गझल
माझे न काही, जे काय आहे, ते सर्व आहे परमेश्वराचे!
माझी न काया, माझी न छाया, श्वासांवरीही स्वामित्व त्याचे!
जन्मास आल्यापासून माझ्या वाट्यास आली झोळी रिकामी;
आली न विद्या, आली न लक्ष्मी, आयुष्य जगलो भिक्षेक-याचे!
गुंडाळतो मी जितका पसारा, तितका नव्याने होतो पसारा!
नाही मलाही, आता कुठेही, कोणामधेही गुंतावयाचे!!
केला जिवाचा आटापिटा मी! बाहेर येण्या कर्जातुनी मी,
मुद्दल निराळे, मी व्याज देखिल फेडू न शकलो देणेक-याचे!
जे वार झाले, ते पाठमोरे! मी वाचलो...ही किमयाच आहे!
अद्याप ओझरते तोंड देखिल मी पाहिले ना मारेक-याचे!!
माझ्यासवे तू आहेस देवा, इतकी विनवणी माझी तुला की,
होकारण्या दे बुद्धी विवेकी, धारिष्टही दे नाकारण्याचे!
मी दूर इतका चालून आलो, ते फक्त माझ्या स्वप्नामुळे मी;
राहून गेले सत्यात अंती ते स्वप्न माझे साकारण्याचे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
निरळे ऐवजी निराळे आणि धारिष्ट
निरळे ऐवजी निराळे आणि धारिष्ट ऐवजी धारीष्ट्य असे केल्यास आपली ही अजून एकगोटीबंद गजल होईल.
गोटीबंद म्हणजे काय? हे मात्र पुसू नका.
काव-काव
सुंदर गझल
सुंदर गझल
प्रत्येक शेर भरतीचा
प्रत्येक शेर भरतीचा वाटला.
भरतीच्या शब्दांना भरती आल्यासारखे वाटले.
प्रोफेसर, आपण कुमारावस्थेत असताना ही गझल लिहीली होतीत काय?
जे वार झाले, ते पाठमोरे! मी
जे वार झाले, ते पाठमोरे! मी वाचलो...ही किमयाच आहे!
अद्याप ओझरते तोंड देखिल मी पाहिले ना मारेक-याचे!!
मी दूर इतका चालून आलो, ते फक्त माझ्या स्वप्नामुळे मी;
राहून गेले सत्यात अंती ते स्वप्न माझे साकारण्याचे! .... अतिशय छान. छान म्हणजे अफलातून
खुप खुप धन्यवाद देवसर.
गुंडाळतो मी जितका पसारा,
गुंडाळतो मी जितका पसारा, तितका नव्याने होतो पसारा!
नाही मलाही, आता कुठेही, कोणामधेही गुंतावयाचे!!
>>>> +१००
अप्रतिम
केला जिवाचा आटापिटा मी! बाहेर येण्या कर्जातुनी मी,
मुद्दल निराळे, मी व्याज देखिल फेडू न शकलो देणेक-याचे!
>>>>> खुपच खास
माझे न काही, जे काय आहे, ते
माझे न काही, जे काय आहे, ते सर्व आहे परमेश्वराचे!
माझी न काया, माझी न छाया, श्वासांवरीही स्वामित्व त्याचे!....................... कविता
माझी न काया, माझी न छाया, श्वासांवरीही स्वामित्व त्याचे!
माझे न काही, जे काय आहे, ते सर्व आहे परमेश्वराचे!................................. गझल
..................................................................... ही रचना मला फारच संभ्रमीत करून गेली.
गुंतण्याचा शेर छान वाटला.
काही ओळी आवडल्या: जन्मास
काही ओळी आवडल्या:
जन्मास आल्यापासून माझ्या वाट्यास आली झोळी रिकामी;
गुंडाळतो मी जितका पसारा, तितका नव्याने होतो पसारा!
मुद्दल निराळे, मी व्याज देखिल फेडू न शकलो देणेक-याचे!
अद्याप ओझरते तोंड देखिल मी पाहिले ना मारेक-याचे!!
मी दूर इतका चालून आलो, ते फक्त माझ्या स्वप्नामुळे मी;
या गझलेतील द्विपदी मला काहीश्या वर्णनात्मक वाटल्या. गझलेची जादू जाणवली नाही. माझ्या आकलनातील दोषही असेल.
विदिपा ,शामजी व बेफीजी
विदिपा ,शामजी व बेफीजी म्हणाले तेच मला म्हणायचे आहे