मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture)

Submitted by हेमांगीके on 14 May, 2012 - 06:59

मेसोअमेरिका (१) – एक दृष्टिक्षेप

तज्ज्ञांच्या मते, मेसोअमेरिकन प्रांतातील पहीली वसाहत ही बहुदा सैबेरीयापासून स्थलांतरित झालेले भटके लोक. त्यांच्या स्थलांतराचा निश्चित कालावधी जरी माहीत नसला तरी Tlapacoya (North-East Mexico city) येथे सापडलेल्या काही हाडांच्या रेडीयोकार्बन डेटिंगने सिद्ध झाले आहे की आस्तेक वस्ती ज्या भागात होती त्या भागाच्या आसपास सुमारे ख्रि.पू. २१००० वर्षे वस्ती असावी. याच मनुष्यवस्तीमधील काही प्रगत पिढ्यांना “ओल्मेक” असे नाव देण्यात आले.

इतिहासाने ज्या संस्कृतीला “मेसोअमेरिकन संस्कृतीची जननी” असं नाव बहाल केलं आणि जी पुढील बर्‍याच मेसोअमेरिकन पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरली त्या संस्कृतीचा आढावा या लेखात आपण घेऊ.

ओल्मेकांचा शोध लागेपर्यंत मायन संस्कृती प्राचीन मानली जायची. परंतु अलिकडे झालेल्या संशोधनात ओल्मेकांचं स्थान खूप आधीच असल्याच सिद्ध झालं आहे. ओल्मेकांचा निश्चित कालखंड इतिहासाला माहित नाही. त्यांच्या काही कलाकृती सोडल्या तर त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. इतकाच काय त्यांना दिलेलं “ओल्मेक” हे नावही आस्तेकांच्या "नौवात्ल"(१) भाषेने त्यांना बहाल केलं. ओल्मेक म्हणजे “रबर पीपल” (Rubber People) त्यांना हे नाव मिळण्याचं कारणही एवढंच की त्यांचे अवशेष रबर पिकणार्‍या प्रांतात मिळाले.

ओल्मेकांचा कालखंड ख्रि.पू. १५०० - ४०० असा मानला जातो. गंमत म्हणून एक दृष्टिक्षेप टाकू नेमकं या काळात बाकी जगात काय चालू होतं. याचं सुमारास इजिप्शियनस पिरॅमिड बांधण्यात गर्क होते. भारतात आर्य संस्कृती फुलत होती, शून्याचा शोध लागला होता, ऋग्वेद जन्म घेत होता. तिकडे पूर्वेत चायनीज पतंग उडवत होते आणि रेशमाचा शोध तर त्यांनी फार पूर्वी लावला होता. युरोपात ग्रीसमध्ये होमारने “इलियड” आणि “ओडिसी” लिहायला सुरवात केली होती. इतर संस्कृतींच्या मानाने ओल्मेक जरी मागासलेले असले तरी त्यांनी एका संस्कृतीचा पाया रुजवला.

वस्तीस्थान : मेक्सिकोच्या पूर्वेस असलेल्या Tuhtala डोंगरांच्या आसपास त्यांची वस्ती होती. याच भागाला संशोधकांनी "ओल्मेक Heart Land " संबोधले आहे. “ओल्मेक Heart Land” मधे १) सान लोरेन्सो (San Lorezo) २)ला वेंता ( La Venta) अशी दोन मुख्य पुरातत्त्व ठिकाणे अंतर्भूत आहेत.

१)सान लोरेन्सो : सान लोरेन्सो हे नाव सान लोरेन्सो, तेनोच्तीत्लान(२), पोत्रेरो नुएवो या तीन पुरातत्त्व ठिकाणांना एकत्रितरित्या दिलं गेलं आहे. ही तिन्ही ठिकाण मेक्सिकोच्या आग्नेय दिशेस वेराक्रुझ (३) येथे आहेत. साधारण ख्रि. पू. १२००-९०० या काळात सान लोरेन्सो मोठे शहर असावे तसेच ते शेतीसाठी उपयुक्त अशा भागाच्या आसपास होते. साधारणपणे ७०० हेक्टर परिसरात बांधलेल्या या शहरात दगडी पाईप बांधून केलेली सांडपाणी वाहून नेण्याची सोय होती. ख्रि. पू. ९५० सुमारास सुरु झालेल्या सान लोरेन्सोच्या र्‍हासाची कारणे वातावरणातील बदल तसेच नद्यांनी आपल्या मार्गात केलेला बदल मानला जातो.

२)ला वेंता (La Venta): सान लोरेन्सोच्या र्‍हासानंतर ला वेंता हे ओल्मेकांचे मुख्य केंद्र बनले. ओल्मेकांचे दिडशेहून अधिक अवशेष व्हीय्ये एरमोसा (४) मधील वेंता पार्क मध्ये पाहायला मिळतात. नमुन्यादाखल ही काही चित्रे. हे पाहिलं चित्र आहे ग्रान आल्तारचं.

ग्रान आल्तार: अभ्यासकांचा असा अंदाज आहे कि बेसॉल्ट खडकातील “आल्तार” म्हणजे भव्य शिला ज्या ओल्मेक राज्यकर्ते महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रम व रितिरिवाजांसमयी बसण्यासाठी वापरत असत. या चित्रातील शिळेत वरच्या बाजूस कोरलेली पट्टी आहे. मधला भागात बसलेला रक्षक आपल्या हातातील दोरखंडाने दोन्ही बाजूच्या कैद्यांना पकडून ठेवत आहे.

ला वेंता मधली अजून एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे जायंट हेड्स(Giant Heads). खाली दिलेल्या चित्रामधे जवळ जवळ १२ फुट उंच अस हे आफ्रिकन माणसाचं मस्तक. चित्रात दिसत असल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे. अतिशय साधारण अवजारांचा वापर करून ही इतकी भव्य आणि तितकीच प्रमाणबद्ध कलाकृती पाहताना त्याच्या निर्मात्याला मनापासून दाद दिल्या खेरीज राहवत नाही. अशी सुमारे १२ मस्तके या ठिकाणी सापडली आहेत.
मोंते आल्बान : इसवी सन पूर्व ५०० वर्षे ओल्मेकांनी मेक्सिको मधील मोंते आल्बान इथे डोंगर माथ्यावर शहर वसवलं. डोंगर माथ्यावर शहर वसवण्याचं कारण या परिसराचा भूगोल. तीन दर्‍यांमधे असलेला हा सुपीक प्रदेश सर्वत्र नजर ठेवायला अतिशय उपयुक्त होता. ओल्मेकांनी याच कारणास्तव आपली राजाधनी येथे बनवली असावी. त्या काळी देखील या ठिकाणी १० हजाराची वस्ती असल्याचा कयास आहे. ओल्मेकांचा हा निर्णय किती अचूक होता ते त्यांच्या नंतर आलेल्या झापोतेकानी मोंते आल्बानला आपली राजधानी बनवून सिद्ध केलं.

ओल्मेकांचा प्रभाव : ओल्मेकांच्या बर्‍याचं परंपरा, रिती, देवदेवता इतकचं काय तर अंक, लिपी पुढच्या सर्व मेसोअमेरिकन संस्कृतींनी आपलेसे केले. आस्तेकांच्या देवदेवता असोत किंवा मायनसची दुहेरी चक्र पद्धतीची कालगणना असो बर्‍याचं ठिकाणी ओल्मेकांचा प्रभाव आपल्याला वेळोवेळी जाणवतो. जग हे चार दिशांमध्ये विभागले गेले आहे ही कल्पना मेसोअमेरिकन जगात ओल्मेकांनीच प्रथम मांडली. ओल्मेकांनी छपाई तंत्र विकसित केल्याचे पुरावे सापडले आहेत. दगडी दंडगोल छाप्यावर शाईसारखा द्रव टा़कून अंगावर, कपड्यावर फिरवित असत. तज्ज्ञांच्या मते माया लोकांच्या लिपीचे मूळ हे ओल्मेकांच्या सांकेतिक चिन्हात आहे. ओल्मेकांच्या कलाकृतींमध्ये अभ्यासकांना १८० हून अधिक संकेतिक चिन्हे आढळली आहेत. हा एक ओल्मेक चित्रलिपीचा नमुना.

देवदेवता : मेसोअमेरिकन काळात अनेक देवदेवता एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित झाल्याचे दिसून येते. आस्तेक आणि माया लोकांचे बरेच देव ओल्मेकांकडून आले. ओल्मेक प्राथमिक स्वरूपात या देवांची पूजा करत असत. जसे Tlaloc(आस्तेकांचा पर्ज्यंनदेव) , Tezcatlipoca(आस्तेकांचा रात्रीचा देव) , Quetzalcoatl( आस्तेकांचा पहाटेचा देव आणि माया लोकांचा kukulcan), Huehueteotl ( अस्तेकांचा अग्निदेव). नमुन्यादाखल हे चित्र आहे Tlaloc चं.

बॉल गेम : बॉल गेम शोधून काढण्याचं सर्व श्रेय मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये ओल्मेकांना जात. “पासो दे ला आमादा” (Paso de la Amada) येथील बॉल कोर्ट हे मेसोअमेरीकेतील सर्वात जुने बॉल कोर्ट मानले जाते. “एल मानाती” (El Manati) जवळ एक डझनाहून अधिक रबरी बॉल सापडले आहेत. परंतु ते नक्की ओल्मेकांनी वापरले असतील की नाही यावर अजून ही दुमत आहे. बॉल गेमसाठी लागणारे बॉल ओल्मेक रबराच्या झाडाचा चीक आणि मॉर्निंगग्लोरी फुलाची वाईन यांच्या मिश्रणापासून बनवत. रबरामुळे चेंडू उसळ्ण्यास मदत होई.

नगर रचना : ओल्मेक घरे साधारणपणे विस्तृत मैदानात विखुरलेली असत. घराजवळच्या बागेत औषधी वनस्पती व घरगुती वापरासाठी छोटी पिके जसे सुर्यफुल इत्यादी घेत असत. कोको, अवकाडो सारखी फळे ही त्यांना माहित होती. फळे व भाज्या या बरोबरीने मासे, कासव, साप, ससा इ. भक्षण केले जाई. शेते मुख्यत्वे गावाबाहेर असत आणि त्यात मका, स्कॉश, बटाटे, कापूस या सारखी पिके घेतली जात.

र्‍हास : ओल्मेकांच्या र्‍हासची दोन कारणे दिली जातात. वातावरणात अचानक झालेला मोठा बदल जो मोठ्या लोकसंख्येला मानवाला नाही. ओल्मेक सर्वतोपरी मुख्यत्वे शेतीवर गुजराण करीत. नद्यांच्या पत्रात झालेला बदल शेतीसाठी अयोग्य ठरला. दुसरा प्रवाद असा आहे की वारंवार या प्रदेशात होणारे ज्वामुखीमुले ओल्मेकांनी दुसर्‍याजागी स्थलांतर केले असावे.

ओल्मेकांच्या र्‍हासाची कारणं काहीही असली तरी त्यांनी मेसोअमेरिकन जगाला दिलेली देणगी अमूल्य आहे. मेसाअमेरीकन संस्कृतीचा पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या जगाला फारशी माहीत नसलेली ही संस्कृती जगाच्या पाठीवर नांदली, बहरली आणि पुढच्या अनेक पिढ्यांना मार्ग दाखून नाहिशी झाली. ओल्मेकांच्या अनेक शिल्पकृतींमध्ये कोरलेले चेहरे बसक्या नाकाचे(चीनी, मंगोलियनसशी मिळतेजुळते), जाड ओठांचे(आफ्रिकन) तर काही युरोपियनांसारखे टोकदार दाढीचे आढळून येतात. अमेरिका खंडाला कोलंबसचे पाय पहिल्यांदा लागले तर मग जगाशी संपर्कं नसलेल्या या ओल्मेकांनी कोरलेले हे चेहरे नक्की कोणाचे? या आणि अशा अनेक प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन एक संस्कृती जगाच्या पाठीवरून लुप्त झाली. सर्व मेसोअमेरिकन संस्कृती मध्ये “ओल्मेक” हे माझे सर्वात लाडके. त्यांच्याबद्दल कितीही वाचालं, ऐकलं तरी उत्सुकता न संपणारी. तुर्तास काही माझ्या आवडत्या ओल्मेक कलाकृतींचे फोटो इथे डकवून ओल्मेकांना निरोप देत आहे.

ओल्मेक लहान बाळ :

हातात लहान बाळ धरलेली मूर्ती:

हा पहिलवान :
माशाच्या आकाराचं भांडं :

***

टिपा :

प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे.

थोडी अवांतर माहिती:
१. नौवात्ल : ही आस्तेकांची भाषा. तिच्यात “त्ल” हे अक्षर फार येत.
२. तेनोच्तीत्लान : आस्तेकांची राजधानी तेनोच्तीत्लान आणि या लेखात उल्लेख केलेली तेनोच्तीत्लान दोन्ही वेगवेगळया. आस्तेकांची राजधानी मेक्सिको सिटीच्या जवळपास होती.
३. वेरा क्रुझ : आर्नान कोर्तेसने मेक्सिकोच्या किनर्‍यावर उतरल्यावर येशूच्या नावाने क्रॉस उभा केला आणि तो प्रदेश स्पॅनिश राजाच्या नावे घोषित केला. त्याच नाव त्याने वेरा क्रुझ (Vera Cruz – अर्थ : True Cross) असं ठेवलं.
४. व्हीय्येरमोसा (Villahermosa) : हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ – सुंदर खेड. (व्हीय्या – खेड एरमोसा – सुंदर)

संदर्भ :

१) मेक्सिकोपर्व (मीना प्रभू)
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Olmec
३) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
४) Lost Civilization (Paramount Publications)

(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

गुलमोहर: 

.

अत्यंत माहितीपूर्ण सुरेख लेख आणि कुतुहलजनक पुतळ्यांचे फोटो. या लोकाना आफ्रिकन चेहरे कुठे पहायला मिळाले असतील?

ज्योती कामत,

आफ्रिकींचा अमेरिकेच्या त्या प्रांताशी अटलांटिक महासागराद्वारे संपर्क असणार.

मी ऐकलंय की काही प्राचीन अमेरिकन लोक गुहांमध्ये गडप झाले. किंवा वातावरणातल्या बदलांमुळे मुद्दामून भुयारांत गेले. यांत ओल्मेकांचा समावेश होतो की नाही ते माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.