कपात माझ्या

Submitted by निशिकांत on 26 June, 2012 - 02:42

वादळ आले आणी विरले कपात माझ्या
कधीच धडधड झाली नाही उरात माझ्या

तुझा हात हातातुन सुटता अजब जाहले
काळ थांबला सरकत नाही घरात माझ्या

कांगारूसम पोटी धरुनी वाढवले पण
दूर जायची आस जागली पिलात माझ्या

खळे संपले तसे उडाले पक्षी सारे
अता सुनेपण वस्तीला वावरात माझ्या

कलियूगी पण दशरथ दिसती पुत्रवियोगी
दु:ख जयांचे लिहितो मी अक्षरात माझ्या

आनंदाने श्रोते देती टाळ्या जेंव्हा
दु:ख मनीचे फुलून येते सुरात माझ्या

भाव घालती आभाळाला जरी गवसणी
रोज गिरावट होतच असते दरात माझ्या

उजाड कोठी, रोज मैफिली, मुजरे, गाणे
हमिदाबाई जुनीच ताजी मनात माझ्या

चारोळ्या अन् नवकाव्याची अशी सुनामी!
कोण वाचतो सुमार गजला जगात माझ्या

"निशिकांता"विन अंधारातच मीही जगले
चंद्र तारका कधीच नव्हत्या नभात माझ्या

निशिकांत देशपांडे मो. क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

गुलमोहर: 

कलियूगी पण दशरथ दिसती पुत्रवियोगी
दु:ख जयांचे लिहितो मी अक्षरात माझ्या

आनंदाने श्रोते देती टाळ्या जेंव्हा
दु:ख मनीचे फुलून येते सुरात माझ्या

भाव घालती आभाळाला जरी गवसणी
रोज गिरावट होतच असते दरात माझ्या
>>>

शेर आवडले

चारोळ्या अन् नवकाव्याची अशी सुनामी! (त्सुनामी) Happy
कोण वाचतो सुमार गजला जगात माझ्या>> ओळ आवडली

एकुण गझल छानच

अभिनंदन Happy

काका .
......ग्रेट आहात तुम्ही

मतलाच इतका जानलेवा आहे की पुढची गझल वाचताना माणुस स्वतःचा उरतच नाही..............
कलिजा खल्लास् , जान् कुर्बान् आहे ही गझल

मस्त