Black and White

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'नील'... जॉन जवळ-जवळ धावतच नीलच्या अॉफिसमध्ये शिरणार तेवढ्यात त्याला लक्षात आलं की अॉफिसचा दरवाजा अोढून घेतलेला होता. दार उघडून जॉन आत शिरला आणि क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं - इतकं की आपण नीलकडे का आलो ते सुद्धा तो विसरायच्या बेतात होता. समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की वैतागावं हेही कळेना... अॉफिसमधल्या मोठ्ठ्या मॉनिटर वॉलवर एरवी जेम्स वेब किंवा चंद्रा दुर्बिणीवरुन येणारं चित्र आणि जवळच भल्यामोठ्या व्हाईटबोर्डवर मोठ-मोठी समीकरणं यात हरवलेला नील हे नेहमीचं दृश्य. त्याऐवजी आज त्या वॉलवर मायकेल जॅकसन 'Black or White' च्या तालावर गात-नाचत होता आणि नील त्या गाण्यातल्या मॅकॉले कल्किनला इमिटेट करत होता. गाण्याचा आवाज इतका मोठा होता की नीलला हाक ऐकू आली असती तरच आश्चर्य! जॉननी आधी अॉफिसचं दार परत लावून घेतलं आणि गाणं कुठून ऐकू येतंय याचा शोध घेऊ लागला... पहिल्यांदा त्यानी नीलचा लॅपटॉप बघितला तर त्यावर नेहमीसारखं कामाचंच काहीतरी होतं. इकडे-तिकडे पाहिलं तर चक्क नीलच्या म्युझिक सिस्टीममधून ते कानठळ्या बसवणारं गाणं वाजत होतं. हेही एक आश्चर्यच कारण बहुतेकवेळा त्यातून व्हाईट नॉईज तरी ऐकू यायचा नाहीतर मंद सुरात भारतीय वाद्यसंगीत. जास्त विचार न करता आधी जॉननी ती म्युझिक सिस्टीम बंद केली आणि पाठोपाठ मॉनिटर वॉल. क्षणात सगळं इतकं शांत झालं की जॉननी सुटकेचा निःश्वास सोडला - जेमतेमच, कारण पाठोपाठ नील अोरडलाच 'कोणी बंद केलं गाणं?'

'नील, तुला झालंय तरी काय? अॉफिसचं दार बंद, वॉलवर चक्क मायकेल जॅकसन? आणि तू नाचतोयस त्याच्या बरोबर? बरा आहेस ना?'

'जॉन, तू अगदी पक्का अौरंगजेब आहेस...'

'कोण अाहे? अॉरँग?'

'अॉरँग नाही रे बाबा, अौरंगजेब... मरु दे त्याला - तुला बराच वेळ भारताच्या इतिहासाबद्दल सांगावं लागेल आणि इतिहास हा तुझा विषय नाही.'

'तुझा तरी कुठे आहे?'

'राहू दे रे... नंतर कधी तरी बोअर करेन तुला! आत्ता मी छानपैकी सेलिब्रेट करत होतो तर मध्येच का थांबवलंस मला ते सांग आधी!'

'हे..हे..हे तुझं सेलिब्रेशन होतं? कशासाठी? आणि तू आज मिटींगला का आला नाहीस? तुला माहिती होतं आजच्या अजेंडावर मुख्य करुन तुझ्या प्रोजेक्टबद्दल चर्चा होणार होती. आणि तूच गायब! शेवटी डॉ. मा मला विचारत होते तुझ्या रिसर्चबद्दल, तू तुझी प्राथमिक निरीक्षणं प्रेझेंट कधी करु शकशील असंही विचारत होते... जेम्स वेबवर तुला अजुन किती वेळ लागेल तेही हवंय त्यांना. नील, केवळ तू म्हणूनच वाचशील, कारण मा खूपच वैतागले आहेत. आज तू मिटींगला न येऊन मोठी चूक केलीस. तुला माहितीये JWST वर तुला मागशील तितका वेळ मिळतो तो केवळ तू त्यांच्या खास मर्जीतला कॉस्मॉलॉजिस्ट आहेस म्हणून.'

'अरे हो, हो... मी आज यायचं अगदी नक्की ठरवलं होतं. गेले काही दिवस त्याचीच तयारी करत होतो.'

'मग कुठे अडलं?' विचारता-विचारता पहिल्यांदाच जॉनची नजर नीलच्या अवताराकडे गेली. 'तू गेले दोन दिवस इथेच आहेस? घरी नाही गेलास? अांघोळ तरी केलीस का?' नीलच्या चेहऱ्यावरच्या वाढू पाहणाऱ्या दाढीकडे पाहता ती शक्यता कमीच दिसत होती... 'आणि जेवणाचं काय? की जेनी आपल्या दोघांचा डबा देते तेवढ्यावरच?'

'अरे, खरंच - जेनीला सांग परवाचा शेपर्ड्स पाय खाल्ल्यावर मला तिच्या हातांना किस् करावंसं वाटत होतं! गेल्या जन्मी आई होती बहुधा माझी...'

जॉनइतकीच - कदाचित त्याच्यापेक्षा कणभर जास्तच त्याच्या बायकोची, जेनीची माया होती नीलवर. त्याच्या जेवणाच्या (म्हणजे वेळी-अवेळी जेवण्याच्या किंवा कामात बुडल्यावर जेवणही विसरण्याच्या) एकेक कथा जॉनकडून ऐकल्यावर तिनी जॉनबरोबरच नीलचाही डबा करुन द्यायला सुरुवात केली. तो घरी आला की न चुकता ती बिचारी त्याच्या आवडीचं काही ना काही करुन त्याला खाऊ घालायची. बोलता-बोलता संभाषणाची गाडी नीलच्या लग्नाकडे वळवायचा प्रयत्न करायची आणि ते लक्षात आलं की पुढच्या क्षणाला नील जॉनला अोढून त्याच्या घरच्या अॉफिसमध्ये न्यायचा.

'बरं, ते सांगतो तिला, किंवा आज रात्री तूच सांग. आजच्या रात्रीच्या जेवणाचं लक्षात आहे ना? आमच्या अॅनिव्हर्सरीला तू आला नाहीस तर एक वेळ मा परवडले असं म्हणशील तू...'

टेबलावरचा बेसबॉल हातात घेता-घेता नील म्हणाला, 'हां - तर डॉ. मा! मला सांग किती प्रकारचे ड्वार्फ आहेत?'

'तू काय माझी तोंडी परीक्षा घेतो आहेस? आणि काय रे? हे असले बेसिक प्रश्न विचारायला मी काय तुझ्याकडे पी. एच् डी. साठी अर्ज घेऊन आलेला विद्यार्थी आहे का? तुझ्याइतका प्रसिद्ध नसलो तरी मी पण कॉस्मॉलॉजिस्टच आहे महाशय!'

'अरे - रागवू नकोस रे, मी काय तुझी परीक्षा घेणार? तितका मोठा नाही झालो मी अजुन! बरं मी सांगतो - साधारणपणे दोन प्रकारचे ड्वार्फ मानतात - पहिला प्रकार 'मेन सिक्वेन्स ड्वार्फ' म्हणजे जे तारे अजुन ऊर्जानिर्मितीचं काम नियमितपणे करताहेत ते - सगळे तारे आपलं ९०% आयुष्य हायड्रोजनचं हेलियममध्ये रूपांतर करण्यात म्हणजेच 'मेन सिक्वेन्स' मध्ये घालवतात आणि दुसरे म्हणजे मृतावस्थेतील तारे. 'मेन सिक्वेन्स' मध्ये पीतवर्णीय - म्हणजे आपला सूर्य, केशरी, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अल्फा सेंटॉरी, रक्तवर्णीय - म्हणजे आपल्या सगळ्यांत जवळचा तारा प्रॉक्झिमा सेंटॉरी, Brown dwarf म्हणजे पूर्णपणे तारा म्हणण्याइतकं वस्तुमानही नाही आणि इंधनही नाही - थोडक्यात ग्रह म्हणवण्याइतका छोटा नाही आणि तारा म्हणवण्याइतका मोठा नाही असा अर्धवट अवस्थेतला तारा; Teide-1 हा मान्यता मिळालेला पहिला Brown Dwarf. थांब - मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस - ही ढोबळ विभागणी झाली. ताऱ्याचं वस्तुमान, त्याच्यात असलेली रासायनिक मूलद्रव्य, त्याचा आकार, तापमान यावर आणखी अचूक विभागणी होते.

मृतावस्थेतील तारे म्हणजे श्वेतवर्णी ड्वार्फ, न्युट्रॉन स्टार, कृष्ण विवर...

बरं, रागवणार नसलास तर मला दोन गोष्टी सांग बरं - आपल्या विश्वाचं वय काय आणि कृष्णवर्णी ड्वार्फ म्हणजे काय?' बेसबॉल एका हातातून दुसऱ्या हातात खेळवत नीलने विचारलं.

'हात्तिच्या मारी!' जॉननी मोठ्ठा सुस्कारा सोडला.

'आता काय झालं?'

'विशेष काही नाही, पण तू आजच्या महत्त्वाच्या मिटींगला न येणं, तुझा हा असा दाढी न केलेला अवतार आणि हो - मी अॉफिसमध्ये आलो तेव्हा मायकेल जॅकसनच्या बरोबरीने तुझं नाचणं पाहून मला वाटलं की जेनीची इच्छा पूर्ण होते की काय... पण आत्ताचं तुझं भाषण ऐकून तरी तसं काही चिन्हं मला दिसत नाही.'

'तू विषय बदलू नकोस - सांग विश्वाची निर्मिती कधी झाली असं तुला वाटतं आणि Black Dwarf म्हणजे काय?'

'सर्वमान्य गणिताप्रमाणे १३.७५ अब्ज वर्षांपुर्वी बिग बँग होऊन विश्वाची निर्मिती झाली. Microwave Background Radiation लक्षात घेऊन यात ०.११ अब्ज वर्षाचा फरक पडू शकतो.'

'आणि Black Dwarf बद्दल सांगण्यासारखं खास असं काही नाही. आपल्या सूर्यासारख्या ताऱ्याची हायड्रोजनचं फ्युजन करण्याची प्रक्रिया करण्याची ताकद संपली की तो आधी वाढत जाऊन रक्तवर्णीय राक्षसी तारा होतो आणि हेलियमचं रूपांतर कार्बन आणि अॉक्सिजनमध्ये व्हायला लागतं. पुढे कार्बनचंही फ्युजन करण्याइतकं तापमान जर त्या ताऱ्याच्या कमी वस्तुमानामुळे मिळत नसेल तर हळुहळु बाहेरचे थर नाहीसे व्हायला लागून मुख्यतः कार्बन आणि अॉक्सिजन भरलेला, प्रचंड वस्तुमान आणि छोटा आकार असा White Dwarf तयार होतो. जरी कार्बनचं फ्युजन करण्याइतका गरम नसला तरी तो चांगल्यापैकी गरम असतोच - फक्त त्यात ऊर्जास्रोत नसतो. White Dwarf च्या तापमानामुळे उरल्या-सुरल्या हेलियमचं रूपांतर होण्याची प्रक्रिया थोडा काळ सुरू राहते. पण त्याच्यातली उष्णता रेडिएशनमुळे झपाट्याने कमी होत राहते. जेव्हा तो थंड होऊन त्याचं तापमान Microwave Background इतकं, म्हणजे साधारण २.७ केल्व्हिन इतकं कमी होईल तेव्हा त्यालाच Black Dwarf म्हटलं जाईल. तो अती-शीत तर असेलच, पण कार्बन ठासून भरलेला आणि आकाराच्या मानानी अफाट वस्तुमान असलेला असा असेल. Black म्हणजे तो दिसणार नाही हे तर अोघानी आलंच! पण हे सगळं तार्किकी गणित झालं कारण अजुन तरी ३००० केल्व्हिनपेक्षा कमी तापमान असलेले White Dwarf सुद्धा फार कमी मिळाले आहेत. आणि विश्वाचं वय आणि White Dwarf ची थंड होण्याची गती बघता २.७ केल्व्हिनपर्यंत पोहोचायला त्यांना इतका काळ लागेल की त्यामुळे काही शास्त्रज्ञ तर Black Dwarf ला केवळ सैद्धांतिक शक्यता मानतात.'

'तार्किकी गणित? सैद्धांतिक शक्यता? अरे, ते सगळं विसरा आता! तुला माहितिये मी गेले कित्येक महिने डॉ. मांच्या वशिल्याने जेम्स वेब वापरतोय माझ्या संशोधनासाठी. त्यातून मिळालेली माहिती मी असंख्य वेळा तपासून पाहिली. पण जगातल्या एकाही कॉम्प्युटरवर प्रस्थापित गृहितकं वापरुन मला त्या माहितीचा अर्थ लावता येत नाही. अक्षरशः वेड लागायची वेळ आली मला! पण काही दिवसांपुर्वी अचानक डोक्यात विचार आला - जर प्रस्थापित गृहितकांना वापरुन जेम्स वेबनी मिळालेल्या माहितीचा अर्थ लागत नसेल तर दोष त्या माहितीचा, निरीक्षणांचा नाही; तर ती गृहितकं तपासुन बघण्याची वेळ आलेली आहे.'

'कसली माहिती? कुठली निरीक्षणं? आणि कोणती गृहितकं मोडुन काढायला निघाला आहेस?'

'अरे, त्यासाठीच मी मगाशी दोन प्रश्न तुला विचारले होते. तुला हे तर सांगायला नको की जवळपास २४ वर्षांपुर्वी, २०११ च्या सुरुवातीस UDFj-39546284 या आकाशगंगेचा शोध लागला, जिचा जन्म १३.२ अब्ज वर्षांपुर्वी झाला, म्हणजे विश्व-निर्मितीच्या क्षणापासून केवळ ४८० मिलीयन वर्षांत तिची निर्मिती झाली असली पाहिजे. आणि हा शोध चक्क हबल वापरुन लावण्यात आला! हे ही सर्वमान्य आहे की आपल्याला माहीत असलेल्या प्रत्येक आकाशगंगेच्या अंतरंगात कृष्णविवर असतं, जे आपल्याला 'दिसत' नाही पण आपण ते असल्याचं सिद्ध करु शकतो!

आता तर आपल्या हाताशी JWST आहे, आणि जेम्स वेबची रेंज जवळपास पहिल्या-वहिल्या ताऱ्याच्या निर्मितीपर्यंत जाते. UDFj-39546284 च्या शोधाबद्दल वाचल्यापासून माझ्या डोक्यात एकच विचार घोळतोय गेली चोवीस वर्षं! जर 'बिग बँग' नंतर इतक्या थोड्या कालावधीत निर्माण झालेल्या आकाशगंगेत कृष्णविवर असू शकतं तर मग Black Dwarf असणं का अशक्य आहे? कारण कृष्णविवरसुद्धा एखाद्या मोठ्या ताऱ्याचा अंतच असतो ना? ध्यास तर होता, पण त्यासाठी लागणारं उच्च शिक्षण, नंतर चांगली संशोधन संस्था, प्रस्थापित विचारसरणीपेक्षा वेगळा विचार करायला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक आणि सहकारी, जेम्स वेब सारखी अफाट क्षमता असलेली दुर्बीण, कॉम्प्युटर क्षेत्रात लागणारी प्रगती - किती गोष्टी जुळून याव्या लागतात!'

'नील - थांब थोडं... माझं डोकं गरगरायला लागलंय! मला शंका येतेय तेच तू सांगतो आहेस का?'

'Yes, John, I did it! जेम्स वेबच्या मदतीनी मला पहिला-वहिला Black Dwarf दिसला - सॉरी - मिळाला. आणि गंमत म्हणजे UDFj-39546284 जिथे मिळाली त्या 'फोरनॅक्स' नक्षत्रातच मिळाला! का कुणास ठाऊक पण ते नक्षत्र मला जरा स्पेशल असावं असं UDFj बद्दल ऐकल्यापासून वाटतंच होतं. नंतर अभ्यास करत गेलो तसं लक्षात आलं की 'फोरनॅक्स'मध्ये Ultra Compact Dwarf आकाशगंगा आहेत. पुन्हा एकदा dwarf! जणू त्यानी माझा पिच्छा पुरवला होता! गेले काही महिने मी त्या भागाचे वेध घेत होतो आणि एका ठिकाणी मला काहीतरी विचित्र गोष्ट असावी असं प्रत्येक रिडींग सांगत होतं. साधारण विश्व-निर्मितीनंतर ३७७ मिलीयन वर्षाचा काळ असेल. जेम्स वेबला अतिशय क्षीण किरणोत्सर्ग मिळत होता पण दिसत तर काही नव्हतं! भरीला त्या भागातलं गुरुत्त्वाकर्षण आजू-बाजूच्या कुठल्याही भागाशी जुळत नव्हतं. शेवटी प्रस्थापित विज्ञानाला मान्य असं एकही स्पष्टीकरण मिळत नाही म्हटल्यावर मी एकेकाळी उत्साहानी लिहीलेला आणि नंतर बाजूला पडलेला प्रोग्रॅम बाहेर काढला - Operation Black Dwarf. सगळा डेटा घेऊन डॉ. मांना भेटलो आणि त्यांच्याशी भरपूर चर्चा केली. मी केलेलं प्रत्येक विधान ते खोडून काढत होते. एकदा तर खडाजंगी होते की काय असं वाटत होतं. पण मा जितका विरोध करत होते तितका मी माझ्या मनाशी जास्त खंबीर होत गेलो; जणू त्यांच्या विरोधामुळे माझी थिअरी आणखी तावून-सुलाखून स्पष्ट होत होती. आणि ध्यानी-मनी नसताना अचानक मा म्हणाले, 'Go ahead... I think you really are on to something.' माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना! मी त्यांना विचारलंही की त्यांचं मत असं अचानक कसं बदललं; तर मला म्हणाले, 'Young Man, not suddenly - I was convinced roughly two hours into our discussion that you were on right track. But I needed to see how convinced you are. Remember, nobody - and I mean NOBODY - even thinks that Black Dwarfs could exist. In fact, they are convinced that that it is all hypothetical. In case your research pans out, I wanted to see how well you can handle the opposition. Of course, the Institute and I, personally, will vouch for your findings; but after all, it's your discovery. So the credit belongs to you and you, alone. I don't have to tell you that even if we are all scientists, we don't readily accept a finding that goes contrary to what we have always believed - kind of like conventional wisdom; we are afraid to think outside the box. Your discovery deserves a Nobel prize - but that's just me. My advice would be - be prepared to fight hard and to be ridiculed for finding something that no one dared to even believe, until now. You are going to need all the best wishes and help you can get.'

'गेले कित्येक दिवस मी सगळी गणितं पुन्हा-पुन्हा सोडवतो आहे, सगळे निष्कर्ष परत परत तपासुन पाहतो आहे. I am playing my own Devil's Advocate. पण दर वेळी तोच निष्कर्ष... आज मी खात्रीनी सांगू शकतो की Operation Black Dwarf is a success! गेली चोवीस वर्षं पाहिलेलं स्वप्न या आयुष्यात पूर्ण होईल असं खरं तर मलाही वाटलं नव्हतं. खरंच असं होऊ शकतं?'

'तरीच आज डॉ. मा मिटींगसाठी तुझी उत्सुकतेनी वाट पहात होते. आत्ता मला त्यांनी मिटींगमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ लागला आणि तुझ्या आनंदाने नाचण्याचाही! नील, खूप-खूप-खूप अभिनंदन. डॉ. मा म्हणाले ते अगदी खरंय - या संशोधनासाठी तुला खरंच नोबेल मिळायला हवं. आणि ते म्हणाले तशी खरंच तुला मिळेल तितकी मदत लागेलच. तुला हवं असेल तर तुझा पेपर प्रसिद्ध करण्यापुर्वी मी सगळा रीसर्च तपासून पहायला तयार आहे.'

'खरंच एवढं करशील, जॉन? अनबायस्ड नजरेखालून एकदा सगळं गेलं की मलाही धीर येईल कारण मा म्हणाले तसं पुढे काय होईल माहीत नाही. तुझ्यासारखा मित्र बरोबर असला आणि पाठीवर डॉ. मांचा धीराचा हात असला तर I am sure Operation Black Dwarf will see the light of the day! आईनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञाची 'थियरी अॉफ रिलेटिविटी' जिथे अजून सतत कसाला लावली जाते तिथे मला तर झगडायलाच हवं ना?'

'अगदी नक्की करेन मी. आणि हो, घाबरु नकोस, या लढ्यात तू एकटा नाहीस. आपली संशोधन-संस्था आणि डॉ. मा तुला मदत करतीलच, पण ती जास्त करुन शास्त्रीय पातळीवर असेल. मी तुझ्याबरोबर असणार आहे तो नुसता एक शास्त्रज्ञ म्हणून नाही, तर तुझा जवळचा मित्र म्हणूनही. पण ते सगळं नंतर - एक मिनीट थांब.'

अचानक खोली पुन्हा एकदा 'Black or White' च्या आवाजानी दणाणली आणि एकाऐवजी दोन वेडे तिथे नाचायला लागले.

(JWST - James Webb Space Telescope - It is a large infra-red telescope scheduled for a 2018 launch date.)

विषय: 
प्रकार: 

या कथेत जरा जास्तच इंग्रजीचा वापर झाला आहे याची जाणीव आहे. मला स्वतःलाही ते टाळता आलं असतं तर आवडलं असतं, पण कथाविषय असा आहे की त्यातल्या कित्येक इंग्रजी शब्दांसाठी - विशेषतः Dwarf, Microwave Background Radiation आणि असे अनेक - मला स्वतःला सोपे मराठी शब्द माहीत नाहीत. काही ठिकाणी जे लिहायचं होतं ते दुर्दैवाने इंग्रजीत लिहीणं जास्त सोपं गेलं. त्याबद्दल आधीच क्षमा मागते.

अरे वा! कॉस्मॉलॉजी संबंधीत तपशील काही कळत नाहीत मला .. पण कथेचं नाव आणि फ्रेमिंग आवडलं ..

(फक्त ह्या कथेतलं मुल्य (माझ्यासारख्या) सामान्य वाचकांनां कळू शकेल का असं वाटलं ..)

मंडळी, कथेबद्दल प्रतिक्रिया निंदवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी फार पुर्वी जेव्हा विज्ञानकथा लिहित असे त्या बऱ्याचश्या, ज्याला soft-core म्हणतात अश्या प्रकारच्या असायच्या. Hard-core विज्ञानकथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.

मुळात मराठी विज्ञानकथेचा असा वाचकवर्ग नाही. त्यातून मराठी विज्ञानकथेचे जनक ज्यांना म्हणता येईल त्या डॉ. जयंत नारळीकरांचा विज्ञानकथा लिहिण्याचा दृष्टीकोन विज्ञान सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचवण्याचं एक साधन हा होता आणि बऱ्याच अंशी अजुनही आहे. डॉ. नारळीकरांसारख्या मोठ्या शास्त्रज्ञाने ही भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काळातील विज्ञानकथा याच छापातील होत्या. त्यानंतरच्या पीढीतील डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, सक्ष्मण लोंढे यासारख्या प्रतिष्ठित लेखकांनी मात्र वेगळी वाट निवडली. त्यांच्या कथा या सर्वप्रथम कथा आहेत पण त्याचबरोबर त्यात विज्ञान अश्या तऱ्हेनी गुंफलेलं असतं की त्यातलं विज्ञान काढलं तर ती कथा कोसळते - म्हणजेच कथा आणि विज्ञान हातात हात घालून बरोबरीने जातात.

पण तरी मराठीतल्या रूढ आणि मान्यताप्राप्त चौकटीप्रमाणे (हे बंधन लेखकांनी स्वतःवरच घालून घेतलेले आहे) प्रस्थापित विज्ञानाच्या फार विरोधात जाणारं किंवा विज्ञानाचे नियम न पाळणारं विज्ञान कथेत सहसा वापरलं जात नाही. तसंच मिथविज्ञान (म्हणजे कालप्रवास वगैरे) वापरून जरी कथा रंजक आणि वाचकप्रिय होत असली तरी सहसा कथेचा मुख्य गाभा त्यावर आधारीत ठेवला जात नाही.

विज्ञानाची आवड असलेल्या किंवा शिकलेल्या बहुतेक सगळ्यांना कृष्णविवर म्हणजे काय हे माहिती असतं. कृष्णविवर हा प्रचंड मोठ्या ताऱ्याचा अंत असतो, ज्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही आणि आत्तापर्यंतच्या निरीक्षणांनुसार प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी कृष्णविवर असतं - आपल्याही आकाशगंगेच्या केंद्रस्थानी ते आहे आणि आत्तापर्यंत सापडलेली सगळ्यांत जुनी जी आकाशगंगा तिच्याही केंद्रस्थानी ते आहे. White dwarf हा साधारण आपल्या सूर्याइतपत मोठ्या (खरं तर छोट्या) ताऱ्याचा अंत - निदान आत्तापर्यंतच्या निरिक्षणांप्रमाणे. जरी तो अंत असला तरी याही स्थितीत तो चांगल्यापैकी गरम असतो. आणि black dwarf व्हायला गणिताप्रमाणे त्याचं तापमान २.७ केल्व्हिन इतकं कमी व्हायला हवं. साहजिकच आत्तापर्यंत एकही black dwarf आढळलेला नाही आणि white dwarf ची थंड होण्याची गती आणि विश्वाचं वय बघता ते शक्यही नाही असं आजचं विज्ञान मानतं म्हणूनच आज तरी black dwarf ही केवळ सैद्धांतिक शक्यता (hypothetical) मानले जातात.

जेम्स वेब ही दुर्बीण या दशकात अवकाशात सोडण्याचा नासाचा मनोदय आहे. ती अश्या ठिकाणी स्थित करण्यात येईल की सूर्य-चंद्र वगैरे जवळच्या प्रकाशस्रोतांचा तिच्या वेध घेण्याला अडसर होणार नाही. या दुर्बिणीची रेंज बिग बँग नंतर साधारण पहिला-वहिला तारा जन्माला आला तितक्या मागेपर्यंत जाण्याची आहे. हबल आणि चंद्रा या सध्या वापरात असलेल्या दुर्बिणींपेक्षा वेध घेण्याची प्रचंड ताकद या दुर्बिणीमध्ये असेल.