेत ते.

हा पर्याय पण मराठी चित्रपटनिर्मात्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. थिएटरचा प्रश्न जरा कमी तीव्र होईल.

आणि तसेही पूर्वापार मुंबईत मराठी चित्रपटांसाठी थिएटर्स मिळत नव्हतीच. आम्ही मालाडहून, प्लाझा, कोहीनूर,
हिंदमाता, भारतमाता अशा थिएटरना येत असू. मालाडमधे तीन सिनेमा थिएटर होती ( जोहरा, कस्तुरबा आणि न्यू ईरा, तरी तिथे कधी मराठी चित्रपट लागत नसत.) आजोळी आल्यावर कोल्हापूर आणि मलकापूरच्या तंबू
थिएटरमधे मात्र, खुप चित्रपट बघायचो.

खूप कळ्कळीने लिहीला आहे लेख! खूप आवडला!

मला तर सचिनसारखी लोकं गुन्हेगार वाटतात! इतकी लोकप्रियताआणि अनुभव (मराठी, हिंदी दोन्हितही) मिळूनही, लाइकेबिलिटी असतानाही किती पाचकळपणा करून आदर धूळीला मिळवायचा? सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा कॉपी करताना लाज कशी वाटत नाही!? Angry

सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा कॉपी करताना लाज कशी वाटत नाही!? >>> आता तर No Entry चा रिमेक करतायत...आजकालच्या मराठी सीनेमात वळु, विहीर, टिंग्या, देउळ आवडले. पण मला नटरंग, बाल गंधर्व, शाळा फारसे नाही आवडले.श्वास नंतर सावंतांचा एकही चित्रपट आला नाही. खुप मोठी gap झाली.

प्रेक्षक, थिएटर मिळत नाहि म्हणनार्‍यांनी दादा कोंडके, व्हि. शांताराम यांचे उदाहरण ठेवावे. पब्लीक आएगा, अच्छा पिक्चर बनना मंगताय!

छान लेख आहे किरण. सध्या भरपूर मराठी चित्रपट येत आहेत. पण हे सौष्ठव आहे की सूज असा प्रश्न पडतो.

पूर्वी मराठी चित्रपटांना करपरतीची योजना होती. त्यालाही आधी एक चित्रपट निर्माण केले असणे आवश्यक होते.

सध्या मराठी चित्रपट निर्मितीसाठी सरसकट पस्तीस लाख रुपयांचे अनुदान सरकारकडून मिळते आहे.
हे तर या भारंभार निर्मितीमागचे कारण नाही ?

कलाकार कोण आहेत त्याप्रमाणे उपग्रह वाहिन्या हक्काचे पैसे, अजय अतुल चे संगीत असेल तर संगीत हक्काचेही पैसे मिळतात. त्यातून चित्रपट बनू शकत नाही. पण त्यात हे सरकारी अनुदान मिळवले की चित्रपट प्रेक्षकांनी बघितला काय किंवा नाही बघितला काय, फायदा पक्का असे गणित आहे का?

थोडक्यात, आम्हा करदात्यांच्या पैशाने मराठी चित्रपट बनू नयेत ही एक अपेक्षा आहे. ( मराठी चित्रपटाबद्दल असली तरी सरकारकडून आहे.) चांगले चित्रपट निर्माण होण्याच्याच मुळावर येणारे, करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करुन निर्मात्यांना सरकारचे मिंधे करणारे हे अनुदान आहे.

पूर्वी मराठी चित्रपटांना करपरतीची योजना होती. त्यालाही आधी एक चित्रपट निर्माण केले असणे आवश्यक होते. सध्या मराठी चित्रपट निर्मितीसाठी सरसकट पस्तीस लाख रुपयांचे अनुदान सरकारकडून मिळते आहे. हे तर या भारंभार निर्मितीमागचे कारण नाही ? <<<
जी एस, करपरतीची योजना अजूनही आहे. आधी एक चित्रपट निर्माण केलेला असणे हे आजही आवश्यक आहे. सरसकट पस्तीस लाख रूपयांचे अनुदान हे अतिशय फसवे चित्र उभे केले जात आहे. ते तसे नाही.
पूर्वी सरसकट दुसर्‍या निर्मितीला काहीही न बघता १५ चे अनुदान होते. त्याचा भरपूर गैरफायदा घेतला गेला असे समजते.
आता अनुदानाची रक्कम वाढवली असली तरी त्याची चाळणी आणि निकष यामधेही बरेच बदल आहेत.

योजनेमधे गैरव्यवहार आणि सवलतीचा गैरफायदा हा इंदिरा आवास पासून प्रत्येक योजनेत होतो तसा इथेही होत असणार नाही असे नाही पण काही तपशिलात घोळ दिसले ते दुरूस्त करण्यासाठी ही पोस्ट.

Kiran..,

उत्कृष्ट विवेचन! अशोक पाटील म्हणतात त्याप्रमाणे हा लेख पारितोषिकाच्या पल्याड गेलाय.

म्हणतात ना जेव्हा फिल्म कागदाएव्हढी आणि कॅमेरा शाईएव्हढा स्वस्त होईल तेव्हा लोक चित्रपटास व्यवसाय न म्हणता कला म्हणतील. मराठी चित्रपटाकडे पाहून हे वाक्य सहीसही पटतं. खरंतर तुम्ही चित्रपटाद्वारे मराठी माणसाच्या आत्मजाणीवेस (आयडेंटिटी) हात घातला आहे. मराठी चित्रपटाची जी व्यथा आपण मांडली आहे, तिच्या मुळाशी जातांना मराठी म्हणजे काय यावर आत्मपरीक्षण करावं लागेल. एक भारतीय उपसंस्कृती म्हणून आपण भारताला काय आणि कसं देऊ शकतो यावर गांभीर्याने विचार झाला नाही. (बंगाली व दाक्षिणात्य राज्यांबद्दल कल्पना नाही.) भारताचे माजी सत्ताधारी अशी मराठ्यांची ओळख आहे. तिला अनुसरून मराठी चित्रपटातून जबाबदारीची जाणीव वा वर्तन दिसतं का? एक अतिशय दैदिप्यमान वारसा महाराष्ट्राला मिळाला आहे, त्याचं प्रतिबिंब कुठे दिसतं?

मला वाटतं आपण जेव्हा आपली मराठी ओळख नीट ओळखू शकू, तेव्हा मराठी चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेलेला असेल. एक उलट उदाहरण द्यायचं झालं तर बॉलीवूडचं देता येईल. इथे केवळ नावालाच हिंदी आहे. चित्रपटात हिंग्लीश संवाद सर्रास चालतात. पुरस्कार सोहळ्यांची भाषा इंग्रजी असते. मग हा उद्योग स्वत:ला हिंदी कसा काय म्हणवतो?

आज अमीरखानसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाला मराठी भाषा जाणून घ्यायची का गरज भासावी? हिंदी चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम हाताशी असतांना त्याला सत्यमेव जयते अशासारख्या मालिकेची गरज का पडावी? आशयासाठीच ना? आज बॉलीवूडात आशयघन असं काही बनतं का? तसं नसेल तर मराठी आणि बॉलीवूडची तुलना अनाठायी नाही का होणार?

मराठी चित्रपटात मराठी सारस्वताचं प्रतिबिंब पडायला हवं. आज तसं ते पडतं का? बंगाली व दाक्षिणात्य चित्रपटांची काय परिस्थिती आहे ते माहित नाही. पण खूप आशादायक असावीसे वाटते.

सारांशाने, मराठी चित्रपटाच्या मागे मराठी ओळख हा कळीचा मुद्दा आहे. त्याची लवकरात लवकर तड लागलेली बरी, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

सैराट जगभराचे प्रेक्षक पाहताहेत. कतार, सिलिकॉन व्हॅली इथे गण्यावर नाचताहेत ...
रवीशकुमारने मला मराठी येत नाही याचं वाईट वाटलं असं नमूद केलं. पण भाषेवाचून सिनेमा कळाला असं म्हटलंय. सैराटने सिद्धच केलं.

http://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha-paper-epaper-majhapa/sili...

Pages