खुशी आणि नकुशी

Submitted by सुनीता करमरकर on 16 August, 2012 - 12:13

२ मुली असतात. मैत्रिणी असतील कदाचित, कदाचित नसतील पण.
एक असते खुशी आणि एक नकुशी.
खुशी तिच्या आई ला हे सांगत असेल.

Thank you तू मला जगवलेस आई,
जगायचे कसे शिकवलेस आई.

जन्मले मी, विसरलीस तू वेदना,
जमले कसे, तूला, तू सांग ना,
हसायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

खेळताना मी पडले जरी,
कधी रडले कधी हसले तरी,
खेळायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

शाळेतल्या गोष्टी माझ्या अनंत,
तुझ्या पेशंसला कधी नसे अंत,
ऐकायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

ताई नि मी भांडलो जरी,
कितीही वाद घातले तरी,
विसरायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

रस्त्यात ठेच लागून पडले,
पडून पुन्हा परत मी उठले,
चालायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

कोणी समोर स्तुती करो,
कि निंदा तुमच्या कर्माची करो,
पचवायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

तुझे गुण थोडे मिळू दे मला,
माझी पण मुलगी म्हणेल मला,
जगायचे कसे शिकवलेस आई,
Thank you तू मला जगवलेस आई.

पण सगळ्या मुली इतक्या भाग्यवान असतात का? खुशी ची गोष्ट सगळ्या मुलींची गोष्ट नसते. नकुशीची गोष्ट खुशी पेक्षा खूप वेगळी आहे.

नकुशी तिच्या आईला हे तर विचारत नसेल न?

सांग तू मला जगवलेच का आई?
बाईचा जन्म तुला माहित का नाही?

मला बघताच बाबांच्या डोक्याला आठी,
"मुलगीच का पुन्हा?" म्हणाली आजी.
आनंद कुणाला झालाच नाही,
मी नुसते डोईवरचे ओझे होई.
बालपण मला सापडलेच का नाही?
सांग तू मला जगवलेच का आई?

शाळेत मी चुकीचे गिरवले धडे,
मुलगा मुलगी समान म्हणे!
घरी छोट्याच्या भाकरीवर लोणी,
मी मात्र चुलीवर हात भाजून घेई,
मला कधी कोणी भरवलेच का नाही?
सांग तू मला जगवलेच का आई?

छोट्याला कॉलेजात जायचे म्हणून
माझ्या शाळेचे दार बंद करून,
मी किती घरची भांडी धुणीच केली,
खेळायचे, बागडायचे विसरून गेली.
खेळायला मला मिळालेच का नाही?
सांग तू मला जगवलेच का आई?

लग्नात माझ्या दिला जरी तू हुंडा,
सासरी तरी मी ठरले धोंडा,
म्हणे सगळे मला "देवा हिचे कर्म!",
कारण मी पण दिला मुलीलाच जन्म.
माझे हे भोग कधी संपायचेच का नाही,
सांग तू मला जगवलेच का आई?

मला नको आता परत, पुन्हा मुलगी,
पहिली नंतर माझी दुसरी का जगली?
तिसरीला मी जगात आणू कशाला?
कारण ती पण हेच विचारेल मला.
"तुझे भोग मी पण भोगायचेच का आई?
सांग तू मला जगवलेच का आई? "

स्त्रियांवरचे अत्याचार थांबले, त्यांना पण माणूस म्हणून जगायला मिळाले, समान संधी मिळाल्या, शिक्षण मिळाले, तर कुठलीही मुलगी कधी "नकुशी" होणार नाही.

स्त्री-भ्रूण हत्या होणार नाही.

समाजात असमतोल राहणार नाही.

कधीतरी असा बदल होईल का?

कधी नकुशी, खुशी होईल का?

http://www.sonyslimitedworld.blogspot.in/2011/12/blog-post_1141.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकमेव मुलगी असली तरी ती पित्याचा वारसा समर्थपणे चालवू शकते , हे लोकाना अजुन का समजत नाही.?

nehru.jpg

.. एकमेव मुलगी असलेली,
भाग्यवान शेळी