मेसोअमेरिका (3) - झापोतेक (The People)

Submitted by हेमांगीके on 17 May, 2012 - 12:52

मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture)

१६ व्या शतकात स्पॅनिशांनी, आपण जिंकलेल्या मेसोअमेरिकन वसाहतीतल्या लोकांची माहिती गोळा करून दस्ताऐवज बनवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी काही आस्तेक जमातींशी संपर्क साधला. या जमाती स्वत:ला “Tzapotecatl “ असं म्हणत. Tzapotecatl चा अर्थ "People of the place of Sapote". (झापोतेकांचा असा समाज होता ही त्यांचे पूर्वज सापोतेच्या(१) झाडावरून आले.) स्पॅनिशांना तो शब्द काहीसा “Zapotea “ असा वाटला आणि त्यांनी या जमातींना Zapotec असं संबोधलं .

स्पॅनिशांच्या आगमनापूर्वी झापोतेकांच्या उच्च वर्गातील लोकांचा (ज्यांच्या हातात सत्ता व अधिकार होते) असा समज होता की आपले पूर्वज आणि देव वरती ढगात रहातात आणि मृत्युनंतर आपणही आकाशात जाऊन त्याचाच एक भाग बनणार आहोत. त्यांच्या या श्रद्धेमुळे त्यांना काही भागात Be’ena’ Za’a. (Cloud People) असं नाव मिळालं.

२१ व्या शतकातले झापोतेक स्व:ताला Be’ena’ म्हणजेच The People म्हणवून घेतात. या लेखात आपण जाणून घेऊया या झापोतेकांबाद्द्ल.

ओल्मेकांनी रचलेल्या भरभक्कम पायावर झापोतेकांनी आपली संस्कृती नेटाने बांधण्याचं काम उत्तमरीत्या केलं. झापोतेक ही मेसोअमेरीकेतली दुसरी महत्त्वाची संस्कृती. बोलीभाषेला सर्वप्रथम लिखित स्वरूप देण्याचं श्रेय मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये झापोतेकांकडे जातं. मेक्सिकोच्या आसपास मिळालेल्या पुराव्यावरून त्यांचे समकालीन ओल्मेक व तोल्तेकांशी व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट होते. “बार आणि डॉट”ची मोजणी पद्धत, वीस या अंकावर आधारित अंकतालिका (Vigesimal/base 20), दुहेरी चक्राकार दिनदर्शिका ही झापोतेक संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगता येतील.

वसतीस्थान : साधारणपणे मेक्सिकोच्या दक्षिणेला असलेल्या डोंगराळ भागात वाहाकामध्ये (Oaxaca) पिढ्यानपिढ्या झापोतेकांचं वास्तव्य आहे. ओल्मेकांच्या र्‍हासानंतर, मागच्या भागात आपण जे मोंते आल्बान पाहिलं, त्याचा ताबा झापोतेकांनी घेतला आणि पुढे जवळजवळ कित्येक वर्ष ते त्यांची राजधानी बनलं. मोंते आल्बानला त्यांनी एक सुंदर आणि मोठं शहर बनवलं.

मोंते आल्बानचं झापोतेक नाव आहे Danibaan म्हणजेच “पवित्र पर्वत” (Sacred Hill) या डोंगराच्या माथ्यावर झपोतेकांनी पिरॅमिड्स बांधली, देवळं बनवली. मोंते आल्बानच्या भरभराटीच्या काळात तिथे साधारण ३५ हजारांची लोकवस्ती असल्याचा कयास आहे. तर चला एक छोटीशी सफर करुया झापोतेकांच्या मोंते आल्बानची.

ग्रान प्लाझा : मोंते आल्बानच्या मधल्या चौकाला "ग्रान प्लाझा" म्हणतात. चौकच्या मधोमध असलेली इमारत हे मुख्य देवस्थान. त्याच्या समोर ठेवलेला दगड बळी देण्यासाठी वेदी म्हणून वापरीत.

या इमारतीसमोर एक बॉल कोर्ट आणि राजवाडा (क्रमांक १७) आहे. असं म्हणतात, या राजवाड्याला भुयारी मार्ग आहे आणि तो देवळाला जोडतो. या स्थापत्याशात्राच्या नमुन्यामुळे राजाला अचानक देवळात प्रकट होऊन लोकांना चकीत करता येई. मोंते आल्बनच्या बॉलकोर्टचं वैशिष्ट्य म्हणजे माया व तोल्तेकांच्या बॉल कोर्टप्रमाणे इथे बॉलरिंग नाही.

वेधशाळा (Building J): देवळाशेजारी असलेली छोटी त्रिकोणाकृती इमारत म्हणजे वेधशाळा. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्व इमारती काटकोनात बांधलेल्या आहेत पण वेधशाळेची ही इमारत इतर इमारतींना ४५ अंशाचा कोन करत बांधली आहे. कदाचित या विशिष्ट कोनामुळे खगोलशास्त्राने झपाटलेल्या या लोकांना अवकाश निरिक्षण करणे सोपे जात असेल. याच ठिकाणी दुहेरी चक्राकार कॅलेंडरचं तंत्र (जे आपण मायन समजतो) विकसित झालं. झापोतेक नवी कालगणना ५२ वर्षांनी करीत. (आपण जसं १०० वर्षांनी करतो) दर ५२ वर्षाच्या शेवटच्या रात्री सर्व आगी विझवून नरबळी देत. डोक्यावरचा सप्तर्षी सरकला की सुर्याला पुढच्या ५२ वर्षांसाठी जीवनदान मिळाल्याचं मानलं जाई.

(Building L): चित्रात अगदी वरती Building L दिसेल. या इमारतीला "Danzantes" (dancers) किंवा "नर्तक कक्ष" म्हणतात. इथे मिळालेल्या दगडी अवशेषात अनेक आकृत्या आहेत. त्या नक्की काय आहेत यावर बरीच मतं आहेत. काहिंना ती लढाईत जिंकलेली शत्रूची चिन्हे वाटतात, काहिंना बॉल गेम मधले मृत खेळाडू तर काहिंना नर्तक, त्यातलाच हा एक नमुना :

स्मशानभूमी (Tomb 56): चित्रात अगदी खालच्या बाजूला झापोतेकांची स्मशानभूमी दिसेल. या ठिकाणी अनेक थडगी सापडली आहेत. त्यापैकी क्रमांक १०४ क्रमांकाच थडगं महत्त्वाचं मानलं जातं. या थडग्यात अनेक अमूल्य वस्तू सापडल्या आहेत. या थडग्यावर झापोतेक पर्जन्य देवाचं चित्र आहे.

मोंते आल्बानच्या उत्तरेला बरीच पिरॅमिड्स व देवळे आहेत. उत्तरेला असलेलं पिरॅमिड सर्वात उंच आहे.
ग्रान प्लाझाच्या प्रवेशद्वाराजवळ संग्रहालयात या ठिकाणी मिळालेल्या बराचश्या वस्तू ठेवल्या आहेत.

मित्ला: मित्ला हे प्रसिध्द झापोतेक गाव. मित्ला हे नाव अस्तेकांच्या नौवात्लमधून आलं. Mictlán म्हणजे "मृतांची जागा किंवा पाताळ". मित्लाचं झापोतेक नाव Lyobaa म्हणजे "विश्रांतीची जागा". स्पॅनिशांनी Mictlán चं मित्ला केलं. मोंते आल्बान नंतर उदयास आलेलं. झापोतेक हे कुंभारकाम आणि विणकामात प्रसिद्ध आहेत. आधीच्या लिखत नमूद केल्याप्रमाणे मेसोअमेरिकनांना जरी चाक माहित असलं तरी त्यांनी त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला नाही. ही परंपरा या गावात आजही पाळली जाते. चाकऐवजी पालथ्या ताटलीवर, ताटली उपडी ठेवून वरची ताटली गोल फिरवून मातीच्या वस्तू बनवल्या जातात. या अशा:

हा मित्ला विणकामाचा नमुना :

धर्म व देवदेवता : सर्व मेसोअमेरिकन संस्कृतीप्रमाणे झापोतेकही बहुदेवतावादी होते. त्यांचे दोन महत्वाचे देव म्हणजे Cocijo (पर्जन्यदेव) आणि Coquihani (प्रकाशाचा देव). प्रजनन आणि कृषीशी निगडीत देव हे झापोतेक देवांच वैशिष्ट्य. Copijcha हा युद्धाचा देव, Cozobi हा मक्याचा आणि Pecala हा प्रेमाचा देव, Pitao Xoo भूकंपाचा देव तर Cozaana सृष्टीचा निर्माता.

हा Cocijo (पर्जन्यदेव) त्याच्या एका हातावर पाणी ओसंडून वाहतंय तर दुसर्या हातावर वीज.

झापोतेक पापक्षालनासाठी देवाला रक्त देत. गंभीर गुन्ह्याची कबुली देताना हातवर, गालावर जखमा करून त्यातून निघणारं रक्त ते मक्याच्या सालावर वाहत असत.

समाजजीवन : बारा हजार वर्षांपेक्षा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या मोंते आल्बानचा इतिहास ५ चरणात विभागला जातो.

१) मोंते आल्बान १ – ख्रि.पू. ४०० – १००
२) मोंते आल्बान २ – ख्रि.पू. १०० – इ.स. १००
३) मोंते आल्बान ३ – इ.स. २०० – इ.स. ९००
४) मोंते आल्बान ४ – इ.स. ९०० – इ.स. १३५०
५) मोंते आल्बान ५ – इ.स. १३५० – इ.स. १५२१

पहिल्या चरणातील झापोतेक हे बरेचसे ओल्मेकांच्या प्रभावाखाली होते. दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणात मोंते आल्बानची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्याचा विस्तार झाला.

झापोतेक समाजजीवन लिंगाधारित होते. स्त्री व पुरुष वेगवेगळे राहून कार्य करीत. स्त्रियांसाठी योनिशुचीता खुपच महत्त्वाची मानली जायची. स्त्री लहान असो वा वयोवृद्ध योनिशुचीता ही प्रतिष्ठेची मानली जात होती. घर आणि मूलं सांभाळणं हे स्रियांचं मुख्य काम मानलं जाई. वयाच्या दहा बारा वर्षांनंतर मुलींबा एकटं बाहेर पडण्याची परवानगी नव्हती.

भाषा : झापोतेकांच्या बर्‍याच बोलीभषा आहेत. त्या Oto-manguean या भाषिक गटात मोडतात. या भाषांना Tone Language संबोधतात याच कारण असं की या भाषा बोलतांना शब्दाचा उच्चार फार महत्त्वाचा ठरतो. उच्चारच्या उतार चढावावर त्या शब्दाचा अर्थ ठरतो. उदाहरण द्यायचं झालाच जसा आपण पाणी(जल) आणि पाणि(हात) जसा फरक करतो तसच काहीसं. आवाजातला उतार चढाव शब्दाचा अर्थ समजण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

मोंते आल्बानने भरभराटीची अनेक वर्षे पहिल्यानंतर झापोतेकांची जागा मिह्तेकांनी घेतली आणि त्याचा र्‍हास चालू झाला. मिह्तेकांनी मोन्ते आल्बनचा वापर उच्च वर्गासाठी स्मशानभूमी म्हणून केला. मोंते आल्बांच्या र्‍हासाची कारण वाढत्या लोकसंख्येमुळे उद्भवलेली अन्नटंचाई किंवा उंच जागी राहतांना होणारी गैरसोय असं सांगितलं जातं

झापोतेक शूर , लढवय्ये समजले जातात. सहा दशकाहून अधिक काळ मेक्सिकोचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणारे बेनितो व्हारेस हे झापोतेक समाजाचे. वाहकाच्या आसपास आजही झापोतेक संस्कृती नांदते आहे. स्पॅनिशांच्या प्रभावाखाली आल्याने बर्‍याच प्रथा आता बंद पडल्या आहेत. जागतिकीकरणाच्या शर्यतीत स्त्रिया ही विणकाम , भरतकाम, कापड उद्योगास हातभार लावत आहेत. वाढत्या स्पर्धेला तोंड देतांना झापोतेक स्व:ताला बदलत आहेत. परंतु वाहकाशी असलेलं त्याचं हजारो वर्षांचं नातं तसंच अतूट आहे.

काही झापोतेक कलाकृती :

***

टीपा :

प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत.

झापोतेक हे नाव सपोतेक, त्सापोतेक असेही उच्चारतात. वाचनाच्या सोयीसाठी मी झापोतेक वापरला आहे.

१) सापोते : चिक्कूसारखं एक फळ.
२) Oaxaca या शब्दाचा उच्चार wah-HAH-kah असा होतो.

संदर्भ :

१) मेक्सिकोपर्व (मीना प्रभू)
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Ancient Wisdoms - Gayle Redfern
३) UNESCO Website : http://whc.unesco.org/pg.cfm?cid=31&id_site=415
४) Lost Civilization (Parragon Books)
५) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
६) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.

(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

गुलमोहर: 

.