उत्सव 'असण्या'चा !

Submitted by बयो on 12 August, 2012 - 09:46

ऐ जिंदगी, किती छान वाटतंय, तुझ्याबरोबर बोलताना! तसंतर आला दिवस मावळत असतो, रोजचा सूर्य नव्यानं उगवत असतो. नित्य नियमानं अनेक कामं आपापल्या गतीनुसार सुरु असतात. काळ क्षणाक्षणाने, दिवसादिवसाने आणि वर्षावर्षाने पुढे सरकत असतो. काही वेळेला जगणं दमछाक करणारं होतं तर कधी एकदम थांबून गेल्याचं- थबकल्याचं, आहे तिथंच साचून गेल्याचंही वाटत राहतं.

अशा वेळेस थोडंसं थांबून तुझ्याशी बोलावंसं वाटतं. जाणून घ्यावेसे वाटतात तुझे अलवार पदर, समजून घ्याव्याशा वाटतात तुझ्या सप्तरंगी अन् कधी कधी बेरंगीही वाटणार्‍या छटा! अनेक चित्रपटांनी तुझ्यावरची गाणी रसिकांना दिलीयेत. अनेक कवींनी, शायरांनी, लेखकांनी तुझ्यासाठी आपली लेखणी शब्दबद्ध केलीये. तरीसुद्धा तू उरतेच या शब्दांच्या पलीकडची कितीतरी अव्यक्त - अबोध अशीच. तू खरंतर बर्‍याच जणांना जराजराशी कळलीयेस आणि म्हटलं तर अजिबातच उलगडलेली नाहीयेस वर्षानुवर्षे. तुझे रंग अनेक, तुझ्या भाषा अनेक, तुझं लोभसवाणं रुपही तितकंच मोहक!

ऐ जिंदगी, तुझ्यात काय काय आहे म्हणून सांगू? अपेक्षा, अपेक्षाभंग, दु:ख, राग, लोभ, मत्सर, मोह, नैराश्य, द्वेष, अपयश, अपमान, नाकारलेपण अशा कितीतरी न मोजता येणार्‍या नकारात्मक भावना, प्रसंग, अनुभव. तर दुस-‍या बाजूला आशा, हास्य, आनंद, आदर्शवाद, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, माणूसपणाचे देखणे आविष्कार! आपल्याला पटो, ना पटो, जगताना या सगळ्यासकट जगावं लागतं. पण काही काही वेळेला माणसांचं असं होतं की आपल्या वाट्याला फक्त सगळं चांगलं आणि चांगलंच यावं असं वाटतं. मग कुठला नकार, अपयश, दु:ख याची सावलीही आपल्यावर पडू नये असं त्याला वाटत असतं. पण तू कधीच कुणाच्याही बाबतीत भेदभाव करत नाहीस. प्रत्येकाच्याच वाट्याला दु:खानं भरलेल्या अंधा-‍या रात्री तू देतेस तसंच आनंदानं उजळवणारे सोनेरी दिवसही देतेस.

दारिद्य- दैन्यानं ओसंडून वाहणा-‍या कंगाल झोपडपट्ट्या, वेदनेनं पिळवटून निघणारे चेहरे, कुपोषणानं खंगलेली शरीरं, उपासमारीनं होणारी मरणं, संतापाच्या, सूडाच्या आवेशात होणारे खून, माणसानं हैवानाच्या पातळीवर येऊन केलेली कृत्यं, हे सगळं जसं तू आम्हाला पाहायला, ऐकायला, वाचायला लावतेस, तसंच निसर्गाला सोबत घेऊन वसवलेली टुमदार घरांची स्वच्छ गावं, उंच हिरव्यागार डोंगररांगांमधून नाचत- फेसाळत येणारा धबधबा, आपल्या वाहत्या पाण्यानं आजूबाजूचा परिसर समृद्ध करणा-‍या जीवनदायी नद्या, भव्यतेची स्वप्नं देणारं अथांग आकाश, इवल्याइवल्या निरागस चेह-‍यांवरचं मोहक हसू, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं मनोहारी दर्शनही तूच आम्हाला घडवतेस. पण आम्ही हे सगळं चांगलं न बघता वाट्याला येणा-‍या दु:खालाच कवटाळत राहतो. कुरवाळत बसतो आपणच जपलेल्या अहंगडांना!

सखी, तुला आठवतंय?
तू म्हणालीस एकदा,
जगणं खूप कठीण असतं.
जंगल्यातल्या हिंस्त्र पशूंसारखे
आपलेच विचार
आपले लचके तोडत असतात.
हे अगदी खरंय ग,
पण सखी,
अमावस्येच्या रात्रींबरोबर
चांदणवृक्षही भेटत असतात.
उदास, नीरस आयुष्यात
नंदनवन फुलवत असतात
हेही तितकंच खरंय ना!

ऐ जिंदगी, तू आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला दिलंस हे आमचं केवढं मोठं भाग्य! किती शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून! तो फक्त माणसाला त्याच्या हजारो हातांनी पेलता न येण्यासारखं असं खूप काही उधळून देतो मुक्तपणानं! निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी साजरा करतात आपल्या असण्याचा उत्सव प्रत्येक क्षणाला. आम्ही डोळे उघडे ठेवून तो पाहायला पाहिजे. आणि नुसतं पाहणंच नाही तर आपल्या जगण्यात पण ते उतरवायला पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमधली एक खूप सुंदर पद्धत मला नेहमी आठवते.
माझ्या एका मैत्रिणीनं मला हे सांगितलं आणि मी न पाहताच शांतीनिकेतनच्या प्रेमात पडले! तिथे म्हणे, एखादं नवीन झाड इवल्याशा पानांच्या रुपात माती बाजूला सारुन जमिनीतून हळूच डोकवायला लागलं की तिथे सगळेजण एकत्र जमतात. त्याभोवती फेर धरुन गाणी म्हणतात. ते साजरे करतात त्या झाडाच्या आगमनाचा उत्सव अतीव आनंदानं! किती मस्त ना? त्या रोपालाही केवढं छान वाटत असेल उगवताना! मग ते बेटं असं मस्त तरारुन येत असेल आपल्या हिरव्यापोपटी पर्णसंभारानं! निसर्गातल्या अशा एवढ्या म्हटलं तर साध्या घटनेचा असा उत्सव साजरा करणं म्हणजे आपली संवेदनशीलता जागी ठेवणं, तिला प्रयत्नपूर्वक वाढवणं. मग बघता बघता ती आपल्या जगण्याचा एक सहज भाग कधी बनून जाईल; कळणारही नाही. एका झाडाच्या स्वागताचा हा उत्सव तिथं साजरा केला जातो, तर मग आम्ही तर चालती-बोलती, विचार करणारी माणसं! आपल्या असण्याचाच उत्सव का नाही आम्ही साजरा करायचा? तुझ्यामुळे मिळालेल्या सगळ्या क्षणांवर मनापासून प्रेम करत, त्यांना हृदयापासून स्वीकारत, निसर्गाच्या साक्षीनं, त्याला न दुखावता, त्याच्या साथीनं हे जगणं म्हणजे एक आनंदाचा उत्सवच बनायला हवं! मग अवघं जगणंच होऊन जाईल आनंदाचं एक सुंदर गाणं! मी माझ्यापासून हे आनंदाचं गाणं होण्याचा प्रयत्न सुरु केलाय. माझ्या साथीला जिंदगी, तुझी अनेक माणसं येतीलच! मी वाट बघतेय! भेटूयात पुन्हा. तोपर्यंत मस्त मज्जेत जगूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users