गोंदवण

Submitted by दाद on 9 August, 2012 - 01:37

रित्या मनाचे आक्रोश
मौनी घुसमटलेले
दंश साहल्याचे विष
ओठांआड दाटलेले

वेदनेचे पाणलोट
रोखलेले पापणीत
उसवीत प्राणबंध
ओघळले पदरात

मुक्या हाताने नको तू
चाचपूस बये भाळ
गोंदवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....
नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल......

-- शलाका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान. Happy पण -----

गोंदवण -- पेक्षा ---- 'गोंदण' ... हे नाव छान होतं

गोंदवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ
......
.........................................ए॓वजी

गोंदणाच्या आड आहे ..... इथे वरील ओळीप्रंमाणे मात्रा ही समान येतात.
तुझे उघडे आभाळ

...किंव्हा तुम्हाला आड ए॓वजी पल्याड असाच शब्द हवा असेल तर....

गोंदणाच्या पार आहे
तुझे उघडे आभाळ

वेदनेचे पाणलोट
रोखलेले पापणीत
उसवीत प्राणबंध
ओघळले पदरात....................... हे अतिशय आवडले. खुप छान.

!........अभिनंदन......!

धन्यवाद.
सुधाकर, तुमच्या सुचना अचूक आहेत.
पण आधी कवितेचा जन्मं मग तिला नाव असं झालय. आता गोंदण हे नाव कितीही छान असलं तरी त्यासाठी कविता बदलायची इच्छा होत नाहीये. माफ करा... पण सूचना सुंदर आणि चपखल आहेत ह्याबद्दल वाद नाही.

पहिल्या शब्दापासून निर्माण झालेला भाव अखेरच्या शब्दापर्यंत काय नजाकतीने पण सहज सांभाळलाय - इसिलिए आप "दाद" है....

सुधाकर - तुमचे म्हणणे पटते, पण इथे गोंदवण च बरोबर वाटते - तो 'वण' आपोआप अधोरेखित होतोय असं नाही का वाटत तुम्हाला.... (वै मत, चु भू दे घे)

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....
नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल......
.............. व्वा मस्त. तसं सर्वच छान. Happy

दाद , शशांक - मी देखिल ही सुचना अगदी वैयक्तिकपणेच केली होती. इथे काही बदलावच असं नाही. आणि दाद यांचे म्हणने ही योग्य आहे. कोणत्याही निर्मीत्ती मागे काही आठवणी असतात त्या ही जपून ठेवाव्या वाटतात.
त्यामुळे माझे हे मत वैयक्तिकच समजावे.

छान, आशयघन कविता.

शेवटच्या कडव्यातल्या
"नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल.."
या ओळी वाचल्यावर
मनात "आह !" असा उद्गार उमटला

मुक्या हाताने नको तू
चाचपूस बये भाळ
गोंदवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ
>>
आहाहा!

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....
नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल..
>>
वाह! सुंदर अप्रतिम
जियो दाद!
लिहितच रहा

दाद, तुमच्या सगळ्याच कविता अतिशय अर्थपूर्ण असतात आणि तशीच ही ही आहे Happy
सुंदर लिहिता.... लिहित राहा!

विस्कटल्या नजरेत,
कायमची सांजवेळ....>>>> हे वाचताना काटा आला अंगावर..!

नको आरशात पाहू
काच बिंबाने फुटेल..
>> !!

मुक्या हाताने नको तू
चाचपूस बये भाळ
गोंदवणाच्या पल्याड
तुझे उघडे आभाळ>>> आहा हा! निव्वळ अप्रतिम! भारी!