श्रावण साजण....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2012 - 02:20

रेशीम सरींना
गुंफतो उन्हात
श्रावण साजण
येतो गं भरात

कोवळ्या थेंबांना
सांभाळून घेत
पान पान डुले
नाजुक तालात

जाई जुई पानी
शुभ्रशी कनात
मंद मंद गंध
झुलवी मनात

शोभली सवाष्ण
गर्द हिरव्यात
नथ चमकते
मोत्यांची उन्हात

सणांचा श्रावण
झुलतो झुल्यात
गहिरी मेंदीही
खुलते हातात

कान्हाही भुलला
राधेच्या दर्शना
यमुना कल्लोळी
भेटवी चरणा

रसीला श्रावण
रंगीला साजण
धणी ती न पुरे
करीता वर्णन..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई जुई पानी
शुभ्रशी कनात
मंद मंद गंध
झुलवी मनात

आवडता विषय ! मग काय ?! एक सुखद अनुभूती देणारी कविता.
कान्हाही भुलला
राधेचे दर्शन
यमुना कल्लोळी
भेटवी चरण
हा संदर्भ मात्र थोडा स्पष्ट झाला नाही..

कान्हाही भुलला
राधेचे दर्शन
यमुना कल्लोळी
भेटवी चरण
हा संदर्भ मात्र थोडा स्पष्ट झाला नाही.. >>>>
भारतीताई - परीक्षा तर घेत नाही ना माझी ? असो. गोकुळअष्टमी - कृष्णजन्म - राधेचे (प्रकृतीचे, धरेचे) साजशृंगार सहित दर्शन या महिन्यात घडते म्हणून याच महिन्यात कान्हा जन्म घेता झाला.
त्याच्या चरणाचे दर्शन / स्पर्श घडले याच महिन्यात म्हणून अजून यमुनेचे जळ कृष्णाच्या आठवाने कल्लोळून उठते - याच श्रावणमासात ...(कृष्णाला टोपलीत घालून वसुदेव गोकुळात निघाले त्याचा पौराणिक संदर्भ...) - हे मला अभिप्रेत असलेले अर्थ.
सर्वांचे मनापासून आभार........

परीक्षा नाही हो! गोकुळाष्टमीचा संदर्भ वाचताक्षणी लक्षात नव्हता.. राधा म्हणजे धरा हे एकदम appealing..

कान्हाही भुलला
राधेचे दर्शन
यमुना कल्लोळी
भेटवी चरण
याचा संदर्भ माझ्याही लक्षात आला नव्हता.
तो संदर्भ वाचून तर या ओळी अजून आवडल्या.
असेच लिहीत रहा..