क्राईम पॅट्रोल - दस्तक - आरसा

Submitted by बेफ़िकीर on 12 May, 2012 - 02:51

क्राईम पॅट्रोल दस्तक हा भारतीय समाजाचा लखलखीत आरसा आहे. इतर समाजांचा नसेलही किंवा असेलही, पण आपल्या समाजाचा आहे.

निवेदक अनुप सोनी हा रुबाबदार माणूस अत्यंत संवेदनशीलपणे सर्व नाजूक विषयांवर भाष्य करत 'गुन्हा करण्याची मानसिकता कोणत्या क्षणी तयार होते हे लोकांच्या लक्षात यावे' यावर उपयुक्त बोलतो.

या कार्यक्रमात भारतात झालेले विविध प्रकारचे गुन्हे कसे घडले, का घडले, पोलिसांनी तपास कसा घेतला व गुन्हेगारांची, शोषितांची, इतर संबंधितांची मानसिकता काय होती, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व सांस्कृतीक परिस्थिती काय होती यावर सर्व काही दाखवले जाते. या सत्य घटना असल्याने यात नाट्य रुपांतरापेक्षा अधिक काही नाट्यमय नसते.

या कार्यक्रमाचा मी पंखा आहे

सोनी टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम बरेचदा रात्री अकरा ते बारा इतका उशीरा असतो तर रिपीट टेलिकास्ट अनेकदा दुपारी साडे तीन ते सायंकाळी सात या कालावधीत असतो

सामान्य जीवन जगणार्‍याच्या डोक्यातही येणार नाहीत असे गुन्हे झालेले दिसतात. त्यात शोषण, चोरी, जातपात, लैंगीकता, नुसताच संताप, व्यसनाधीनतेची व त्यातून घडणार्‍या गुन्ह्यांची परमावधी असे सर्वच प्रकार आढळतात

खरे तर या कार्यक्रमाबाबत केव्हापासूनचे लिहावेसे वाटत होते. आपण कोणी हा कार्यक्रम बघता काय? या कार्यक्रमाबाबत मायबोलीवर आधीच धागा असल्यास क्षमस्व व मी हा धागा अप्रकाशित करेन

माझा असा अंदाज आहे की हा कार्यक्रम बघणार्‍यांपैकी कोणाला तो आवडला नाही असे बहुतेक होणारच नाही

अर्थात, आवडणे म्हणजे सादरीकरण, वास्तवता, कलाकारांचा संयत व नैसर्गीक अभिनय आणि कोणत्याही मोठ्या नावापासून दूर राहून सामान्य नावांकडून दर्जेदार अभिनय करून घेणे

मुळात कथानक (स्क्रिप्ट) इतके पॉवरफुल असते की त्यात काही फारसे करावे लागत नसावे

आपली मते मांडाल काय?

धन्यवाद

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एका मुंबईतल्या तरुणाकडे एक मोठी जमीन असते. ती तो त्याच्या इस्टेट एजंट मित्राला विकायला तयार नसतो. त्यामुळे प्लॅन करून तो मित्र, त्याची बायको आणि त्याचे काही मित्र या तरुणाला आपल्या घरी जेवायला बोलवून बेशुद्ध पाडतात. बेशुद्ध पाडल्यावर त्याला एका बेडखाली असलेल्या स्टोरेजमध्ये डांबतात. अडीच वर्षे त्याला तिथेच ठेवतात हे कल्पनेबाहेरचे आहे. अधेमधे त्याच्या सह्या वगैरे घेत असतात. दिवसातून त्याला फक्त वीस वीस मिनिटे असे दोन वेळा बाहेर काढत असतात.

एक निनावी चिठ्ठी पोलिसांना मिळते व त्यात लिहिलेले असते की असा असा एक तरुण काही महिन्यांपासून गायब झालेला आहे. त्यावरून पोलिस तपास करून त्याला सोडवतात

ही कथा मला भयानक दु:खी करून गेली Sad

या कार्यक्रमात दाखविलेले आतापर्यंतचे सर्व गुन्ह्यांवरचे एपिसोड अत्यंत प्रभावशाली होते. त्यातल्या त्यात "रुचिका गिरोत्रा" आत्महत्ये वरचे एपिसोड

मला हि आवडते ह्या कार्यक्रमाचे सादरिकरण, पुर्वी पण यायचा पण अनुप सोनी आल्या पासुन कार्यक्रमाची प्रत सुधारली.
मला तो भाग खुप अचंबित वाटला ज्यात एका मुलीवर वार होउन , ती कोमात जाते, कोमातुन बाहेर येते तर सगळी स्मरण शक्ती जाते, तरी मह्त्प्रयासाने एक वर्षाने तिला सर्व आठ्वते.

हो, पण ते महत्प्रयासाने आठवत नाही

देवळात आरतीच्या वेळी पुन्हा परिणाम होतो आणि झोपेत स्वप्न पडते की असे काहीतरी

विजय - तो यू ट्यूब वरचा धागा सावकाश पाहतो, तो एपिसोड मी पाहिलेला नसावा, आठवत नाही

या घटना, सत्य घटना आहेत, एवढेच अंगावर काटा आणायला पुरेसे आहे.
पण जगाचा इतिहास काही वेगळा नाही. गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी असणारे फारच थोडे देश उरलेत आता.

दिनेशदा

असे कोणते देश आहेत ते कृपया सांगावेत (कमी गुन्हे असणारे)

(कॅनडा व स्वित्झर्लंड त्यात आहेत का?)

क्राईम पेट्रोलमध्ये बरेच गुन्हे मोबाईल फोनच्या रेकॉर्ड्सवरून आणि लोकेशन्सवरून सुटले आहेत, या दृष्टीने तंत्रज्ञान हे वरदान

आम्ही सुद्धा हा कार्यक्रम पाहतो,गुन्हेगाराना पकडून त्यांची पोल खोलली जाते त्यावेळी पोलिसानांबरोबर पाहनार्‍यानासुद्धा जो आनंद मिळतो त्यातच या कार्यक्रमाचे यश सामावले आहे.

खर आहे, हा कार्यक्रम सत्यघटना/गुन्हे यांच अतिशय प्रभावि सादरीकरण करतो. हल्ली भारतात/माबोवर गाजणार्‍या आमीरखानच्या पहिल्या एपिसोडवरील विषय, क्राइम पेट्रोलने साधारण ६-७ महिन्यांपुर्वि लोकांसमोर आणला होता; पण त्याची घ्यायला हवी तशी दखल घेतली गेली नाहि.

आमच्याइथे सी.आय्.डी. - क्राईम पेट्रोल - अदालत ह्या क्रमाने हे कार्यक्रम दिसतात. मला स्वतःला क्राइम सिन इनव्हेस्टिगेशन, फोरेंन्सिक सायन्स आणि कोर्टरूम ड्रामा ह्या सगळ्यात इंटरेस्ट असल्याने मी आवर्जुन हे तीनही कार्यक्रम पाहते. त्यायला सी.आय्.डी. हा 'विनोदी कार्यक्रम' म्हणुन पाहिला जातो. अदालत हा कोर्टारूम ड्रामा साठी (आता त्याच्या केसेस ची लेव्हल पण घसरायला लागलीये हल्ली).
पण क्राईम पेट्रोल हा सगळ्यात आवडता कार्यक्रम.

तीनही कार्यक्रमात काम करणारे लोक तेच असले तरी सी.आय्.डी. च्या सेटवरुन क्राईम पेट्रोलच्या सेट्वर गेल्यावर त्यांच्या कामात लक्षणिय सुधारणा कशी होते? हा एक वेगळा 'इनव्हेस्टीगेशनचा' विषय आहे.. आणि त्याचं श्रेय क्राईम पेट्रोलच्या रायटर, डायरेक्टर पासून टेक्निकल टीम मधल्या सगळ्यांना जातं.

हा कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजाच्या बदलेल्या मानसिकतेबद्दल भीती वाटायला लागते, वाईट वाटायला लागतं... कल्पनाही करता येणार नाही अश्या कारणांसाठी, आणि अश्या प्रकारे गुन्हे घडत असतात/ आहेत आपल्या आजुबा़जूला हे चित्र चांगलं नक्कीच नाही, पण निदान सतर्क राहायला हवं, असं काही घडत असेल तर 'माझ्या घरात घडत नाहीये ना.. माझं कुटुंब सुरक्षित आहे ना.. मग मी कशाला यात पडू' ही विचारसरणी बदलायला लावणारा कार्यक्रम आहे हा !
लहान मुलं आणि तरुणांना लागलेली 'चैनीची चटक', मोठ्यांना हवं असलेलं 'फास्ट यश', लहान लहान गावातली सरंजामशाही, ठेकेदारी, मुलींची खरेदी-विक्री, व्यसनाधिनता, मोठ्या शहरात वृद्ध् मातापित्यांच्या वाट्याला आलेलं एकाकी आयुष्य..... इतके वेगवेगळे विषय कुठे ना कुठे शेवटी खून, किडनॅपिंग यासारख्या गुन्ह्यापर्यंत जाऊन पोचतात ह्याची डोळे उघडणारी जाणीव ह्या कार्यक्रमातून होते.

क्राईम पेट्रोल पाहून माझा पोलिंसांबद्दलचा आदर खरंच वाढला आहे. लहानसा क्लू घेऊन किंवा अनेकदा 'ब्लाईड केसेस' मधे कोणाताही क्लू नसताना कमालिच्या लॉजिकल पद्धतीनं ही लोकं गुन्हेगारापर्यंत पोचतात. काही काही केसेस मला ह्या साठी विशेष आवडल्या.
ह्या उलट एकाद्या गावात खालच्या जातीच्या लोकांना 'सिस्टीमवर' विश्वास ठेवूनही स्थानिक पोलिसांकडून साधी गुन्हा नोंदवली जायचीही मदत मिळत नाही, तेव्हा ह्या लोकांनी वारंवार सिस्टीमकडून मिळालेल्या निराशेपोटी शस्त्र हातात घेतलं तर ह्या लोकांची काही चूक नाही असंही वाटून जातं.

सिमकार्ड, मोबाईल ट्रॅक करुन गुन्हा शोधायला खूप मदत होते ही चांगली बाजु असली तरी खूपसे गुन्हे 'सहज उपलब्ध असणारी सिम कार्ड', आयडेंटिफिकेशन साठी जे कागदपत्र जमा करावे लागतात त्याकडे दुर्लक्ष करणे, ह्या कागदपत्रांची नीट विल्हेवाट न लावणे ह्या गोष्टींची मदत घेऊन होतात ही देखील गंभीरपूर्वक विचार करण्याची गोष्ट आहे.
(थोडं अवांतर - पण सिमकार्ड आणि मोबाईल टॅक करुन गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांना ट्रेनिंग दिलं जातं हा विषय हिंदी चित्रपटात एकाच सिनेमात हाताळला गेला आहे. अर्शद वार्सी आणि पंकज कपुरचा 'सेहेर' हा जरुर पाहण्यासारखा चित्रपट. दोघांचीही काम, सिनेमाची हाताळणी, विषय अप्रतिम)

एकूणच विचार करायला लावणारा कार्यक्रम.

अनुप सोनी कार्यक्रमाचं सादरीकरण उत्तम करतो, पण त्याच्या 'हातात हात गुंतवण्याच्या स्टाईलमुळे' कायम तो स्वतः हातात 'बेड्या घालुन' बोलतोय की काय असं वाटतं. Happy

क्राईम पेट्रोल मधली मला एक गोष्ट नक्की खटकते ते म्हणजे 'अंत्यविधी'. नाकातल्या कापसाच्या बोळ्यापासून ते लाकडं रचेपर्यत आणि मडकं फुटेपर्यंत प्रत्येक वेळी 'अंत्यविधी' इतक्या साग्रसंगीत दाखवायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पुर्वी दूरदर्शनवर 'चिता' दाखवायला सेंन्सॉर बोर्डाची परवानगी घ्यावी लागत असे. आता ह्या कायद्यात बदल झाला आहे की काय !!!

कार्यक्रम चालू होण्याआधी जे 'वैधानिक इशारा सर्टिफिकेट येतं' त्यातल्या शेवटच्या ओळीत 'घोषित' हा शब्द typo होऊन 'घेषित' असा लिहिला आहे हे लक्षात येण्याइतक्या बारकाईनं मी हा कार्यक्रम पाहते... त्यामुळे ह्याबद्दल फार लिहिलं गेलं असल्यास क्षमस्व. Happy

<<मुळात कथानक (स्क्रिप्ट) इतके पॉवरफुल असते की त्यात काही फारसे करावे लागत नसावे>> बरोबर आहे

रार .. पुर्ण पोस्टीला +११११११

खुप मस्त असतो हा कार्येक्रम. मी जेंव्हा शक्य तेंव्हा पहाते. मागच्याच आठवड्यात "इ फ्रॉड्स" बद्दल एक केस दाखवली.. ती मी प्रत्यक्षात जवळुन पाहिलेल्या एका फ्रॉड सारखीच आहे..

ह्या काही गोष्टी तर फारच भिडतात... खरच हा कार्येक्रम ही एक "दस्तक" आहे... कान उघडणी...

रार अप्रतिम पोस्ट.
क्राईम पॅट्रोल दस्तक हा माझा ही अत्यंत आवडता कार्यक्रम. संयमित सादरीकरण ही भक्कम बाजू आहे. संवाद सुद्धा अतिशय दर्जेदार आणि अर्थपूर्ण (उगिच सीआयडी सारखे नसतात :अओ:)
पुर्वी सीआयडी भयंकर आवडायचं पण क्रापॅ पाहिल्यावर मात्रं त्यात काही दम नाही हे जाणवलं. इतक्या लेट हा कार्यक्रम असतो टिव्हीवर पण खूप लोक फॉलो करतात. टिआरपी जबरी आहे. पुर्वी सीआयडीचा होता तसाच. शनिवार रविवार दिवसभर जुने एपिसोड दाखवतात.

बेफी - क्राईम पेट्रोल नव्हे, 'पॅट्रोल'.
पॅट्रोल म्हणजे फेरी.. (आढावा म्हणू थोडक्यात)

क्राईम पेट्रोल पाहून माझा पोलिंसांबद्दलचा आदर खरंच वाढला आहे.>>> अनुमोदन. क्रापे मधले एकदोन पोलिसवाले माझ्या खास आवडीचे आहेत Happy

अत्यंत आवडीने आम्ही हा कार्यक्रम बघतो. रीपीट प्रोग्रॅमसुद्धा बघतो.

फेसबुक वरुन बदनाम झालेल्या(केलेल्या) तरुणीची केस, आणि फेसबुकवर एक टिंगलीचा विडियो अपडेट होइल म्हणुन एका कॉलेजतरुणाने दुसर्‍याची केलेली हत्या हे सुन्न करणारे भाग होते. सगळ्यात शॉकिंग भाग म्हणजे एका अनाथ मेंटली डिसेबल्ड मुलीचे अनाथालयात झालेले शोषण..
शेवटची अनुप सोनीची कॉमेंटरी ऐकण्यासारखी.
मालिकेत थोडेसे अप्रसिद्ध (पण कामात अव्वल दर्जाचे) कलाकार असल्याने प्रत्येक भाग खरा वाटतो.

रार + १.. क्राइम पेट्रोल आणि सीआयडी दोन्ही आवडतात. अदालत, बाकिच्या सिरीयल्सच्या मार्गावर आहे. क्राइम सीन इन्व्हेस्टीगेशनचे उसगावातलेपण काही कार्यक्रम मला आवडायचे (सीएसआय आणि इतर). बर्न नोटीस ही सिरीयल सगळ्यात जास्त आवडती. Happy

पाकिपुंगा,

स्वित्झर्लंडमध्ये कौटुंबिक हत्या बर्‍याच होतात बरंका! दिसतं तसं नसतं, म्हणून तर हे जग फसतं! इथे आजून एक लेख आहे.

अवांतर : या कौटुंबिक हत्यांना सन्मानवध (ऑनर किलिंग) म्हणावे का? Sad

आ.न.,
-गा.पै.

आमच्याकडे पण रोज क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, अन व्ही चॅनल चा गुमराह रोज पाहिला जातो... खरच सुन्न होतं मन .. अन वाटत इतक सगळ आपल्या आजुबाजुला घडत असत.. अन आपण आपल आपल्याच दुनियेत जगत असतो.. खरच भयानक सार्‍या गोष्टी..

व्ही चॅनल चा गुमराह>>.

त्या दिवशी पाहिला हा कार्येक्रम... सुन्न झाले... खरच येवढ्या क्रुरतेला जातात का लोक? गुमराह मधे बहुतेकदा रस्ता भटकलेल्या तरुणां बद्दल स्टोरी असते.

रच्याकने...

मागे वैशाली हळदणकर हिचं "बारबाला" हे पुस्तक वाचलं होतं... ते वाचुन कळल होतं की रस्ता भटकणं म्हणजे काय ते....

एका जमीनदाराला गाव सोडायला लोक भाग पाडतात तो एपिसोड. त्याच्या मुलाचा शेवटी खूण करतात. तो भारी होता.

या क्षणी क्राईम पॅट्रोलवर निर्भया प्रकरणाचा दुसरा भाग दाखवत आहेत. (काल रात्री अकरा ते बारा दरम्यान पहिला भाग दाखवला होता).

अत्यंत प्रभावी चित्रण!

रक्त उसळत आहे. पुन्हा एकदा डिसेंबर २०१२ मध्ये झालेला संताप संताप होत आहे.

हॉरिबल!!! Sad Angry

मी बघायचो हा कार्यक्रम आधी पण पाहून झाल्यावर येणारी हतबलता व विषण्णता सहन होईना म्हणून बघायचा सोडून दिलाय . मन घट्ट करून पुन्हा बघायला सुरुवात करावी असे हा धागा वाचून वाटत आहे
धन्यवाद बेफीजी

रार पोस्ट अतीशय उत्कृष्ट आहे आपली ! धन्यवाद

बेफीजी तुमची ती ओळ आठवली >>जगात दु:ख केवढे सुखात मी जगू कसा <<

पोलिस आणि कोर्टाच्या एकुणच कामकाजाविषयी उत्सुकता आणि आवड असल्याने पण सिआयडी बघुन निराश झाल्याने कोणताही कार्यक्रम बघणे सोडले होते, पण हा बघावाच लागेल.

रार > एकदम फॅन दिसता या मालिकेचे. Happy

पण http://www.goanewsonline.com/index.php?option=com_content&view=article&i... वाचुन वाईट वाटले.

माझाही अत्यंत आवडता कार्यक्रम पण मुले जागी असल्यास पाहत नाही. गेल्या बर्‍याच दिवसांत एकही एपिसोड पाहिलेला नाहीये.

लोकेशन्सची निवड ही खूप मोठी जमेची बाजू!

त्याच लोकेशनला शूटींग करत असावेत बहुधा... नक्की माहीत नाही.

क्राईम पॅट्रोल दस्तक ही मालिका खरंच फार प्रभावी आहे. संवाद, चित्रण, पात्र, जागा सगळंच एकदम रियलिस्टिक. अनूप सोनी सुद्धा अँकरिंग जबरदस्त करतो. त्याच्या लिंक्स सुद्धा सुरेख लिहिल्या जातात, अत्यंत मॅचूअर भाषा आणि तो सादरही तितक्याच ताकदीने करतो.

अतिशय प्रभावी मालिका आहे. मायदेशी आल्यावर त्यातल्या त्यात हीच मालिका शक्य तितकी न चुकता पाहिली जाते. सादरीकरण अतिशय प्रामाणिक वाटते. केवळ टिआरपी साठी काहीही असा यांचा तरी खाक्या अजिबात वाटत नाही. अनूप सोनी छाप सोडून जातो दरवेळी.

Pages