कोहम ते सोहम संस्कारांचे महत्व

Submitted by मोहन वैद्य on 18 May, 2012 - 11:24

जन्माचे फळ म्रूत्यू. जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जीवाचा म्रूत्यू येइपर्यन्त प्रवास कळत नकळत पण अविरत चालू असतो. "आला क्षण, गेला क्षण". या सम्पूर्ण प्रवासात बहुतेकाची देहासक्ती मरेपर्यन्त सुटतच नाही. झाडाचे पान वारा उडवून लावतो. त्यानंतर पानाच्या व झाडाच्या एकत्र सहवासाला काही अर्थ उरत नाही. गमाविलेल्या पानाच्या दु:खात झाड अडकत नाही. पण मनुष्याच्या सहजीवनातील कुणी जर म्रूत्यूने उडविला तर मनुष्य मात्र सतत दु:खी राहतो. त्याला ह्याही गोष्टीचा विसर पडतो की तोही म्रूत्यूचाच प्रवासी आहे. फक्त थाम्बा यायचा आहे. मोह काही सुटत नाही. सर्व जीवांचे कौमार्य यौवन व जरा या अवस्था मधून सन्क्रमण चालू असते. अधिक अधिक गुरफटणे चालू असते. कुमार अवस्थेमध्ये सामान्यतः कुठल्याही जबाबदार्‍या नसतात. अन्न, वस्त्र, निवार्‍याची चिन्ता नसते. जीव बागडून घेतो. यौवनात तर काय वसन्त खुणावत असतो. सगळेच भोग अति गोड वाटतात. काय भोगू अन किती भोगू असे होउन जाते. भोग भोगून जीर्ण झालेली देहाची शाल मग वार्धक्याचे लेणे होउन राहते. देह मनाची साथ करीत नाही. चिन्ता, दु:ख वाढतात. मग माणूस अन्तर्मुख व्हावयाला लागतो. पण हे अन्तर्मुख होणे आधी का घडत नाही? कोहम ची हाक आधी का उठत नाही?

कोहम चे उत्तर सोहम कळण्यासाठी मुळात संस्काराचा पाया मजबूत पाहिजे. जर बाळपणात संस्कार चांगले असतील तर फायदा होइल पुढील आयुष्यात. संस्कार संस्कार म्हणजे काय? लहानपणी आइ वडिल शिकवितात "सत्यम वद" अर्थात सत्य बोला. लहान वयातले ते "खरे बोलणे" पुढील प्रगल्भ आयुष्यात कळून येते की ब्रह्मं सत्य जगन मिथ्या. जे जे शाश्वत आणि अविनाशी तेच सत्य. लहान वयात शिकविलेल्या खर्‍याचा उलगडा पुढील आयुष्यात "सत्य" रुपाने कळायला लागतो.

आपल्या शालेय जीवनात आपण सगळे शिकतो की, " परोपकाराय फलन्ति वृक्षः | परोपकाराय वहन्ति नद्यः | नदी दुसर्‍याना पाणी देते. वृक्ष दुसर्‍याना फळे देतात. स्वतःच खात नाहीत. संत तुकाराम महाराज तर सोप्या भाषेत सांगतात "पुण्य पर उपकार, पाप दे पर पीडा" या सगळ्याचा मतितार्थ काय तर स्वतःच्याच देहसुखाव्यतिरिक्त इतरांच्याही सुखाबध्दल जागरुक असणे. म्हणजेच आपली देहासक्ती कमी व्हावी. देहासक्ती
नाहीशी झाली तरच माणूस अन्तर्मुख होणार. बा. भ. बोरकर म्हणतात " जीवन त्याना कळले हो, जीवन त्याना कळले हो, मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो".

हे सगळे लहान पणीचे संस्कार उतार वयातील जाणीवांचा पाया मजबूत करतात. आपल्या मुलांवर 'उपनयन संस्कार' होण्याची केवढी किमत विठ्ठलपन्त व रुक्मिणी यांनी मोजली आहे. संस्कारांसाठी केवढी तळमळ. पण ह्या आत्यन्तिक तळमळीचे फळ म्हणजे चारही भावंडांनी कोहम चे उत्तर सोहम हे अनुभविले. बाकी आपल्याला कोहम सोहम ऐकायला फारच सोपे वाटते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: