'ट्रिव्हिअल रिलेशन' - दया

Submitted by बेफ़िकीर on 11 July, 2012 - 03:47

"गाजराचा ज्यूस प्यायला की डोळे छान होतात"

माझ्या आतड्यांचा पीळ सुटून एक हासण्याची खदखद माझ्या घशापर्यंत पोचली आणि चहाच्या घोटाबरोबर मी ती गिळताना खोकला आल्यासारखे दाखवले आणि खूप खोकून घेतले.

दया मोसंबी ज्यूसच्या प्रवाहात एक तंगडी अडकून पडलेल्या स्ट्रॉचे दुसरे तोंड स्वतःच्या ओठांनी दाबून फुर्र फुर्र करत माझ्याकडे अभ्यासू नजरेने पाहू लागली. मग मीही हासण्याची उबळ दाबली आणि चहाकडे लक्ष दिले.

"हसू येतंय का?"

"का?"

"नाही... मी काही बोलले की तू त्सुनामी यावी तसा हासतोस"

"ह्यॅ... काहीही.. "

"ऐक ना! वटवाघुळे उलटी का लटकतात माहितीय का?"

"ज्यूस संपलंय तुझं"

"हे आहे ना तळाशी... शेवटचा थेंबही वाया घालवायचा नाही... पैसे देतो आपण"

"काय सांगतेस?"

"तुझं म्हणजे असंय... की चिकन तंदुरी फुल्ल मागवायचं आणि त्याचा वास येऊन पायात घोटाळणार्‍या मांजराची कीव आल्याने ते सगळे त्याच्यासमोर टाकायचे"

"वटवाघुळे उलटी का लटकतात?"

"सॅन्डवीच खायचं?"

"हम्म्म"

"ओ... एक मिनिट.... एक ग्रिल्ड सॅन्डवीच द्या... व्हेज... म्हणजे इथे व्हेजच मिळणार... माहितीय मला.. पण जरा लवकर द्या हं?"

दया म्हणजे तिच्या आई वडिलांना त्यांचा तसा अजिबात हेतू नसताना झालेली मुलगी असावी. रस्त्यावरचे फेरीवाले भरदुपारी वॉचमन नसलेल्या सोसायटीत जाऊन वस्तू विकण्यासाठी बोंबलत असतात तशी दया कोणाच्याही जीवनात घुसायची आणि त्या माणसाच्या दुपारचे रुपांतर एखाद्या उदास संध्याकाळीत करून लोप पावायची. तिला भेटलेल्या 'य' लोकांपैकी तिच्या सहवासात आता जेमतेम चार सहा जण उरलेले असतील. प्रत्येकाशीच भांडायची ती. कशाहीवरून. मग तो माणूस किंवा ती स्वतःच संबंध संपवून टाकायची. मग त्या माणसाच्या वाढदिवसाला एखादा एस एम एस करून शुभेच्छा द्यायची आणि वर लिहायची की तुझा बर्थडे आहे म्हणून मेसेज केलाय, शहाणपणा करून गळ्यात पडू नकोस.

भिंतीला ओल यावी तशी ती यायची, भिंतींना पोपडे पडावेत तशी अस्तित्व टिकवत राहायची आणि भिंतींचा रंग जावा तशी जायची.

दया!

२००४ ते २००६ या दोन वर्षांमध्ये काहीच दिवस ती मला भेटली, पण ते दिवस तिच्यानावे 'असाईन' झालेले आहेत.

त्या दिवसांचे नाव आहे ... सॉरी... त्यांना नाव नाही आहे... नंबर्स आहेत.. दया एक, दया दोन, दया दहा, दया एकवीस, दया 'निल'!

काळेपणाकडे बिनधास्त झुकणारा सावळा रंग, न शोभणारा चष्मा, बॉबकट, डोळ्यांना खुपेल असे यौवन, चेहर्‍यावर सतत चक्रम भाव आणि कोणाच्या टाळक्यात येणार नाही अशा विषयांवर बडबड!

दया वॉज ट्रिव्हिया! की ट्रिव्हिआ, जे काय असेल ते!

असंबद्ध विषय ती असे बोलायची जणू त्यात पी एच डी करायची असावी. काय तर म्हणे वटवाघळे उलटी का लटकतात माहितीय का?

स्वखुषीने करकचून आवळली गेली तरी पापणीही न मिटता असंबद्ध बडबड करू शकणारी मी पाहिलेली ही एकमेव व्यक्ती!

नदीतला धोंडा होणे हे माझे स्वप्न! प्रवाह आपल्याला भिजवून जात आहे. आपण त्यात बुडत आहोत. पण हालत नाही आहोत. मगाशी आलेला थेंब आत्ता कुठल्याकुठे पोचलेला आहे आणि कुठल्याकुठे असलेला थेंब किती वेगात आपल्याला धडकायला येत आहे. आपल्यावर पाय ठेवून किती जण नदी ओलांडतायत. किती पक्षी आपल्यावर बसून नदीतले मासे शोधतायत. आणि आपण अगदी गुळगुळीत होऊनही स्वतः सटकत नाही आहोत. आह!

कुंदन साडी सेंटरमध्ये एखाद्या विवाहितेने चारशेचे बजेट ठेवून साडी आणायला जावे आणि चार हजाराची साडी घेऊन घरी यावे तशी दया जितकी भेटेल असे वाटायचे त्याच्या दसपट भेटायची.

संस्कारांप्रमाणे जो तो वागू पाहात असतो. संस्कार प्रत्येकाचे आई वडील चांगलेच करतात. थोड्या फार फरकाने, असे म्हणता येईल फार तर. पण एक वेळ अशी येते की माणूस त्या संस्कारांच्या बंधनातून मुक्त होतो आणि मग त्याला स्वातंत्र्य असते निवड करण्याचे. चांगले वाईट कळत असूनही वाईट वागू शकण्याचे. सर्वमान्य नीतीमत्तेपासून डेव्हिएट होण्याचे स्वातंत्र्य! जबाबदारी स्वतःस्वतःचीच! अशा वेळी माणूस आनंदात असतो. 'आज तू काय काय केलेस' या प्रश्नाचे उत्तर द्यायला तो बांधील राहिलेला नसतो. पण कसलेच संस्कार नसतील तर माणसाला स्वतःचे चांगले वाईट हे स्वतः अनुभव घेऊन ठरवावे लागते.

जसे दया ठरवायची. दयावर संस्कार झालेले नव्हते. तिला आई वडील नव्हते. पोरकी मुलगी म्हणून प्रथम मला कीव वाटायची. नंतर मला असे आपल्याला वाटले यामुळे स्वतःची कीव वाटू लागली.

एकदा म्हणाली हाऊ मेनी टाईम्स अ मेल कॅन हॅव सेक्स इन अ डे या प्रश्नाचे उत्तर एकाने चौदा दिले म्हणे! बाकीचे म्हणाले हार्डली दोन किंवा तीन! याहू अ‍ॅन्सर्सवर! मी म्हणालो मी आठवड्यातून एकदा करतो. म्हणाली 'का?'! म्हंटलं यापेक्षा कमीवेळा करणे शोभणार नाही. तर म्हणे 'हाऊ मेनी टाईम्स अ मेल कॅन हॅव सेक्स इन अ मन्थ' या प्रश्नावर तुझे उत्तर टाक!

स्त्रिया हासल्या की किणकिणल्यासारखा आवाज करतात. दया भसाडी हसायची. ती दुसर्‍यासोबत हासायची नाही, दुसर्‍याला हसायची. पण अशी हासायची की त्या दुसर्‍यालाही स्वतःचे हसू यावे. जोरात टाळी वगैरे देऊन ती खदखदून हसताना स्वतःचे डोके स्वतःच्या पोटाकडे वाकवायची. ध्यान दिसायची. पण लगेच गंभीर होत विचारायची. विमानाच्या पंखांमुळे थ्रस्ट निर्माण होऊन विमान जमीनीपासून वर उचलले जाते, माहितीय का?

मग तो जो कोण दुसरा असेल तो हसू लागायचा.

शी वॉज ट्रिव्हिया!

जी माहिती असली काय अन नसली काय, काहीच फरक पडत नाही, तशी दया जीवनात असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडायचा नाही.

एकदा आम्ही दोघे कात्रज घाटात गेलो होतो. वरून पुण्याची लांबवर दिसणारी शोभा बघत असताना जरा कुठे रोमॅन्टिक वातावरण निर्माण होतंय तर म्हणाली होस्टेलवरून काढून टाकणार आहेत मला. हे वाक्य बोलताना तिच्या चेहर्‍यावर दु:खाचा लवलेश नव्हता. मी बघतच बसलो त्या शांतपणाकडे! विचारले...

"मग???"

"मुंढव्याला आहे एक पेयिंग गेस्टसाठी जागा.... सिंधी आहेत ते"

"पण तुला का काढणार आहेत?"

"या सेमिस्टरचे पैसेच भरले नाहीत मी"

"का????"

"नव्हते"

"मग... म्हणजे... देऊ का?"

"नको.. तू पैसे दिलेस की तुझा माझ्यावर हक्क निर्माण होणार... मग मला तुझे ऐकून घ्यावे लागणार... मग तुला मी तुझी हक्काची व्यक्ती वाटू लागणार... मग आत्ता आपण जसे येथे बसलो आहोत तसे परत येथे येऊन बसलो तर ते तुला तुझ्या मर्जीने झाल्यासारखे वाटणार आणि... कधीनव्वद एक रिलेशन जरा टिकतंय तोवर त्याला अगतिकतेची झालर लागून त्याचा खेळखंडोबा होणार... त्यापेक्षा मी गेल्या तीन महिन्यात कमवलेले पैसे देऊन शिफ्ट होते मुंढव्याला..."

"असं काहीही होणार नाही दया..."

"त्याचं काय असतं... की माणूस हे जनावरच असतं... कपडे वगैरे घालतं... संशोधनं करून टेक्निकल अ‍ॅडव्हान्समेन्ट्स करतं... संस्कृती निर्माण करतं... पण जनावरच असतं..."

"बकवास... "

"चल जाऊ..."

"तुझी मैत्री का टिकत नाही माहितीय का कोणाशी?"

"माहितीय.."

"का?"

"मला माहीत अहे हे पुष्कळ आहे की? का, कसे, कधी, हे सगळे कशाला हवे?"

"पण मला जे कारण वाटतंय तेच तुलाही वाटतंय का ते तपासायचंय मला..."

"माझी कोणाशीच मैत्री टिकत नाही... सगळ्यांशी भांडणे होतात... मग रात्री एकटीच एकेकाच्या आठवणी काढून मी रडत बसते... पण उपयोग काय? ती माणसे मला विसरून कुठल्याकुठे पोचलेली असतात... माझे कोणाशीच जमत नाही कारण मी असं मानते की प्रत्येक जण स्वतःच्या टर्म्सवरही दुसर्‍याशी मैत्री करू शकतोच... मी तुझा आदर करते... तू माझा करत असशील... तर आपापल्या आवडीनिवडी सांभाळतही आपण मित्र असू शकतो... लोकांचे तसे नसते.. बहुतेकांचे तसे नसते... त्यांना घाई असते की हे जे नाते निर्माण झालेले आहे ते कोण डॉमिनेट करणार हे एकदा ठरूनच जावे... मग त्यात कंफर्ट वाटली तर ते राहतात.. नाहीतर बाहेर पडतात... मला असे वाटते की नाते डॉमिनेट व्हायलाच नको... ते समतोल, सर्व बाजूंनी इक्वल ठेवायला हवे.... "

"तुला कसे माहीत की तुझ्यामतानुसार तू ते नाते नेमके सर्वबाजूंनी ईक्वल ठेवत आहेस? तुझे वागणे काहींना डॉमिनेटिंग वाटू शकेल ना?"

"आय डोन्ट केअर..."

"याला काही अर्थ नाही... तू जे म्हणतीयस त्याचा अर्थ असा होतो की एखादे नाते तुला जसे हवे आहे तसे त्या माणसाने ते ठेवावे..."

"नाही... मी हे म्हणतीय की ते नाते इतपत मॅच्युअर्ड असावे की दोघांचे इगो त्यात समसमान सांभाळले जावेत"

"तुला हेच पटत नाही की तू जो निकष मानत आहेस तो तू स्वतःच पाळत नसशील असेही होत असेल..."

"रश्मीचं काय? देवकुळेचं काय? किरण्याचं काय? मी काय केलं त्यांना?"

"तू ही सगळी नाती विसरूच शकत नाहीस.. मग त्याचा अर्थ असा नाही का? की तुझ्या निकषांनुसार नसलेली नातीही तितकीच महत्वाची होती.. ज्या अर्थी तू ती विसरू शकत नाहीस... आणि त्याचा अर्थ असाही होतो की तू तुझे निकष लादत राहणे आणि त्या नात्यांची तोडफोड करणे ही तुझी चूक आहे... अन्यथा ती नाती छान टिकलीही असती कदाचित..."

"ऐक ना.. मेल लायन दिवसातून वीस तास नुसता बसून असतो... फक्त चार तासच चालत वगैरे राहतो"

"तू असंबद्ध बडबड करतेस त्याचे एक कंट्रिब्यूशन असेलच नाती तुटण्यामध्ये"

अतर्क्य बडबड करणे ही तिची आवड होती. मी टाकलेली कमेंट तिला दुखावून आणि बिथरवून गेली.

"चल निघू..."

"सॉरी..."

ती पुन्हा खुलली... आणि म्हणाली...

"आणि हिमअस्वल पाचशे किलोचं असल्याने तिथले लांडगे त्याला घाबरतात माहितीय का?"

मी खूप हासलो. माझ्या खांद्यावर तिने डोके टेकल्यावर मला तिचा उग्र वास जाणवला. मागून कोणत्यातरी वाहनातून कोणीतरी शिट्टी मारली तसे आम्ही उठलो आणि परतू लागलो.

दयाने सर्व मित्रांना भांडणे करून सोडलेले होते. माझ्याही 'भिंतीना पोपडे' पडतच होते. मागे भिंतीला आलेली ओल मी आता विसरून चाललेलो होतो.

दया असंबद्ध बडबड करत असली तरी ती वेडी नव्हती. तिच्या डोक्यात वेगळेच काही चाललेले असायचे.

तिच्या घर बदलण्याच्या प्रक्रियेत मी झाट लक्ष दिले नाही. तिलाही काही घेणेदेणे नव्हतेच. पण शिफ्ट झाल्याच्या चौथ्या दिवशी रात्री मला तिचा फोन आला. तिचे फोन केव्हाही येतात हे माहीत असल्याने घरी काही अशांतता पसरली नाही. मला म्हणाली..

"त्या सिंध्यांच बाळ माझ्या हातातून पडलं... मला जायला सांगतायत..."

यावर मी काय बोलणार? तिची आणि माझी ओळख एका लायब्ररीत झालेली. तिथे उगाचच झालेली ओळख दोघांनीही उगाचच वाढवलेली. कशात काही नसताना त्या नात्याला नाही ते कंगोरे मिळालेले. मी म्हणालो..

"मग माझ्याकडे राहा आज..."

"ते बाळ रडत पण नाहीये... चांगलं हासतंय... "

"अगं पण तुला जायला सांगतायत ना?"

"हो... पण उद्या..."

"मग ... मग आत्ता काय करायचंय???"

"कॉफी पिऊ... ते बाळ कसं पडलं सांगते ना?"

यडझवंच रिलेशन होतं आमचं! गेलो मी थापा मारून हिला! भेटलो तर दया खदाखदा हासत होती. म्हणे चांगलं खेळत असताना मलाच थडाथडा मारायला लागलं आणि स्वतःचाच तोल जाऊन माझ्या मांडीवरून खाली पडलं! नुसतंच घाबरून रडायला लागलं! मी काय करू? सिंधी म्हणतो असलं नाही चालणार. असली बाळं जन्माला आणायची कशाल मग?

तिचं हासणं पाहून लोक माझ्याकडेच बघायला लागले. हळूहळू मलाही हसूच यायला लागलं सालं!

मग म्हणाली शंभर सीसी म्हणजे सिलिंडरचा व्हॉल्यूम असतो.. त्यात तेवढे फ्युएल मावते....

माझा नदीतला धोंडा झाला होता.. दयाचे थेंब थेंब मला आदळून जात होते...

आपण ज्यांना खिजगणतीतही धरत नसतो ते हळूहळू मनातला एक कोपरा धरतात तेव्हा आपल्याला 'भटाला दिली ओसरी' ही म्हण आठवत नाही. आणि त्या व्यक्तीमुळे आपणच आपल्या मनातून बाहेर फेकले जायला लागतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनाचा एक कणही आपला नसतो. हे फार वाईट.

गाडीत बसल्यावर मी तिला म्हणालो की तू अशी मांडीवरून खाली पडलीस तर तुला कसं वाटेल?

म्हणाली मी तुझ्या मांडीवर बसले तर तू मला पडू देशील होय?

म्हंटलं का ग? आज तुझी भावनिक गरज भागवायला मी वाटेल तेव्हा घरातून बाहेर पडलो याने माझा तुझ्यावर काहीच हक्क निर्माण होत नाही का? 'भिंतीचा रंग जाण्याची प्रक्रिया' मी स्वतःहूनच सुरू केली.

तेव्हा इनकमिंग फ्री आणि आऊटगोईंग दिड रुपया होते. अगदी आमच्या नात्यासारखे. दयाला मनाच्या आत घेताना फ्री घेता येते, पण बाहेर घालवण्याची मात्र किंमत पडते!

दिल तो पागल है बघायला जावं आणि तिकीट काढून आत गेल्यावर हिम्मतवाला लागावा तसे वाटायचे तिच्याबरोबर! खूप काही चांगलं बोलावं तर उसळून तिसरंच बोलायची आणि तिला वाटेल तेव्हा मात्र मी तिचा असायला हवा!

माझी चूक एकच झाली. मी तिला स्वार्थी समजलो. ती स्वार्थी नव्हती. यडचापही नव्हती. ती तिचे वेगळेपण जपत इतरांना त्यांचे वेगळेपण जपायची फुरसत द्यायची. आगगाडीचे दोन रुळ समांतर जातात तसे ती आणि जग समांतर जात असे. कुठलीकुठली असंबद्ध पुस्तके आणून वाचून त्यातली माहिती तितक्याच असंबद्धपणे सांगत बसायची. ट्रिव्हिअल रिलेशन विथ द वर्ल्ड!

सिंध्याने हाकलले नाही तिला! पण तिने मनातून त्या सिंधी कुटुंबाला हाकलून दिले. प्रोफेशनल रिलेशन्स ठेवली. ते बाळ तिच्याकडे आले की ती ते उचलून घरात आणून ठेवू लागली. लहान मुलांना लळा जितक्या फास्ट लागतो तितक्याच फास्ट त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होऊ शकतो. ते बाळ येईनासे झाले. ते बाळही दयाच्या विचित्र स्वभावाच्या तडाख्यातून सुटले नाही.

एकदा ती आणि मी गाडीतच गप्पा मारल्या खूप! तिला तिच्या आजी आजोबांनी वाढवले होते. ते गेल्यावर मामांची भांडणे झाली. त्यात हिला काही स्थानच नव्हते कारण ही तर बहिणीची मुलगी! ते घरच विकले गेले. ती तिथून बाहेर पडली आणि आजोबांनी तिच्या नावे ठेवलेल्या पैशांवर काही दिवस जगून नोकरी करू लागली. साधीच नोकरी होती. पन्नास हजार अ‍ॅन्यूल पॅकेज होते फक्त! पण तिला काही करायचेच नव्हते. मला म्हणाली मी लग्न करत नाही कारण पटेल असे वाटत नाही कोणाशी!

दया अशी असण्यामागे तिचे अनाथपण होते, ते जेनेटिक होते की एकटेपणामुळे जगात आलेले वैतागवाडीचे अनुभव होते तिचे तिलाही माहीत नसेल.

किस करताना ती तिचे दोन्ही हात वेगळीकडेच मोकळे सोडून द्यायची. जसे काही ओठांचे थोडेही काम हातांनी का म्हणून करावे? किस घेऊन दूर होताना तिचा चेहरा तृप्त, लज्जित, गोंधळलेला, वैतागलेला, सुखी, यातला काहीच नसायचा.. जणू गाडीतून हात बाहेर काढून टोल भरला आणि रिसीट घेऊन पुढे निघालो तशी ती निवांत भासायची.. माझी मात्र जळजळ व्हायची की हे प्रकरण नेमके आहे काय? लगेच पुन्हा अशी बोलायला लागायची जसे काही झालेलेच नाही.... ओठांना हवे ते ओठांनी करावे आणि हाताना हवे ते हातांनी! असल्या काहीतरी फार क्लीअर कॉन्सेप्ट्स होत्या तिच्या.. ती इन्व्हॉल्व्ह्ड आहे की नाही हे मला ठरवता यायचे नाही.... आणि त्यातच तिचे 'दयापण' असायचे.. तिच्या मनाचा तळ कोणाला गाठताच येणार नाही हे एन्शुअर करणे या एकाच सामर्थ्यावर ती बहुधा जगात टिकून असावी...

आपल्याला वाटते काय सालं सामान्य लोकांवर लिहायचं? आपणही सामान्य आणि सगळेच सामान्य! पण मनापासून सांगतो की प्रत्येक माणसात एक कादंबरी असते... प्रत्येक माणसावर ग्रंथ लिहिता येईल... माणसाच्या उमेदीवर कविता होऊ शकते आणि हतबलतेवर गझल! सौंदर्यावर गीत होऊ शकते आणि कुरुपतेवर मुक्तछंद!

तुमच्याआमच्या आयुष्यात नाही का आपापल्या दृष्टीने सगळं काही असामान्यच असतं? स्वतःपुरतं? तसंच प्रत्येकातील असामान्यत्व जाणणे या पातळीला पोचता यायला हवे. पण त्यात एक मोठ्ठा अडथळा आहे.

..... - दया- .... हा तो अडथळा!

आणि त्या दिवशी भिंतीचा रंग थोडासा गेलाच...

... मला मेसेज केला तिने... रात्री साडे आठला... तीन हजार देतोस का? जरा अडचण आहे...

मी 'शक्य नाही, सॉरी' असे उत्तर पाठवले आणि घरातल्या लोकांबरोबर रमून गेलो.. तिच्या नदीतला धोंडा व्हायचे असेल तर तिचा आपल्याला न स्पर्शता निघून गेलेला थेंबही कसा आणि का होता हे विचारायला पाहिजे ना? मी नाहीच विचारले. मग नदी थोडी आटली हेही लक्षात आले नाही...

दुसर्‍या दिवशी दुपारी मला आठवले.. च्यायला हिला कसली अडचण आली? विचारले तर तिने 'ओह हाय... हाऊ आर यू?' असे उत्तर पाठवले... मग मी पुन्हा विचारले... 'अगं काल काय झालं होतं?' म्हणाली कुठे काय? मग तिने बोलणेच बंद केले.. तीन हजारामुळे मैत्री तुटत असेल तर ती मैत्रीच नाही असे मी समजलो आणि मीही चूपचाप बसलो.. आजवर तिच्यापायी काही कमी खर्च झालेला नव्हता माझा... तिने हे लक्षात ठेवायला हवे असे मला वाटले..

आणि चक्क तीन आठवड्यांनी तिचा मला भला मोठा मेसेज आला..

'तीन हजारांत जुनी लुना मिळते.... तीन हजारात एक मुलगी एक महिना काढू शकते.... तीन हजारात एक वेळचे डिनरही होऊ शकते काही जणांचे... आणि तीन हजारांत प्लॅस्टरही बसते गुडघ्याला.. '

या मेसेजवर मी केलेले सर्व दहा ते बारा कॉल अनअ‍ॅन्सर्ड गेले.. तिच्या घरी गेलो तर सिंधी म्हणाला ती आता तिच्या मामाकडे राहते... औरंगाबादला.. जोरदार पडली होती टू व्हीलरवरून... हेल्मेटमुळे डोके बचावले.. आम्हीच अ‍ॅडमीट केले तिला...

सिंध्याने बहुतेक तिला फोन करून सांगितले असावे हा आला होता म्हणून.. कारण तिचा मेसेज आला..

' यू नो व्हाय बॅट्स हॅन्ग अपसाईड डाऊन? कारण त्यांच्या पायात ताकदच नसते उभे राहायची'

'आय अ‍ॅम सॉरी.. मला तू ते तेव्हाच सांगितले असतेस तर मी धावलो असतो'

'हो, पण त्यात तुझा इगो सुखावला असता आणि माझ्यावर हक्क प्रस्थापित केला असतास'

'मग मला मेसेज तरी कशाला केला होतास तीन हजारांचा?'

'कारण मैत्री कशी टिकते माहितीय का? काहीही न विचारता धावून जाण्यामुळे'

हा 'ट्रिव्हिया' मात्र मला मुळासकट हादरवून गेला...

तरी मी एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला...

"तू धावली असतीस का अशी?"

उत्तर आले...

'मी धावले असते का नाही हा प्रश्न येणार नाही.. तू पडला असतास तर स्वतःहून धावून येणारे खूप जण होते.. माझी लिस्टच फक्त दोन तीन जणांची होती.. त्यातल्या वरच्या नंबरला मी पहिला एसेमेस केला.. त्याने नकार दिल्याने मी इतरांना विचारलेच नाही'

मला अतिशय खिन्न वाटले. ती सत्य बोलत होती. पण तिने पहिल्याच मेसेजला ती पडल्याचे सांगितले असते तर माझ्याबरोबर माझी बायकोही आली असती

मला दयाचा राग आला... तिने का सांगितले नाही ती पडल्याचे पहिल्याच मेसेजला?

विचारले मी मेसेज करून...

तिचे उत्तर आले..

'तू मदत नाकारावीस हीच माझी इच्छा होती... नाहीतर ही मैत्री संपलीच नसती... मला नाती तोडून मग त्यावर रडत बसायचा छंद आहे'

भिंतीचा पूर्ण रंग गेला होता. आता एकही पोपडा नव्हता. आणि या भिंतीला पुन्हा रंग द्यायचे धाडसही उरलेले नव्हते...

नदीने वळण घेतले होते.... गुळगुळीत धोंडा आता केवळ उन्हच झेलायला सज्ज झालेला होता..

... पण नेमकी तेव्हाच माझ्या आयुष्यात एक तिसरीच भिंत उभी राहात होती...

... ही भिंत मला मुळासकट हादरवणारी होती.... आणि स्वतःचा रंग कधीच न जाऊ देणारी ...

पण दयाचे मनस्वी वागणे कोरलेच गेले... जे नाते संपताना फक्त आठवडाभरच त्रास होतो ते नाते कधी नसतेच...

... तिचा आणखी एक ट्रिव्हिया... अ ट्रिव्हियल रिलेशन...

तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो

-'बेफिकीर'!

(नांव काल्पनिक)

=========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399

थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मस्त !

<'कारण मैत्री कशी टिकते माहितीय का? काहीही न विचारता धावून जाण्यामुळे'>>

आवडले

काश...!! बेफि....तुम्च्याबरोबर एकदा तरी भेटावं...असं वाटतं....me india t aalo ki please vel kadha mazya sathi.....ayalaa chaavataa rao tumhee....bhungaa zala dokyaacha....tooo goood....

खुप आवडली बेफि.... माझं नेहमीचं वाक्य पुन्हा म्हणेन मी.... "कथेपेक्षा जीवनावरील \ नात्यांवरील भाष्य..... जबरदस्त!!"

"नको.. तू पैसे दिलेस की तुझा माझ्यावर हक्क निर्माण होणार... मग मला तुझे ऐकून घ्यावे लागणार... मग तुला मी तुझी हक्काची व्यक्ती वाटू लागणार..." खरच अशीच भावना होते.......

सीमा गैलाड चीच बहिण वाटली ही. आणि शेवटी तुम्ही ते कनेक्ट (लिंक) टाकल्याने दुजोरा मिळाला.
नदीतल्या धोंड्याचा प्रवास आवडला, त्याचं अंताला कोरडं पडणंही पोचलं, तसा आपल्यातला प्रत्येकजण हर्ट होण्यासाठीच धडपडत असतो, दयासारखं कुणी बोलून दाखवतं, इतकंच काय ते!

अफलातुन बेफिजी,..... वाचकालाच रंगीबेरंगी करुन सोडता......आणि.... 'आता माझा रंग कोणता?' ..असे वाचकानेच पुन्हा म्हणवे. Happy -- तशी विनोदाच्या अंगाने वैचारिक भाषा खुपच संभळावी लगते. ते कसब तुमच्या लेखणीत स्पष्ट जाणवते. .

Like !!

next ??

प्रत्येक माणसात एक कादंबरी असते... प्रत्येक माणसावर ग्रंथ लिहिता येईल... माणसाच्या उमेदीवर कविता होऊ शकते आणि हतबलतेवर गझल! सौंदर्यावर गीत होऊ शकते आणि कुरुपतेवर मुक्तछंद!

Tooo good sentence 100/100

नदीतला धोंडा होणे हे माझे स्वप्न! प्रवाह आपल्याला भिजवून जात आहे. आपण त्यात बुडत आहोत. पण हालत नाही आहोत. मगाशी आलेला थेंब आत्ता कुठल्याकुठे पोचलेला आहे आणि कुठल्याकुठे असलेला थेंब किती वेगात आपल्याला धडकायला येत आहे. आपल्यावर पाय ठेवून किती जण नदी ओलांडतायत. किती पक्षी आपल्यावर बसून नदीतले मासे शोधतायत. आणि आपण अगदी गुळगुळीत होऊनही स्वतः सटकत नाही आहोत. आह!>>>>
खुप आवडला...मला पण असच काहीतरि वाटत पाण्याबद्द्ल..ते हेच असाव.