तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही..

Submitted by रसप on 19 August, 2012 - 03:20

पाउलवाटेवर माझ्या माझीच सावली असते
माझीच पापणी ओली माझ्या डोळ्यांना दिसते
तू हात पुढे केला पण मी वळुन बघितले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

जो रोज साथ देतो तो एकांत हवासा वाटे
मी घड्याळ माझ्यापुरते थांबवतो अडवुन काटे
तू शब्दावरती एका अडल्याचे कळले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

बाळगले उरात होते काहूर कधीकाळी जे
अन आज सजवले आहे तू खुद्द तुझ्या भाळी जे
ते दारावरून गेले पण मी थोपवले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

अस्तित्त्वाच्या अंताची ओढ्याला चिंता नसते
निर्बुद्ध वाहिल्यानंतर त्याचीही सरिता बनते
तू माझी सरिता व्हावे, हे भाग्य लाभले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

....रसप....
१९ ऑगस्ट २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_19.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्तित्त्वाच्या अंताची ओढ्याला चिंता नसते
निर्बुद्ध वाहिल्यानंतर त्याचीही सरिता बनते>>>>मस्त,
छान!

मी घड्याळ माझ्यापुरते थांबवतो अडवुन काटे>>>मस्त

अस्तित्त्वाच्या अंताची ओढ्याला चिंता नसते>>>> वा वा छान>>>>>>>>>

माझ्या एका कवितेतल्या दोन ओळी आठवल्या

का अशी गूढ कल्पांता मेळते नदी उगमासी
मी तसाच संपिन काय सावळ्या उद्या तुजपाशी

धन्यवाद रणजित