मराठीचं काय होणार?

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

बेफिकीर यांचा मराठीचा अभिमान Uhoh हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखातले काही मुद्दे पटले तरी त्यामधे भविष्यात काय घडू शकेल, याबद्दल जे विचार मांडले आहेत ते मला पटले नाही. थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन कि त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले तरी त्यामागची कारणे मात्र त्यांनी मांडलेली नसतील. त्यांच्या एकेक विधानाचे मुद्देसूद खंडण करणारा हा लेख नाही. तर मनात आलेले काही वेगळे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

१. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्रः
माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीमधे दोन परस्परविरोधी गोष्टींचा समावेश आहे. पहिली की कुठल्यातरी गटाचा/कळपाचा आपण हा भाग आहोत, त्या गटाशी आपलं नातं आहे हे जाणवणं ही आपली अगदी मूलभूत गरज आहे. परिस्थितीनुसार आपण ते कळप बदलत असतो. पण (सर्वसामान्य माणूस) कळपाशिवाय राहू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे एका ठराविक मर्यादेबाहेर आपण त्या कळपामधे आहोत याची आपल्या जाणीव होत नाही. म्हणजे उदा. जर तो कळप ५००० (हि संख्या फक्त उदा. साठी) च्या पुढे गेला तर आपोआप त्या कळपाचे उपकळप होतात. त्यामुळे
त्याला अभिमान म्हणा काहीही म्हणा पण जितका कळप मोठा, तितकी उपकळपाची भावना जास्त प्रबळ. आजही प्रामुख्याने हिंदी बोलणार्‍या राज्यात जाऊन पहा. मी भोजपुरी आहे, मी बिहारी आहे अशा भावना नष्ट झाल्या नाहीत. प्रामुख्याने ख्रिस्ती असणार्‍या अमेरिकन समाजात मी कॅथॉलिक आहे, मी प्रॉटेस्टंट आहे, मी इव्हेंजलीकल आहे, मी बॉर्न अगेन आहे, मी युनायटेड मेथॉडीस्ट आहे हे चालूच आहे. त्यामुळे सगळे इंग्रजी बोलायला लागले, जरी अगदी मराठी भाषा नष्ट झाली तरी आपण मराठी आहोत किंवा महाराष्ट्राचे आहोत ही भावना नष्ट होणार नाही.

२. अर्थ एव प्रधानः
हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. किंवा वरचा मुद्दा १ नेहमीच का खरा ठरत नाही, सगळेच उपकळप टिकून का रहात नाही याचं हे कारण.
२-१) इस्त्रायल या देशात ९९% लोकांना ईंग्रजी चांगली बोलता येते. प्रत्यक्ष इस्त्रायलमधे गेलात तर हिब्रू भाषेचा अभिमान म्हणून हिब्रूतच बोला असे अजिबात दिसत नाही. पण म्हणून हिब्रू मेली नाही. हिब्रू टिकून आहे कारण त्यांना संस्कृतीचा नक्कीच अभिमान आहे पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहेत. तिथल्या ग्राहकांपर्यत पोहोचण्यासाठी त्या भाषेशी / संस्कुतीशी निगडीत परस्परावलंबी पर्यावरण संस्था निर्माण झाली आहे जी भाषा टिकून ठेवते आहे.
२-२) अमेरीकेत सरसकट इंग्रजी बोलली जाते. स्पॅनीश बोलणारे आर्थिकदॄष्टया गरीब आहेत. लाखो लोक बेकायदेशीरपणे रहातात. इतकेच नाहि तर आपण स्पॅनीशच बोलत राहिलो तर गरीबच राहू, त्यासाठी इंग्रजी बोलले पाहिजे याची त्यांना जाणीव होते आहे. पण काही वर्षांपूर्वी जनगणनेत असा शोध लागला की स्पॅनीश बोलणारे ज्या प्रमाणात वाढताहेत, त्यामुळे काही वर्षांनी ती मुख्य भाषा असणार आहे. सहाजिकच बाजारपेठेला एक मोठा ग्राहकवर्ग दिसायला लागला आणि स्पॅनीश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या भाषेवर आधारीत टिव्हि , रेडीयो चॅनेल्स इत्यादी परस्परावलंबी पर्यावरण संस्था निर्माण झाली, जी पुन्हा स्पॅनीश टिकून ठेवायला मदत करते.
२-३) मराठी बोलणारे ७-८ कोटी लोक आहेत. जितके लोक इटालियन बोलतात त्यापेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. युरोपात इतक्या आजुबाजुला विविध भाषांची आक्रमणे होत असतानाही इटालियन टिकून आहे. मराठी भाषिकांकडे पैसा आल्यावर, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजारपेठेला मराठीची जास्त आवश्यकता वाटू लागली. मग टीव्ही चॅनल, त्यांच्यामधल्या स्पर्धा, गाण्याचे कार्यक्रम या "बाजारूकरणामुळेच" अधिकाधिक मराठी व्यक्तींना रोजगार उपलब्ध होऊ लागला. चांगली मराठी बोलता येणे ही आवश्यकता असणारे व्यवसाय तयार होत गेले. मराठी चित्रपटांमधे पैसे आहेत हे कळाल्यावर जास्त मराठी चित्रपट तयार होत आहेत, पाहिले जात आहेत. थोडक्यात धंदा म्हणून "मराठी" वाढते आहे. आणि हे स्वागतार्ह आहे. कारण ही "मराठी" फक्त काही समिक्षकांनी गौरवलेली साहित्यकृती नाही. तर अनेकांचा पोटापाण्याचा उद्द्योग आहे. मग भले ते रोजच्या व्यवहारात हिंदी का इंग्रजी का बोलत असेना. त्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी, जाहिरातींच्या जगात वेगळं दिसण्यासाठी का होईना, मराठीचा वाढता आधार घेतला जातो आहे.
२-३)हे मराठीचंच वेगळेपण किंवा मोठेपण अजिबात नाही. किंवा बेफिकीर यांचा मुद्दाच वेगळ्या बाजूने मांडतो. हे त्या त्या प्रदेशात रहाणार्‍या संवादाचे माध्यम आहे. पण त्यामुळेच त्या त्या प्रदेशांमधल्या ग्राहकांपर्यंत जास्त प्रभावीपणे जाण्यासाठी स्थानिक भाषा बाजारपेठेला जास्त महत्वाची वाटू लागली आहे. भारतातल्या प्रसारमाध्यमातल्या कुठल्याही कॉन्फरन्सला हा मुद्दा नेहमी निघतो. इंग्रजी जाहिराती आणि त्यामुळे संपर्क होऊ शकणारे फक्त शहरी भागातले ग्राहक यांच्या तुलनेत स्थानिक जाहिराती आणि शहराबाहेर रहाणारे, आता नव्याने पैसे असणारे ग्राहक जास्त फायदेशीर ठरत आहेत. शहरी भागातसुधा , भाषेचा संस्कृतीचा उपयोग करून जास्त टार्गेटेड ग्राहकांपर्यंत जाणे आवश्यक होते आहे. थोडक्यात गेल्या १०-१२ वर्षात सगळयाच स्थानिक भाषांवर इंग्रजीचे आक्रमण होऊन सुद्धा, त्या भाषांची भरभराटच होते आहे. आणि या लाटेला मराठी कशी अपवाद असेल?
२-४) अमेरिकेत सगळीकडेच इंग्रजी बोलली जाते. पण पुन्हा त्या त्या राज्यातल्या स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी , तिथल्या स्थानिक संस्कृतीकडे लक्ष दिले जाते आणि जितका त्या संस्कृतीचा भाग ग्राहक निर्माण करून देतो तितकी ती संस्कृती टिकवणारी परस्परावलंबी पर्यावरण संस्था वाढत जाते. कधी कधी बाजारपेठेत चालत असेल तर मुद्दाम नसलेली संस्कृतीही तयार केली जाते. उदा Groundhog day

२-५)त्यामुळे मराठी संस्कृती आणि भाषा टिकून राहील याची मला नक्की खात्री आहे. उलट पैसे दिसायला लागल्यावर भूतकाळात गेलेल्या कित्येक रुढी पुन्हा परत येताना दिसतात. उदा. कितीतरी जुने "मराठी" दागिने मधे ऐकिवात नव्हते ते आता सरार्स मिळतात. काही मराठी प्रसिद्ध व्यक्तिंवर फारतर पूर्वी डॉक्यूमेंटरी निघाली असती. आता सिनेमा निघतो, तो भरपूर चालतो त्यावरून अजून १० सिनेमे काढायला लोकांना स्फूर्ती मिळते. जे "मराठी" विषय कालबाह्य झाले होते, ते पुन्हा जिवंत होतात आणि त्या संस्कृतीशी नातं सागणार्‍याला परत तो कोण आहे याची जाणीव करून देतात.

जोपर्यंत ७-८ कोटी लोकांपर्यत पोहोचण्यासाठी मराठी हे प्रभावी साधन असणार आहे (आणि त्या लोकांकडे खर्चासाठी पैसे आहेत) तोपर्यंत मला तरी मराठीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही.

संदर्भ:
1. "Television media: Regional content is preferred more by the Indian
viewers" Report on Vernacular content, Internet and Mobile Association of India, published in Sept 2010
2. "Over 70% internet users prefer to access the net in Indian languages, with English users at just 28%, down from 41% in 2007 ", India online 2008 report, Juxt Consult
3. "English is saturated. We are seeing more consumers from non metros and small towns and we can reach them only through local languages" Author's informal conversation with then CEO of MakemyTrip.com, IAMAI conference, 2007, Mumbai
4.Vernacular Content on The Web – Patterns, Capabilities and Barriers to Consumption Revealed by IAMAI, WATBLOG,
http://www.watblog.com/2009/01/09/vernacular-content-on-the-web-patterns...
5.Internet Untapped Success Lies In Villages & Local Languages, Minister of State for Communications and IT, Sachin Pilot,
http://www.watblog.com/2012/03/16/internet-untapped-success-lies-in-vill...
6. List of languages by number of native speakers
http://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers

प्रकार: 
शब्दखुणा: 

मर्यादित स्वरुपात पटले.
ना तुम्ही ना बेफिकिरांनी संख्यांचा, अभ्यासाचा आधार घेतला आहे. मुद्दे तुम्ही दोघंही काहीश्या भावनिकरित्या मांडताय. वरवर पटतेच. वास्तव इतके सोपे खचितच नाही.

रैना, वर लेखात माझ्या माहितीत असणारे संदर्भ दिले आहेत. हे संदर्भ जुने आहेत याची मला कल्पना आहे, पण लेखातली मते या काही संदर्भांवर आणि आकडेवारीवर उपलब्ध आहेत.

२०१० मधले TV Media बद्द्लचे विधान त्यावेळची वस्तुस्थिती सांगते. त्या आधी काही वर्षे दुसर्‍या एका संशोधनात ही माहिती उपलब्ध झाल्यावर, अनेक स्थानिक भाषांमधे नवीन चॅनेल निघाल्या.

सुंदर, वास्तव व समर्थनीय लेख आहे

धन्यवाद या आशा नष्ट न होऊ देणार्‍या संदेशासाठी

स्पॅनिश भाषेचे वाढलेले महत्व हा पॅरा फार आवडला

मला अजय ह्यांचे सगळे मुद्दे, उदाहरणे, विचार पटलेत. पहिल्यांदा मराठी भाषेचा विचार आर्थिक पातळीवर करताना पाहिला.

बेफिकीर,
माझा आकडा चुकला होता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. विकिपिडीया नुसार योग्य तो बदल केला आहे.

खरे सांगायचे तर पैशाचा प्रश्न नाही. उलट इंग्रजाळलेल्या मेट्रो सिटीतील घरांमधून मराठी ऐवजी इंग्रजी बोलली जाते. पण जरा बाहेर पडले, तर गावाकडे किंवा मध्यमवर्ग, निम्न वर्ग( केवळ आर्थिक बाबींवर आधारित) मराठी छान बोलली जाते. तिचे सर्व वैविध्य राखून. आणि त्या सर्वांना असे काय होणार वगैरे प्रश्न कुठे पडतात. वस्तुस्थिती इतकीही निराशाजनक नाही. जी मराठी ग्राहकवर्गासमोर मांडली जाते ती थोडी कृत्रीमच वाटते मला.

८ कोटी लोकांपैकी किती लोकं मराठी बोलतात- सगळे (असे आपण धरुन चालू)
वाचतात
लिहीतात?
शुद्ध लिहु शकतात. ? (मी नाहीये त्यात हे मला माहित आहे. खास लोकांच्या हुकमी पोस्टींचे कष्ट वाचावे म्हणून सांगीतले.)

किती लोकांच्या वापरात किती मराठी शब्द आहेत. दर दहा वर्षात यात किती बदल होतो आहे?
यापैकी किती लोकांच्या मुलांना मराठी बोलता, वाचता, लिहीता येते. दर दहा वर्षात यात किती बदल होतो आहे?

भाषा टिकुन आहे म्हणजे फक्त दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि एखादी अजून वाहिनी आणि थोडेफार menu/ applications याला असलाच तर मर्यादित अर्थ/फायदा आहे. हाँ याने थोडेसे ट्रिगर होऊन अजून काही काळ ती भाषा टिकायला मदत होईल हे मान्यच. प्रसारमाध्यमांचे थोडे महत्त्व आहेच.
ज्या जाहीरातींचा अनुवाद मराठीत होतोय तो अनुवाद इतका क्षीण असतो की हास्यास्पद या पातळीला जाऊन बसतो. अर्थकारण सपाटीकरण आणते आणि केवळ त्यासाठी का होईना भाषेचा वापर होतो, तो थोडाफार आणि जुजबी असतो. त्याचे महत्त्व आहेच पण ते आणि तेवढेच पुरेसे नाही. आणि तसा वापर झाल्याने भाषेला मोठे योगदान मिळाले असेही नाही.

आपण एकमेकांना मराठीतून ( हो र्‍हवदीर्घच्या चुकांसहित) पत्र/इमेल पाठवू शकतो. आपली मुलं?

जपानी भाषिकांमध्ये मुलांना जपानी न येणे हा फारसा मुद्दाच नसतो. मँडॅरिन्/कँटोनिज भाषिकांमध्येही. ते वापरत असलेले सगळे अ‍ॅप्लिकेशन्स (याला मराठीत काय म्हणतात) कांज्यांचे पर्याय देतात. कारण त्यांनाही आता मुळापासून कांज्या लिहीता येत नाहीत.

मी बर्‍याच दुसर्‍या पिढीतल्या जपानी अमेरिकनांसोबत, आणि चिनी अमेरिकनांसोबत काम केले आहे. हे नेहमी जाणवते की ते स्वतःच्या भाषेच्या उगमस्थानी, आईवडलांच्या देशात (country of origin) मध्ये आले की पुन्हा नव्या दमाने भाषा शिकायला सुरवात करतात. आणि त्यांना ती भाषा यावी किंवा ती विसरली जाऊ नये म्हणून त्यांच्या आईवडलांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. हे चांगले की वाईट याबाबतचा ठोस विचार अजून माझा झाला नाही. Ghettos मध्ये राहणार्‍या 'गोठलेल्या वाटा' असलेल्या परदेशस्थ भारतीयांबाबत विचार करताना, तेच इतर भाषिकांची आणि संस्कृतींचे वर्तन आहे हेही दिसते.

रैना, तुमचा मुद्दा मला कृपया स्पष्ट सांगाल का? मला खरंच समजलं नाही की मुद्दा काय. गैरसमज नसावा व हा प्रश्न उपरोध नव्हे.

बेफिकीर,
मुद्दा एवढाच आहे की
जोपर्यंत ७-८ कोटी लोकांपर्यत पोहोचण्यासाठी मराठी हे प्रभावी साधन असणार आहे (आणि त्या लोकांकडे खर्चासाठी पैसे आहेत) तोपर्यंत मला तरी मराठीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही. >> हा एक सोपा निष्कर्ष आहे. आणि हे फक्त पुढची ५-१० वर्षे लागू आहे. There is more to it than meets the eye. विष्लेषणासाठी विचारात घेतलेले घटक थोडेसे अपुरे आहेत.

तुम्ही मांडलेली वस्तुस्थितीही नाकारण्यासारखी नाही.

मराठी भाषेच्या भवितव्याविषयी लेख लिहीताना अजून व्यवस्थित बारकाईने आणि in-depth विष्लेषणाची अपेक्षा होती. At the gut feel level, मला तुमच्या दोघांचेही म्हणणे पटते आहेच.

रैना,

तुमचे म्हणणे गंभीर, धक्कादायक व पटणेबल आहे

पण असे वाटत आहे की असे होऊ नये वगैरे

पण मग तोच अभिमान किंवा 'उगाच माझी भाषा म्हणून माझे मराठीवर असलेले प्रेम' असे काहीसे होईल, जेही पटत नाही Sad

एकंदरीत, विषय क्लिष्ट होऊ लागलेला दिसत आहे आणि आता काहीतरी भरीव चर्चा होणार असे वाटत आहे

<<जोपर्यंत ७-८ कोटी लोकांपर्यत पोहोचण्यासाठी मराठी हे प्रभावी साधन असणार आहे >: म्हणजे काय? मराठी भाषा ही कोणत्या टप्प्यातल्या मराठी लोकांपर्यंत पोचण्याचे प्रभावी माध्यम आहे? ज्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी पर्यायी माध्यमे आहेत त्यांच्याबाबत मराठी हे प्रभावी माध्यम आहे का? अशांची संख्या वाढत जाणार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस मधून जोडीने लोकसत्ता वाचा, It is cool to read loksatta अशा प्रकारच्या जाहिराती यायच्या. दोन्ही वृत्तपत्रे घेतल्यास सवलतीचे आमिषही होते. या सगळ्याची गरज का पडली?
<त्या लोकांकडे पैसा आहे> आणि तो ते मराठीवर खर्च करतील? मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे इज नॉट हॅपनिंग, सो अनकूल असे खाजगी एफेम चॅनेलवाल्यांसारखेच मराठी मंडळींनाही वाटत नसेल का?

मराठीचा आग्रह अमराठी भाषिकांपुरता, तोही मुठी वळायला मिळणार असतील तर, धरला की आपले कर्तव्य संपले अशी मानसिकता नाही का? मला अशीच मंडळी जागोजागी दिसताहेत.

महाराष्ट्रापासून दूर असताना असा भावनिक विचार करणे सोयीचे असेल, पण इथले वास्तव आणि भविष्यातले संकेत फारसे चांगले नाहीत.

>>दोन-तीन वर्षांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस मधून जोडीने लोकसत्ता वाचा, It is cool to read loksatta अशा प्रकारच्या जाहिराती यायच्या. दोन्ही वृत्तपत्रे घेतल्यास सवलतीचे आमिषही होते. या सगळ्याची गरज का पडली?

दोन्ही वृत्तपत्रे एकाच(एक्स्प्रेस) वृत्तसमूहाची आहेत. त्यामुळे एकमेकात अशा जाहीराती चालतातच. अर्थकारण हीच गरज.

DNA हे इंग्रजी वृत्तपत्र सुद्धा अत्यंत सवलतीत विकत घ्या वर्षाचे पैसे भरून असं सांगत मागे अनेक फिरत्या विक्रेत्यांनी वात आणला होता. इंग्रजी वृत्तपत्र असूनही "गरज" पडलीच ना? Happy

DNA हे नवे वृत्तपत्र आहे. लोकसत्ता नाही. त्या जाहिराती नव्या पिढीला आकृष्ट करण्यासाठी होत्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचा आधार घ्यावा लागला. कुठे आहे मराठी माध्यमांचा प्रभाव?

>>त्या जाहिराती नव्या पिढीला आकृष्ट करण्यासाठी होत्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचा आधार घ्यावा लागला.

अहो, दोन्ही वृत्तपत्रे एकाच(एक्स्प्रेस) वृत्तसमूहाची आहेत. त्यामुळे एकमेकात अशा जाहीराती चालतातच.
हीच जाहीरात वृत्तसमूहाबाहेरच्या एखाद्या इंग्रजी वृत्तपत्रात केली असती तर गोष्ट वेगळी होती.

आजच्या घडीला लोकसत्ता हे सर्वाधिक खपाचे मराठि दैनिक आहे. जाहीरातीची गरज सगळ्यांनाच भासते.

आशावादी लेख आहे. मला बेफीचा जास्त संयुक्तीक वाटला - भाषा मेल्याने काहिही होणार नाही. सगळ्याच मरताहेत. इंग्रजी तरी कोणाला येते? Its cool to read loksatta? आजच स्ट्रंक अँड व्हाईटची लेटेस्ट आवृत्ती पहात होतो. व्हाईट म्हणतो की 'ईमेल ला साजेसे नियम त्याच्याजवळ (सुद्धा) नाहीत'. सगळेच दळणवळण जास्त व्हिजुअल, डेटा रीच होते आहे. लोकांमधे असतांना आय-फोनवर खेळणे सुरु असते. कोण्याएका गोष्टीत म्हंटल्याप्रमाणे प्रत्येक जण एका कुपीतच राहुन सर्व कार्ये करत जाईल - कुणाला भेटायची गरज नाही, 'बोलायची' गरज नाही. ते होईल तेंव्हा होईल. Until then lets enjoy मराठी and whatever else we can.

तसे होई पर्यंत आपण मराठी भाषेचा आनंद घेऊ या आणि इतरही काही जे अजून अनुभवता येणे शक्य आहे?!

मी विदर्भातला आहे. मी दरवेळी भारतभेटीत अनेक शाळेत जाऊन एक चक्कर मारतो. तिथल्या मुलांना What is your name? च्या पलिकडे जाऊन What are your hobbies? असे सोपे प्रश्न जरी विचारले तर त्यांना तो प्रश्न कळत नाही आणि मग उत्तर द्यायची गोष्ट तर दुरचं आहे. मराठी भाषेतून मात्र ती मुल उत्तरे देतात. उलट त्यांचे कमालिचे कच्चे ईंग्रजी पाहून (हो यात ईंग्रजी माध्यमात शिकलेले मुले पण आलीत आणि मुली सुद्धा आल्यात) त्यांनी ईंग्रजी विषयावर अधिक लक्ष केंद्रीत करावे असे मी त्यांना सुचवले. मुलींचे ईंग्रजी चांगले असते असे मी खूपदा ऐकले पण कित्येक मुलींचे ईंग्रजी कच्चे असल्याचेही मी पाहिले आहे.

सांगण्याचे तात्पर्य हे की महाराष्ट्रात विदर्भात अजून चांगले मराठी (अर्थात वर्‍हाडी) बोलले जाते. ईंग्रजीची मात्र बोंब आहे. मला शाळा सोडून (१० वीची) पंधराएक वर्ष झाले. त्या मानाने माझे ईंग्रजी कच्चे नव्हते. आता ह्या नवीन पिढीचे ईंग्रजी जास्तच कच्चे वाटते आहे. तात्पर्य- नवीन पिढीला भाषेचा गंध राहिलेला नाही!

जो वर्ग नव्याने शिक्षण घेऊ लागलाय त्यांच्याच हाती सध्यातरी मराठी आहे.
असेच वर्गसंक्रमण होत राहील. त्यांची जागा अन्य कोणी घेतील.

अजय, उत्तम लेख. काही मुद्दे पटले.

१.. मुळात भाषा ही एक प्रवाही गोष्ट आहे. शंभर वर्षापूर्वी बोलली जाणारी मराठी आणि आजची मराठी यामधे फरक असणारच. तसंच अजून शंभर वर्षानी आजच्या भाषेत बदल होणारच. त्यामुळे आज मराठी मरत आहे असं रडण्यात काहीच अर्थ नाही. मराठीसाठी काही करायची इच्छाच असेल भाषेत होणारे बदल स्विकारणे जास्त गरजेचे.

२. आपण सध्या अत्यंत मजेदार जगात जगत आहोत. गेल्या हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीसमोर उभे ठाकले नसतील इतके मजेदार प्रश्न समस्या आणि त्यांची उत्तरे गेल्या काही वर्षात आपल्यासमोर उभे आहेत. कृषी संस्कृती, औद्योगिक संस्कृती यानी आपल्या जीवनामधे जितके झटपट बदल घडवून आणले नसतील तितके बदल आजच्या प्रसारमाध्यमांमधून झाले आहेत. त्यामुळे आज सर्वच प्रश्न ज्वलंत आणि ताबडतोब उत्तराच्या प्रतीक्षेत बसलेले दिसतात. Happy कोणे एके काळी एखादा जनसमूह जगामधे आपण बोलत असल्याखेरीज दुसरी भाषा अस्तित्वात आहे याची कसलीही चिंता न बाळगता जगू शकत होता. त्याला त्या बाबतीत कसलाही त्रास अभिमान अथवा कमीपणा वाटत नाही. माहितीच्या विस्फोटामधे आता तसे शक्य होत नाही. कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी "अस्तित्त्वावर घाला" हेच एक कारण असतं. त्यामुळे कळपाचे, उपकळप होतच राहतात. या उपकळपाशी आपापसात मारामारी होते इथवर ठिक आहे. पण हे उपकळप जेव्हा मुख्य कळपापासून विलग होऊन स्वतःचा वेगळा कळप तयार करू लागतात तेव्हा पूर्ण समाज व्यवस्थाच हादरून निघते. आणि सध्या हे फक्त मराठी-हिंदी किंबहुना भाषेमधेच घडत आहे असे नाही. प्रत्येक बाबतीत घडत आहे. व्यवसाय, जन्म, वंश, जात, रंग इतकंच काय पण आवडीनिवडीवरून देखील हे कळप वेगवेगळे होत असतात. एक मनुष्य यापैकी अनेक कळपाचा सदस्य असतो. त्या त्या वेळेनुसात त्या कळपाशी असलेली त्याची लॉयल्टी बदलत असते.

म्हणजे पूर्ण समाज वेगवेगळ्या बंद खोल्यामधे विभागला जात आहे का? तर याचं उत्तर नाही!!!

पुन्हा एकदा, कोणे एके काळी एखाद्या द्राविडी मुलीने काश्मिरी मुलाशी लग्न करणे ही गोष्टच अशक्यप्राय होती. आता सर्रास आंतरजातीय्/आंतर प्रांतीय इतकंच काय पण आंतरराष्ट्रीय विवाह होत आहेत. विवाहाचे उदाहरण मुद्दाम देत आहे कारण, संस्कृतीच्या मिश्रणासाठी याहून दुसरे चांगले नाही. यामुळे होतं काय की आपल्यापेक्षा विभिन्न संस्कृती असलेल्या दोन कुटुंबाच्या एकत्र येण्याने संस्कृतीची देवाण घेवाण तर होतेच त्याचबरोबर अजून एक वेगळीच संस्कृती उदयाला येते.

सध्या आपण या स्थित्यंतरामधे आहोत. आपल्या आजूबाजूला एवढे विविध प्रकारचे बदल घडत आहेत तेही इतक्या वेगाने की आता आपण या बदलांची नोंद ठेवणेच बंद केले आहे. टेलीफोनचा शोध कुणी लावला हे कुणीही सांगेल. पण व्हीडीओ कॉलिंगचा शोध कुणी लावला हे पटकन सांगता येइल का? Happy

या सर्व बदलानंतर नक्की काय होइल याची सध्या कुणालाच कल्पना नाही. अंदाज आणि थेअरीज मात्र भरपूर आहेत त्यापैकी एक सर्वाना मान्य असलेली थेअरी म्हणजे मार्शल मक्लुहानची ग्लोबल व्हिलेज थेअरी.

१९६४च्या Understanding Media या पुस्तकामधे मार्शलने काही आडाखे वर्तवले होते. इंटरनेट सर्वदूर होण्याआधीच त्याने हे पुस्तक प्र॑सिद्ध केले होते तरीत्याचे कित्येक अंदाज बरोबर आहेत. त्याच्या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यामधे एक मुद्दा होता ग्लोबल व्हिलेज अर्थात वैश्विक खेडे. हा शब्दप्रयोग सर्वात आधी या पुस्तकात वापरला गेलेला आहे
त्याच्या इतर मुद्द्यांबद्दल इथे लिहत बसत नाही. भाषेचा जो मुद्दा आहे त्याबद्दल तो म्हणतो की, यापुढे हळूहळू माहितीच्या प्रपातामुळे सर्वच भाषांचा वापर कमी कमी होत जाणार आहे. सर्वच जागतिक समाजाला समजण्यास सुलभ होणारी चित्रलिपी उदयाला येइल. दृकश्राव्य माध्यमांमुळे लेखन्-वाचन्-मनन्-चिंतन हे कमी होत येइल. त्याऐवजी इतर माध्यमे जास्तप्रमाणात वापरली जातील.

३. एवढे सर्व लिहिण्याचे कारण हेच की, भाषा मरण्याचा धोका फक्त एखाददुसर्‍या भाषेपुरता मर्यादित नसून सर्वच भाषाना आहे. पण ते मरण आज उद्या वर्षभरात होणार नाही. त्याबद्दल निश्चिंत राहू या.

भाषा हे संवादाचं माध्यम आहे. ज्या गोष्टीची जोवर युटिलिटी आहे, तोवर ती बदलत्या स्वरूपात का होईना टिकणारच; फुकाचा अभिमान किंवा गर्व-यापेक्षा तिची व्यवहारातली युटिलिटी ही भाषा टिकण्याच्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे- असा एक समान सूर अजय आणि बेफिकीर यांच्या लिखाणातून मला सापडला. बाकीचे मुद्दे थोडे वेगळे असले तरी.

अजयच्या '७-८ कोटी लोकांपर्यत पोहोचण्यासाठी मराठी' या मुद्द्याबद्दल आणि त्यावरच्या रैनेच्या प्रतिक्रियेबद्दल-

भाषा 'बोलणे' आणि 'लिहिणे' यांचं प्रयोजनच मुळात वेगवेगळं असावं. बोलण्यातून संदेश पोचवण्याचं प्रचंड मोठं व्यावहारिक काम पार पाडलं जातं. आपण मराठी मराठी भाषा म्हणतो, म्हणजे ती नक्की कुठची मराठी असते? शेकडो बोलीभाषा महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून बोलल्या जातात, आणि अजून शेकडो वर्षे बोलल्या जातील, बदलत्या स्वरूपात का होईना. आता बोलीभाषेत बदल घडला, शब्द बदलले, हेल बदलला, लहेजा बदलला तर ते नक्की कशामुळे होईल? कशाच्या बळावर आणि कशाच्या दडपणामुळे?- हा खरा कळीचा मुद्दा आहे. अभिमान आणि गर्व- हा तो 'फोर्स' असूच शकत नाही. क्वचित कुठे असला तर तो तात्पुरता असणार. मुळात 'युटिलिटी' या गोष्टीला माणुस हजारो वर्षांपासून शरण जात आला आहे. कुठचाही कार्यभाग साधण्यासाठी कमीत कमी कष्ट कसे करावे लागतील- हा विचार म्हणजे माणूसपणाचं लक्षण. आता हा विचार चुकीचा किंवा बरोबर असत नाही, तर तो 'योग्य' असतो.

आता जरा माध्यमे वापरत असलेल्या भाषेकडे वळू. 'क्या आपके टुथपेस्टमे नमक है?' याचं भाषांतर समजा 'काय आपल्या टुथपेस्टमध्ये नमक आहे?' असं. हे घाणेरडं भाषांतर अनेकांना खुपतं. एवढ्या छोट्या वाक्यात तीन भाषा. रचना चुकीची. टोन नाटकी ढंगातला. हे जरा टोकाचं झालं, यापेक्षा बरी भाषांतरंही रोज बघायला मिळतात. पण कशीही असली तरी, तरी तो विशिष्ट मेसेज ७-८ कोटी मराठी 'बोलणार्‍यां'पर्यंत 'पोचतो'. हे इतके कोटी लोक रोजच्या जीवनात खरं तर वर्‍हाडी, खानदेशी, अहिराणी, कोकणी आणि असंख्य निरनिराळ्या बोलीभाषा पोटभाषा स्थानिकभाषा बोलत असतात. या सार्‍या बोलीभाषा म्हणजे मराठी. माध्यमांची भाषा म्हणजे मराठी नव्हे. त्यांच्या मराठीचं त्यांनी धंदा वाढवण्याकरता अनुसरलेला बरावाईट मार्ग, एवढंच महत्व. माध्यमांनी तशी भाषा वापरली, म्हणुन काही लगेच शेकडो निरनिराळ्या भाषा रोजच्या व्यवहारात बोलणारे तमाम स्थानिक लोक माध्यमांची ती विचित्र भाषा बोलू लागत नाहीत. काही शब्द आणि शब्दप्रयोगांचं आक्रमण होतंच, पण त्यात व्यवहार सुकर करण्याचा, मराठीच्याच एखाद्या पोटभाषेशी किंवा वेगळ्या प्रकारच्या मराठीशी जुळवुन घेण्याचा प्रयत्न असतो. शेकडो स्थानिक भाषा आणि तिथलं समाजजीवन ही घट्ट वीण आहे. हे स्थानिक लोक आणि तिथलं रोजचं जगणं- हेच मराठी जिवंत ठेवतात. 'युटिलिटी' वाढवत असतात. आणि हीच 'युटिलिटी' भाषाही वाढवत असते. हे असं 'सिंबायोसिस' असतं तिथंच 'टिकणं' असतं. ते नसेल तर जे काय असेल ते आपोआप मरतं, आणि मेलेलंच बरं.

शहरांत, मेट्रोज् मध्ये वाढत चाललेल्या संख्येमुळे या बोलीभाषांचं, म्हणजे मराठीचं काय होणार हाही प्रश्न काही जण विचारतील. छोट्या शहरांत तर खेड्यांसारख्याच सर्रास स्थानिक भाषा वापरल्या जातात. मोठ्या शहरांतही अशीच सर्वांना समजेल अशी भाषा बोलली जाते- फक्त व्यवहार आणि रोजचं जगणं सोपे व्हावेत म्हणून. ही सो-कॉल्ड 'प्रमाण' भाषा नसते. पण ती 'प्रमाण' नसल्याने काडीचंही अडत नाही. प्रत्यक्षात अनेक दशके पुण्यामुंबईत राहिलेला वर्‍हाडी माणूस त्याची भाषा आणि लहेजा, ढंग विसरत नाही. त्या वर्‍हाडी भाषेतले काही शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि बोलण्याचा टोन, हेल हे सारं तो रोज शहरांची भाषा बनलेल्या अनेक वेळा सरमिसळ असलेल्या, अशुद्ध वाटणार्‍या शहरी मराठी भाषेत आणतो.

'लिहिणे' हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे. आणि भाषा टिकण्याच्या दृष्टीने त्याचं किती महत्व असेल, याबद्दल मला शंका आहे. या लिहिण्यात बोलीभाषांची सरमिसळ झाली की अशुद्धतेचा ठपका बसतो. व्याकरणाचे मुद्दे निघतात. 'प्रमाण भाषे'त लिहून साहित्यनिर्मिती हे देखील कुठच्याही समाजाच्या फक्त एका छोट्या भागानेच केलेलं असतं. विचारवंत, संत, उपदेशक, नेते यांनी समजा काही 'प्रमाण भाषे'त काही लिहिलं, तरी त्याचा उपयोग फक्त 'मेसेज पोचवणे' इतकाच असतो. पुन्हा 'युटिलिटी'. मुळात ते देत असलेले 'मेसेज्'च कुचकामी ठरले, तर ती भाषा 'प्रमाण' असो, 'शुद्ध' असो, 'अभिजात' असो की आणखी काही; त्या भाषेचा काहीच उपयोग नाही. अजयने म्हटल्याप्रमाणे साहित्यिक, समीक्षक, माध्यमे, विचारवंत, संत यांनी भाषा वापरण्यापेक्षा धंद्यातून, तथाकथित 'बाजारीकरणा'तून आणि सामान्य जगण्यातल्या तिच्या 'युटिलिटी'मधून ती भाषा बदलत्या स्वरूपात का होईना, जास्त चांगल्या पद्धतीने जिवंत राहील. आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्या मते कुठच्याही प्रगाढ अभ्यासाची, आकडेवारीची गरज नसावी.

---
लोकसत्ता फुकट वाटणं, जाहिराती करणं हे मंदारने म्हटल्याप्रमाणे जाहिरातीचा, धंद्याचा भाग आहे. प्रत्येक व्यावसायिक आपला व्यवसाय स्थिर झाला, की आपला ग्राहक नसलेल्या सेगमेंटमध्ये मार्केटिंग करून तिथेही आणखी काही ग्राहक मिळतात का हे बघत असतो. इथे तर एक्स्प्रेस वाचणारा आधीच त्यांचा ग्राहक आहेच. आपल्याच ग्रुपमधल्या दुसर्‍या उत्पादनाची ओळख ग्राहकाला करून देणे हा त्यामागे हेतू. ते नवं उत्पादनही तो ग्राहक वापरू लागला (म्हणजे लोकसत्त्ताही वाचू/बघू लागला), तर मग तो जास्तीचा फायदा.

Pages