संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

Submitted by निंबुडा on 10 May, 2012 - 05:09

संदर्भ - संयम आणि मोह

सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामधे
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

गुलमोहर: 

अहा......... खूप छान गं......... मनापासून आवडेश Happy

छान Happy

(अवांतर - या कवितेची लांबी जमेल तितकी कमी करून - अर्थ तोच ठेवून - बघता का?) Happy

(त्यातून अल्पाक्षरीत्व साध्य व्हावे असे वाटते)

मुद्दा छान आहे ;मांडलातही सुंदर.................
बेफीन्चा प्रतिसादही पटला ..............विचार करायला हरकत नाहीये ..........

बेफिंशी सहमत.

प्रयत्न करायला हरकत नाही, अल्पाक्षरी ही तशी जोखमीची बाब आहे अर्थात इथे फक्त उंची थोडी कमी करता येईल का ते बघायचे आहे.

संजय कुलकर्णी(सान्जेय) नावाचे एक कवी आंतरजालावर उत्तम अल्पाक्षरी लिहीतात.

अरे व्वा!
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

कवितेच्या सुरुवातीला दिलेल्या लिंक वर ज्या २ कविता आहेत, मूळात त्या आधी सुचल्या होत्या. त्या लिहून झाल्यानंतर ही अष्टाक्षरी आपोआप जमली. आधीच्या कवितांमधलेच विचार जसे च्या तसे अष्टाक्षरीत जुळवावेसे वाटले म्हणून जरा लांबलचक झाली. यातले कुठलीही २ कडवी redundent वाटत नाहीयेत. त्यामुळे आशय तोच ठेवून लांबी कशी कमी करू प्रश्न पडलाय!

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची

.......................:)

अशी चाले निरंतर
खेळी संयम-मोहाची
कधी मोहाची सरशी
कधी जीत संयमाची ... मस्त मस्त मस्त... आवडलीच ही अष्टाक्षरी..