नेमके तेच झाले!

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 June, 2012 - 09:23

मनाजोगते एवढे हेच झाले....
नको वाटले, नेमके तेच झाले!

असे वाटले उत्तरे गवसली, ....पण.....
दिल्या उत्तरांचे नवे पेच झाले

मिळवले, घटवले, गुणाकार केला...
समिकरण बिघडले नि भलतेच झाले.

किती कोळसे राख झाले, जळाले.....
चमकत्या हि-यांचेच शिरपेच झाले

धपांडी कुणी घातली ऐनवेळी?
'प्रिया' राज्य खेळात अर्धेच झाले

-सुप्रिया.

गुलमोहर: 

वाह सुप्रियाताई

जबरदस्त गझल (............चझल Happy )
सगळेच शेर खूप खूप आवडले

मतला आणि खासकरून माक्त्यासाठी दंडवत स्वीकारा ...........

___________/\____________

("समिकरणा"त एक लघु-गुरू कमी-जास्त झाला आहे का........ लयीत म्हणता येत नाहीय जरा अडखळल्या सारखे होतेय .........)

धन्यवाद वैवकु...

<<<<("समिकरणा"त एक लघु जास्त झाला आहे का तपासून पाहावे असेल तर दुरुस्त करावे .........)>>>>

स मिक रण

ल गा गा

Happy

ओके ओके सुप्रियाताई
धन्यवाद ........

आधी अगदीच चुकले आहे असे लिहिले मग माझा प्रतिसाद एडीट केला तोवर आपला प्रतिसाद आलेला पाहिला
पण लयीत वाचता येत नाही असे का होतेय मग .......तज्ञान्ना विचारीन म्हणतो माझी शंका दूर होईल इतकेच

मनाजोगते एवढे हेच झाले....
नको वाटले, नेमके तेच झाले! >> वाह! आवडला Happy

समिकरणात एक लघू जास्त असावा.. पुलेशु Happy

स मिक रण

ल गा गा >> अरेच्चा! होच की..!! पण लयीत वाचताना थोडं अडखळायला झालं म्हणुन वाटलं असं.. असो.. Happy

असे वाटले उत्तरे गावली, पण.....
दिल्या उत्तरांचे नवे पेच झाले

>>>
गावली ऐवजी गवसली चालणार नाही का?

स मिक रण । बि घड ले । नि भल ते । च झा ले.
ल लल लल । ल लल गा । ल लल गा । ल गा गा
ल गा गा । ल गा गा । ल गा गा । ल गा गा

लघु गुरू सूट प्रामाणाबाहेर झाली आहे म्हणून अक्षरसंख्या कितीतरी अधिक( १२ ऐवजी १६ )
यतीस्थान भरकटले आहे असे वारंवार झाले आहे (ज्या अक्षरसंख्येवर यायला हवे तिथे नाही इतरत्र आहे )
त्यामुळे अक्षरगणवृत्ताची(भुजंगप्रयात) नैसर्गिक लय बिघडली आहे.
या गझलेत इतरत्र असा प्रकार एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे त्यामुळे ही ओळ तेवढी खटकते

उपाय : अक्षरगणवृत्तात लगावली सोबत अक्षरसंख्या तितकीच महत्त्वाची आहे (यतिस्थानही अक्षर संख्येवर ठरते शब्दावरून नव्हे )पण प्रत्येक वेळी ती पाळणे सहजसाध्य नसते म्हणून बव्हंश कवी आशाप्रकारच्या र्‍हस्वदीर्घाची सूट मान्य करू लागले(यतिस्थानाचीही)
........आताशा ही सूट असून नियम नाही हे लक्षातही येत नाही अशी स्तिथी झाली आहे

असो उपरोक्त ओळीत किमान दोन 'लल' चे 'गा' असे शुद्धरूपांतर करावेत अक्षरसंख्या दोनेक अक्षरांनी कमीजास्त झालेली चालेल अगदीच ४ / ५ अक्षरे नको

असो !!!

शेवटी हा फक्त एक मतप्रवाह आहे नियम नाही

या ओळीपुरती ही गझल मात्रावृतात आहे बाकी अक्षरगणवृतात.... असेही म्हणता येतेच म्हणा

लोभ असावा राग नको

प्लीज गैर्समज करून घेवू नये ही कळकळीची विनन्ती !!

आपला नम्र
वैवकु

समिकरण बिघडले नि भलतेच झाले.
या ओळी बरोबरच
असे वाटले उत्तरे गवसली, ....पण.....
या ओळीतही थोडीसी ओढाताण होते आहे..
बाकी गझल आवडली.

धपांडी कुणी घातली ऐनवेळी?
'प्रिया' राज्य खेळात अर्धेच झाले
>>>

व्व्वा व्व्व्वा

किती वर्षांनी हा शब्द ऐकला आणि किती अर्थपूर्णरीत्या तो या शेरात आला आहे

वा वा