सहप्रवास ७

Submitted by भारती.. on 19 July, 2012 - 11:42

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480

सहप्रवास ७

(गावातल्या वाड्यातल्या बैठकीच्या खोलीचा दर्शनी भाग. दोन मोठ्या खिडक्या.मध्ये विवेकानंदांचा एक फोटो. एका कोपर्‍यात एक अलमारी.शेजारी एक स्वच्छ बैठक आणि बैठं मेज. दोन खुर्च्या,एक आरामखुर्ची. या आरामखुर्चीत उमा बसलीय.डावा हात प्लॅस्टरमध्ये चक्क गळ्यात बांधलेला. दादा नाईक येरझारा घालताहेत..उमाचे वडील.उंच, गोरे,गंभीर,भारदस्त व्यक्तिमत्व.)

दादा- उमा कसं आहे हाताचं आता? काल रात्रीसुद्धा चुळबुळत होतीस अंथरुणात. कितीदा येऊन बघून गेलो. आधीच रात्री नीट झोपतही नव्हतीस महिनाभर, आता जरा घडी बसतेय त्यात हा अपघात करून घेतलास.

उमा-( बरीच क्षीण झाली आहे.चेहर्‍यावर व्यग्रतेच्या सावल्या.) हळुहळू शरीराचे ,मनाचे घाव भरत जातातच बाबा,निसर्गच आहे तो,पण झालंय असं की या खूप रिकामपणात स्वतःकडे बघायलाच घाबरलेय मी. आत्ताच पुरेपुरे वाटायला लागलंय आयुष्य.स्वतःला कोणत्या प्रयोजनाचं खेळणं देऊ मी बाबा?

दादा- वेडी आहेस उमा. असं असतं की एक उभारलेली मोहनगरी असते मनात.माणसं वर्षानुवर्षे रमून असतात म्हण किंवा अडकून असतात.असे प्रश्न विचारायची सवयच नसते त्यांना.

उमा- मी तरी काय मागून घेतली ही सवय ?प्रश्न पडतच गेले.. इतरांसाठी क्रमप्राप्त असणार्‍या गोष्टी घडल्याच नाहीत कधी. ऐन विशीत आई गेली.किती रसरशीत,कामं करायच्या उत्साहाने भरलेली बाई. भोवती सारखा गोतावळा.क्षुल्लक आजारपणाचं निमित्त होऊन गेली.बाबा ,तिच्या जाण्याचं दु:ख मी काय सांगावं? तेही तुम्हाला?आपल्या दोघांचीही जिवलग मैत्रीण होती ती. तिघांचं घट्ट जग होतं.त्याच्या परिघावर आक्कासारखा एक भोळा प्राणी होता.तिला तर दगाच झाला.

दादा- काढून टाक ते डोक्यातून.ती जायची होती, गेली. हा मीपणा सोडून सर्वत्राकडे पहा. याहून वाईट दुर्घटना सारख्या घडतच असतात. आपण सगळ्यांचाच अर्थ डोक्यात घेत राहिलो तर एक दिवससुद्धा शिल्लक रहाणार नाही संतुलन आपलं.

उमा- तुम्ही स्वभावानेच अलिप्त आहात बाबा- आपल्या कवचात शिरायची चांगली सवय आहे तुम्हाला. प्रत्येकाचा डिफेन्स मेकॅनिझम वेगळा. गेला महिनाभर मी माझा डिफेन्स मेकॅनिझम गमावून बसलेय. आक्का हे केवळ निमित्त.सगळ्या कार्यकारणांमधला रसच हरवला.

दादा- उमा,तू काहीतरी लपवते आहेस माझ्यापासून .. माझ्यापेक्षा मीनूला माहीत असेल ते. तुझं वय जगण्यातला रस हरवण्याचं नाही बेटा. आक्काच्या जाण्याबद्दलच्या तुझ्या तीव्र भावना माहीत आहेत मला,पण ते एकमेव कारण नाही.उमा,खूपच त्रास झालाय तुझ्या मनाला, पण कोण तो तुझा आवडता कवी,त्याच्या शब्दात जखम फाडून धिटाईने आत बघायची वेळ आलीय. या दुष्टचक्रातून आता बाहेर ये उमा. किती काळ असी डिप्रेस्ड रहाणारेस ? या वयात कुणामध्ये तरी गुंतायचं, कुणाला तरी गुंतवायचं- निसर्गाची प्रबळ हाक ऐकू येते आहे तुला उमा आणि तू ती नाकारते आहेस. suppress करते आहेस. होय ना ? काय आहे त्याचं नाव ?

उमा- (चकित होत) बाबा ! इतकं सोपंसरळ काही नाहीय हो ! तुम्ही म्हणता त्याअर्थी कुणावर प्रेम करते आहे मी की नाही हे खरंच कळत नाही !प्रेम म्हणजे काय असा आणखीही एक प्रश्न मनात येतो नको असलेला... होय, एकजण खूप आवडतो ..पण मनाला ओढ वाटते ती त्याची की मनाने रंगवलेल्या त्याच्या एका प्रतिमेची हेही कळत नाही. आमच्या प्रत्यक्ष भेटी त्रासदायकच वाटतात खरं तर, पण तो गेल्यावर मात्र मन त्याच्या स्मृती गोंजारत रहातं. योग्य वयात कुणीतरी योग्य भेटायला हवं असतं बाबा.इथे सगळीच चुकामूक आहे.

बाबा- कठीण आहे. म्हणजे ते मुळातच कठीण असतं,आणखी तू अजून कठीण करून घेतेसुद्धा आहेस. मी तरी काय सांगणार उमा! एवढंच की ज्या गाठी सुटत नाहीत त्या तुटू शकतात उमा. नव्याने बघ अवतीभोवती...कुणी आवडतं का सांग मला. मी विचारेन जाऊन तुझ्यासाठी. तुझं असं तळमळत रहाणं पहावत नाही मला बेटा.

उमा- (हसते) बाबा ! किती गोड आहात तुम्ही. किती भाग्यवान आहे मी की मला असे वडील आहेत.. आठवतं तुम्हाला की लहानपणी माझे सगळे हट्ट तुमच्याकडेच असायचे. किती कामं लावली मी तुम्हाला बाबा- हरेक दिसणार्‍या विषयावर बाळगाणी करायला लावली,ती गायला लावली.रोजच्या दिवसाचे अहवाल दिले घेतले,चुकीच्या गोष्टी करण्याबद्दल धपाटेही खाल्ले. आत्ता हे जे बोललात ना बाबा, मला खूप मागे घेऊन गेलात.मी खूप लहान असताना शेजारच्या छोट्या जयूशी लग्न करायचा हट्ट धरला होता तुमच्याकडे...आठवतं?

दादा- उमा तू हवी आहेस ग मला.म्हणे प्रयोजन नाही उरलं जगायचं.माझ्याकडे बघूनसुद्धा हे असं सगळं बोलायची हिम्मत कशी होते तुझी ? तुझी आई गेल्यावर मी इथे येऊन राहिलो तुला स्वतंत्र करावं म्हणून.तू खूप मोठी होताना दूरून बघावं म्हणून..

उमा- मला माहितेय बाबा.पुन्हा नाही बोलणार असं. हळुहळू माझी मठात जायची वेळ होते आहे,पण,...

दादा- (तिला मध्येच तोडून) आणि हे तुझं अजून एक मठात जाणं! या गावातला असूनही माझ्या कधी चकरा झाल्या नाहीत तुझ्या,ना तुझ्या आईच्या.तुझ्या आधीच्या पिढीचे आम्ही.इतके rational -बुद्धीबळावर जगायची रीत लावून घेतलेली, आणि तू घड्याळ मागे नेते आहेस! काळजी तरी किती तर्‍हांनी करावी तुझी?

उमा-बाबा मला पूर्ण बोलू तरी द्याल? खरं तर एक surprise आहे.. आज मी मठात जात नाहीय, स्वामीच आपल्या घरी येणारेत तुम्हाला भेटायला. एका परीने तुमचं हे achievement म्हणावं लागेल बाबा की त्यांना तुम्हाला भेटावंसं वाटलं!

दादा- आणि हे आता सांगते आहेस? मूर्ख कुठली! अग वेगळाच माणूस आहे तो..मला त्याचं अध्यात्म नाही कळत-ते माळा ओढत बसण्याचं तंत्र, पण त्याचं निखळ माणूसपण कळतं.या साच्यात अशी माणसं कमीच मिळतात उमा.

( उघड्याच दरवाजातून स्वामी प्रवेशतात.बरोबर एक पोरगेलीशी तरुणी ,आणि एक प्रौढ माणूस.स्वामींचा वेष तसा सदरा लेंगाच्,पण गळ्यातल्या रुद्राक्षमाळेमुळे काही वेगळेपणाचं सूचन होतं. वय पन्नाशीचं,रापलेला गोरटेला तेजस्वी चेहरा. उमा पुढे होऊन वाकून नमस्कार करते.)
स्वामी- दत्तगुरु..कशी आहेस पोरी आता ?

उमा- पहिल्यापेक्षा खूपच बरी आहे स्वामीजी. हे माझे वडील नाथ नाईक. दादा म्हणतात सर्वजण त्यांना. शासकीय विभागात शिक्षणाधिकारी होते.

दादा- (उभ्याउभ्याच नमस्कार करतात.) समाजमंदिरातल्या आपल्या काही वैद्यानिक कीर्तनांना आलो होतो.छान वाटली आपली संकल्पना. पण व्यक्तिशः परिचय व्ह्यायचा होता. तो योग आज उमामुळे आला. एरवी अध्यात्माशी माझा परिचय वाचनापुरताच. मनःशांती मिळवणं,काही प्रगती साधता येईल का पहाणं असे स्वतःशीच एकांतवेळेतले प्रयोग. हे संतसाहित्यच माझे गुरु.

स्वामी-हे सगळं ठीक आहे पण पुरेसं नाही. मला काही माझे विचार खपवायचे नाहीत कुणालाही दादा, पण आधी अनुभव,मग त्याचं साहित्यरूप.,भाषाभिव्यक्ती. गुरु हाडामासाचाच असावा लागतो.

उमा- पण स्वामी ,साहित्याची तर किती रुची आहे तुन्हाला.अलिकडे कोणी काय लिहिलंय याच्यावर सहज चर्चा करू शकाल तुम्ही माझ्या ग्रूपमध्ये.

स्वामी- ही तुमची उमा दादा-माझ्याकडे आली तेव्हा किती बिथरलेली होती..तुम्ही तिला किती साहिलं सावरलं याची पूर्ण कल्पना आहे मला,पण तिला आसन घालून बसवलं नामस्मरणासाठी रोजच्या रोज तेव्हा स्थिरावलं तिचं मन. पुनर्वसनाची प्रक्रिया अध्यात्म वगळून कधीच पुरी होत नाही.

दादा- क्षमा करा स्वामी,कुणाच्याही श्रद्धेवर घाव घालायला आवडत नाही मला जोपर्यंत ती श्रद्धा सात्त्विक आहे,पण तुम्ही इतके मोकळे आहात म्हणून बोलतो- मला सांगा या माळा ओढण्याचा अर्थ काय? काय बदलणार आहे त्यामुळे? हे जग अधिक सुंदर होणार आहे की आपली वैचारिक वाढ होणार आहे? तसं काही झाल्याचं तर दिसत नाही ..

स्वामी-या माळेचे मणी म्हणजे जगण्याच्या क्षणांमधलं सातत्य आहे दादा.. तुम्ही ईश्वरीय प्रतीक्षेची जाणीव ओतताय त्या क्षणांमध्ये - प्रार्थनेची शांतता अनुभवताय आणि शक्ती मिळवताय.. नंतर युद्धभूमी आहेच कठोर निर्णयांसाठी,प्रहारांसाठी.

उमा- युद्धभूमी म्हणा,अचानक येणारी संकटं म्हणा--

स्वामी-अचानक म्हणजे अकारण नव्हे उमा. आणि संकट म्हणजे संधी असते.तुझ्याच वयात असंच काहीतरी न पेलवणारं समोर आलं.महिने-न-महिने तळमळलो,घरातून पळालो,गावं,शहरं,जंगलं भरकटलो,अजब-अवलियांना भेटलो. नंतर एका नीरव रात्री एका समुद्रकिनार्‍यावर अंतर्यामात अद्भुत शांती प्रकटली.

जे आहे ते सगळं बरोबर आहे उमा. जे आहे ती ईश्वरेच्छा आहे. तिच्या इथे येण्याचं प्रयोजन समजून घ्या दादा. ती वेळ आली आहे.

(वार्‍यासारखे निघतात सुद्धा..)

पडदा.

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

अरे वा - हा भागही छान जमलाय - अजून एक कोन (अँगलला अजून समर्पक शब्द आठवत नाहीये मला...) मिळालाय या कथेला.....
भराभर येऊं द्या पुढचे भाग.....
क्रमशः , contd. - असे वाचले ही निम्म्यापेक्षा अधिक वाचक वाटेलाच जात नाहीत मग.......

धन्स शशांकजी,सामी,नक्की वर्गीकरण करता येणार नाही अशा स्वरूपाचे हे नाट्य..तुम्हाला आवडतेय म्हणून मला हुरूप येतोय.'अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग' असं आपलं जगणं,त्यातले पेच,अनपेक्षितता..थोडक्यात,त्यातलं अकृत्रिम नाट्य..शशांकजी नोटेड.क्रमशः काढून टाकते. धन्स.