ने मला कुठेही..

Submitted by भारती.. on 7 June, 2012 - 11:56

ने मला कुठेही..

कशामुळे कोणती स्मृती जागृत होईल सांगता येत नाही..स्टीव्ह जॉब्झचं अधि़कृत चरित्र वाचताना एक विस्मरणात गेलेली माझीच कविता आठवली 'ने मला कुठेही '..

खरं तर मृत्युला उद्देशून लिहिलेली,किंचित 'मुझे गलेसे लगा लो बहुत उदास हूं मैं ' मधून प्रेरित झाल्यामुळे एक दूरस्थ धाग्याने एलिझबेथ ब्राउनिंगशीही जोडली गेलेली अशी ही कविता.

इतके भरभरून जगणार्‍या,मृत्युच्या आवळल्या जाणार्‍या पाशातूनही बुद्धीची चिकित्सा मंदावू न देणार्‍या स्टीव्ह जॉब्झला अन्तिम पर्वात असेच काहीतरी जाणवले असेल..

तोही तसा भारतीयच,आहाराचे आणि अध्यात्माचे त्याचे सत्याचे प्रयोग आयुष्यभर तितक्याच तीव्रतेने जोपासणारा,जितक्या आक्रमकतेने त्याने तन्त्रज्ञानात नवनिर्मिती आणि सौंदर्यनिष्ठा यांचे भान सांभाळले..

अर्थात,अगदी शेवटच्या श्वासातही तो नाही म्हणणार 'आता कशास सोस अर्थस्वी उत्तरांचा- आला सुशांत वारा दुरूनी दिगंतराचा' !!कबूल!!तरीही ही कविता आज तुला अर्पण स्टीव्ह ,कारण तुझ्यामुळे ती माझ्या विस्मृतीच्या 'काळ्या वनस्थळी'तून पुनः प्रकट झाली..

ने मला कुठेही...

प्रियतम तुझ्या दिशेला असतील दीप विझले
काळ्या वनस्थळीत किन्तु समस्त निजले
येथे अजून जाग ..जरी मंडळी विखुरली
आरास उत्सवाची संपूर्ण नाही सरली

त्या उत्सवात होते उन्माद उन्मीलित
आनंद देहधारी .. छळवाद मूर्तीमंत
सर्वांस शाप होता सर्वस्व पिंजण्याचा
कोलाहलात सार्‍या स्वरमेळ शोधण्याचा

मीही इथे स्वतःशी संघर्ष मांडलेला
शृंगार यातनांचा मीही सहर्ष केला
जपली मनात मीही काही फकीरगीते
स्वप्नात ऐकलेल्या सत्यात तथ्य होते?

आता कशास सोस अर्थस्वी उत्तरांचा
आला सुशांत वारा दुरूनी दिगंतराचा
निरवेन नाव मीही आता तुझ्या प्रवाही
बाहूंत चंदनाच्या घे,ने मला कुठेही..

-भारती बिर्जे-डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाचनाची भूक शमवली या कवितेने..!
तुमच्याच शब्दांत सांगायचं तर 'तरलतन्मयी'

भारती यांच्या लेखनशैलीच्या अनेक वैशिष्ठ्यापैकी एक हे आहे की त्या कधीही "मी अमुक एक कविता, अमुक एक लेख लिहिला आहे...अमुक तारखेला लिहिला होता...;' असे इथल्या सदस्यांना सांगत नाहीत. कविता लिहिणे आणि ती प्रकाशित करणे....इतकेच आपले कार्य त्या मानतात. हे योग्य की अयोग्य याबद्दल निश्चित मतेमतांतरे होऊ शकतील पण एकदा का साहित्य प्रकाशित झाले की त्याचे दायित्व त्यांच्याकडे त्या ठेवत नाहीत....त्यामुळे गोची होते ती त्यांच्या साहित्यावर प्रेम करणार्‍या माझ्यासारख्या अनेक वाचकांची....ज्याला अशा वर्षापूर्वीच्या साहित्याचा मागोवा कसा घ्यायचा ते समजत नाही. आज के.अंजली यानी ही कविता वाचली आणि त्यावर आपली प्रतिक्रिया लिहिल्यावर समजले की दीडेक वर्षापूर्वी भारती यांनी लिहिलेली ही कविता किती समर्पक आणि अर्थपूर्ण आहे.

कवितेविषयी....

मृत्यूविषयीची कविता असल्याने शब्दांची योजना करताना दाहक रंगाचा वापर करणे कवयित्रीला नैसर्गिक वाटणे सहजच म्हणावे लागेल, पण त्यातही त्या स्वरमेळ शोधतात ते अनुभवणे खूप समाधान देणारी गोष्ट आहे. एलिझाबेथ बॅरेट-ब्राऊनिंगचा उल्लेख मला साहजिकच आवडला....

"सॉनेट्स फ्रॉम द पोर्तुगीज..." मध्ये एका ठिकाणी एलिझाबेथ म्हणते :

...."Smiles, tears, of all my life ! - and if God choose,
I shall but love thee better after death..."

भारतीदेखील....'ने मला कुठेही...' मध्ये वेगळे काय सांगतात ? दोघींच्याही भावनेचा पदर आयुष्याची हीच व्याख्या सांगत आहे.

कविते रचनेचा सुंदर अनुभव, भारती.

अशोक पाटील

मला भारती यांच्या कविता अनेकदा नीट समजत नाहीत. मला समजते ते इतकेच, की शब्दनिवडीच्या दर्जाचा परमोच्च बिंदू त्या लीलया गाठतात आणि तरीही सगळे खरेखुरे, अस्सल, जातिवंत आहे हे सहज मान्य होते. अतिशय दुर्मीळ अशी ही प्रतिभा आहे.

आता कळलं मी का आभार मानले होते अंजली, बायो ?
धन्स ज्ञानेश, विदिपा, दाद..

अशोकजी, इथे मायबोलीवर दीड वर्षापूर्वीपासून मी कविता देऊ लागले त्याआधी एक संग्रह प्रकाशित होऊनही तशी अप्रकाशितच होते कारण कुठे विशेष न जाणारीयेणारी अशी मी एक कवयित्री, कविता ही माझी एकांत-साधना. प्रतिसाद फारसे नसल्याचं दु:ख नाही कसं,वाटतंच, पण कवितेचा गांभिर्याने विचार अन तीवर प्रेम करणार्‍या मोजक्या प्रतिसादांनीही मी खूप आनंदित होते. माझ्यामुळे कुणी कवितेबद्दल विचार करू लागलं तर तो माझा बहुमान मानते. इथे खूप चांगलं लिहिणारे, समजून घेणारे तुम्हा सर्वांसारखे गुणी लोक आहेत हे माझ्यासाठी पुरेसं आहे. एलिझाबेथ ब्राउनिंगच्या सुंदर शब्दांसाठी आभार !

बेफ़िकीर, तुम्ही स्वतः नीट समजणार्‍या तरीही कुठेही आशयदृष्ट्या कमी न पडणार्‍या कविता लिहित असता.माझा पिंड तसा नाही. तरीही कवितेतून मी एक अनुभवाचा महत्त्वाचा वाण मांडत असते जो सार्वत्रिक असतो..इतकंच .माझ्या कविता दुर्बोध असतात असंही नसावं पण त्या खूप आत्ममग्न अवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत .

शेवटी, पु.शि.रेगे आठवताहेत-

'पक्षी जे झाडावर गाणे गातो

आहे झाडच दुसरे पुनः त्या गाण्यातून..''

तशी जगण्यामरण्यातली कविता आणि कवितेतून येणारं जगणमरणं.

भारती....

प्रतिसादाच्यानिमित्ताने तुम्हाला पु.शि.रेगे आणि "दुसरा पक्षी" ही कविता आठवावी या परता दुसरा आनंद नाही. केवळ सहा ओळींची ती कविता....आणि तो छोटेखानी संग्रह....त्याचे अत्यंत कलात्मक मुखपृष्ठ.... जे तयार केले होते चित्रकार र. कृ. जोशी यानी..... आवृत्ती आठवली मला....केवळ साडेचार रुपये किंमतीची, जी माझ्याकडे आहे आणि आत्ता पुन्हा त्या दडलेल्या पक्षासाठी शोधून काढली.....आणि पाहिली....

ह्या अनोख्या आनंदाबद्दल तुमचेच आभार.

अशोक, ही कविता व त्यावरचे प्रतिसाद वाचत आहे.कृपया ती रेगे यांची कविता संपूर्ण इथे द्या.

जरूर जिगिषा....

मला आनंद होत आहे की, तुम्हालाही या पक्षी ने पछाडले आहे :

"...पक्षी जे झाडावर गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
पक्षी जे झाडावर गातो

झाडावर जे गाणे पक्षी गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा
झाडावर जे पक्षी गातो.. "em>

शब्दसामर्थ्याची वानवा नव्हती रेग्यांकडे....वरील कविताच त्याबद्दल साक्षी आहे.

>>किती सहज खूप काही, किती अलगद, किती खोल.. किती हलकेच किती गडद >>
असेच असतात पु.शिं. चे शब्द .
धन्यवाद रमा,मयी , जिगिषा, अशोकजी.

भारती...

वर "....किती हलकेच किती गडद..." प्रतिसाद देणारी 'रमा' आमच्या कोल्हापूरची कन्या.... कविता प्रांतात खास तयारी आहे तिची. मला वाटते तुमचे प्रतिसाद आहेत तिच्या कवितांवर....वाचल्याचे स्मरते.

होय अशोकजी , तुमच्या या करवीर कन्या आहेत तयारीच्या Happy मुंबई,पुणे,कोल्हापूर ,नाशिक आणिकही इतर देशाविदेशांतरीच्या वेगवेगळ्या अस्मितांचे संमेलन इथे मायबोलीवर बघायला मजा येते आहे .

".....वेगवेगळ्या अस्मितांचे संमेलन इथे मायबोलीवर बघायला मजा येते आहे ....."

~ आणि याला कारणीभूत आहे तुमच्यासारखी कवयित्री....जिच्या देखण्या शब्द-रचनांनी या अस्मितांना एकत्र येण्याची भुरळ पडत आहे.

< आणि याला कारणीभूत आहे तुमच्यासारखी कवयित्री....जिच्या देखण्या शब्द-रचनांनी या अस्मितांना एकत्र येण्याची भुरळ पडत आहे > जोरदार सहमती.

भारतीताईंच्या कविता म्हणजे मौनाची गाणी आहेत. आत्यंतिक मनस्वी, आत्ममग्न अविष्कारातून आलेल्या असल्या तरीही या कविता ओरडून अंगावर येणार्‍या नाहीत. अर्थात, जखमी करण्यासाठी शस्त्र मोठे यापेक्षा धार किती याचे जसे महत्त्व, तसेच हे शब्द सुंदर असूनही भिडायचे तिथे खोल भिडतातच.

"आनंद देहधारी .. छळवाद मूर्तीमंत
सर्वांस शाप होता सर्वस्व पिंजण्याचा"
यातल्या शब्दकळेला सलाम जातोच पण ती पार करुन अर्थाला हात घालताना - त्यातील ओढणारा आशय समजल्यावर - पुढचे पाउल नेमके जागेवर पडेलच याची शाश्वती उरत नाही. वाचणार्‍याला रचनेच्या सौंदर्यापलिकडची, अधिक ताकदीची भूल घालण्याचे सामर्थ्य असलेली ही संपन्न लेखणी.

अशोकजींचे प्रतिसाद वाचणे ही आणखी एक पर्वणी.
या धाग्याने एक बेभान कविता, दोन उत्तुंग प्रतिभेच्या कवींची आठवण आणि एका रसिकाच्या मनात उमटलेले तितकेच तीव्र प्रतिसाद- तरंग असा मोठा आनंददायी ठेवा दिलाय.

अमेय, सानी , अशोकजी .. चर्चा रंगली आहे पण कसली कसली ही श्रेयं मला लोक्स ! पार अवघडून टाकलंत.ही कविता प्रसन्न होते तेव्हा अनायास शब्द सुचतात त्यात आपलं फारसं काही नसतं .
बोरकरांच्या शब्दात
''सुखद असो दु:खद वा
वरद तुझे स्मरण सखे
पाऊस वा ऊन असो
हृदयी कविताच पिके .. ''

आज पुनश्च वाचली ही कविता..
मागे मला याच कवितेनं पछाडलं होतं..मला आठवतंय की मी एकाच दिवसात आठ-दहा पारायणं केली होती ..
आता तर पाठच झालीये !
ज्या कुणी वरती आणली असेल त्यांचे खूप खूप आभार ज्यामुळे इथे एवढी चांगली चर्चा झाली आहे .
मागे खूप वाईट वाटलं होतं या कवितेवर तीन -चारच प्रतिसाद पाहून ....Now its fine ....भारतीताई ....you deserve it ! Happy

भारतीताई,
खूप छान कविता.
पु शि रेग्यांची कविताही वाचायला मिळाली त्यासाठी अशोक. यांचे आभार.
कविता आणि प्रतिसाद दोन्हींचा सुंदर अनुभव.

भारती यानी सर्व प्रतिसादकांचे योग्य असे आभार मानले आहेतच....पण त्यांच्याच बरोबरीने मी देखील तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो....तुम्हा सर्वांना प्रतिसादांमुळेही हा धागा खूप पसंत पडला याची तुम्ही जाणीवपूर्वक नोंद केल्याचे पाहिले आणि आनंद झाला.

अशोक. | 2 October, 2013 - 11:30 नवीन

भारती यानी सर्व प्रतिसादकांचे योग्य असे आभार मानले आहेतच....पण त्यांच्याच बरोबरीने मी देखील तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो....तुम्हा सर्वांना प्रतिसादांमुळेही हा धागा खूप पसंत पडला याची तुम्ही जाणीवपूर्वक नोंद केल्याचे पाहिले आणि आनंद झाला.
<<<

अशोकराव, तुमचे प्रतिसाद म्हणजे दुधात साखर! पक्वान्नाच्या ताटावर आग्रहही केला जावा असे वाटते तुमचे प्रतिसाद वाचून. कित्येकदा तर मूळ धागा वाचावा की त्याचे रसग्रहण वाचावे असेच वाटत राहते. अहो तुम्ही आणि भारती हे रसग्रहण आणि कविता यांचे प्रत्ययकारी मिश्रण हीच तर खरी दौलत अश्या स्थळांची!

तुम्ही दोघांनी धन्यवाद देणे म्हणजे प्रतिसाददात्यांनाच लाजवणे होय.