पाऊस माझा; तुझी कहाणी...

Submitted by हर्षल_चव्हाण on 20 June, 2012 - 08:25

गडबड झाली, सर आली,
ओल-ओल ही जमीन न्हाली...

सरसर ओली ध्यानी-मनी,
आठवणींचीच खोड जुनी,
वाहत जाती कुठे कुठे की,
सरी सयींचे खेळ जसेकी...

झरझर ओल्या नयनांना,
सावर पाऊस झेलतांना...

दारी पडल्या गारांमधूनी,
अवखळ नाचे तू अजूनी,
अल्लड अल्लड बालपण,
हसू लागले नवजीवन...

गरगर गिरकी फसलेली,
पाऊस पाहून हसलेली...

आपण दोघे भिजलेलोही,
भरीस याच्या थिजलेलोही,
पाऊस मला तेव्हा गमला,
हात तुझा मी जेव्हा धरला...

आता पाऊस पडतो पण,
आजही तो आवडतो पण...

पाऊस आज हरवलेला,
तुझ्यापासुनी दुरावलेला,
पाऊस पाऊस आठवण,
ओंजळ ओंजळ साठवण...

नवलाई ती तशीच आणि,
पाऊस माझा; तुझी कहाणी...
===============================================================
हर्षल (२०/६/२०१२-सायं. ५.५५)
===============================================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: