संयुक्ता मुलाखत : निवृत्त प्रशासकीय अधिकारी सौ. लतिका पडळकर

Submitted by अवल on 11 July, 2012 - 09:11

1341369959669.jpgसौ. लतिका पडळकर, एक माजी प्रशासकीय अधिकारी. तामिळनाडू राज्यात अनेक प्रशासकीय पदे यांनी सांभाळली. अतिशय पारदर्शी अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. इंग्रजी साहित्याची अतोनात आवड आणि प्रचंड वाचन, कलासक्त, अंगभूत हुशारी आणि दुसर्‍याला समजून घेण्याची हातोटी असणारे, असे हे त्यांचे अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व!

त्यांच्या कारकिर्दीची माहिती मला तशी 'स्त्री' आणि 'मानिनी' या मासिकांमधून आलेल्या मुलाखतींमधून झाली होती. पण जेव्हा मला कळलं की त्या आमच्याच सोसायटीत राहतात, तेव्हा त्यांना भेटल्यावाचून राहवले नाही. मग एका वेगळ्या कामानिमित्त त्यांना पहिल्यांदा भेटले. अन मग मी प्रेमातच पडले त्यांच्या!

इतक्या मोठ्या पदावर काम करूनही, इतका व्यासंग असूनही एखादी व्यक्ती केवढी ऋजू असू शकते! कधीही भेटल्या तरी अतिशय कोमल हास्य, गोड आवाज अन अगदी शांत- समंजसपणे बोलणे. त्यांना बघितल्यावर, त्यांच्याशी दोन मिनिटं बोलल्यावर देखील लक्षात येतं, ही बाई कधी रागावतच नसेल. कितीही छोटे काम असो, मदतीला कायम तयार. अन् दुसर्‍याच्या अगदी छोट्या गोष्टीचेही आवर्जून कौतुक करण्याचा स्वभाव! एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने आपल्याला आदर वाटतो पण त्याच व्यक्तीबद्दल इतके आतून प्रेम, नितांत विश्वास वाटणे मात्र फार कमी व्यक्तींबद्दल होते. सौ. लतिका पडळकर त्यांपैकी एक!

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक नवे प्रयोग केले. समाजात आवश्यक असे अनेक मूलभूत बदल घडून यावेत यासाठी त्यांनी नवे पायंडे पाडले. एखाद्या आपत्ती नंतर आपत्तीग्रस्त लोकांना सरकारी मदत ताबडतोब आणि कोणताही गैरव्यवहार न होता मिळावी यासाठी त्यांनी राबवलेली धनादेशाची कल्पना, झोपडपट्टी निर्मूलनासाठी सरकारने बांधलेल्या ४९६ घरांचे वाटप करताना योजलेली पद्धती, नवजात मुलींचे अपमृत्यू थांबावेत यासाठी त्यांनी पाडलेले पायंडे, स्त्रियांना व्यवसायासाठी तारणाशिवाय कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेले 'सेल्फ हेल्प ग्रुप्स' (स्व-मदत गट), अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठीची अल्पमुदत कर्ज योजना, साखर-कारखानदारांकडून रस्ता बांधणीचा केलेला अभिनव प्रकल्प अशा कितीतरी कामांमधून त्यांनी प्रशासन तर कार्यक्षम केलेच, पण त्याच बरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समाजाप्रती काम करण्यास उद्युक्तही केले. एक प्रशासकीय अधिकारी समाजाला कशा प्रकारे प्रेरणा देऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण म्हणून नेहमीच देता येईल.

त्यांच्यातील या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याचा मागोवा घ्यायचा हा एक छोटासा प्रयत्न.
_________________________________________________________________________

नमस्कार. तुम्ही मूळच्या कुठल्या? तुमचं बालपण कुठे गेलं? वडील काय करायचे?

नमस्कार. मी मूळची पुण्याचीच. माझे वडील ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस (समुद्रपार संचार सेवा) मध्ये होते. निवृत्त होताना ते डेप्युटी चीफ इंजिनियर होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. दिल्ली जवळचे छत्तरपूर, काल्काजी, कोलकात्याजवळचे हाटिखंडा, पुण्याजवळचे दिघी अशा अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या व्हायच्या. म्हणून मग त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. आमचं शिक्षण निर्वेध व्हावं ही त्यांची इच्छा होती. माझी आई थोडी कडक होती पण माझे वडील फार प्रेमळ होते. माझ्यावर प्रभावही वडिलांचा जास्त आहे.

तुमचे शिक्षण कसे व कोठे झाले?

पहिली पाच वर्षे मी हिंगण्याला होते. महिलाश्रमात होते. अण्णा कर्वे आणि बाया कर्वे हे दोघेही असताना मी तिथे शिक्षणासाठी आले. कर्वे हे माझ्या नात्यातले. म्हणजे माझी पणजी कर्व्यांकडची. त्यांची मुलं भास्कर आणि कावेरी ही दोघं आमच्यावर देखरेख करण्यास सिद्ध होती. अन त्यांच्या दोन्ही मुली आमच्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या, त्याही हिंगण्याला शिकायला होत्या. त्यामुळे त्यांच्या बरोबर मला आणि माझ्या बहिणीला तिथे ठेवणे माझ्या आई वडिलांना योग्य वाटले. एक सुरक्षित आणि ओळखीचे वातावरण आम्हाला तिथे मिळाले. त्यामुळे पाचवीपर्यंत मी हिंगण्याच्या शाळेत शिकले.
अन मग सहावी ते अकरावी मी हुजूरपागेत शिकले. १९५८ साली मी मॅट्रिक झाले.
प्री-डिग्रीला मला आणि माझ्या बहिणीला फर्ग्युसनमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. पण माझ्या बहिणीला जरा कमी ऐकू यायचं, त्यामुळे ती बिचारी प्री डिग्रीला नापास झाली. मग माझ्या वडिलांनी तिला एस. एन. डी. टी. कॉलेजमध्ये घातले. तिथे मग तिने छान बी.ए. केलं. पण आम्ही दोघी बहिणी सावली सारख्या होतो. खरं तर ती माझी मोठी बहीण. पण ती तब्येतीने जरा नाजूक होती. त्यामुळे मीच तिची ताई झाले. अगदी कॉलेजमध्येही मी तिला सांभाळत असे. आय वॉज एक्स्ट्रिमली प्रोटेक्टिव्ह ऑफ माय सिस्टर.

घरातले वातावरण कसे होते त्या वेळेस ?

आमच्याकडे त्या काळाच्या मानाने खूप आधुनिक वातावरण होतं. शिक्षणाला खूप महत्त्व होतं.

तुमच्या घरात कोणी प्रशासन क्षेत्रात होते? प्रशासकीय नोकरीत यावं असं कधी वाटलं, आणि का?

नाही, आमच्याकडे कोणीच या क्षेत्रात नव्हते. प्रशासकीय नोकरीत आलेली मी पहिलीच.
कारण इतके गमतीशीर आणि क्षुल्लक आहे. मी आप्पांकडे (म्हणजे माझे चुलत आजोबा, रँगलर परांजपे यांच्याकडे ) जायचे तेव्हा तिथे एस. जी. बर्वे यायचे. ते आय. सी. एस. होते अन तेव्हा पुण्याचे कमिशनर होते. त्यांच्याबरोबर एक धाबळी घातलेला शिपाई येत असे. अन येताना तो 'आमचे साहेब आले, साहेब आले' असे म्हणत यायचा. तो त्यांचा रुबाब पाहून मला असं वाटायचं, की मला असं 'बाईसाहेब आल्या, बाईसाहेब आल्या' असं कोणी म्हणालं तर किती छान वाटेल! असं आपलं मला तेव्हा वाटायचं. मग असं हवं असेल तर आय. सी. एस. व्हायला पाहिजे असं तेव्हापासून वाटायचं. माझ्या मनात अगदी सातव्या- आठव्या इयत्तेत असल्यापासून आय. ए. एस. (स्वातंत्र्यानंतर आय. सी. एस. चे रूपांतर आय. ए. एस. मध्ये झाले) व्हायचं अशी सुप्त इच्छा होती. पण सगळे माझी चेष्टा करत. ते म्हणत ही कसली आय ए एस होणार? हिला नाटकं आवडतात, गमती करायला आवडतात, गोष्टी सांगायला आवडतात, वाचायला आवडते, झाडावर चढायला आवडते, विनोद आवडतो; ही कसली आय ए एस होते? माझ्या आजीलाही वाटायचं की मी आपली थापा मारतेय. मी तिला म्हणायचे, 'बघेन बघेन अन एक दिवशी कलेक्टर होईन बघ!' अन जेव्हा मी खरंच आय ए एस झाले तेव्हा इतका आनंद झाला माझ्या आजीला! आजीला फार प्रेम आणि कौतुक होतं माझं !

तुम्ही आय ए एस केलंत त्या काळात फार कमी लोक या क्षेत्रात येत. त्यासाठी आजच्यासारखे काही जागोजाग कोचिंग क्लासेस नव्हते, ग्रंथालय, इंटरनेटचे ज्ञानाचे खुले द्वार नव्हते. त्या काळाचा विचार केला तर ही काही सोपी गोष्ट नव्हती, अतिशय कष्टसाध्य गोष्ट होती ही. मग तुम्ही हे कसं जमवलंत?

स्टाफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नावाची एक इन्स्टिट्यूट होती. अतिशय इन्फॉर्मल (अनौपचारिक) अशी ही संस्था होती. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आठवड्यातून एकदा तिथे आम्ही, १०-१२ समवयस्क विद्यार्थी जमत असू. तिथे आय ए एस च्या विद्यार्थ्यांना थोडे मार्गदर्शन दिले जाई. जस्टिस एस. बी. ढवळे (पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश), प्रोफेसर जठार, खगोलशास्त्राचा खूप अभ्यास असलेले गो. रा. परांजपे (इंडियन एज्युकेशन सर्व्हिस), एस. व्ही. महाजनी (स्टेट सिव्हिल सर्व्हिस ऑफ बडोदा), रँगलर परांजपे अशी सगळी मंडळी आम्हाला मार्गदर्शन करायला यायची. आम्हाला एखादा विषय देऊन त्यावर वाचायला सांगायची; अन त्यावर नंतर आम्हाला भाषण द्यायला सांगायची. मग ते त्यावर आम्हाला प्रश्नही विचारायचे. त्यामुळे आम्हाला बोलायची सवय झाली, भीती चेपली. हे सगळे इतके दिग्गज लोक आमच्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ देत असत ही इतकी मोठी गोष्ट होती आमच्यासाठी! अन त्यामुळे आम्ही अगदी न चुकता जायचो या सभांना.

अन पुस्तकांचे म्हणशील तर माझ्या चुलत आजोबांची म्हणजे रँगलर परांजप्यांची स्वतःची खूप मोठी लायब्ररी होती. इतकी मोठी की शिडीवर चढून आम्ही पुस्तकं शोधायचो, अन शिडीवर बसूनच पुस्तकं वाचायचोही! आणि आजोबांचा माझ्यावर इतका विश्वास होता की मला कोणतेही पुस्तक कधीही वाचायला परवानगी होती त्यांची. फर्ग्युसन कॉलेजचीही लायब्ररीही उत्तम होती. युनिव्हर्सिटीचीही लायब्ररी होती. त्यामुळे वाचायला मला भरपूर मिळाले. आणि बी. ए. मी इंग्लिश लिटरेचर (साहित्य) घेऊन केलं असल्याने दिवसाला जवळ जवळ ६-६, ७-७ तास मी वाचत असे. मी अगदी झपाटल्यासारखी वाचायचे. आतूनच मला कुठे तरी अशी जबरदस्त इच्छा होती की मला काहीतरी करायचंय.

तेव्हा किती मुली होत्या तुमच्या बरोबर?

मी आणि सुनिती नामजोशी (फलटणच्या राजेसाहेबांची नात आणि एअर इंडियातील पायलटची मुलगी) अशा दोघीच होतो तेव्हा. ती आणि मी, आम्ही दोघी त्या वर्षी आय ए एस झालो. एकाच वर्षी महाराष्ट्राच्या दोन मुली आय ए एस झालो ही खूप महत्त्वाची अन मोठी गोष्ट होती तेव्हा. तिचे पोस्टिंग महाराष्ट्रात झाले. पुढे ५-६ वर्षांनंतर तिने हे क्षेत्र सोडले अन ती साहित्याकडे वळली.

इतक्या लहानपणापासून तुम्ही आय ए एस होण्याचे स्वप्न बघितले होते, त्यासाठी इतके कष्ट घेतले होतेत, तर तुमची निवड झाल्याचे कळल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तसंच घरच्यांची, समाजाची प्रतिक्रिया काय होती?

मी अगदी सेवन्थ हेवन मध्ये होते.
अन माझ्या आजूबाजूचे सगळेच फार आनंदात होते. अनेकांनी माझे आवर्जून अभिनंदन केले. अनेकांची अभिनंदनाची पत्रे आली.
रँगलर परांजपे आजोबांना इतका आनंद झाला होता. ते म्हणत '१९६४ सालामध्ये देवाने मला तीन आनंदाच्या बातम्या दिल्या.' शकुंतला परांजपे त्याच वर्षी राज्यसभेच्या सदस्या झाल्या, सई परांजप्यांना अश्विनी झाली अन मी आय. ए. एस. झाले. त्यांना या तिन्ही बातम्यांनी खूप खूप आनंद झाला होता.

तुमचे पहिले पोस्टिंग तामिळनाडूलाच झाले का? ते स्वीकारताना जड गेले का? कारण त्या काळात सामान्यतः आपले गाव सोडायला सहसा कोणी फारसे तयार नसायचे. अन तुम्हाला तर गावच काय राज्यही बदलायचे होते. त्यातही तामिळनाडू, जिथे मराठी काय हिंदीचाही फारसा वापर होत नव्हता.

काय झालं होतं, त्या वर्षी एक लाखापेक्षा जास्त लोक आय. ए. एस. च्या परीक्षेला बसले होते. अन त्यात १२० जणांची निवड झाली होती. अन मी पहिल्याच फटक्यात जरी निवडले गेले असले तरी माझा क्रमांक १२० तील ८९ होता. सुनितीचा क्रमांक माझ्या आधी होता. त्यामुळे तिला महाराष्ट्र मिळाले. पण एकाच वेळेस दोन मुलींना महाराष्ट्रात घेणे त्यांना नको होते; त्यामुळे मला महाराष्ट्रात पोस्टिंग मिळणे शक्य नव्हते. मला दोन पर्याय होते, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश. कर्नाटकाचा पर्याय मी दिला नव्हता कारण सीमाप्रांतावरून चाललेल्या वादामुळे मला तिथे त्रास होईल असे वाटले. माझे वडील त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान एक वर्ष मद्रासमध्ये होते. त्यांनी सांगितले की तिथली माणसं अतिशय सज्जन आहेत, तुला अजिबात त्रास होणार नाही. तू मद्रासला जा. म्हणून मग मी तामिळनाडूचा पर्याय स्वीकारला.

प्रशासकीय पदावर काम करत असताना आलेले काही अनुभव, केलेले काही नवे प्रयोग यांची माहिती सांगाल?

काही अनुभव सांगते तुला.

१९७६ मध्ये मद्रासला (आताचे चेन्नई) माझी जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. तिथे पोहचून स्थिरस्थावर होते तोच मोठ्या आस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ आली. २४ नोव्हेंबरला अफाट पाऊस पडला. जणू आभाळच फाटले. २४ तासात १८ इंच पाऊस पडला. अनेकांची घरं पडली, झोपड्या नष्ट झाल्या. पाच लाख लोक बेघर झाले. सरकारने ताबडतोब मदतीचा हात पुढे केला. एक कोटी रुपयांचे गरजूंना वाटप करायचे होते. सहसा अशा प्रसंगी होणारा भ्रष्टाचार या वेळेस होऊ नये म्हणून मी वेगळा पायंडा पाडला. मी माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून पाच राष्ट्रीयीकृत बँकांची मदत घेतली. गरजूंना त्यांच्या नुकसानीनुसार बेअरर चेक्स सरकारतर्फे देण्यात आले. ते गरजूंनी ताबडतोब त्या त्या बँकांतून जाऊन वटवले. त्यामुळे कोणालाही भ्रष्टाचाराची संधी मिळाली नाही. सरकार मान्य रक्कम त्यांना पूर्णतः मिळाली अन अल्पावधीत मिळाली, ही फार मोठी समाधानाची बाब ठरली. या नव्या पद्धतीचे कौतुक चीफ सेक्रेटरी कार्तिकेयन यांनी मुद्दामहून पत्र पाठवून केले. आम्हा सगळ्यांना काम केल्याचे समाधान मिळाले.

साखर कारखान्याची कमिशनर म्हणून मी काम पाहत असतानाचा एक अनुभव सांगते. साखर कारखान्यात एक मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले की ५ रुपये कर सरकारला द्यायचा अशा पद्धतीने कर आकारणी केलेली होती. आणि हा कर न भरल्यास, कराच्या रकमेवर व्याज लावले जात असे. अशा तर्‍हेने वसुली न झालेल्या कराची रक्कम १६ कोटी रुपयापर्यंत साठत गेली होती.
ऊसाची वाहतूक शेतापासून साखर कारखान्यापर्यंत सुरळीत व सुखकर व्हावी यासाठी रस्ते बांधण्याचा खर्च या करांतून करावा अशी सरकारी योजना होती. आणि रस्त्याचे बांधकाम सरकारनेच करायचे असा नियम होता. साखर कारखान्यांना तो मान्य नव्हता. म्हणून ते कर द्यायला तयार नव्हते. 'कर जर आम्ही देणार तर रस्ते आम्हीच बांधणार. सरकारकडे पैसा गेला तर त्याचा दुरुपयोग होतो.' असे त्यांचे म्हणणे होते. आणि काही अंशी ते खरेही होते.
यावर तोडगा काढावा म्हणुन मी मंत्रिमंडळाला एक योजना सादर केली. जे साखरउद्योग आपणहून ऊसाच्या शेतापासून साखर कारखान्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करतील त्यांना थकबाकीवरील व्याजाच्या रकमेत सूट देण्यात यावी. तसेच थकलेला कर चार हप्त्यांत भरण्याची त्यांना मुभा द्यावी. या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे ६ कोटी रुपये वसूल तर झालेच शिवाय हजारो शेतकर्‍यांना रस्त्याची सोय झाल्यामुळे फायदा झाला.

मी कमिशनर ऑफ फिशरीज असताना मच्छिमारांसाठी सरकारने ४९६ घरे बांधली होती. चार चार मजल्यांच्या इमारती होत्या त्या! त्या घरांचे वाटप मोठ्या पारदर्शक रितीने मी केले. लॉटरी पद्धतीने, चिठ्ठ्या काढून, सर्वांच्या समोर ध्वनिवर्धक वापरून ते वाटप केले. त्यामुळे कोणताही भ्रष्टाचार न होता, कोणताही फेवरेटिझम चे आरोप सरकारवर न होता, हे मोठे काम सुरळीत झाले.

१९९६ मध्ये माझी नेमणूक कमिशनर फॉर अर्बन लँड टॅक्स म्हणून झाली. अर्बन लँड टॅक्स हा अत्यंत थोडा, परंतु वसुलीस अतिशय किचकट असा कर आहे. शेतजमिनीला त्यातून वगळले जाते. मोठ्या शहरात ज्यांच्याकडे ४८०० स्क्वेअर फूटापेक्षा जास्त जमीन असेल त्यांच्यावर हा कर आकारला जातो. अनेक वर्षांपासून थकबाकी व त्यावरचे व्याज डोंगराएव्हढे झाले होते. माझ्या पूर्वी, माझ्या आधीच्याच बॅचमधल्या श्री. रंगाराव या अधिकार्‍यांनी १० कोटी ५६ लाख रुपयांची एका वर्षात वसूली केली होती. आपल्यालाही असे चांगले काम कसे करता येईल असा विचार मी सुरू केला.
त्यातून काही योजना मी मांडल्या. विविध जिल्हाधिकार्‍यांच्या मीटिंग्ज घेऊन त्यांच्या सहकार्‍याने त्या पार पाडल्या. उदाहरणार्थ संगणकाचा सुयोग्य वापर करून माहितीचे संकलन-वर्गीकरण केले. अनेक ठिकाणी अधिकारी पाठवून - कधी स्वतः जाऊन, जिच्यावर कर आकारायचा आहे ती शेतजमीन आहे की अर्बन लँड आहे, तिचा आकार केवढा आहे, मालकी कोणाची आहे ही माहिती संकलित केली, रेव्ह्येन्यू रिकव्हरी अ‍ॅक्टच्या संदर्भातील जाहिराती दिल्या. अशा सततच्या प्रयत्नांमुळे एका वर्षात आम्ही १४.१६ कोटी रुपयांची वसुली करून नवा उच्चांक निर्माण केला. या कामाचे कौतुक रेव्हेन्यु खात्याचे मंत्री थिरु नानजी के. मनोहर यांनी केले.

नुसतीच वसुली केली नाही तर जिथे जिथे अन्याय झाला आहे तिथेही लक्ष घातले. ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्या चुका दुरुस्त केल्या. त्यांनी कर रुपाने भरलेली जास्तीची रक्कम परत देण्याची व्यवस्था केली. अशा कर रद्द करण्याच्या १८०० ऑर्डर्स १९९५ ते १९९९ या दरम्यान काढल्या आणि त्यातून चुकीचा आकारलेला १.५ कोटी रुपयांचा कर माफ केला. यातून सामान्य जनतेचा विश्वास मिळवला ही सर्वात मोठी गोष्ट होती. काही प्रमाणात त्रासही झाला, पण लोकसेवेत लोकनिंदा ही वाट्याला येणारच. तथापि आपण प्रामाणिक असलो तर भिण्याचे काहीच कारण नाही. ताठ मानेनी जगण्यातली मजा प्रामाणिक माणसाला नेहमी चाखता येते.

photo1.jpgकाम करताना अनेकदा अपरिहार्य, ज्यांवर आपले नियंत्रण नाही अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा नैराश्य येतं. हा अनुभव तुम्ही नक्की घेतला असेल. आपल्याला काम करता येईल पण करता येत नाहीये यातून येणारे नैराश्य तुम्ही कसे हाताळले?

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे कोणत्याही क्षणी नोकरी सोडण्याचा पर्याय होता. कारण माझे पती अन मी दोघंही कमावत होतो. त्यामुळे आय वॉज फ्री टू रिझाइन. पण मलाच हे सोडायचे नव्हते. तशात मला हेही आधीपासून माहिती होते की अनेकदा मला खड्यासारखे वगळले जाणार आहे. मी त्याबाबत आधीपासून जागृत होते. त्यामुळे जे काम, जे पोस्टिंग मला मिळेल, दिले जाईल तिथे उत्तमच काम करायचं हे मी मनातून ठाम ठरवले होते. त्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही हेही मी पक्के ठरवले होते, कारण कोठेही गेलं तरी धूळ ही असतेच हे मला माहिती होते.

त्यामुळे कुठेही गेले की आधी झाडू हातात घ्यायचे, स्वतःच्या देखरेखीखाली ऑफिसेसमधली टॉयलेट स्वच्छ करून घेत असे. कितीतरी ऑफिसेस मधील रेकॉर्ड रूम्स मी साफ केल्या आहेत. अगदी व्हॅक्युम क्लीनर घेऊन तिथली धूळ मी साफ करायचे. प्रत्येक रेकॉर्ड बघून त्यातली कालबाह्य रेकॉर्ड्स मी निकालात काढायचे. जिथे जिथे मी गेले तिथली सर्व रेकॉर्ड्स त्यामुळे व्यवस्थित राहिली, याचे मला खूप समाधान आहे.

आणि सुख शेवटी आपण शोधण्यात असतं ना? आणि काय आहे, इतकी कमी लोक असतात जी कामं करतात... त्यामुळे काम करणारा उठून दिसतोच ना! आणि सोबतच्या लोकांना तर नक्की कळते की कोण काम करणारा आहे ते.

आणखीव एक अनुभव सांगते तुला,
मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये होते तेव्हा त्यांचे कामाचे दिवस सोमवार ते शनिवार होते अन सर्व दिवस लोकांसाठी खुले असत. पण त्यामुळे काय व्हायचं की कर्मचार्‍यांना त्यांची ऑफिसच्या कामांची - फॉलोअपची चर्चा करायला वेळच मिळायचा नाही. त्यांचे काम अप टू द डेट करण्यासाठी त्यांना वेळच मिळायचा नाही. म्हणून मग मी शनिवारी बाहेरच्या लोकांना भेटता येणार नाही असा नियम केला. त्यामुळे काय झालं की त्यांना त्यांच्याकडचा डेटा नीट ठेवता यायला लागला अन त्यामुळे ते लोकांसाठी अधिक चांगले काम करू शकले.
त्यावेळेस माझ्याकडे ३३ आय टी आय होते. त्यात लोहार, चांभार, सुतार ही पदं मॅट्रिकच्या खालच्या लोकांना द्यायची असायची. आणि एसी एअरकंडिशनिंग किंवा टीव्ही रिपेअरिंग हे मॅट्रिकच्या पुढच्यांसाठी असे. त्यामुळे हजारो अर्ज असायचे अन ट्रेनिंगच्या सीट्स केवळ शेकड्यात असायच्या. तेव्हा ही अ‍ॅडमिशन पद्धती मी सुयोग्य केली. मी त्यांना सांगितलं की या पोस्ट्स साठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे आवश्यक विषय आहेत. तेव्हा या विषयांच्या दहावीच्या मार्कांनुसार यादी तयार करा. आणि एका पोस्टसाठी सहा जणांना बोलवा त्यातून एकाला निवडा. यामुळे निवडप्रक्रिया इतकी स्वच्छ झाली की तक्रारी पूर्ण थांबल्या, गोंधळ थांबले.

या उदाहरणांवरून तुला समजेल की सुधारणा कुठेही करणं शक्य असतं. कोणीही आणि कोणतीही पद्धती परिपूर्ण नसते; त्यामुळे प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सुधारणा शक्य असतेच!

तुमच्या बरोबर काम करणारे, तुमचे सहकारी तुम्हाला कसे लाभले? अशा नव्या गोष्टींना पाठिंबा देणारे किती होते अन हे बदल नको असणारे, पाय ओढणारे किती होते?

पाय खेचणारे ५-१० टक्केच होते. ९० टक्के माझ्या बरोबर काम करायला उत्सुक असे होते. मी जेव्हा रिटायर्ड होऊन निघाले तेव्हा स्टेशनच्या अगदी शेवटाला एक मनुष्य उभा होता. तो माझा १९७६ सालचा तहसीलदार होता. अन मी २००१ रिटायर्ड झाले तेव्हा हा १९७६ मध्ये माझ्याबरोबर काम केलेला मनुष्य मला निरोप द्यायला आवर्जून स्टेशनवर आला होता. 'अम्मा, तुम्ही का जाताय?' म्हणून विचारायला. मला वाटतं हा मला मिळालेला सर्वात मोठा काँप्लिमेंट असेल. त्यांना बघून माझे डोळे भरून आले. कुंचित पादम नावाचे हे गृहस्थ.

तामिळनाडूत किती वर्षे होतात तुम्ही?

मी तिथे ३६ वर्षे होते.
या तुमच्या सर्व कारकीर्दीत तुमच्यामागे कोण उभे होते? तुमचा बॅकबोन, तुमची सपोर्ट सिस्टिम कोण होते?

माझा नवरा श्री. दत्तात्रय राजाराम पडळकर! माझा नवरा हा माझी बेस्ट सपोर्ट सिस्टिम होता.
Image (2) copy.jpg
केवळ माझी नोकरी तामिळनाडूमध्ये होती म्हणून त्यांनी स्वतःच्या करियरमधल्या अनेक संधी बाजूला सारल्या. अन माझी करियर घडावी यासाठी त्यांनी खूप त्याग केला.
१९८४ ते १९८९ पर्यंत ते इंडियन हाय कमिशनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी शिपिंग होते. हि रेप्रेझेंटेड इंडिया फॉर द इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन ( I.M.O. ). माझ्या यजमानांच्या कामावर I.M.O. चे सेक्रेटरी इतके खूष होते की त्यांनी माझ्या यजमानांना आय. एम. ओ. मध्ये उच्च पदावर नोकरी देऊ केली. मी भारतात परत यायचा हट्ट केला म्हणून माझ्या यजमानांनी त्यांना नकार कळवला.
त्यापूर्वीही अशा अनेक सुवर्णसंधी चालून आल्या- गेल्या. I.T.C. hotel division च्या चीफ ची ऑफर घेऊन स्वतः I.T.C. चे डायरेक्टर आमच्या घरी आले. परंतु, ' तुम्हाला कलकत्त्याला आज ना उद्या जावे लागेल' असे त्यांनी सांगितले. आणि हे योग्यच होते. I.T.C. चे मुख्य कार्यालय कलकत्त्याला असल्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. पण मी नोकरी न सोडण्याचा हट्ट धरला म्हणून माझ्या यजमानांनी ती संधीही जाणून बुजून दवडली. आणखीनही ३-४ संधी त्यांनी याच कारणास्तव दवडल्या. पत्नी आणि मुलांपेक्षा करियरला त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही.
माझ्या अनेक अशक्य गोष्टी त्याने सहन केल्या. माझे स्वयंपाक न करणे, साफसफाई कडचे दुर्लक्ष, अगदी सगळ्या गोष्टी त्याने चालवून घेतल्या.

पण मुलांशी मात्र मी अतिशय प्रामाणिकपणे वागले. जेवढा माझा मोकळा वेळ असे तो सगळा मी माझ्या मुलांना देत असे. त्यामुळे त्याबाबत त्यांची काही तक्रार नसे. पण त्याचबरोबर त्यांचे अती लाडही केले नाही. त्यांना शाळेत कधी मोटारीने पाठवत नसू. सायकल, बस किंवा पायीही मुलं शाळेत जायची.

मुलं लहान असताना तुमच्या काम करण्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय असायची? कारण त्या काळात फार कमी बायका नोकरी, त्यातही इतकी जबाबदारीचे काम करत असत. तेव्हा लहान असताना मुलांची प्रतिक्रिया काय असायची? सध्या ती काय करताहेत ?

माझ्या मुलांना माझ्याबद्दल फार अभिमान वाटायचा. इतरत्र मंडळी मला 'कलेक्टर अम्मा, कलेक्टर अम्मा' असं म्हणत - त्याची त्यांना खूप गंमत वाटायची. तामिळनाडूत आय. ए. एस. ऑफिसर्सना कलेक्टर म्हणत. माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. मुलगी विभा, एच डी एफ् सी स्टॅंडर्ड लाईफ या इन्शुरन्स कंपनीमध्ये चीफ फिनान्शिअल ऑफिसर आहे. मुलगा कॉम्प्युटर हार्डवेअर डिझाईनर असून अमेरिकेत स्थायिक झाला आहे.

तामिळनाडू मधला समाज कसा वाटला?

तामिळनाडू समाज तसा परंपरावादी. पण म्हणून चांगलं आहे त्यांचं. तिथे डिव्होर्स रेट बराच कमी आहे. सासू सासर्‍यांना तिथे खूप मानतात. घरातल्या विधवा बहिणींना खूप सपोर्ट दिला जातो. एकंदरच कुटुंब खूप बांधलेले असते एकमेकांशी. सर्वसामान्य माणूस पापभीरू आहे, देवाला घाबरणारा, खूप प्रामाणिक आहे. त्यांच्या गरजाही खूप कमी आहेत. छानछोकी, डामडौल नाही तिथे. लग्नांमध्ये ते खूप खर्च करतील- रेशमी साड्या, दागदागिने असतील पण दैनंदिन जीवनात ते खूप साधे आहेत. वर्षभर ते तोच डोसा, तेच सांबार खातील, त्यात फार बदल असत नाही. अन श्रीमंत गरीब यांच्या खाण्यातही फार बदल नसतो. फारतर श्रीमंताच्या घरी सांबार्‍यात काजू असतील. पण जेवण तेच उपमा, इडली, डोसा, सांबार अन पोंगल हेच! आणि सांबारामध्ये त्यांना कोणतीही भाजी चालते. हेच हवे आणि तेच नको असे नसते. खूप साधी माणसं आहेत ती. आणि त्यांच्या साधेपणाचा त्यांना अभिमान आहे. लवकर उठणारी ही माणसं. त्यांच्याकडे उशीरा उठणं नाही, त्यांच्याकडे आचरटपणा नाही, दारू पिणं कमी आहे, जुगार खेळणं कमी आहे, अतिरेकी फॅशन नाही. एकंदर व्हर्च्युअस पीपल!

आणि स्त्रियांना तर फारच उत्तम आहे ते राज्य राहायला. मला कधीही वाईट अनुभव एक बाई म्हणून आला नाही तिथे. अम्मा म्हणजे आई असंच ते म्हणतात, मानतात. बाईकडे आई किंवा बहीण या नजरेनेच बघितलं जातं. भोग्य वस्तू म्हणून बाईकडे नाही बघितलं जात तिथे. स्त्रियांवर होणारे गुन्हेही तिथे कमी आहेत.

प्रशासकीय क्षेत्रातल्या फिशरी, सोशल वेलफेअर, अ‍ॅग्रीकल्चर, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, अ‍ॅनिमल हजबंड्री या विभागांमध्ये तुम्ही काम केलंत. अशा वेगवेगळ्या विभागात काम करताना वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागला असेल ना? तो कसा जमवलात? कारण नवीन ठिकाणी पोस्टिंग झालं की, 'हम्म्म, काही काळ काम थांबवा, अभ्यास करा अन मग काम सुरू करा.' असं काही होत नाही. एकीकडे काम सुरू करून त्या बरोबरीने अभ्यास करावा लागतो. हे सारं कसं जमवलंत ?

हो अभ्यास तर करावाच लागतो. काय आहे; काही बाबती या एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स असतात. म्हणजे त्या विभागातल्यांचे पगार, रजा, आजारपणं, वगैरे... हे सर्व ठिकाणी सारखे असते. पण स्कीम्स मात्र प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या असतात. त्यासाठी खूप वाचन करावे लागते. ऑफिसेसच्या लायब्ररीज नेहमी खूप चांगल्या असत. त्यामुळे मला खूप पुस्तके मिळाली. मग रात्र रात्र मी वाचत असे. आणि मुख्य म्हणजे आपण माणसं हेरतो. सहकार्‍यांमधले कोण विश्वासार्ह आहेत, कोण नाहीत; कोण तोंडपुजेपणा करतं, कोण खरोखरी मदतीला येतं. तर माणसं हेरायची अन त्यांचा सल्ला घ्यायचा. दोघा-तिघांचा विचार घ्यायचा. अन मग आपला विवेक वापरायचा.

एव्हढ्या मोठ्या प्रशासकीय पदावर काम करत असताना इतक्या वेगवेगळ्या लोकांना हाताशी घेऊन काम करायचं असतं, हे अतिशय कौशल्यपूर्ण काम. हे सहजी जमणारे काम नाही. तुम्हाला हे कसं काय जमू शकलं?

मी स्वभावाने अतिशय सॉफ्ट ऑफिसर आहे. मी इतरांचे दु:ख पाहून स्वतः दु:खी होते. कनवाळू म्हणून माझी ख्याती होती. मला खरं रागावताच येत नसे. इतर कोणीही कसेही वागले तरी त्याच्याशी खुनशीपणे वागणे मला जमत नाही. मला कधी राग आलाच तर मी लवकर निवळत असे. त्यामुळे मला फार असे दुष्ट सहाय्यक मिळाले नाहीत. अन दर महिन्याला मी मीटिंग घेत असे. त्यात सगळ्या गोष्टी चर्चिल्या जात. अन विचारणारे कोणीतरी आहे याचे दडपण असे, त्यामुळे सगळे नीट कामे करत. अन खरंच तिथली माणसे चांगली माणसे होती.

नोकरी सोडल्यानंतर पोकळी जाणवली का ? इतक्या धावपळीच्या आयुष्याकडून निवृत्त झाल्यानंतर त्याचा त्रास किती झाला?

पहिले तीन महिने फार जड गेलं. अकरा वाजले की ऑफिसच्या चहाची आठवण व्हायची आणि लंच वेळेस मैत्रिणींची आठवण यायची. पण मग त्याची हळूहळू सवय झाली. आणि मुळात मला माहिती होतं आपण हे सर्व सोडणार आहोत, त्यामुळे मनाची एक तयारी मी केलीच होती.
तशात त्या वेळेस माझे मामंजी अन सासूबाई माझ्याकडे होते. आणि सासूबाई पार्किन्सन्सच्या पेशंट होत्या. त्यामुळे मी खूप व्यस्त असायचे.

आजपर्यंत अशी कोणती घटना घडली का; की ज्यामुळे आपल्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून गेला?

माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली तेव्हा आयुष्याचा नवा अर्थ मला कळला. १९९४ मध्ये माझी अँजिओप्लास्टी करत असताना त्यांच्याकडून माझी आर्टरी पंक्चर झाली. आणि हिमाटोमा झाला. म्हणजे पेरी कार्डियम मधल्या फ्ल्युइडमध्ये रक्त गेलं. त्यामुळे माझे हृदयाचे आकुंचन प्रसरण अतिशय कमी होऊ लागले. माझं ब्लडप्रेशर जे सामान्यतः ८०/१२० असते ते ३०/४० इतके घसरले.
मी मृत्यूच्या अगदी जवळ गेले होते. हे माझे दुसरे जीवन ! त्यामुळे स्वाभाविकच आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. माझा राग अजिबात गेला. हे मला म्हणतात तुला राग कसा येत नाही ? अमुक एक जण कसा वागतोय बघ , तुला त्याच्या वागण्याचा राग कसा येत नाही? पण मला आता खरंच राग येतच नाही. खरं तर चुकीच्या गोष्टींचा राग यायला हवा पण कशाचाच राग येत नाही आता मला, हसूच येतं.

पुढच्या पिढीला काय सांगावंसं वाटतं ? काय त्यांनी करावं आणि काय करू नये असं तुम्हाला वाटतं?

अहंकार! हा अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.त्याच्यावर ताबा मिळवता आला पाहिजे. आणि मला वाटतं, प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. अंतर्मन आपल्याला योग्य तीच गोष्ट सांगत असतं. पण आपण त्याला दडपत असतो.
मला असं वाटतं की आपल्या अंतर्मनाशी आपण प्रतारणा करू नये. आपलं मन आपल्याला चूक बरोबर सांगत असतं, पण आपण त्याला गप्प बसवतो. ते करू नये, आपल्या अंतर्मनाला ऐका, त्याचा सल्ला माना!

तोरा मन दरपन कहलाये
भले बुरे सारे करमों को
देखे और दिखाये |

_________________________________________________________________________
यशोगाथा

१९५८ - मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान
१९६२ - बी. ए. (इंग्रजी साहित्य)
१९६४ - आय. ए. एस. परीक्षेत उत्तीर्ण
१९६४ - एम. ए. (राज्यशास्त्र आणि इतिहास )
१९६४-६५ - मसुरी येथे विशेष प्रशिक्षण
१९६५ - विवाह
१९६५ - तामिळनाडूमध्ये पोस्टिंग
१९७० - डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर
१९७३ - डेप्युटी सेक्रेटरी, अ‍ॅग्रीकल्चर
१९७६ - डिस्ट्रिक्ट कलेक्टर, मद्रास
१९७७-८० - डायरेक्टर ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग
१९८०-८३ - डायरेक्टर ऑफ अ‍ॅनिमल हजबंडरी
१९८३ - मलेशियाला परिषदेसाठी प्रयाण
१९८३-८४ - स्पेशल सेक्रेटरी, चीफ मिनिस्टर ( नून मिल प्रोग्रॅम)
१९८४-८५ - सेक्रेटरी, सोशल वेलफर डिपार्टमेंट
१९८५-८८ - असाधारण रजा घेऊन पती बरोबर लंडनला वास्तव्य. श्री. पडळकर इंडियन हायकमिशनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी (शिपिंग) ह्या पदावर.
१९८९-९१ - सेक्रेटरी, अ‍ॅग्रीकल्चर
१९९० - जागतीक बँकेकडून सहाय्य मिळवण्यासाठी पाठवलेल्या पथकाबरोबर वॉशिंग्टना प्रयाण.
१९९२-९४ - कमिशनर ऑफ फिशरी
१९९४-९५ - सेक्रेटरी, पर्सोनेल अ‍ॅंड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मस
१९५-१९९९ - प्रिन्सिपल कमिशनर फॉर लँड रिफॉर्मस
१९९-२००१ - व्हिजिलन्स कमिशनर
स्वेच्छा निवृत्तीनंतर २००१ मार्चपासून तमिळनाडू अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलवर सदस्य म्हणून रुजू
२००१ ऑक्टोबरपासून पूर्ण निवृत्ती
_________________________________________________________________________
(त्यांच्या या सर्व कार्याचा सविस्तर आढावा स्त्री मासिक , मार्च २००२ आणि मानिनी मासिक, दिवाळी २००६ यात आला आहे, तो खरंच मुळातून वाचावा असा आहे.)
मुशो आणि संपादनासाठी संयुक्ता व्यवस्थापन आभार Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल,
मुलाखत छान झाली आहे. लतिका पडळकर यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रश्नही नेमके विचारले आहेत.

मुलाखत आवडली. अत्यंत कर्तुत्त्ववान व्यक्तीची ओळख घडली. >>> मृण्मयी +१,
त्यांचा चेहरा किती सोज्वळ आहे Happy

फारच सुरेख झाली आहे मुलाखत. आत्ता पर्यंत माबोवर वाचलेल्या सर्व मुलाखतीम्मधली सर्वोत्तम. प्रश्न आणि उत्तरे अगदी नेमकी. खरच खूप प्रेरणा मिळाली मुलाखत वाचून. अवल तुझे त्यासाठी आभार.
आणि माबोसाठी मुलाखत दिल्याबद्दल लतिका पडळकरांना पण खूप सारे धन्यवाद.

त्यांचा प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्या स्वतः आता शिकाउ आणि आय. ए. एस. इच्छुकांना मार्गदर्शन पण करत असतील ना?

सर्वांना मनापासून धन्यवाद.
माधुरी अगदी तशाच आहेत त्या अगदी सोज्वळ आणि साध्या Happy त्यांचे बोलणेही ऐकत रहावे असे. पुढच्या आठवड्यात माझ्या ब्लॉगवर या मुलाखतीच्या काही भागाचे रेकॉर्डिंग टाकेन. त्याची लिंक देइन इथे, नक्की ऎका.
शुम्पी धन्यवाद, अगं लतिका पडळकर स्वत: इतक्या छान आणि कर्तृत्ववान आहेत की त्यांची मुलाखत छान होणारच ना Happy

मस्त, मस्त. Happy
धन्यवाद अवल. छान झाली आहे मुलाखत.

या उदाहरणांवरून तुला समजेल की सुधारणा कुठेही करणं शक्य असतं. कोणीही आणि कोणतीही पद्धती परिपूर्ण नसते; त्यामुळे प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सुधारणा शक्य असतेच! >>> वेल सेड!!
हे अतिशय आवडले. पण अशा लोकांना किती कमालीचा त्रास होतो ते माहिती आहे. Happy

अगदी रैना, मुलाखत घेताना त्या हे बोलल्यावर मी पण " वा मावशी कित्ती छान! " असंच म्हटलं होतं Happy
त्यांच मला अजून भावलेलं एक वाक्य म्हणजे "आपण प्रामाणिक असलो तर भिण्याचे काहीच कारण नाही. ताठ मानेनी जगण्यातली मजा प्रामाणिक माणसाला नेहमी चाखता येते."
अन त्रासाचं म्हटलं तर त्यांनी २-३ उदाहरणं दिलीही. अयोग्य वसुल केलेला कर परत देण्याच्या त्यांच्या कामाबद्दल त्यांना खुप त्रास सहन करावा लागला. परंतु त्यांचे काम अतिशय चोख असल्याने सरकारकडून त्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला होता.

माझे स्वयंपाक न करणे, साफसफाई कडचे दुर्लक्ष, अगदी सगळ्या गोष्टी त्याने चालवून घेतल्या.>>
हेही आवडले अवल. उगाच भलावण नाही की खोटेपणा नाही. जे करत नाही, ते करत नाही.
उगाच हा प्रकार नाही - 'घरचे सगळे सांभाळुन, दिवसरात्र एक करुन सगळे सगळे केले'

उत्तम मुलाखत. साधे, सोपे, सरळ प्रश्न आणि त्यांची मनमोकळी, प्रांजळ उत्तरं Happy

आपण प्रामाणिक असलो तर भिण्याचे काहीच कारण नाही. ताठ मानेनी जगण्यातली मजा प्रामाणिक माणसाला नेहमी चाखता येते. >>>

प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा >>>

येस्स! अगदी माझ्याच मनातली वाक्यं आहेत ही... !!

सुरेख मुलाखत....

काय प्रवास आहे!!! थक्क करणारा... त्यांना लाभलेल्या व्यक्तिंचा सहवास पण हेवा करायला लावणारा.... खरोखरच एक कर्तुत्ववान पण रुजु व्यक्तिमत्व.

इकडे किती मोकळे पणे त्यांनी नवर्‍याच्या स्वभावाला सलाम केला आहे. आणि स्वतः मधल्या त्रुटी कबुल केल्या आहेत.

आजही लोकं स्वतः चं शहर, प्रदेश सोडायला बिचकतो. पण त्या काळात त्या तामिळ्नाडु सारख्या पर भाषिक राज्यात जाउन येवढे काम करु शकल्या....सलाम त्यांना....

विलक्षण कर्तॄत्ववान स्त्री ची मुलाखत..
बेअरर चेक चा प्रसंग खुपच जबरी आहे. इतक्या लहान वयात त्यांना हे जमलं.
रैना ला सगळ्यासाठी +१.

छान मुलाखत.
त्या एव्हढ्या कर्तुत्ववान असुनही कुठेही त्याबद्दलचा अहंम जाणवला नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगितले आहे!

धन्यवाद अवल!

त्यांना लाभलेल्या व्यक्तिंचा सहवास पण हेवा करायला लावणारा >> अनुमोदन!!
त्यांचे काम जबरदस्त आहे. आणि बरोबरीने फॅमिली बॅकग्राउंडही तितकीच तगडी आहे. ज्या लोकांच्या सहवासात त्या वाढल्या त्या सगळ्याचा त्यांचे इतके उत्तम व्यक्तिमत्व घडण्यात नक्कीच हातभार असणार.

छान Happy

Pages