अगतिक

Submitted by कवठीचाफा on 1 June, 2012 - 12:15

मध्यंतरी बंगलोरला काही कामानिमित्त गेलो असताना अंकित घाटपांडेशी ओळख झाली, ऑफिशियल नाही पण एक जिंदादील माणूस म्हणून एकदम आवडून गेला तो. तो आलेला एका सॉफ्टवेअर कंपनीतून म्हणजे बंगलोरच्या त्या कंपनीत सॉफ्टवेअर अपडेटींगचं काम चालू होतं. एक एक कंप्युटर फ़ॉरमॅट करून मग अपडेट करायचं फारच कंटाळवाणं काम ते. त्या टीम मधला हा अंकित. रोज भेट होत होती आणि आधी एकभाषिक म्हणून आणि नंतर मित्र म्हणून आमची ओळख बरीच वाढली.
आता कंपनीतल्या लोकांना सण वार सुटी मिळणार असेल तरच लक्षात राहतात त्या दिवशी अचानक तिथल्या मराठी सेक्रेटरीनं त्याला गाठलं आणि म्हणाली
" अंकित आज राखीपौर्णिमा आहे माझा भाऊ तिकडे दूर पण तुम्हाला पाहिलं की त्याची आठवण येते मी तुम्हाला राखी बांधू ? " माणसं कुठेही गेली तरी नाती सोबत घेऊन जातात.
" सॉरी, मला ते आवडत नाही. तुम्हाला मी भावासारखा वाटत असेन तर भाऊ म्हणून कधीही हाक मारा मी मित्र म्हणून धावून येईन पण मला असल्या मानलेल्या नात्यांची चीड आहे" एकदम तुटकपणे अंकित बोलून गेला. बिचारी ती सेक्रेटरी इवलंसं तोंड करून परत गेली. मी तिथेच जवळपास कुठेतरी होतो
नेहमी हसतमुख अंकितच्या त्या तुटक वागण्याचं मला गूढ वाटलं तरी वर वर हसत त्याची मस्करी केली
" काय राव, लाइन मारतो की काय तिच्यावर ? तिचं लग्न ठरलंय माहिताय ना ? " यावर अंकितनं माझ्याकडे कळवळून पाहिलं त्याच्या नजरेतली वेदना क्षणात मनाला भिडली. नाही , माझं काहीतरी चुकत होतं.
सॉफ्टवेअर अपडेटींग संपलं आणि त्याच रात्री झालेल्या पार्टीत मी त्याला जरा बोलका केला. मैत्रीच्या सोबत एखादं ड्रिंक बयाच वेदनांना मोकळी वाट करून देतं. त्याच्याकडून ऐकलेली त्याची विलक्षण कहाणी मी एकत्र करून मांडायचा प्रयत्न करतोय.
*******

" आई, मला निघायला उशीर होतोय माझा रुमाल दे ना ! " अंकितनं आईला जरा जोरातच हाक मारली.
" अरे, एक दिवस तरी स्वतःच्या हातानं काही काम करशील की नाही ? सारखं आपलं आई, आई आई " त्याचा रुमाल त्याच्याकडे देत आई कृतककोपानं म्हणाली.
" अगं पण तू काय करतेयस बाहेर ? "
" अरे, आपल्या शेजारच्या घरात नवीन कुटुंब आलंय त्यांची विचारपूस करत होते, शेजारी होणार ना ते आपले"
" बरं चल मी निघतो नाहीतर उशीर होईल " आपली बॅग उचलून अंकित बाहेर पडला.
बाइकने पंधरा मिनिटांवरचं तर त्याचं ऑफिस होतं पंधरा मिनिटांपेक्षा जास्त उशीर कशाला होणार होता ? पण अंकितला कधी वेळेनंतर पोहोचणं पसंत नव्हतं ही शिस्त त्याच्या अंगात फार पूर्वीच आली होती.

अंकित सध्या एका कंपनीत सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करत होता. कंप्युटर सॉफ्टवेअर हा खरं म्हणायचं तर त्याचा प्राथमिक प्रांत नव्हताच. त्याने इलेक्ट्रिकल मधून बी ई केलेलं पण मध्येच कंप्युटरची लाट आली आणि संधी सापडताच त्यानं क्षेत्र बदललं. इतका धोरणी अंकित यापूर्वी नव्हता
घरातला एकुलता एक असल्यानं लहानपणापासून फक्त हट्ट पुरवून घेणं इतकंच अंकितला माहीत, जबाबदारी कर्तव्य असले शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हते. कदाचित याच शब्दांना त्याच्या शब्दकोशात जागा करून देण्यासाठी त्याचे वडील अकाली गेले. वडील गेले तेव्हा अंकित फक्त सतरा वर्षाचा होता, आतापर्यंतचं आयुष्य जगताना त्याला कधीच इतका मोठा झटका बसला नसेल पण त्यामुळेच त्याच्या स्वभावात फरक पडत गेला. एरव्ही बाहेर जाताना आईला साधं `येतो' न म्हणणार्‍या अंकितचं आयुष्यच आता आई या शब्दापुढे जाईनासं झालं.
शिक्षणाची सोय वडिलांच्या दूरदृष्टीमुळे सहज साध्य होती पण त्यापुढे मात्र अंकितनं प्रचंड कष्ट उपसले. एकतर डिग्री होती पण नोकर्‍या नव्हत्या आणि होत्या त्या त्याच्या शहरापासून दूर म्हणजे आईला एकटीला सोडून राहणं आलं आणि तेच त्याला नको होतं.
मिळतील तश्या नोकर्‍या करत तो स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता त्यातच त्याला ही संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्यानं क्षेत्र बदललं, आता कुठे आयुष्यात स्थिरता येण्याची चिन्हे दिसत होती.
ठरावीक वेळ काम, चांगलासा पगार त्याचं घर आणि आई इतकंच. या सगळ्या उलाढालीत वय मात्र तिशीचा उंबरठा ओलांडून पुढे पोहोचलं

त्या संध्याकाळी अंकित घरी परतला तेव्हा घरातून उसळलेल्या हास्याच्या कारंज्याने त्याला जरा विचारात पाडलं. बाबा गेल्यापासून घाटपांडे कुटुंबात हसू मुक्तपणे असं कधीच व
घरात पाऊल ठेवल्याठेवल्या त्याला या हास्याचं मूळ सापडलं. समोर सोफ्यावर बसलेल्या पाहुणे मंडळींकडे ते क्रेडिट जात होतं अर्थात त्यांना पाहताना तो जरा गोंधळातच पडला, हे चाळीस पंचेचाळिशीचं जोडपं आणि एक पंधरा- सोळा वर्षाची मुलगी आपल्या नात्यात असल्याचं काही त्याला आठवेना ! आणि असलेच तरी त्यांचं वागणं इतकं मनमोकळं असल्याचं पाहण्यात आलं नव्हतं.
" आलास ? ये हो, हे आपले नवे शेजारी केळकर, या त्यांच्या पत्नी आणि ही त्यांची मुलगी राधिका " आईनं बाहेर येत त्याचा गुंता सोडवून दिला.
केळकरांशी ओळख करून घेऊन अंकित आपल्या खोलीत गेला.
फ्रेश होऊन बाहेर येतानाच त्याला आजच बदललेलं वातावरण जाणवलं. आज घरात काहीतरी उल्हास जाणवत होता. केळकर कुटुंब खरोखरच एकदम दिलखुलास वाटत होतं. कित्येक दिवसात न दिसलेला आनंद आज त्याला आईच्या चेहर्‍यावर दिसत होता. नकळतच तो त्यांच्या गप्पात मनापासून सहभागी झाला.

दिवस भरभर सरकत गेले आणि केळकर कुटुंबाचा स्नेहही वाढत गेला. त्यांची राधिका बरेच वेळा अंकितच्या घरातच दिसायची. संध्याकाळी तो कामावरून आला की आई बरोबर बाहेर हॉलमध्ये नाहीतर स्वयंपाकाच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारत असायची. राधिका आणि अंकितचा भावबंधही असाच अचानक जुळला.
" दादा, अरे लक्ष कुठाय तुझं आई केव्हाची हाका मारतेय, तू कसला पुस्तकात डोकं खुपसून बसलायस? " राधिकानं त्याला खडसावलं
`दादा' या हाकेतला गोडवा त्यातला अधिकार अंकितला यापूर्वी कधीच अनुभवायला मिळाला नव्हता. सख्खी बहीण तर नव्हतीच पण नात्यातल्या सगळ्या मंडळींनी बाबा गेल्यावर `आता यांची जबाबदारी घ्यावी लागते की काय ? ' या भीतीनं पावलं मागे घेतली असल्यानं त्यांच्याशी फारसा संबंध राहिलाच नव्हता त्यामुळे त्या ही बहिणी त्याला परक्याच राहिल्या.
" अरे ऐकतोयस ना ! बंद कर ते पुस्तक आधी " राधिकानं आवाज चढवला.
" निघतो गं, पण मला काय हाक मारलीस ? '
" दादा , का ? नको म्हणू ? मग काय म्हणू काका ? "
" अगं हो, हो, किती प्रश्न ? आता कायम अशीच हाक मारत जा, चला मला किमान एक करवली मिळाली. "

राधिका एक वेगळीच कहाणी होती, घरातली एकूलती एक नवसा सायासाची मुलगी त्यामूळे घरातल तिच्याबद्दलच प्रेम काळजीत कधी बदलल्या गेलं तेच कळलं नसेल तीला. अर्थात त्रयस्थ नजरेला ते ताबडतोब जाणवायचं.
` हे नको करू, तिथे नको एकटी जाऊ, उशिर का झाला ? वेळेत घरी येत जा' एक ना हजार सूचनांचा नुसता पाऊस पडत असायचा तिच्यावर.
शाळा संपेस्तोवर केळकरांपैकी कुणी ना कुणी तीला आणायला शाळेच्या गेटवर हजर असायचं त्यामुळे मैत्रिणी नाहीत की धम्माल नाही सगळंच चाकोरीबध्द काम.
कॉलेजात जायला लागली तीला न्यायला आणायला जरी केळकर जात नसले तरी एक कायम स्वरूपी रीक्षावाला तीच्या जाण्या येण्यासाठी ठेवला होता. त्याचेही कदाचित याच एका भाड्यावर घर चालत असावं कारण त्याच्या वयात रिक्षा घेऊन भाडं मिळवण्यासाठी भटकणं शक्यच नव्हतं.
कॉलेज म्हंटलं की मज्जा, धम्माल, पण राधिकाचं कॉलेज फक्त मुलींचे त्यांचे नियम कडक. प्रत्येक तासाची हजेरी. नाही म्हंटल तरी एक प्रकारचा जाचच हा,
त्या मानानं अंकितच्या घरी अधे-मधे येणार्‍या मित्र-मैत्रिणींचा मोकळेपणा पाहिल्यावर राधिका घाटपांड्यांच्या घरातच रूळली नसती तरच नवल. कादाचित त्यामुळेच ती पुर्वीसारखी एकटी एकटी, गप्प गप्प न रहाता बोलकी झाली होती, जरा नाही चांगलीच बोलकी झाली होती. केळकरांनीही सुटकेचा निश्वासः सोडला असेल.
*******
केळकर, घाटपांडे आता शेजार्‍यांपेक्षा नातेवाईक जास्त वाटायला लागले. राधिकाचा चिवचिवाट घरात कायम चालू असायचा. तिच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालापासून ते पुढे तिच्या कंप्युटर क्लासेस पर्यंत सगळीकडे तिला अंकितदादाच आपल्यासोबत लागायचा.
कित्येक वर्षे रक्षाबंधनाला रिता राहिलेला हात राधिकामुळे त्या हाताला राखीच्या बंधनाचा स्पर्श झाला भाऊबीजेला अंकितच्या कपाळावर औक्षणाचा टिळा लागला. जणू घाटपांड्यांचीच मुलगी चुकून दुसर्‍या घरात जन्माला आल्यासारखं वाटावं इतका त्या दोन भावंडात लळा होता.
मधली चार-एक वर्ष जणू दान करावीत असं सौख्य अंकितला लाभत होतं, नियती कधी कुणाला भरली झोळी देत नाही म्हणतात........

अंकितच्या घरात एकदम बेधडक वावरणारी राधिका अचानक काहीतरी सांगायला अंकितच्या खोलीत आली. अंकित व्यायाम करत होता.
खरंतर नेहमी या वेळी तो दरवाजा आतून बंद करून घ्यायचा पण आजच चुकून उघडा राहिला. म्हणजे गैर असं काही नव्हतं त्यात पण आपलं उघड्या शरीराचं प्रदर्शन त्याला कधीच आवडलं नाही.
दुनियेच्या खस्ता खाताना मनासोबत शरीरही बळकट झालेलं, आणि नियमिताच्या व्यायामानं तो ते राखत होता.
आत्ता राधिकाच्या आत येण्यानं तो गडबडला. चटकन पुश-अप्स बंद करून उठून त्यानं खांद्यावरून टॉवेल घेतला. एव्हाना राधिकाला त्याच्या नेहमी अवगुंठित असलेल्या भरदार छाती आणि पीळदार स्नायूंचं दर्शन झालंच होतं काहीच क्षण घामानं निथळलेल्या त्याच्या शरीरावर तिची नजर टिकून राहिली.
" ए शहाणे, दरवाजावर नॉक नाही करता येत ? " त्यानं तिला टप्पल मारली.
" सॉरी, आईनं तुला लवकर आवरायला सांगितलंय " राधिका गंभीर आवाजात बोलून निघून गेली. बहुतेक त्याच्या बोलण्याचा तिला राग आला असावा.
लहानसा प्रसंग, कधीच विस्मरणात निघून गेला पण राधिकाचं घरी येणं त्या नंतर जरा कमीच झालं. तीच्या हट्टी स्वभावानं पुन्हा उचल खाल्ली ती त्याच्या ट्रेकच्या प्रसंगात.

त्या दिवशी रविवारला जोडून कसलीशी सुट्टी होती, त्याचा फायदा घेत कित्येक दिवसांनी अंकित आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी ट्रेकला जायचा प्लॅन केला. रविवारी सकाळी निघायचं दिवसभर डोंगरवाटांवर भटकायचं रात्री छानशी जागा पाहून कॆंपफ़ायर करायची. सरळ सोपा प्लॅन .
शनिवारपासूनच धावपळ सुरू झाली होती. बॅकपॅकमध्ये लागणाऱ्या वस्तू भरणं, टेंट मिळवणं इतरही बरंच काही. त्यातच राधिकानं अंकितला सोबत नेण्याची गळ घातली. खरंतर त्याचे तिला परस्पर कटवायचेच प्रयत्न चालू होते कारण नाही म्हटलं तरी त्याच्या वागण्यावर तीच्या उपस्थितीमुळे बंधनं पडायची शक्यता होती. तसं अंकितच्या सवयींमध्ये वाईट असं काही नव्हतं पण नाही म्हटलं तरी मित्रांसोबत सढळ बोलणं, एखादं-दुसरी सिगारेट व्हायची त्या सगळ्यावर बंधन येणार होतं, हो , समजा राधिकानं चुगली केली तर ?
शेवटी राधिकानं अंकितचा नाद सोडून अंकितच्या आईला गळ घातली आणि अंकितला तिला सोबत नेणं भाग पडलं
ट्रेकची सुरुवात तर मस्त उत्साहात झाली. अंकितच्या मित्र-मैत्रिणीत राधिका सहजपणे अशी मिसळून गेली की अंकितलाच वाटलं उगीच आपण हिला नाही म्हणत होतो.
दिवसभराच्या पायपिटीनंतर थकलेल्या शरीरांना रात्रीची कॆंपफ़ायर जास्त वेळ झेपली नाही एक- एक करत मंडळी झोपायला निघून गेली. या गडबडीत राधिकाही कधी मुलींच्या टेंटमध्ये पसार झाली ते कुणालाच कळलं नाही.
शेवटी अभी आणि अंकित तेवढे राहिले.
" अंक्या, चल मी सटकतो रे झोपायला, आता आणखी जागा राहिलो तर सकाळी मला उचलूनच न्यायला लागेल" अभी निरोप घेत म्हणाला.
" मी पण आलोच, तेव्हढी एक चैतन्यकांडी सरकव इकडे, आज दिवसभरात या नालायक कार्टीमुळे मला एक कशही मारता आला नाहीये " अंकितनं तक्रार केली.
यावर दात काढत अभीनं गोल्डफ़्लेकचं पाकीट अंकितकडे उडवलं, ते लीलया झेलून त्यातून एक सिगारेट काढून अंकितनं एक दमदार कश मारला. मस्त शिरशिरी गेली अंगावरून.
समोरच्या दगडावर ऐसपैस जागा पाहून अंकितनं त्यावर बसकण मांडली आणि आरामात सिगारेटचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
एक करता करता दुसरी सिगारेट पेटली अंकित दिवसभराच्या गमतीजमती आठवत आरामात कश मारत होता इतक्यात...
कुणाचेतरी बायकी हात त्याच्या गळ्यात पडले. इतक्या रात्री कुणाला मस्करी करायची लहर आली म्हणून अंकितनं मागे वळून पाहिलं. ती राधिका होती. प्रतिक्षिप्त क्रियेने त्याच्या हातातली सिगारेट पाठीमागे दडवली गेली.
" काय गं ए शहाणे झोप नाही का येत आईशिवाय ? आणि माझ्या आईला यातलं काही सांगशील तर मारच खाशील हं " हातातली सिगारेट तिला दाखवून फेकत अंकित म्हणाला.
यावर राधिकाकडून काहीच उत्तर आलं नाही फक्त ती त्याला येऊन बिलगली.
" का गं ए वेडे भीती वाटतेय का ? तरी सांगत होतो नको येऊ म्हणून " अंकितनं समजूत काढायचा प्रयत्न केला.
तरीही राधिकाकडून काहीच उत्तर आलं नाही मात्र आता तिचे हात त्याच्या शरीरावरून फिरायला लागले आणि पहिल्यांदाच अंकितला तीच्या स्पर्शातलं वेगळेपण जाणवलं तो बहिणीचा अल्लड स्पर्श नव्हता त्यात काहीतरी वेगळं होतं
‘वासना’ भराभर राधिकाचे हात त्याच्या पाठीवरून चेहऱ्यावरून फिरत होते आणि स्पर्शातली कामुकता स्पष्ट जाणवत होती.
आजूबाजूची निरीव शांतता, समोर धडाडून शांत होऊ पाहणारी कॆंपफ़ायरची आग आणि रात्रीच्या थंडीत राधिकाच्या श्वासांचा होणारा धपापता आवाज. काही क्षण अंकीतमधला पुरूष जागा झाला, पण लगेचच त्याला वास्तवाचं भान आलं
" राधिका काय करतेयस हे ? " तिला दूर ढकलत अंकित म्हणाला. ’
" काही नाही मला जे हवंसं वाटतंय ते मी मिळवतेय "
" तू शुद्धीवर आहेस ना ? मी भाऊ आहे तुझा दादा हाक मारतेस मला तू आणि हे असलं मनाततरी कसं आलं तुझ्या " संताप, चडफड, आश्चर्य नक्की कोणती भावना होती अंकितच्या आवाजात हे त्यालाही सांगता आलं नसतं.
" तू मला जवळ घे, एकदाच , बघ कुणीच नाहीये इथे " राधिकाचा श्वास अजूनही फुललेलाच होता.
" भानावर ये राधिका , काय बोलतेयस कळतंय ना ? "
" मला चांगलं कळतंय, तूच समजून घे, बघ कुणाला काही कळणार नाही "
" अगं मी भाऊ आहे तुझा "
"होतास, आता नाही मानत मी तुला भाऊ .... "
" पण मी अजूनही तुला माझी बहीणच मानतोय तुझ्या नाही तर किमान माझ्या भावनांची तरी किंमत ठेव "
" तू मला वाटल्यास मामेबहीण मान, हल्ली तर चुलतं भावंडांमध्ये संबंध असतात आपण तर नात्यातलेही नाही" राधिकाला अजूनही भान आलं नव्हतं. त्याला बिलगायचा अजूनही तिचा प्रयत्न चालू होता.
" राधिका, भान ठेव तू तुझ्या दादाशी बोलतेयस" काही न सुचून अंकितनं जवळच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी तीच्या चेहऱ्यावर मारलं. पाण्याचा सपकाऱ्यानं म्हणा किंवा अंकितच्या चढलेल्या आवाजानं म्हणा राधिकाला परिस्थितीची जाणीव झाली. त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून ती धावतच टेंट मध्ये गेली.
एव्हाना अंकितच्या डोळ्यावर रेंगाळलेली झोप पार नाहीशी झाली. काळीज करपवणारा मनस्ताप, चीड .......
नकळतच त्यानं पाकिटातून एक सिगारेट काढून पेटवली जणू झाल्या प्रकाराला मनातून जाळून कोळपून टाकण्यासाठी त्यानं भसाभसा चारपाच कश मारले.
राधिकाच्या मनात जे काही आलं ते आजच आलेलं नसणार यापूर्वी कधीतरी तिच्या मनात हे विचार येऊन गेलेले असणार कदाचित म्हणूनच आज तिनं ट्रेकला यायचा हट्ट धरला असणार.
एखादी मुलगी इतका टोकाचा वाईट विचार करू शकते ? गेली साडेचार- पाच वर्ष ‘दादा’ ‘दादा’ म्हणत आजूबाजूला बागडणाऱ्या राधिकाच्या मनात इतकं किळसवाणं काही असू शकतं ? मग त्या हातावर बांधलेल्या राख्यांचं काय ? भाऊबीजेला माझं आयुष्य तुला लाभो असं म्हणत ओवाळून लावलेल्या औक्षणाच्या टिळ्याचं काय मांगल्य ?
जपलेली नाती इतकी क्षणभंगुर असतात ?
बोटांना चटका बसला आणि तो भानावर आला पुन्हा त्याच थोटकावर दुसरी सिगारेट पेटवून तो पुन्हा विचारात हरवला
मनात प्रश्नांचं मोहोळ उठलेलं त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ नाही, राधिकानं दिलेला धक्का पचवायची ताकद अजून मनात आलेली नाही. बिकट अवस्था होती त्याची.
‘साला माणसाचा जन्मच वाईट, शरीराला भुकाच इतक्या की कुठली भूक कोणत्या भावनेवर कधी मात करेल याची कल्पनाच करवत नाही. नाती तयार माणूसच करतो आणि वेळ आली की नात्यांचा चोळामोळाही माणूसच करतो. त्यात कुणाच्या मनाच्या चिंध्या होतायत याचा साधा विचारही मनात आणत नाही’
‘ हरवलेला ठेवा सापडावा तसं नातं सापडलं म्हणून आनंद मानायच्या आतच त्या नात्याचा चक्काचूर होतो, कालपर्यंत कशाला आत्ता मघापर्यंत आपल्याला दादा म्हणत अंगाखांद्यावर बागडलेली ही मुलगी एका क्षणात परकी अगदी विचारातही दूर दूर पर्यंत येऊ नये इतकी परकी वाटायला लागली. वासना ही इतकी तीव्र असते ?
पुरुषाची वासना उथळ असते जगात सगळीकडे त्याचे नमुने पाहायला मिळतात पण स्त्रीची वासना खोल डोहासारखी असते खळखळाट नसतो तिथे. राधिकेच्या मनात कधीपासून असले विचार येत असतील ? याच भावनेनं ती आपल्याला स्पर्श करत असेल आणि आपण मारे लाडकी बहीण म्हणून तीच्या वागण्याला अल्लडपणा म्हणत गेलो.
जास्त दूर कशाला आत्ता थोड्यावेळापूर्वी जेव्हा तिनं आपल्याला मिठी मारली तेव्हा क्षणभर का होईना आपल्यातला पुरूष जागा झालाच की आपलीही हीच लायकी ?
" वा रे भाऊराया " समोरच्या मोकळ्या दरीकडे तोंड करत अंकित मोठ्यानंच म्हणाला.
" का रे किंचाळतोयस सकाळी सकाळी ? " टेंटबाहेर येत अभी म्हणाला
" आणि हे काय ? साल्या रात्रभर सिग्रेटी फुंकतोयस ? झक मारली आणि तुला आख्खं पाकीट दिलं, भारीच टरकून आहेस बाबा बहिणीला" अभी असं म्हणाला पण तारवटलेल्या डोळ्यानं अंकित आपल्याकडे का पाहतोय याचा अजिबात अंदाज न आल्यानं तिकडे दुर्लक्ष करून तो आपलं आवरायला निघून गेला.
एक एक करत सगळेच उठले आपापलं आवरून उरलेल्या निखाऱ्यांवर चहा करून घेऊन सगळे परतीच्या प्रवासाला लागले.
परतीच्या प्रवासात अंकित अबोल झालेला, राधिका अंकितची नजर चुकवायचा प्रयत्न करत असलेली पण अर्थात अंकितचं तिच्याकडे लक्ष तरी कुठं होतं तो आपल्या मनाच्या चिंध्या एकत्र जुळवण्याचा प्रयत्न करत स्वतः:शीच गुंतलेला होता.

ट्रेक नंतर दोन भावंडांच्यात काहीतरी बिनसलंय हे दोन्ही घरात लक्षात आलं आणि खोदून खोदून विचारणा सुरू झाली.
" एकमेकांशी भांडलात का ? दादा ओरडला तुला ? दादाच्या मित्रांनी तू लहान म्हणून चेष्टा केली का ? " एक ना अनेक.
अंकितला वाटत होतं एकदाच किंचाळून सत्य काय आहे ते सांगावं पण नाही ...
तसं केलं असतं तर आरोपाची तलवार त्याच्याच मानेवर आली असती. त्यानं थातुरमातुर कारणं देऊन सगळ्यांना गप्प केलं. पण अजून त्याच्या उरलेल्या भावनांच्या चिरफाळ्या उडायच्या होत्या.

" तू काय विचार केलायस आपल्याबद्दल ? " आई देवळात गेल्याची संधी साधून राधिकानं अंकितला एकटं गाठलं.
" हे असले किळसवाणे विचार तुझ्या मनात आले तरी कसे ?" तीच्या प्रश्नाचा रोख लक्षात येताच अंकितनं धुडकावलं.
" आजपर्यंत मी जे मागितलं ते तू मला दिलंस आज का नाही म्हणतोस ? "
" आज पर्यंत मी माझ्या बहिणीचे हट्ट पुरवले आता माझ्या समोर उभी आहे ती वासनेनं लडबडलेली एक निर्लज्ज मुलगी , तू विचार कर झाला प्रकार जर मी तुझ्या घरच्यांच्या कानावर घातला असता तर ? " न राहवून अंकित बोलून गेला.
" हाच प्रकार मी ही घरी सांगू शकले असते..... मला हवा तसा " इतकं बोलून निघून जाताना राधिकाच्या चेहऱ्यावर अपमान मावत नव्हता.
‘ का असं केलंस ? अवयवांची भूक इतकी मोठी आहे की बहिणभावांच पवित्र नातंही त्यात आपलं मांगल्य हरपून बसावं ? हे सगळं असंच होतं तर आधी दादा म्हणून माझ्यातली माया जागी तरी का केलीस ? ’
शब्दांचा आधार घेऊन ओठाबाहेर न पडू शकलेले बाष्फ़ळ प्रश्न.
हे असंच चालत राहिलं तर एक दिवस वेड लागायची वेळ येईल. खड्ड्यात गेली ती नाती गोती, खड्ड्यात. इथे राहण्यात काहीच अर्थ नव्हता कधी ना कधी बुरखा फाटून सत्य नग्न होणारच होतं.

इतके वर्षात पहिल्यांदा अंकित इतका अस्वस्थ झाला होता. राधिकाची भेट होऊ नये म्हणून लवकर जाणं, उशीरा येणं असं चाकोरीबाहेर वागणं त्यानं चालू केलं. आजकाल अंकितच्या आईलाही त्याच्या वेळी अवेळी कामावरून परत येण्याची काळजी वाटायला लागली. अनेकदा तिनं त्याला विचारायचा प्रयत्नही केला पण काही नवीन अपडेट्स चालू आहेत त्यामुळे जरा जास्त काम पडतंय या कारणाखाली त्यानं वेळ मारून नेली पण तो हे कुठवर करू शकणार होता ?

" पुढच्या आठवड्यात सोमवारी सुट्टी घेशील ना रे ? " आईनं आठवण करून दिली.
" का गं ? काय आहे सोमवारी ? "
" विसरलास ? त्यात तुझी काय चूक म्हणा असं कामाच्या ओझ्याखाली असं दबून गेल्यावर तुझ्या तरी काय लक्षात राहणार ? अरे पुढच्या सोमवारी रक्षाबंधन नाही का ! घरात थांबायला नको ? राधिकाला किती वाट पाहायला लावायची ? "
पुढच्याच क्षणी अंकितच्या काळजात प्रचंड उलथापालथ झाली, काय सांगायचं आईला ?
ज्या नात्यातल्या मूळ भावनेला सुरुंग लागलाय त्याच्या जपणुकीसाठी हातातल्या त्या लहानश्या दोऱ्याचा काय उपयोग होणार ? ज्या हातांनी राखी बांधली जाणार आहे तेच हात त्या दिवशी ......
नको जगातलं एक नातं विटाळल्या जाऊ नये.
मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन तो कामावर गेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यासमोर बंगलोरच्या एका कंपनीनं ठेवलेल्या नोकरीच्या प्रस्तावाला त्यानं होकारार्थी उत्तर पाठवलं.

आजही अंकित बंगलोरमध्ये कामाला आहे, बरासा फ़्लॅट पाहून आईलाही इकडेच बोलावून घेतलेय आणि इथेतरी त्याचा केळकरांशी कोणताच संपर्क नाहीये, त्यामुळे राधिकाचं पुढे काय झालं हे अद्याप माहीत नाही . काळ हळू हळू जखमा भरायचं काम करतोच आहे त्यामुळे अंकित आता पहिल्यासारखा मोकळा होत चाललाय अपवाद फक्त एकच, आता त्याला कुणीच मानलेली बहीण नाहीये. एवढी एकच गोष्ट तो कटाक्षानं टाळतो.

गुलमोहर: 

मलाही बहीण नाही रे.. कोणी दादा म्हणून हाक मारली किंवा तश्या भावना मनात उत्पन्न केल्या की लगेच हुरळून जातो.. बरे वाटायला लागते.. एक बहीण मिळाली असे मनापासून वाटायला लागते.. पण कधीतरी अशी नाती केवळ औपचारीकता म्हणून समोरून जपली जात आहेत हे समजले की वाईट वाटते.. कालांतराने संबंधही तुटतात.. पण यातूनही काही नाती टिकली आहेत.. टिकून राहतील.. हा विश्वास आहे... असो.. बहीण हा माझा वीक पॉईंट असल्याने प्रतिसाद उगाच लांबला.. बाकी तुझी कथा कितीही चांगली असली तरी नाही वाचायला पाहिजे होते असे वाटले....

कचा,

>> पुरुषाची वासना उथळ असते ... पण स्त्रीची वासना खोल डोहासारखी असते

१००% अनुमोदन. (बहुतेक आयुर्वेदानुसार) स्त्रीची वासना पुरुषाच्या ८ पट जोरदार असते. मात्र तिची नियंत्रणशक्तीही पुरुषाच्या ८ पट असल्याने स्त्री चटकन वासनापूर्ती करू पहात नाही. (अवांतर : यालाच सहनशक्ती असंही म्हणतात.)

म्हणूनच बायकांच्या सहवासात पुरुषाला फार सावध रहावं लागतं. माझ्या डोळ्यासमोर असंच एक 'दादाभाई नवरोजी' छापाचं एक प्रेमप्रकरण घडलं होतं. मित्र आणि त्याची मामेबहीण होती. मित्राच्या जिवाचा जो चुथडा झाला त्याचं नावच ते!

जवान हो या बूढिया
या नन्हीसी गुडिया
कुछभी हो औरत
जहर की है पुडिया

आजून काय सांगणार!

आ.न.,
-गा.पै.

काय बिनधास्त व वस्ताद आहे मुलगी.........कसले बहिण भावाचे मानलेले नाते, असल्या नात्याच्या बुरख्याआड व्यभिचार करणारेच जास्त......... तरी या गोष्टीतील पुरुष स्वतःवर बंधन ठेऊ शकला म्हणुन बरे...... नाहीतर मजा मारून अंगाशी आल्यावर याच मुलिने हे प्रकरण याच्यावर शेकवायला कमी केले नसते व हा पुरुष आहे म्हणुन चुक याचीच असणार असे म्हणायला समाज मोकळा....... Sad

जरा स्पष्टच लिहीतो...
व्यभिचार कसला यात? १६-१७ वर्षांची असताना ती कधीतरी 'दादा' म्हणाली, नंतर पुढे तिला त्याच्याबद्दल 'क्रश' निर्माण झाला. याने खरोखरच तिला बहीण समजले असावे, त्यामुळे तिचा रोख कळाल्यावर त्याला शॉक बसणे साहजिक आहे, ते समजू शकतो. पण ती ते तितके सिरीयसली समजत नसेल. याला ते नीट लक्षात आले नसेल. आपल्या येथील समाजव्यवस्थेमधे असे 'रीडिंग' चुकणे सहज शक्य आहे. त्यामुळे नंतरचे सगळे म्हणजे जरा ओव्हररिअ‍ॅक्शन वाटली मला. उलट तिलाच प्रेमाने मी तुला बहीणच समजतो त्यामुळे तुला पाहिजे तसा विचार करणे कधीच शक्य नाही, तुला नक्कीच कोणीतरी दुसरा चांगला मित्र मिळेल वगैरे समजावयाचा प्रयत्न करायला हवा होता. एकदम किळसवाणे विचार वगैरे असे वाटणे जरा जास्तच वाटले.

समाजासमोर आपण बहीण-भाऊ पण आत वेगळेच काही असू असे काहीतरी ती म्हंटली असती तर सर्व आरोप योग्य आहेत पण हा केवळ त्या वयात आपल्याला दुसर्‍याबद्दल नक्की काय वाटते ने न ठरवता आल्याचा परिणाम वाटतो.

वाचून त्या दोघांबद्दलही वाईट वाटले. कोणी गाइड करून एवढी वेळ येउ द्यायला नको होती.