"घुटी"सब्जी..

Submitted by सुलेखा on 25 June, 2012 - 04:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेतातुन "नवे बटाटे "येतात तेव्हा सालासकट या बटाट्याची अशा पद्धतीची भाजी करतात.साल कोवळे ,पातळ असते.वेगळ्या चवीचे फर्मास कालवण तयार होते .या भाजीबरोबर पराठा,गाकर काहीही चालते.
बटाटे ४ मोठे.
लहान कांदा,लसुण पाकळ्या २/३,किसलेले आले १ चमचा.१ चमचा जिरे,१ हिरवी मिरची,बारीक चिरलेली कोथिंबीर -साधारण पाव वाटी् हे सगळेमिक्सर मधे वाटुन घ्यायचे.जर कांदा सालासकट गॅसवर भाजुन घेतला तर मसाला जास्त छान चवीचा होतो..
२/३ टोमॅटो चिरुन त्याची मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्यावी.
पंचफोडण १ चमचा..
पाव चमचा हिंग..
१ चमचा बडीशोप भरडुन घ्यावी..
हळद पाव चमचा.
२ मसाला वेलची सालासकट..
लाल तिखट व मिठ चवीनुसार.
१ चमचा धनेजिरेपुड.
अडीच किंवा तीन कप पाणी..[बटाटा फोडींच्या अंदाज घेवुन लागेल तसे]
२ चमचे तूप फोडणीसाठी..

क्रमवार पाककृती: 

बटाटे धुवुन एकाच्या चार फोडी कराव्या.[लहान असतील तर दोनच .]
ही भाजी कूकर मधे करायची आहे.
कूकरमधे तूपाची फोडणी करायची आहे..तेव्हा तूप गरम झाले कि त्यात पंचफोडण व मोठी वेलची घालावी .नंतर त्यात हिंग,बडीशोप वाटलेला कांदा मसाला घालुन छान परतले गेले कि त्यात बटाट्याच्या फोडी घालुन पुन्हा परतुन घ्यायच्या.
आता त्यात तिखट-मीठ-धनेजिरेपुड व शेवटी टोमॅटो पेस्ट घालुन परतायचे.
आता शेवटी पाणी घालायचे व कूकरचे झाकण लावुन ४-५ शिट्या काढायच्या.कूकरचे प्रेशर गेले कि कूकर उघडायचा.व ही भाजी घुट्याने नीट घोटुन घ्यायची.घुटा म्हणजे पराठे दाबुन करारे[खरपुस ]भाजण्यासाठीचा भिंगरीवजा लाकडी खुंट.घुटा शब्द लिहीताना व उच्चारताना ,घुट्याच्या "ट" अक्षराखाली मिंड/टिंब असते त्यामुळे उच्चार "ट्ट" असा होतो.तेव्हा या घुट्याने भाजीतले बटाटे ठेचुन भाजी पळीवाढ तयार होते ही भाजी एकसार मिळुन येते .म्हणुनच या भाजीला घुटी सब्जी म्हणतात.मसाला वेलची,बडीशोप , पंचफोडण ,कोथिंबीर व फोडणीच्या तूपाची चव छान लागते.घुटा नसेल तर पळी-डावाच्या खालील बाजुने घोटावी.
ghuttee sabjee...JPG
ही भाजी झन्नाट हवी असेल तर भिजलेल्या लाल मिरच्यांचे वाटण करावे.
गाकर-
३ वाट्या गव्हाची कणिक २ चमचे तेलाचे मोहन .चवीपुरते मीठ व अर्धा चमचा ओवा घालुन पुरीसाठी भिजवतो तसे घट्ट भिजवुन घ्यावे.भिजवलेल्या पिठाच्या गोळ्याला वरुन तेलाचा हात फिरवावा..१० मिनिटानी फुलकापोळी पेक्षा दुप्पट गोळाघेवुन पोळपाटावर पुरीइतका मोठा पण जाड लाटायचा..तव्यावर दोन्हीकडुन फुलक्यासारखा भाजुन नंतर मध्यम गॅसवर चिमट्याने उभा धरुन,गोलाकार फिरवत्,सगळीकडुन भाजायचा..लगेचच फुगतो. असा गाकर भाजुन घ्यायचा त्यावर थालिपिठाला करतो तसे बोटाने दाबुन मधे एक व चार बाजुला चार असे खळगे [आर-पार नाही] करायचे व वरुन तुप लावायचे.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पोटभर..
अधिक टिपा: 

या भाजीत तयार गरम मसाला घालत नाही.त्यामुळे वेगळ्या चवीची भाजी होतें.बटाट्याचे साल भाजीत मिळुन येते.
कांदा-लसुण मसाला घातला नाही तरी ही भाजी छान लागते.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा वीकनेस = गाकर.
>>गाकर-
३ वाट्या गव्हाची कणिक २ चमचे तेलाचे मोहन .चवीपुरते मीठ व अर्धा चमचा ओवा घालुन पुरीसाठी भिजवतो तसे घट्ट भिजवुन घ्यावे.भिजवलेल्या पिठाच्या गोळ्याला वरुन तेलाचा हात फिरवावा..१० मिनिटानी फुलकापोळी पेक्षा दुप्पट गोळाघेवुन पोळपाटावर पुरीइतका मोठा पण जाड लाटायचा..तव्यावर दोन्हीकडुन फुलक्यासारखा भाजुन नंतर मध्यम गॅसवर चिमट्याने उभा धरुन,गोलाकार फिरवत्,सगळीकडुन भाजायचा..लगेचच फुगतो. असा गाकर भाजुन घ्यायचा त्यावर थालिपिठाला करतो तसे बोटाने दाबुन मधे एक व चार बाजुला चार असे खळगे [आर-पार नाही] करायचे व वरुन तुप लावायचे<<

सो थोडं डीटेलिंग करू?

गाकर = गव्हाची भाकरी. थिकनेस सांगण्यासाठी. (सॉर्ट ऑफ. तितका तरी जाड हवा : हे दुप्पट गोळा + पुरीची साईझ याने डिफाईन झालं असे समजू.)
४ खळगे = अ‍ॅक्चुअली ५. मध्यभागी १. चिम्टी काढायची असते. भाजून झाल्या नंतर. थालिपिठाला चुलीवर ठेवण्याआधी बोटाने खळगा पाडतो आपण. गाकर गरम असताना बोटाने काढायला जमत नसेल, तर सांडशीने काढावी.
वरुन साजुक तूप.
खमंग गाकर नुसता खाल्ला ना चिमूटभर मीट टाकून किंवा तिळाच्या चटणी सोबत.. म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म..

मस्त वाटतेय कृती. करुन पाहीन. गाकर उभा धरुन गोलाकार फिरवून भाजायचा म्हणजे कसा ते कळलं नाही.
पापड किंवा भाकरी भाजतो तसे तव्याला समांतर प्रतलात नाही का भाजायचे ? तव्याला ९० अंशाचा कोन करुन भाजायचे ? अन मग आकाशपाळणा फिरतो तसे गोल फिरवायचे का ?

मेघा,आकाशपाळणा फिरतो तसेच पण ९० अंशापेक्षा कमी,थोडेसे तिरके धरायचे .गॅस कमी ठेवायचा. नाहीतर गाकर वरुन जळेल्.अजुन जाड करता येतील.ते आतुनही भाजले गेले पाहिजेत्.फार पुर्वी माझी आजी तळहातावर थापुन करायची.यालाच "टिक्कड" असे म्हणता. असे २ किंवा ३ टिक्कड एकसाथ मातीच्या तव्यावर भाजायचे.नंतर चुलीतली लाकडे एका बाजुला सारुन गरम राखेवर उभे टेकवुन भाजायचे.त्यानंतर कालामानातील बदलाप्रमाणे आजी व आई दगडी कोळशाच्या शेगडीवर हे गाकर करायच्या.गाकरासाठी खास रवाळ कणिक दळवुन आणायची.याच कणकेची बाटी-बाफले ,उकरपेंडी व शीरा खुपच छान व्हायचा.ती चव गॅसवर येत नाही हे मात्र खरे.

आर्चना,पंच फोडण म्हणजे-मोहोरी,जिरे,कलोंजी[कांद्याचे बी-हे काळ्या तीळासारखे दिसते]बडीशोप ,मेथीदाणा या पाच वस्तु ..कलोंजी सोडुन बाकी आपल्या घरात असतात तेव्हा त्या टाकाव्या तरी चालेल.ईं.ग्रो./पटेल कडे पंचफोडण या नावाने मिळते.वेग-वेगळ्या "दाल्".भोपळा,दुधी,झुकिनी च्या भाजीत पंचफोडण ची चव छान लागते.दाल साठी वरुन तूपाची फोडणी द्यावी.

आज ही भाजी केली होती. मस्त चव आहे Happy अंदाजापेक्षा थोडी जास्त पातळ झाली, पाण्याचे प्रमाण कमी करायला हवे होते. आहे तीच चव बर्‍यापैकी झणझणीत वाटली, त्यामुळे लाल मिरच्यांचे वाटण घालायचा प्रश्नच नाही! शुद्ध तूप, बडीशोप, वेलदोडा, पंचफोडण यांचा स्वाद अप्रतिम लागतो.

मस्त कृती.
एक सूचना - याला 'बटाटा' असा कीवर्ड द्या ना शाकाहारी, माळवी खासियत या बरोबर. नंतर शोधायला सोपं जाईल

वरदा,तुझ्या सुचनेप्रमाणे बदल केला आहे.
अरुंधती,सुरवातीला पातळ दिसणारी भाजी काही तासाने घट्ट होते..अजुन एक अगदी ताज्यापेक्षा काही तासानी भाजी मुरल्यामुळे चव खुप छान लागते.