येईल ती..

Submitted by भारती.. on 13 August, 2012 - 09:37

येईल ती..

येईल ती तुझ्या घरी
..यायचेच कधीतरी!
येईल ती दूरातून
भेटण्यास उराउरी

वाट तिची पाहत पण
घालू नको येरझार
विसर सखीचे येणे
विसर सखीलाही पार

विसरुनही सरते का
पुरतेपणी दु:ख जुने
असतेच सभोती ते
साथ करत मूकपणे

येणारच ठरले ना
येईल ती राहील ती
उशीर जरा करण्याची
सवय कुठे जाईल ती

जन्मदीर्घ-सा प्रवास
खडतरशा वाटेवर
शिणली तर त्यागीलही
जडशीळसा देहभार..

पाऊल ना चाहूल ना
येईल अशी सामोरी
भवताल तुझा होऊन
कवटाळील तुला उरी..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही या रचनेनंतर लगेच तुमचे सदस्यनाम लिहिल्याने कविता तुमच्यावरच असल्यासारखे वाटले Happy

मात्र मला ही रचना फारशी नाही आवडली. कृपया गैरसमज नसावा, कदाचित पुन्हा वाचल्यावर आवडेल.

छानै ही पण.भारतीताई........
मी पहिल्या वचनानन्तर दुसर्‍या वेळी असा बदल करून वाचले होते

येण्याचे ठरले ना
येईल ती ...राहील का
उशिर असा करण्याची
सवय जुनी...जाईल का

तिसर्‍यान्दा वाचले ते खाली आहे तसे वाचले मग छान प्रकारे उमजले ................
येणारच ठरले ना
येईल ती!!! ...राहील ती?
उशीर जरा करण्याची
सवय कुठे जाईल ती?

असो

आता चौथ्यान्दा वाचतो..................

भारतीजी.. मला वाटते सममात्रांच्या अट्टाहासाने ही कविता तुमच्या बाज- बहरातून थोडक्यात निसटली आहे.

असे फक्त वाटते. कॄगैन.

सर्वांचे आभार प्रतिक्रियांसाठी.
बेफिकीर :)) माझ्यावर आहे असे समजा हवे तर ! प्रत्येक कवितेत कवी आत्मीयतेने गुरफटलेला असतोच. 'येणारच कधीतरी 'च्या चालीवरच तुम्हाला आवडेलही कधीतरी अशी आशा करते. :))

वैभव, तिसर्‍यांदा कवितेच्या जवळ आलात,पण 'राहील ती' नंतर प्रश्नचिन्ह नाहीये. ती रहाणारच आहे कायमची, मग उशीर झाला तर थोडा सहन कर असा सूर आहे.चौथ्यांदा वाचण्याआधी शेवटच्या दोन कडव्यांकडे लक्ष द्या..या प्रेयसीला यायला उशीर होतोय कारण तिला जन्माइतका दीर्घ अन पुनः खडतर प्रवास करून यायचंय.कदाचित या जन्मात ते जमण्याआधीच ती वाटेतच दम तोडणारेय.निवेदिका ते 'त्या'ला खोचकपणे सांगतेय..'शिणली तर त्यागीलही जडशीळसा देहभार..'

थोडक्यात ती त्याच्याकडे येणारेय ते तिच्या देहत्यागानंतर,या जन्मी ते तिला एरवी शक्य नाही.पण येणारेय नक्कीच अन कायमची त्याच्या भोवताली त्याचा भवताल होऊनच रहाणारेय.ज्या भवतालात तिच्या नसण्याचे दु;ख सध्या रहातेय्,त्याच भवतालात !

सुधाकर, नाही हो, मी मात्रा कधीच मोजत नाही. मी फक्त गुणगुणून पहाते.रचना बरीचशी निर्दोष असेल तर तशीच सोडते. म्हणून तर गझल लिहिण्याचा आळस! किती चुका काढायचा त्रास द्यायचा लोकांना! :))

बेफिकीर ) माझ्यावर आहे असे समजा हवे तर ! प्रत्येक कवितेत कवी आत्मीयतेने गुरफटलेला असतोच. 'येणारच कधीतरी 'च्या चालीवरच तुम्हाला आवडेलही कधीतरी अशी आशा करते. <<<<<<<<<<

मला काहीही आवडत नाही. मी जगाला थोडेसे तरी आवडावे म्हणून मी काहीतरी लिहीत असतो. भारती बिर्जे डि... माझ्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे 'ज्ञानेश्वरांच्या पाठीऐवजी तव्यावर पोळ्या' गरम करणे आहे

बेफिकीर,विनय!
तुम्ही एक विद्यालयच आहात कवितेचे.

गंमत आहे,आपली सर्वांची अनुभूती अभिव्यक्ती कितीही वेगळी असो,हे प्रतिसाद मला शिकवतात,अंतर्मुख करतात. सर्वस्वी स्वान्तःसुखाय लिहिणार्‍या मला जमिनीवर आणतात.
शैलीतील बदल मात्र आतूनच होतो.त्याची प्रक्रिया मंद आणि हटवादी असतेच.

प्रकरण आहे हे असे आहे,समानधर्मी वाचणार्‍याला आवडले तर आनंद होईल,नाही आवडले तरी स्वागतच कवीकडून. .भवभूतीइतका पेशन्स नसला तरी बराच स्टॉक आहे. :))

उत्पस्यते मम कोsपि समानधर्मा
कालोह्यम निरवधिर्विपुला च पृथ्वी!!

कविता थोडी कळली, थोडी नाही.

"विसरुनही सरते का
पुरतेपणी दु:ख जुने
असतेच सभोती ते
साथ करत मूकपणे " >>> हे कडवं अधिक आवडलं.

धन्स वेदनगंधा, उल्हासजी..
<<कविता थोडी कळली, थोडी नाही. >>

ही निवेदिका धीर देतेय एका 'त्या'ला,ज्याने प्रेयसीला आग्रहाने घरी बोलावलेय आणि तिची वाट पहातोय व्याकूळ होऊन.खरं तर त्याच्या घरात अन आयुष्यात येणं तिला या जन्मी तरी शक्य नाही इतकी बंधनं आहेत..तेच निवेदिका गोड अन तिरकस शब्दात सांगतेय त्याला.
पुनरुक्तीचा दोष पत्करून-
निवेदिका सुचवतेय आडमार्गाने की ती त्याच्याकडे येणारेय ते तिचे लौकिक आयुष्य अन त्यातली बंधने,अडचणी संपल्यावर ,,पण येणारेय नक्कीच अन कायमची.. त्याच्या भोवताली ती त्याचा भवताल होऊनच रहाणारेय.ज्या पोकळीत तिच्या नसण्याचे दु;ख सध्या रहातेय,तिथेच !
थोडा दु:खी अंतःस्वर.