मोहीम: कोथळीगड-पेठ

Submitted by सागर कोकणे on 1 August, 2012 - 07:51

कुठल्याही शुभ कार्यासाठी सकाळी उठायचे ठरले की लेखक महाशयांना रात्री झोप येत नाही. कोथळी गड -पेठ येथे जायचे ठरले तसे सर्व सामानासकट रात्रीच मित्राचे घर गाठले पण सर्व झोपले तरी निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होईना. चार वाजता कुठेशी थोडी झोप लागल्यासारखे वाटले तोच सहा वाजले आणि मोहीम सुरु झाली. सगळ्यांची जमवाजमव आणि ट्रेकच्या सूचनांचे कार्यक्रम झाल्यावर सात वाजता गाडी हलली. प्रवासामध्ये उत्साही मावळ्यांनी लोकगीते,पोवाडे,भजन म्हणत प्रवास सुखकर केला. आंबिवली गावाच्या पायथ्याशी १० वाजता नाश्त्यासाठी उतरलो. पोहे आणि चहा पोटात उतरवून गडाच्या दिशेने चालू लागलो.

बऱ्याच दिवसांनी लेखक महाशयांनी कॅमेरा बाहेर काढल्याने फोटो सेशन जोरदार सुरु झाले. कॅमेऱ्याच्या जीवात जीव असेपर्यंत फोटो काढायचे असे ठरवून मिळेल ते क्लिकत चाललो होतो. सोबतीला नावापुरतेही उन्ह म्हणून नव्हते त्यामुळे ट्रेकसाठी वातावरण प्रसन्न होते. शिवाय इतर ट्रेकर्सप्रमाणे पाठीवर बॅग न घेता चालल्याने आम्ही बरेच बागडत होतो.

 

पेठ गावाचा परिसर येईपर्यंत प्रशस्त पायवाट आहे आणि त्यानंतर त्याहून प्रशस्त मैदानी प्रदेश. इथे आम्हाला फोटोग्राफीचा मोह आवरला नाही आणि बराच वेळ खर्ची पाडला. तिथून पाय काढताना अगदी योग्य वेळी पावसाचे आगमन झाले आणि आडोशाला एका चहाच्या टपरीत शिरलो. चहा प्यायचा योग जुळून आला असावा म्हणून पावसाचा आवेग ओसरेपर्यंत तिथेच थांबलो. नंतर जसे बाहेर पडलो तसा अधिकच जोरात पावसाचे पुनरागमन झाले. बचावाची काही सोयच नव्हती मग पावसाच्या थंडगार पाण्याचा आनंद लुटत मार्गक्रमण करायचे ठरले.


अर्धा गड चढून जाईपर्यंत पावसाने चांगलेच झोडपले होते. सुदैवाने सकाळी कुठूनशी सद्बुद्धी झाली आणि जीन्सचा मोह आवरला. नाहीतर एवढ्या पावसात आधीच थकलेले पाय अजून जड वाटू लागले असते. गडाच्या पायथ्याशी वसलेल्या पेठ गावापासून मूळ गडाची सुरुवात होते. तोपर्यंत केवळ पायी रपेटच चाललेली असते. पेठ गावापासून पुढचा रस्ता उभ्या चढणीचा आहे. इथवर पोहोचेपर्यंत पाऊस ओसरला होता पण तो तसा झाला नसता तर चढाई अजूनच अवघड झाली असती. पावसाळी जॅकेटने खिंड लढवूनही अर्ध्याहून अधिक भिजलो होतो. आता उरले अंग घामाने भिजायला सुरुवात झाली. बराच वेळ दगडी पायऱ्या चढून गेल्यावर एक गुफा दिसली. इथे एक छोटेसे मंदिर आहे तसेच उजव्या बाजूस एक तोफ ठेवण्यात आली आहे.

 इथून वर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे जो आपल्याला गडाच्या सुळक्याच्या माथ्यावर पोहोचवतो. नवख्या ट्रेकर्सना हा भाग चढणे अवघड वाटू शकते. पट्टीचे ट्रेकर्स सरसर चढत शिखर गाठतात. बरोब्बर एकच्या ठोक्याला आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर वारा बेभान वाहत होता आणि धुक्याने बाजूचा परिसर व्यापला होता. तिथेच हा झेंडा रोवून मग माघारी परतलो. विश्रांतीसाठी फार वेळ थांबता येणार नव्हते कारण भोजनाची सोय किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हॉटेलमध्ये केली होती.

माघारी परतताना पुन्हा पेठ गडाचा फोटो काढून घ्यायचे ठरवले. तिथे हे एकाकी घर लक्ष वेधून घेत होते. सुदैवाने गड उतरताना पावसाला पुन्हा हजेरी लावली नाही त्यामुळे कपडे वाळवण्याची चिंता मिटली. या सपाट मैदानी प्रदेशावरून अनेक छोटे छोटे प्रवाह खाली कोसळत होते. पावसाळी दिवस असल्याने दिसणारा हा नयनरम्य देखावा उन्हाळ्यात मात्र फारच भकास वाटत असावा. पुढे उतरणीची वाट बरीच लांब भासू लागली कारण पोटातील कावळे ओरडून थकले होते आणि मार्ग काही संपत नव्हता. शेवटी एकदाचा तळ गाठला आणि मग पिठलं-भाकर, छोले, डाळ-भात, पापडावर आक्रमण झाले. सोबतीला पुन्हा पाऊस बरसू लागला होता.

किल्ला संपवूनही काही जणांना अजून भटकायची हौस होती तेव्हा जवळच असणाऱ्या एका नदीवर जायचे ठरले. पण गाडीतून उतरल्यावर मात्र नदीकिनारी असणाऱ्या एका पांडवकालीन लेणीकडे सगळ्यांची पावले वळली. तिथे असणाऱ्या एका ६७ वर्षीय गृहस्थांनी या लेणीबद्दल बरीच माहिती सांगितली. काही देवांच्या प्राचीन मूर्त्याही तिथे आहेत. निघण्यापूर्वी सर्वानुमते देवाची आरती करायचे ठरले आणि पुढील काही वेळ लेणीमध्ये आरती आणि टाळ्यांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटू लागले. जिथे काही बेजबाबदार तरुण दारूच्या पार्ट्या आणि आधुनिक भिंतीचित्रे काढून आपल्या संस्कृतीची विल्हेवाट लावतात तिथे धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणारे मित्र सोबतीला असल्याचा अभिमानही वाटला. लेणीच्या समोरील बाजूस हा कलावंतीणीचा महाल दिसला.

   

तिथून गाडीमध्ये शिरलेले मावळे आता गाणी गाण्याच्या मनस्थितीत नव्हते. बरेचजण निद्रेच्या आहारी गेले असताना कुणी तरी गाडीमध्ये सीडी प्लेयर सुरु केला आणि अतिशय टुकार गाणी लावत सगळ्यांचा मूड खराब केला. त्यातच जसे पनवेल गाठले तसे गाडी बंद पडली तेव्हा लक्षात आले की डिझेल संपले आहे. ट्रेक वरून माघारी येण्याचा आणि पनवेल गाठण्याचा असा काय संबंध आहे की तिथे नेमक्या गाड्या बंद पडतात असा प्रश्न मला पडला होता. शिवाय गाडी बंद पडल्या ठिकाणाहून पेट्रोलपंप दहा मिनिटाच्या अंतरावर असूनही तिथे दोन तास खर्ची पडल्याने वाहन चालकाचा बराच उद्धार करण्यात आला. नऊ वाजता गाडी हलती झाली आणि सगळे मावळे नवी मुंबईचेच असल्याने निरोप घेत एक-एक जण पायउतार होऊ लागले. थकल्या पावलांनी निरोप घेताना पुढचा ट्रेक कधी याची उत्सुकता लागून राहिली होती.

ट्रेकचे इतर फोटो इथे पाहावेत.

ता.क.- दुसऱ्या दिवसापासून चालण्यात थोडा बदल झाले आहे असे वाटतेय पण चालायचेच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो चांगले आहेत. Happy
लिहिलेल तोकडं वाटतय पण..
बाकीचे फोटो पहायला लिन्क्वर क्लिक केल पण तिथे तुम्ही लिमिटेड लोकाना अ‍ॅक्सेस दिल्याने पाहु शकलो नाही.
ते पब्लिक केले तरच सर्वजण पाहु शकतील.

झकासराव
लिमिटेड अ‍ॅक्सेस नसावा...परत चेक करावे.
ट्रेकमध्ये आणि त्याच्या लिखाणात अजून नवीन आहे.
सुधारणा होईलच हळूहळू...
प्रतिक्रियेबद्दल आभार Happy

सागर फोटो पाहिले लिन्क वरचे.
सुरवातीला दिसले नव्हते.
परत गुगल क्रोममधुन पाहिले मग दिसले.
सगळे फोटो खुपच सुंदर आहेत. Happy
धबधबे, हिरवाइ सगळाच बेस्ट.

मस्त Happy